नवीन वर्ष सुरू होऊन १२ दिवस झालेही. वाचकहो, तुमचे संकल्प ‘जिवंत’ आहेत ना? खरं तर कामात वारंवार दिरंगाई होत राहणं, कंटाळा येणं, हा सगळ्यांना येणारा अनुभव. असं का होतं, यामागे ठोस शास्त्रीय कारणं आहेत. मेंदूला न थकवता कामाला लावलं, ‘माइंडफुल’ राहिलो, तर मात्र संकल्प पूर्ण होतील. कसे ते सांगणारा, थांबलेल्यांसाठी ‘रीस्टार्ट’ करायला लावणारा लेख.
वाचकहो, नवीन वर्ष सुरू झालंही. तुमच्या संकल्पांचं काय? की ठरवलेलं प्रत्यक्षात येत नाही म्हणून तसे निर्धार करणंच बंद केलं होतं? केलेले संकल्प प्रत्यक्षात का येत नाहीत, याची काही कारणं विज्ञानाला समजली आहेत. ती समजून घेऊन त्यावर उपाययोजना केली, तर आपण निश्चित केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येतील यात शंका नाही. आयुष्य आपलं आहे, आपण ते केव्हाही नव्यानं सुरू करू शकतो..
हेही वाचा – निद्रानाशाच्या विळख्यात..
आपल्या मेंदूचा थकवा हे आपल्या दिरंगाईचं, बुद्धीनं ठरवलेला संकल्प कृतीत न येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मेंदूला थकवा येऊ द्यायचा नाही, असं ठरवलं आणि त्यानुसार काही छोटे बदल तुमच्या वागण्यात केलेत, तर तुमचं आयुष्य तुमच्या हातात राहील. नवीन झेप घेणं शक्य होईल. संकल्प म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी बदलण्याचा एक उपाय असतो. रोज शारीरिक व्यायाम करायचा, गोड खाणं कमी करायचं, डायरी लिहायची, सोशल मीडियावर कमी राहायचं.. हे सगळं बुद्धीला पटलेलं असतं. मात्र असा कोणताही निर्धार केला, तरी ती सवय बदलण्यासाठी सातत्यानं स्वत:वर काम करावं लागतं. बुद्धीला मान्य असली तरी नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट करण्यासाठी मेंदूला अधिक ऊर्जा लागते. मेंदू थकलेला असेल, म्हणजेच त्याच्याकडे पुरेशी ऊर्जा नसेल, त्या वेळी तो नेहमीचा, सवयीचा मार्ग निवडतो. त्याचमुळे आपण जे बदल करायचे ठरवलेले असतात, त्यावर लगेच ‘आज नको, उद्या करू या’ असे विचार मनात येतात आणि माणूस दिरंगाई करू लागतो. जे काही बदलायचं ठरवलेलं असतं ते करत नाही, उद्यावर ढकलतो. ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ या पुस्तकात नोबेल पारितोषिक विजेते डॉ. डॅनियल केनमान (Daniel Kahneman) यांनी याविषयी केलेले अनेक प्रयोग सविस्तर लिहिले आहेत. काही माणसांनी गोड खाणं कमी करायचं, नैसर्गिक अन्न-फळं अधिक खायची असं ठरवलेलं असतं. पण दिवसभर मेंदूला थकवा आणणारं काम केल्यानंतर संध्याकाळी त्यांच्यासमोर गोड केक आणि फळं ठेवली तर बहुसंख्य माणसं फळं न खाता केक खातात. मेंदू थकला असेल, तर सिगारेट ओढण्याचे किंवा टाइमपास म्हणून रील्स पाहण्याचे विचार तीव्र होतात. ‘स्लो थिंकिंग’- म्हणजे शांतपणे विचार करून, बुद्धीनं केलेला संकल्प असतो. मात्र मेंदू थकला असेल तर तो ‘फास्ट थिंकिंग’ करतो. म्हणजेच जुन्या सवयींनुसार विचार मनात येतात आणि तशीच कृती होते. संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या मेंदूला अधिक ऊर्जा लागते. तो थकला असेल, तर संकल्प प्रत्यक्षात येत नाही, हेच अशा अनेक प्रयोगांतून स्पष्ट होत आहे. माणूस रोजच्या सवयींनुसार वागतो, त्या वेळी मेंदूला ऊर्जा कमी लागते. हे केवळ खाण्यापिण्याबाबतच होतं असं नाही, तर वागण्या-बोलण्याच्या ज्या जुन्या सवयी असतात, त्यानुसारच माणसं मेंदू थकलेला असेल तर वागतात. मग संकल्प प्रत्यक्षात येत नाही, दिरंगाई होते. म्हणजेच संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मेंदूला अधिक थकवा न येऊ देणं आवश्यक आहे. काही छोट्या छोट्या गोष्टींनी ते करणं शक्य आहे.
मेंदूला थकवा कशामुळे येतो?
१. कोणतंही एकाच प्रकारचं काम बराच वेळ केलं की शरीर थकतं. तसंच विचार करण्याचं काम अधिक वेळ केलं की मेंदू थकतो.
२. कोणतीही भावना, विशेषत: राग, भीती, चिंता, उदासी, अशा त्रासदायक भावना मनात असतात, त्या वेळी मेंदू वेगानं थकतो.
३. मेंदूत विचारांची अनेक दालनं एकाच वेळी उघडी असतील तरीही मेंदू थकतो. एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागल्या, म्हणजेच ‘मल्टीटास्किंग’ करावं लागलं, तर मेंदूला अधिक ऊर्जा लागते आणि तो लवकर थकतो.
विचार निर्माण करणं हेच मेंदूचं काम आहे. सर्व प्राण्यांच्या मनात विचार येतात. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचं आकलन होतं, एखादा आवाज ऐकू येतो, एखादी व्यक्ती बोलतेय ते ऐकू येतं. होणाऱ्या आकलनानुसार प्राणी कृती करतात. पण अन्य प्राणी जे करू शकत नाहीत, त्या अनेक गोष्टी माणूस करू शकतो. माणूस भविष्यातील संकटांचा विचार करून त्यावर उपाययोजना करू शकतो. जे प्रत्यक्षात नाही त्याची कल्पना करू शकतो. विचार करण्याची ही क्षमता माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. मात्र विचार करताना माणसाच्या मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. आजची बहुसंख्य कामं ही विचार करण्याचीच असतात आणि त्याचमुळे मेंदू अधिक थकतो.
बौद्धिक काम केल्यानं आलेला मेंदूचा थकवा आणि त्यामुळे आलेला कंटाळा दूर करण्यासाठी माणसं समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) जातात, मेसेज वाचतात, व्हिडीओ पाहतात, पण त्यामुळे मेंदूचा थकवा दूर होत नाही. कारण त्याला पुन्हा नवीन मिळणाऱ्या माहितीवर काम करावं लागत असतंच.
थकवा दूर करण्यासाठी काय करायचं?
१. बौद्धिक कामासाठी दर तासातली ५८ मिनिटं द्यायची. कारण विचार करणं आवश्यक आहेच. पण साठ मिनिटांतील उरलेली दोन मिनिटं मेंदूतल्या विचार करणाऱ्या भागाला विश्रांती द्यायची. ही दोन मिनिटं विचार करायचा नाही. तेव्हा पाणी पिणं, स्नायू ताणणं-अर्थात आळोखेपिळोखे देऊन स्ट्रेचिंग करणं, सावकाश चालणं, पाठीला उजव्या-डाव्या बाजूला वळवणं, अशी एखादी शारीरिक कृती करायची. तेव्हा त्या कृतीकडे, त्या वेळी होणाऱ्या शरीराच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं. वर्तमान क्षणात शरीराकडे लक्ष दिलं की त्या वेळी माणूस विचार करू शकत नाही. म्हणजे त्या वेळी त्याच्या मनात विचार येत राहतील, पण त्यावर विचार करणं तो थांबवू शकतो. यालाच सजग कृती- ‘माइंडफुल अॅक्टिव्हिटी’ म्हणतात.
विचार येणं आणि विचार करणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. बऱ्याच माणसांनी याचा अनुभव घेतलेला नसतो. विचार येतो आणि त्यावर माणूस लगेच विचार करू लागतो. मात्र वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित केलं की विचार करणं थांबतं. त्या वेळी मनात असतात ते आपोआप आलेले विचार असतात. मेंदूला थकवा येऊ द्यायचा नसेल तर तासात दोन मिनिटं तरी विचार करणं थांबवणं आवश्यक. शारीरिक हालचाली करून त्यावर लक्ष देण्याच्या नियमित सरावानं ते शक्य होतं.
मेंदूला थकवा येण्याचं दुसरं कारण म्हणजे मेंदूत एकाच वेळी अनेक फाइल्स चालू राहणं! किंवा एखादी फाइल खूप अधिक प्रभावी राहणं. आपला मेंदू माहिती मिळवत असतो. त्या माहितीवर प्रक्रिया करत असतो. त्याच वेळी काही आठवणी येतात, उद्या काय करायचं आहे याचे विचार येतात. हे विचार म्हणजे एकेक फाइल असते. कोणतीही भावना- म्हणजे राग, चिंता, उदासी मनात असेल, तर मेंदूतली ती फाइल प्रभावी असते, तीच अधिक ऊर्जा वापरत असते. त्यामुळे तेच ते विचार मनात खूप संख्येनं आणि वेगानं येत राहतात. स्मार्टफोनमधलं एखादं अॅप खूप सक्रिय राहिलं की मोबाईल कधी ‘स्लो’ होतो किंवा त्याची बॅटरी लवकर संपते. मोबाइलचा वेग मंदावला, की त्यातल्या काही फाइल्स बंद कराव्या लागतात. जे मोबाइल फोनचं किंवा कॉम्प्युटरचं होतं, तसंच आपल्या मेंदूचंही होतं. माणसाचा मेंदू हा ‘सुपर कॉम्प्युटर’ आहे, पण त्याचं काम चांगलं व्हायचं असेल तर त्याच्यातल्या फाइल्सदेखील काही वेळ बंद करायला शिकायला हवं. भावना म्हणजे मेंदूतली प्रभावी फाइल असते, त्यामुळे एकाच प्रकारचे विचार मनात येत राहतात. मनातल्या या विचारप्रवाहापासून अलग होऊन त्या वेळी त्या भावनेमुळे शरीरात जे बदल झालेले असतात त्यावर लक्ष दिलं आणि शरीरात, मनात जे घडतं आहे त्याचा काही वेळ स्वीकार केला की त्रासदायक भावनांची तीव्रता आणि कालावधी कमी होतो आणि मेंदूची ऊर्जा वाचते.
जेवढी माहिती माणूस घेतो, तेवढ्या फाइल्स तो मेंदूत नव्यानं तयार करतो. नवीन तंत्रज्ञानामुळे मेंदूला आपण खूप अधिक माहिती देत आहोत. पूर्वीच्या माणसांना त्यांच्या आजूबाजूला जे काही घडत होतं त्याचीच माहिती मिळत होती. आज आपण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जे घडतं त्याचीही माहिती लगेच घेतो. अशी माहिती मिळणं चांगलं आहेच, पण कोणत्या विषयातली किती माहिती घ्यायची आणि किती लक्षात ठेवायची हे माणसांनी ठरवायला हवं. फोनमध्ये कोणते व्हिडीओ ठेवायचे आणि कोणते डीलिट करायचे, हे सजगतेनं ठरवावं लागतं. तसंच मेंदूत कोणत्या फाइल्स चालू ठेवायच्या आणि कोणत्या डीलिट करायच्या हे माणूस ठरवू शकतो. आपल्या मेंदूचं एक महत्त्वाचं काम म्हणजे मिळालेल्या अनुभवांच्या आधारावर वर्तमानात जे घडतंय त्यात काही धोका नाही ना हे ठरवणं असतं. मात्र सध्या त्याला खूप अधिक माहिती मिळते आहे. त्यामुळे तो त्याचं काम करताना गोंधळतो. प्रत्यक्षात फारसा धोका नसतानादेखील त्याला धोका आहे असं वाटतं. तो प्रतिक्रिया देत राहतो, त्यामुळे माणसाचा तणाव वाढतो आणि मेंदूतली ऊर्जा वाया जाते. ‘साक्षी ध्यान’- म्हणजे ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’नं मेंदूची अनावश्यक प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती बदलते. त्यामुळे त्रासदायक भावना निर्माण होणं कमी होतं.
हेही वाचा – सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद
मेंदू लवकर थकण्याचं आणखी एक कारण म्हणजे एकाच वेळी अनेक बौद्धिक कामं करावी लागणं. अशी कामं करताना मेंदूत एकाच वेळी अनेक फाइल्स चालू राहतात. शक्य असेल त्या वेळी मल्टीटास्किंग कमी करणं आणि मल्टीटास्किंग करावं लागत असेल तर त्यानंतर काही वेळ मेंदूला विश्रांती देणं आवश्यक असतं. त्या वेळी कोणतीही नवीन माहिती न घेता, विचार करणं थांबवून, मनात आणि शरीरात जे काही जाणवतं त्याचा पाच मिनिटं स्वीकार केला की ऊर्जा वाचते. फोनमधील ‘कॅशे’ फाइल्स डीलिट केल्या की बॅटरी अधिक चालते, तसंच मेंदूचंही आहे.
दिरंगाई टाळण्यासाठी आणि निर्धार केलेली कामं प्रत्यक्षात आणण्यासाठी या गोष्टी समजून घेऊन त्यांचा सराव करायला हवा. केवळ माहिती पुरेशी नाही. कारण माहिती घेणं म्हणजे मेंदूतल्या विचार करणाऱ्या भागाला काम देणं आहे. अधूनमधून त्या भागाला विश्रांती देण्यासाठी एक लेख वाचून झाला की वाचन थांबवायचं, शरीराचे स्नायू ताणायचे, आळोखेपिळोखे द्यायचे किंवा दहा पावलं चालायचं आणि त्या वेळी शरीरावर लक्ष द्यायचं.. दोन मिनिटं असं केलं की नंतर पुन्हा दुसरा लेख वाचायचा! असं करायला फार वेळ लागत नाही. याला केवळ सजगता लागते. दिवसभरात अधिकाधिक सजग राहण्याचं आपण ठरवलं आणि मेंदूला थकवा आणणाऱ्या गोष्टी कमी केल्या, तर मेंदूचा थकवा टाळता येईल आणि मग आपली दैनंदिन दिरंगाई, चालढकल नक्कीच कमी होईल. आणि हे नवीन वर्ष तुमच्या मनासारखं जाईल!
yashwel@gmail.com