मृदुला भाटकर
‘‘विधवा म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मला अगदी लहानपणी प्राथमिक शाळेत सहा-सात वर्षांची असल्यापासून माहिती होतं, पण या उत्तरामागचा नेमका अर्थ समजायला माझ्या वयाचं बासष्टावं वर्ष उजाडावं लागलं.’’
सकाळी ६ वाजता दचकून उठले.
‘‘जय गंगे भागीरथी! हर गंगे भागीरथी!
चिदानंद-शिव-सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती..’’
स्वप्नातही मला ‘गंगे-भागीरथी’चा जप ऐकू येतोय की काय? दोन मिनिटांनी लक्षात आलं, हे तर प्रसाद सावकार यांच्या स्पष्ट आणि सुमधुर आवाजातलं ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकातलं नाटय़गीत! सकाळीच शेजारच्या इमारतीतल्या घरात ‘अस्मिता वाहिनी’वर लागलेलं. विषय असा आहे, की काल रात्री ९ वाजता आमच्या गणेशनं त्याच्या मेहुण्याच्या शिवपूर बुद्रुक इथे होणाऱ्या लग्नाची पत्रिका दिली. पत्रिकेत निमंत्रक म्हणून त्याच्या आजीचं नाव लिहिलं होतं, ‘गं. भा. सखूबाई’. त्याला वाटलं, मला ‘गं. भा.’चा अर्थच माहिती नाही. तो म्हणाला, ‘‘आजी विधवा आहे. त्यामुळे तिच्या नावापुढे आमच्याकडे ‘गंगा भागीरथी’ लिहितात.’’ मी अर्थातच, ‘गं. भा.’बद्दल अजिबात अनभिज्ञ नव्हते.
मी चटदिशी दात घासून कामाच्या कागदांमधल्या माझ्या ऑर्डर्सचा गठ्ठा घेऊन तपासायला बसले, तर अक्षम्य चूक! मग मी माझ्या स्टेनोकडून झालेली चूक तातडीनं दुरुस्त केली. J. Smt. Mridula Bhatkar च्या आधी आवर्जून मी सगळीकडे J. G. B. Mridula Bhatkar करून टाकलं. (जस्टिस गंगा भागीरथी मृदुला भाटकर). मग मला बरं वाटलं. कोर्टात जाताना डोक्यात कामांचा कोलाहल चालू होता. कोर्टात गेल्या गेल्या खाली माझा सेक्रेटरी, विश्वनाथ यानं मला रिसीव्ह केलं. आम्ही चेंबरकडे निघालो. ‘‘Ladyship, Jamuna jumped very high and tried to catch the sparrow on the ladyshipls nameplate.’’ चेंबरच्या दरवाजाशीच बसलेल्या काळय़ा कुळकुळीत, पण पायात जणू पांढरे बूट-मोजे असलेल्या यमुनानं शेपटीचा गोंडा हलवून ‘म्यँव’ केलं. अत्यंत वेगात काम करणाऱ्या माझ्या सेक्रेटरीनं कौशल्यानं नावाच्या पाटीकडे माझी नजर वेधून घेतली, तर नावात बदल करून ‘J.G.B.’ हा योग्य शब्द रंगवून आणला होता.
‘‘Oh! Very efficient’’ असं म्हणून त्याच्याकडे प्रशंसेचा आणि काळय़ा कुळकुळीत यमुनेकडे प्रेमाचा कटाक्ष टाकून मी चेंबरमध्ये जाऊन तिला कॅटफूड दिलं. कोर्टातल्या कामकाजात शेवटचं प्रकरण नेमकं ‘हिंदूू कायद्यातील विधवेचा मालमत्तेतील अधिकार’ याबाबतचं होतं. ते ऐकताना आणि कायदा पाहताना मला मालमत्ता, अधिकार या बाबी फारच नगण्य आणि निरर्थक वाटू लागल्या. अचानक फक्त ‘विधवा’ या शब्दातच सर्व तरतुदींचा विशेष अर्थ आहे, असा धक्का बसावा तसा शोध लागला. यावर मी माझ्या कायद्याचं विश्लेषण करणाऱ्या बुद्धिमत्तेवर विलक्षण खूश होऊन ते प्रकरण उद्यावर ठेवून चेंबरमध्ये येऊन कोल्ड कॉफी मागवली. तेवढय़ात दोन अनोळखी सभ्य स्त्री-पुरुष विश्वनाथबरोबर अवतीर्ण झाले. विश्वनाथनं ओळख करून दिली, ‘‘आफ्रिकेतल्या लायबेरिया देशातले हे दोन न्यायमूर्ती आले आहेत.’’ विश्वनाथला म्हटलं, ‘‘कोल्ड कॉफीत आइस्क्रीमही घालून आण.’’
नमस्कार वगैरे झाले, तशी ती स्त्री न्यायमूर्ती मला म्हणाली, ‘‘मी आता दुसऱ्या जज्जकडे गेले होते. त्यांच्या पाटीवर नुसतंच ‘ ख’ होतं. तुझ्या पाटीवर तर ‘G.B.’ पण आहे. विशेष प्रोटोकॉल आहे का?’’ मी तिला कसं तरी ‘‘River Ganga, purity, sanctity’’ इत्यादी इत्यादी सांगितलं आणि समजावलं, ‘‘मी विधवा आहे. म्हणून मी पवित्र वगैरे वगैरे..’’ त्यावर इतका वेळ फक्त गप्प बसून बारीक नजरेनं निरीक्षण करणारे ते पुरुष न्यायमूर्ती म्हणाले, ‘‘Oh! How wonderful. I have lost my wife. I am too Vidhva. So, am I Ganga?’’ मी कपाळावर मनातल्या मनात हात मारून, ‘गंगा हे फक्त स्त्रीवचन असून तिला पुल्लिंगी करू शकत नाही,’ असं व्याकरणदृष्टय़ा बरोबर केलं. फार तर त्याला स्वत:ला ‘J. Himalaya’ किंवा ‘J. Sahyadri’ म्हणता येईल, असं सांगितलं. कोल्ड कॉफी पिऊन भारतीय कायद्यांबद्दल चर्चा करून ते गेले.
आज संध्याकाळी ६ वाजता एका लग्नाला जायचं होतं. निघाले. कार्यालयाच्या दरवाजावर पोहोचल्यावर आत प्रवेशद्वाराजवळ रांगेत उभ्या असलेल्या मुलींपैकी एकीनं मला भलामोठा मोगऱ्याचा गजरा माझ्या चिंगुल्या केसांसाठी दिला. दुसऱ्या मुलीनं हळद-कुंकू लावण्यासाठी बोटं कुयरीत बुडवली आणि मी सवयीनं मान पुढे केली. तेवढय़ात तिथल्या प्रौढ बाईनं, ‘‘अगं, यांना नाही. यांना फक्त अक्षता.’’ मी पुढे आलेली मान टुक्कन् मागे घेतली आणि अक्षतांसाठी हात पुढे केला. आत जाऊन दोन मिनिटं कुणीच ओळखीचं न दिसल्यामुळे गोंधळून इकडेतिकडे बघत तिथेच उभी राहिले. ‘‘अरे, भाटकर मॅडम. वा वा वा! या ना.’’ असं म्हणून एका सद्गृहस्थानं माझं स्वागत केलं. ‘‘अहो, आजकाल तुमच्या गाडय़ांना लाल दिवा नसतो ना. त्यामुळे लक्षातच आलं नाही की तुम्ही आलात ते! आमचे एक ‘लाल दिवे’वाले स्नेही नेहमी म्हणतात, आता रस्त्यावरून फिरताना आमच्या गाडय़ा लाल दिव्याशिवाय ‘विधवा’ स्त्रियांसारख्या दिसतात.. हा हा हा!’’
हे ऐकून मला वाटलं, की मीच गाडी आहे. आता ‘विधवा’ म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मला अगदी छोटेपणी- प्राथमिक शाळेत सहा-सात वर्षांची असल्यापासून माहिती होतं, पण या उत्तरामागचा नेमका अर्थ समजायला माझ्या वयाचं बासष्टावं वर्ष उजाडावं लागलं. तेवढय़ात मैत्रीण दिसली. मला हुश्शं झालं. लग्न लागलं. आम्हा दोघींनाही प्रचंड भूक लागली होती. खाण्याच्या टेबलांकडे मोर्चा वळवणार, तेवढय़ात पेढे वाटणाऱ्या बाई समोर आल्या. हातावर पेढा ठेवत म्हणाल्या, ‘‘मॅडम, खूप वाईट झालं रमेश भाटकरसाहेबांचं! ते गेल्यानंतर आज तुम्ही पहिल्यांदा भेटता आहात. अगदी ‘सॉरी’ वाटतं हं तुमच्याबद्दल! बरं, आता पेढा खा. खास ‘कंदी’ मागवला आहे.’’ आपोआप कसानुसा झालेला चेहरा मी कसा तरी दु:खी बनवला आणि पेढा मैत्रिणीला दिला. ती खुसफुसली, ‘‘नेहमीप्रमाणे तुला ‘तयार’ होण्याचा कंटाळा असल्यानं कोर्टाच्या पांढऱ्या साडीतच आलीस. त्यामुळे लोकांना बरं वाटतंय.’’
‘‘हो ना!’’ मी उगाचच माझ्या पांढऱ्या साडीवरून प्रेमानं हात फिरवून परत चेहरा पाडून जेवणाच्या भागाकडे वळले. म्हटलं, आता पांढरे पदार्थच घेतलेले बरे! मीठ पांढरं होतं. ते घेतलं. पांढरी खोबऱ्याची चटणी, दहीभात, कुरडई, पांढरी साबुदाण्याची चिकवडी. नशीब व्हॅनिला आइस्क्रीम होतं. बाहेर पडता पडता एक तरुण मुलगी तिच्या उंच ‘हेअर डू’मध्ये अडकलेलं मंगळसूत्र काढत होती. मी पटकन मदत करायला हात पुढे केला, तितक्याच वेगानं तो मागे घेतला आणि मैत्रिणीला म्हटलं, ‘‘तू कर. अगं, मी हात लावायला आणि ते तुटायला, म्हणजे वाढवायला एकच गाठ पडली आणि तिच्या नवऱ्याला काही झालं, तर अवलक्षण. असं उगीच नको.’’
मैत्रीण म्हणाली, ‘‘अगं, रमेश असतानासुद्धा ४० वर्षांत मंगळसूत्र तू कधी तरीच घालायचीस, कुंकूही असंच. मग आता का एवढं अशुभ वगैरे..’’
‘‘अगं, मला कळतंय चांगलंच, की प्रत्येक माणूस मरणारच! जगरहाटी! त्याचा किंवा तिचा हात सुटतोच कधी तरी. But you know public’’ (माझ्या मनात ‘गं. भा.’ मध्येच येऊन ‘भॉक्’ करत होतं, हे मी तिला कसं सांगू! उगाच कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ!)
घरी आले, तर दरवाजात ठोंब्या आणि मोमो वाट बघत होते. आल्यावर त्यांनी शेपूट हलवत ‘म्यँव’ केलं. मी टी.व्ही. सुरू केला. ‘सह्याद्री’ वाहिनीवर जुना काळा-पांढरा कार्यक्रम सुरू होता. मी बघत राहिले. काळा-पांढरा कार्यक्रम बहिणाबाई चौधरींवर, त्यांच्या कवितेवर लागला होता. बहिणाबाईंची कविता ती मुलगी म्हणत होती,
‘जरी फुटल्या बांगडय़ा,
मनगटी करतुत,
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत!
नका नका आयाबाया,
नका करू माझी कीव,
झालं माझं समाधान,
आता माझा मले जीव!’’
सगळय़ा तमाम ‘गं. भां.’ना फक्त ‘माणूस’ समजणाऱ्या या शहाण्या कवितेनं मी ‘गं. भा.’ला गुड नाइट करून ‘बाय’ केलं. घरी बेडवर पडल्या पडल्या समोरच्या फोटोतल्या रमेशच्या ओठांची मुरड जास्तच मिश्कील झालेली दिसली आणि पायाशी मुटकुळं करून माझ्याकडे पाहत झोपणाऱ्या ठोंब्याकडे पाहत पाहत मीही दिवस झोपेच्या अधीन केला..