डॉ. अल्बर्ट एलीस यांनी स्वत:मधल्या ‘चिंता’ आणि ‘भीती’ यांना हद्दपार करण्याऐवजी त्यांचं रूपांतर सावध काळजीमध्ये करण्याचा समजूतदारपणा आयुष्यभर जोपासला. चिंतेचा प्रभावी आणि विधायक उपयोग करून त्यांनी चिंतेशी नातं जोडलं आणि ‘चांगल्या चिंते’चा वारसा तयार केला.
जिवंत असताना जाळते ती ‘चिंता’ आणि मृत्यूनंतर जाळते ती ‘चिता’. दोहोंमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक. या अर्थाचा संस्कृत श्लोक तुम्ही अनेकदा ऐकला-वाचला असेल. ‘चिंता’ या भावनेची दाहकता सांगताना मीही हा संदर्भ द्यायचो. अलीकडे मात्र मी माझ्या संवादातून चिंतेबद्दलचे आधीच असलेले पूर्वग्रह वाढवत नाही. कारण या भावनेकडे पाहायचा माझा दृष्टिकोन, शास्त्रीय पुरावे आणि प्रत्यक्ष रुग्ण अनुभव यामुळे बदलत चालला आहे.
कोणतेही बाह्य कारण नसताना अचानक एखाद्या मध्यमवयीन आणि निरोगी व्यक्तीला पहाटे अचानक घाम फुटतो, नाडीचे ठोके जलद होतात, श्वासाला त्रास, जिवाची घुसमट, पोटात अॅसिडिटी, स्नायू ताणल्यामुळे येणारी अंगदुखी-डोकेदुखी, सारं काही अस्पष्ट दिसू लागणारी ‘चक्कर’ असे हे सारे चित्र असते. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्या व्यक्तीला आणलं जातं. हृदयाच्या तपासण्या सामान्य, एक चिंताविरोधी गोळी दिल्यावर पडणारा आराम, रक्त तपासण्या आणि शरीराची तपासणी अगदी आजाररहित. ‘‘शारीरिक कारण तर काही दिसत नाही, तुमच्या त्रासाचं,’’ डॉक्टर सांगतात, ‘‘परत त्रास झाला तर मात्र इको कार्डिओग्राम, सीटी स्कॅन, एमआरआय वगैरे करावं लागेल…’’ सावरणारी नाडी परत चढते. ‘‘तसं झालं तर ताबडतोब या…’’ डॉक्टर संवादाचा शेवट करतात. तणावविरोधी गोळीचा असर सुरू झाल्यानं लक्षणं चढत नाहीत, पण विचारांचा भुंगा सुरू होतो. दिलासा देण्यासाठीची डॉक्टरांची वाक्यं भविष्यातल्या त्रासाची नांदी ठरू शकतात.
काही ठिकाणी, पहिल्या अनुभवातच पुढचे चार-पाच दिवस त्या व्यक्तीला थेट अतिदक्षता विभागात दाखल करून तपासण्यांचे सर्व सोपस्कार होतात. ‘एमआरआय’ करताना त्या चिंचोळ्या गुहेमधून जाण्याने आणखीनच एका भीतीची भर पडते. पुन्हा त्रास झाला तर डॉक्टर आणि रुग्णालये बदलतात. कहाणीचा तोच अंक पुन्हा लिहिला जातो. या प्रवासादरम्यान ही व्यक्ती (मी अजूनही ‘रुग्ण’ असे नामकरण केलेले नाही.) मनोविकारतज्ज्ञांपर्यंत पोहोचते कधी कधी. आम्ही मंडळी तत्परतेनं ‘पॅनिक डिसऑर्डर’ किंवा ‘जनरलाईज्ड अॅनझायटी डिसऑर्डर’ असे शिक्के मारून औषधे लिहितो. ‘आजार’ झाला आहे असं निदान पक्कं होतं….शरीराचा नाही, पण मनाचा. ‘आता या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागणार की काय?’ अशी चिंता भेडसवायला लागते. गोळ्या घेतल्यामुळे लक्षणांमध्ये आराम पडलाय हेसुद्धा नाकारता येत नाही. स्वत:च्या आरोग्याबद्दलचा विश्वास हरवायला लागला की निरोगी जीवनशैलीकडे नेणाऱ्या सवयींची स्फूर्ती कमी होते. जे ही चूक करत नाहीत ते सावरतात.
तर मग चिंतेकडे पाहायचं तरी कसं? हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. आपलीच एक पूर्वज, संध्याकाळच्या वेळी पाणी आणायला पाणवठ्यावर गेली होती. पाणी भरताना तिच्या लक्षात आलं की, दूरवर एक काळी आकृती तिला पाहते आहे. पाणवठ्यावर आलेला सिंह होता तो. क्षणाचाही विचार न करता ती पाठी वळून सुसाट पळत सुटली. अनुभव असा होता की, ‘क्षणभराची उसंत करते जीवनाचा अंत.’
आदिमानवाला जीवशास्त्रीय धोक्यांपासून वाचवणाऱ्या जनुकांना अशा प्रत्येक प्रसंगाबरोबर टिकण्याची म्हणजेच पुढच्या पिढीत जाण्याची शक्ती मिळत होती. अस्तित्वाला पोषक जनुकाचे पुढे पुढे जात राहणे ही इतकी जुनी प्रक्रिया. आजच्या जीवनात असे धोके कमी वेळा येतात, पण नक्की येऊ शकतात. मध्यरात्री स्टेशनवर, अगदी गर्दीमध्येसुद्धा. अन्य वेळी मात्र हा असतो ‘फायर अलार्म.’ उदाहरणादाखल वर्णन केलेलं आजच्या काळातलं अनिवार चिंतेचं आवर्तन म्हणजे, टोस्टरमधली पावाची स्लाईस जळल्यावर वाजणारा इशाऱ्याचा घणघणाट. आपल्या मनात दडलेला हा कार्यक्रम (म्हणजे प्रोग्रॅम) प्रत्यक्ष सिंहधोका नसतानाही जागृत होतो. त्यासाठीच्या त्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये प्रेरक घटक असतात. बहुतेक वेळा त्यात थेट जीवशास्त्रीय आव्हान नसतं, परंतु ‘फायर अलार्म’मध्ये इतका विवेक नसतो की सिलिंडर भडकला आहे, की टोस्ट जळला आहे ते समजावं. भीती ही मुळात अस्तित्वाच्या संरक्षणासाठीच्या एका व्यवस्थेशी जुळलेली भावना आहे. तिचा गोंधळ होतो तो ‘अडचण’ ओळखण्यात. मुलाखतीच्या आधी, परीक्षेच्या निकालाआधी, खेळातील सामन्याच्या रोमांचक क्षणी, प्रेमामधला होकार-नकार, ऑफिसमधली बढती… अशा अनेक बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक कारणांनी ही धोक्याची घंटा घणघणते.
कधी कधी अबोध मनामध्ये दडपल्या गेलेल्या संघर्षांमुळेही ही ‘भीती-इशारा-व्यवस्था’ अतिजागृत होते असंही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. व्यक्तिमत्त्वामध्येच कधी कधी भीतीबद्दलचं, जनुकीय हळवेपण (Genetic Vulnerability) असतं. अशा वेळी परिस्थिती खुशालीची असूनही ‘फॉल्स अलार्म’ वाजतो. म्हणजेच चिंतेच्या ताज्या, नुकत्याच घडलेल्या अनुभवाला (अटॅक हा शब्द नको त्या प्रतिमा दाखवतो) आपण खरं तर आजार (Disorder) न मानता कार्यकंपन (Dysfunction)का म्हणू नये?
अतिरिक्त चिंता असेल तर तेही कार्यकंपन आणि चिंतेचा अभाव असेल तेही तसंच! ‘चिंता’ आणि ‘भीती’ यांचं असं कमीचं कार्यकंपन पुरुषांमध्ये जास्त असतं. या व्यक्ती बेफाम, बेदरकार साहसे करतात. स्वत:ला हानी पोहोचवतात. व्यसनांचे प्रयोग करतात, नात्यांमध्ये समोरच्याचा आदर करत नाहीत. त्यांचा ‘फायर अलार्म’ न वाजण्याचीही शास्त्रीय कारणं आहेतच. पण ‘भीती-चिंता नियंत्रण’ व्यवस्था सर्वांच्या मेंदूमध्ये असल्यानं त्याचं ‘मेंटेनन्स’ न झाल्यानंही कधी व्यवस्था बिघडते. भावनिक नियोजनाचं प्रशिक्षण म्हणजेच भावी बिघाडांचं प्रतिबंधन. त्यामध्ये भीती आणि चिंतेचे उच्चाटन अपेक्षितच नाही. भावनिक परिपक्वतेचं प्रशिक्षण देणाऱ्या काही व्यवस्था प्रत्येक संस्कृतीमध्ये होत्या आणि आहेत. त्या परंपरांची सांगड आता विज्ञानाशी घालणं गरजेचं आहे. कारण जगातील सुमारे ३० टक्के लोकसंख्येमध्ये अतिरिक्त चिंतेचं आवर्तन (झटका नव्हे) जीवनात केव्हा ना केव्हा तरी होतंच. या पुराव्यामुळे, आपण चिंतेचा ‘आजार’ करू नये या मताला पुष्टीच मिळते. जगातील सुमारे ५० टक्के लोकांना सर्वांसमोर उभं राहून सादरीकरण करण्याची भीती असते, अशी एक व्यापक पाहणी म्हणते. काही जणांवर ही वेळच येत नाही, काही अशा वेळा चुकवतात तर काही निभावूनही नेतात.
कार्यकंपनातून काही जण ‘आजार’ या तीव्रतेकडे जातात का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. मात्र ‘अधिकृत निदान नोंदणी व्यवस्था’ (Diagnostic System) असा ठळक भेद करत नाही. ती ‘डिसऑर्डर’ वा तो ‘विकार’ हा घोष सोडत नाही. समायोजन विकार (Adjustment Disorder) नावाचं लेबल ही व्यवस्था कार्यकंपनाला देते. पण मनआरोग्यतज्ज्ञाला त्या व्यक्तीशी सखोल चर्चा करून त्याला ‘रुग्ण’ म्हणावं का हे निश्चित ठरवता येते. आणि ‘रुग्णपण’ अंगी आलं तरीही चिंता वाढवण्याचं कारण नाही. आधुनिक औषधोपचार पद्धती आज ‘सवय’ न लावणाऱ्या गोळ्यांचा उपयोग करू शकते. मानसोपचारांची उपलब्धता हळूहळू वाढते आहे. पण स्वाध्यायाचा सगळ्यात जास्त फायदा कुठे होत असेल तर तो या ‘चिंताजाला’मध्ये. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी उपलब्ध प्रशिक्षण साहित्य वाचून पचवले, वर्तनामध्ये कणाकणानं कणखरपणा आणला, भावनांची जाण विस्तारली आणि आपली ‘अलार्म सिस्टीम’ अद्यायावत केली.
भीती (Fear) आणि चिंता (Anxiety) हे शब्द समानार्थी नाहीत. ते एकमेकांत मिसळलेले आहेत. त्यांचं विभाजन कसं करायचं यावर शास्त्रज्ञांचं एकमत नाही. सिंहाची वाटते ती ‘भीती’. कारण संभाव्य परिणाम सीमित असतात. तो हल्ला करेल किंवा नाही करणार. पृथ्वीचं भविष्यात काय होईल याची चिंता. कारण तिथे अनेक शक्यतांचे आगर आहे. जीवशास्त्रीय आव्हान असेल तर भीती आणि मनोसामाजिक असेल तर चिंता असंही एक मत आहे. ‘माझ्या तब्येतीचं काय होणार’ या चिंतेतूनच मला हृदयरोग झाला तर, ही भीती जन्म घेऊ शकते.
‘ Worry’ नावाचा आणखी एक शब्द आहे. त्याला ‘भविष्यभ्रांती’ असं म्हणता येईल. भविष्यात घडू शकणाऱ्या अनेक शक्यतांपैकी नेमक्या मारक, त्रासदायक शक्यता उचलायच्या आणि सतत उजळणी करून त्यांना स्वत:च्या मनात ‘खात्री’ या पातळीवर न्यायचं. ‘कॉलेजला पोहोचलास की मेसेज कर.’ असं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पालकानं म्हणणं योग्य असेल. पण दोन वर्षं प्रवासाचा अनुभव असतानाही दोन फोन, तीन निरोप, देवापुढे दिवा, मनात नवस, येता-जाता नामजप असं करणं म्हणजे ‘भविष्यभ्रांती’.
तर मग ‘उपयुक्त’ अशी चिंता-भीती कोणती…आताच्या संवादासाठी आपण या भावनेला ‘काळजी’ असं म्हणू या. ही काळजी ‘घेण्याची’आहे आणि चिंतेमध्ये काळजी ‘करण्याची’ असते. अतिरिक्त चिंता म्हणजे परिणाम, निकाल, निष्पत्ती असा सर्व मुक्कामांचा विचार. काळजी (Concern) म्हणजे माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर तन्मय होऊन तरीही सावधपणे पुढं जाणं. तिथे प्रवास केंद्रस्थानी आहे मुक्काम नव्हे. प्रयत्नांना सर्वात जास्त महत्त्व आहे, मुक्कामाचं भान मात्र आहे. माझे प्रयत्न सर्व बाजूंनी फुलून कसे येतील ही ‘काळजी’ अशा वेळी मन घेतं. प्रक्रियेची गुणवत्ता खुलवत नेण्याची पराकाष्ठा करतं आणि त्यामुळे अंतिम फल लाभदायक होण्याची शक्यता उंच करत जाते. ‘कर्मयोगी दसपट फळ मिळवतो,’ असं विनोबा म्हणतात ते याच भूमिकेतून. फळाचा अट्टहास आला की चिंता बळावली, प्रवासातील समाधान मंदावलं. फळ अपेक्षेनुसार नाही मिळालं तर चिंतेचं रूपांतर औदासिन्यात आणि मिळालं तर अतिआत्मविश्वासाच्या धोक्याची शक्यता.
स्वत:मधल्या ‘चिंता’ आणि ‘भीती’ यांना हद्दपार करण्याऐवजी त्यांचं रूपांतर सावध काळजीमध्ये करण्याचा समजूतदारपणा ज्यांनी आयुष्यभर जोपासला ते डॉ. अल्बर्ट एलीस, वयाची ८० वर्षं पार केल्यावर लिहितात, ‘‘चिंतेकडे असलेला माझा स्वाभाविक कल आणि बालपणीचे अनेक आघात यामुळे भविष्याचा निरर्थक खल (Worry) करण्याची माझी वृत्ती समवयस्कांपेक्षा जास्त होती.’’ त्यांनी स्वत:वर केलेल्या प्रयोगांमधून पुढे विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धती जन्माला आली. चिंतेचा प्रभावी आणि विधायक उपयोग त्यांनी केला. ते लिहितात, ‘‘मी संभाव्य धोक्यांचं, अडचणींचं विदारक मानसचित्र आता क्वचितच रंगवतो. आपत्तीचं ‘महाभयंकरीकरण’ करत नाही. पण तरीही कधी कधी भविष्यभ्रांती कुरतडते मला. संभाव्य दाहक परिणाम कमी करण्याच्या योजना परिपूर्ण करताना मी बचत केलेला वेळ मात्र जातो… अशा वेळी एका बाजूने शांतही असतो आणि त्याच वेळी चिंताव्यग्रदेखील…यालाच निसर्गदत्त चिंता म्हणायचं का?…मला वाटतं, हो.’’ (पुस्तक, ऑल आऊट, पृ. ३७-३९).
डॉ. एलीस विवेकी आहेत. ते चिंतेचं उच्चाटन करत नाहीत. उपयुक्त आणि अतिरिक्त अशा तिच्या दोन्ही पैलूंचा समतोल गाठतात. चिंतेशी नातं जोडून कार्यरत जीवन जगतात आणि आपल्या सगळ्यांसाठी ‘चांगल्या चिंते’चा वारसा तयार करतात.