– निरंजन मेढेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही व्यक्ती जन्मत: खुनी किंवा बलात्कारी नसते. मग असे काय होते, की ज्यामुळे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर आणि बालकांवर लैंगिक अत्याचार करण्याची मानसिकता तयार होते? बलात्कारासारख्या गुन्ह्यात स्त्रियांवर क्रूर हिंसा करून त्यांची हत्या करण्याची विकृती वाढते? ‘पॉर्न’चे व्यसन आणि नशेचा अंमल यांचा यात वाटा किती असतो? स्त्रियांकडे बघण्याची दूषित प्रवृत्ती हे कशाचे द्याोतक आहे? अशा गुन्ह्यांसाठी समाज किती आणि कुटुंब व्यवस्था किती जबाबदार आहे? आदी प्रश्नांवर अनेक संशोधने, सर्वेक्षणे झाली आहेत. त्यावर आधारित हा लेख, या प्रश्नांवर तत्काळ कठोर उपाय करण्याचा गंभीर इशारा देणारा.

देशभरात स्त्रिया आणि बालकांवरील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, कायदे अधिक कठोर व्हायला हवेत, अशा मागण्या करत गेल्या काही दिवसांत तीव्र आंदोलने झाली. राज्य सरकारनेही परिपत्रक काढत सगळ्या शिक्षण संस्थांनी सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काढले, पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चाच होत नाहीये. ती म्हणजे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांची मानसिकता नेमकी कशी असते? कशी घडते? अत्याचार केल्यावर त्या स्त्रीला कायमचे संपवण्याचे क्रौर्य बलात्काऱ्यात येते कुठून? मनुष्य हा जन्मत:च गुन्हेगार नसतो तसाच तो बलात्कारीही नसतो. मग असं काय घडतं की, काही पुरुष हा अक्षम्य अपराध करायला धजावतात? या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा हा प्रयत्न.

मागील दशकात स्मार्टफोन्स अवतरल्यापासून ‘पॉर्नोग्राफिक कंटेण्ट’ एका क्लिकवर मुबलक उपलब्ध झाला आहे. ‘पॉर्न’चा आणि वाढत्या लैंगिक गुन्ह्यांचा थेट संबंध आहे का? यावर बोलताना सायकॉलॉजिस्ट डॉ. मीनू भोसले म्हणतात, ‘‘सतत ‘पॉर्न’ बघण्याची सवय असेल, तर कृत्रिमपणे लैंगिकदृष्ट्या उत्तेजित व्हायचे प्रमाण वाढते आणि काहीच दिवसांत त्याचे व्यसन लागते. ‘पॉर्न’चे व्यसन जडण्यात मेंदूत होणाऱ्या ‘न्यूरोप्लॅस्टिक’ बदलांचा मोठा वाटा असतो. मेंदूच्या कार्यप्रणालीत बदल झाल्याने ते बदल लवकरच वर्तनात डोकावू लागतात.’’

हेही वाचा – तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?

‘पॉर्न’मध्ये स्त्रियांचे चित्रण उपभोग्य वस्तू असेच केलेले असते. तसेच कितीही मनाविरुद्ध समागम केला, हिंसक वर्तन केले तरी पडद्यावरची स्त्री आनंदीच भासते. थोडक्यात, स्त्रियांना बळजबरी केलेली आवडते, पीडा दिलेली आवडते, असे हे पाहणाऱ्या पुरुषांच्या मनात ठसते. यासंदर्भात बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात, ‘‘इतर कुठल्याही व्यसनाप्रमाणे ‘पॉर्न’मध्येही त्या व्यसनाचा आनंद मिळावा यासाठी हळूहळू त्याचं प्रमाण, डोस वाढवावा लागतो. थोडक्यात, सुरुवातीला कुठलीही ‘पॉर्नोग्राफिक क्लिप’ बघून मेंदूत डोपामाइन हार्मोन स्रावतं. नंतर मात्र अधिक आक्रमक, हिंसक ‘पॉर्न’ बघितल्याशिवाय ते स्रावत नाही. ‘पॉर्न’बघणाऱ्या व्यक्तीची मानसिकता हळूहळू बदलायला लागते. ‘पॉर्न’मध्ये दाखवतात ते वास्तव नसून कल्पित आहे हे त्याला समजेनासं होतं. यातूनच मग प्रत्यक्ष जीवनात लैंगिक आगळीक, गुन्हे घडू शकतात.’’

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. रजत मित्रा यांनी २००० ते २००५ दरम्यान तिहार कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असलेल्या शेकडो कैद्यांच्या मुलाखती घेत त्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास केला. यासंदर्भात त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की, प्रत्येक कैद्यानं केलेल्या लैंगिक गुन्ह्याचं स्वरूप, त्यातली हिंसा वेगवेगळी असली, तरी त्यांच्यातला एक धागा समान होता. तो म्हणजे आपण गुन्हा केलाय हे मान्य करायला यापैकी कुणीही तयार नव्हतं. कारण जरी ते तुरुंगात असले, तरी काहीतरी ‘सेटलमेंट’ करून आपण यातून बाहेर पडू असा त्यांना विश्वास होता. या गुन्हेगारांमधलं आणखी एक साम्यस्थळ म्हणजे आपण केलेल्या कृत्याचा-गुन्ह्याचा कुणालाही यत्किंचितही पश्चात्ताप नव्हता. अगदी गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा भोगत असलेल्यांनाही आपण अजूनही बाहेर पडू असा विश्वास होता. हे निष्कर्ष खरंच धक्कादायक म्हणायला हवेत. गुन्हेगारांच्या या मानसिकतेला वस्तुस्थितीही कारणीभूत आहे, असं दिसतं.

बलात्कारासारख्या गुन्ह्यात स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचा मुद्दाही चर्चेत येतो. यावर बोलताना डॉ. मीनू सांगतात, ‘‘हिंसेचं समर्थन करणारी संस्कृती समजाच्या सर्वच वर्गात आहे. एखादं लहान मूल घरात वडील आईवर हात उचलताना बघतं. रात्री त्यांच्या खोलीतूनही आईच्या रडण्याचे आवाज येतात. दार बंद असलं, तरी वडील बळजबरी करताहेत हेही जाणवतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आई जणू काही घडलंच नाही असं वागत असते. वडिलांच्या हातात ती आनंदानं चहा देते. यावरून मुलींशी-बायकांशी असंच वागायचं असतं, अशा सारखी मतं त्या मुलांच्या मनात ठाम होत जातात. त्यामुळे लैंगिक गुन्हे रोखायचे असतील, तर केवळ कडक कायदे करून भागणार नाही. तर हिंसेचं समर्थन करणारं वर्तन बदलण्यासाठी समाजात, कुटुंबातही ठोस प्रयत्न व्हायला हवेत.’’

बलात्काराचे गुन्हे वाढण्यामागे त्याचे समर्थन करण्याची गुन्हेगारी मानसिकताही वाढतेय का, यासंदर्भात अमेरिकेत २०१५ मध्ये संशोधन झालं.
‘Sexual assault perpetrators justifications for their actions: Relationships to rape supportive attitudes, incident characteristics and future perpetration’ या संशोधन अहवालात पूर्वीच्या काही संशोधनांचा दाखला देत गुन्हेगारांकडून बलात्काराच्या समर्थनार्थ देण्यात येणाऱ्या कारणांची यादीच मांडण्यात आली आहे. उदा. स्त्रिया जेव्हा ‘नाही’ म्हणतात तेव्हा खरं तर त्यांना ‘हो’ सुचवायचं असतं. मद्यापान करणाऱ्या स्त्रिया कुणा परपुरुषासोबत अनोळखी ठिकाणी एकट्या जातात तेव्हा त्यांना बलात्कार झालेला चालणार असतो, कुणा स्त्रीनं प्रयत्न केला तर ती होत असलेला बलात्कार रोखू शकते, पण ती तसं करत नाही वगैरे. हे निष्कर्ष पूर्वीच्या संशोधनातील असल्यानं ते बुरसटलेले असतील असं म्हणावं तर अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अलीकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही त्यांनी याला दुजोरा दिला आहे. सर्वेक्षणात सहभागी ६३ टक्के विद्यार्थ्यांनी एखादी मुलगी फिरायला सोबत आली आणि तिच्यावर सेक्ससाठी बळजबरी केली, तर ते योग्य आहे असं म्हटलं. तर ४१ टक्के विद्यार्थ्यांच्या मते एखादी मुलगी मद्यापानाच्या प्रभावाखाली असताना तिच्यावर बलात्कार झाला तर तीही या घटनेसाठी तितकीच जबाबदार आहे.

अल्कोहोल आणि ड्रग्जचं सेवन करण्याचं प्रमाण अलीकडे झपाट्यानं वाढतंय. या गंभीर व्यसनांमुळेही लैंगिक गुन्हे वाढत आहेत का? यावर बोलताना सायकियाट्रिस्ट डॉ. अनुजा केळकर तुळणकर सांगतात, ‘‘दारू इतकंच गांजासेवन करण्याचं प्रमाणही नक्कीच वाढलंय. गांजा आणि इतर ड्रग्जचा थेट परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे वेगवेगळे भ्रमही होऊ शकतात. बलात्कारामागे वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं स्त्रियांविषयी आदर नसणं, कुठला तरी जुना राग मनात असणं, स्वत:ला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणून तो दुसऱ्या व्यक्तीलाही देणं, दुसऱ्याला पीडा देण्यात आनंद मिळणं. मनुष्य जेव्हा नशेच्या अमलाखाली असतो तेव्हा मनात ठाण मांडून बसलेल्या या विचारांची तीव्रता वाढून त्याच्याहातून गुन्हा घडू शकतो.’’

बलात्कारांचे प्रमाण खरोखर कमी करायचे असेल, तर सरकारनेही केवळ वरवरची मलमपट्टी करून आता चालणार नाही. लैंगिकतेच्या व्यापक विषयाकडे, लैंगिकता शिक्षणाकडे काणाडोळा करण्याचे धोरण आता परवडणारे नाही. बलात्काऱ्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणं, यासंदर्भातलं संशोधन वाढवणं, तसंच गुन्हा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणं आवश्यक आहे. अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येत्या काळात आणखी गंभीर होईल.

लहान मुलांकडे आकर्षित होणारे ‘पिडोफिलिक’

देशातील बाल लैंगिक अत्याचाराचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं पुण्यातील ‘केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर’मध्ये २०१५ मध्ये ‘ ‘ Program for primary prevention against sexual violence’ हा ‘पिडोफिलिया’वरील महत्त्वाचा असा देशातील पहिला प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली. ‘पिडोफिलिया’ हा मानसिक आजार असून, यामध्ये प्रौढ विशेषत: पुरुष हे लहान मुलांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात. जर्मनीमध्ये सेक्सॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट प्रा. डॉ. क्लाऊस बायर हे १५ वर्षांपासून जर्मनीत हा प्रकल्प राबवत आहेत. त्यांच्या सहकार्यानं पुण्यात हा प्रकल्प सुरू झाला.

केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. लैला गारडा या प्रकल्पाविषयी माहिती देताना म्हणाल्या, ‘‘पिडोफिलिया (Pedophilia psychiatric disorder) असलेल्या व्यक्तींच्या हातून वारंवार लैंगिक आगळीक, गुन्हा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपक्रमातून आपण बाल लैंगिक अत्याचारांविरोधातील प्रतिबंध बघतोय. एका पिडोफिलिक व्यक्तीला उपचार दिले तर त्याच्या शोषणाला बळी पडणाऱ्या संभाव्य दहा मुलांचे आयुष्य वाचू शकते. वास्तविक हा विषय नाजूक आहे. लैंगिकतेविषयक काम करणं आपल्या समाजात अजूनही अवघड आहे. पण या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाण अजूनही कमी असले, तरी येत्या काळात अशांना ते माहीत व्हावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्याबाहेरील रुग्णांना प्रत्यक्ष येऊन उपचार घेणं शक्य नसल्यानं एक ‘चॅट फोरम’ सुरू करत चॅटिंगद्वारे थेरपी देण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे.’’

बालकांवर अत्याचार करणारा प्रत्येक गुन्हेगार पिडोफिलिक नसतो, तर ४० टक्के गुन्हेगार हे ‘पिडोफिलिक’ असू शकतात, असे प्रकल्पातील (सीनिअर सोशल सायंटिस्ट) वर्षा चोळ यांनी नमूद केले. तसंच या केंद्रात मुलांविषयी कामुकतेचे विचार मनात येणाऱ्या प्रौढांवर उपचार केले जातात. कोणताही प्रत्यक्ष गुन्हा केलेल्या किंवा तुरुंगात असलेल्या गुन्हेगारावर उपचार केले जात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या हेल्पलाइनवर आतापर्यंत ४७५ व्यक्तींनी चौकशी केली आहे. याशिवाय ‘ट्रबल डिझायर’ या नावानं पिडोफिलिक व्यक्तींसाठी ‘सेल्फ हेल्प मॅनेजमेंट टूल’ विकसित करण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पोर्टलला आतापर्यंत देशभरातील साडेआठ हजार नागरिकांनी भेट दिली आहे.

हेही वाचा – स्वसंरक्षणार्थ…

पिडोफिलिक व्यक्तींचं समाजातील निश्चित प्रमाण किती आहे हे सांगता येत नाही, असे नमूद करत या प्रकल्पात सुरुवातीपासून सहभागी असलेले सायकियाट्रिस्ट डॉ. वासुदेव परळीकर म्हणाले, ‘‘साधारण पौगंडावस्थेत प्रवेश करताना व्यक्तीला ती पिडोफिलिक आहे हे उमगते. साधारण प्रत्येकाला समवयस्क भिन्नलिंगी किंवा समानलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण असते. पण अठराव्या किंवा विसाव्या वर्षीही जाणवलं की, आपल्याला बारा वर्षांचीच मुलगी किंवा मुलगा आवडतोय तर अशी व्यक्ती पिडोफिलिक असू शकते. उपचारांमध्ये ‘कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी’ (सीबीटी) तसेच मानसशास्त्रीय औषधे दिली जातात. उपचार घेण्याबरोबरच मोहाच्या ठिकाणांपासून आयुष्यभर दूर राहायला हवं, याचं प्रशिक्षण रुग्णांना दिलं जातं. या व्यक्तींनी ठरावीक व्यवसाय जसं की क्रीडा शिक्षक, पोहण्याचे प्रशिक्षक, शाळा वा अन्य ठिकाणंचही व्हॅन ड्रायव्हर होणं टाळायला हवं. पिडोफिलिक असणं हा गुन्हा नसून, हा आजार आहे. तो पूर्ण बरा होत नसला, तरी त्यावर उपचार घेऊन तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. मात्र पिडोफिलिया आहे म्हणून हातून गुन्हा घडला तर कायद्यातून सूट मिळत नाही.’’

niranjan@soundsgreat.in

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the mindset of a rapist how does it happen ssb