-डॉ. नंदू मुलमुले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गोष्टीत पात्रं तीन; मी- एक मानसतज्ज्ञ, दुसरा- ज्याला म्हणावी अशी कुठलीच समस्या नाही असा बाप आणि तिसरा म्हणजे त्यांना ती समस्या आहे असं मानणारा मुलगा- सोहम. हा पस्तिशी ओलांडलेला. ‘आयटी इंजिनीअर’. मुक्काम पोस्ट बंगळूरु.

बाप आप्पा- वय सत्तरीत. धुवट पण स्वच्छ धोतर, खादीचा फिकट बदामी सदरा, चेहरा उदास, शांत. वयोमानानुसार नैराश्यात ती उत्कटता राहात नाही हेच खरं!
‘‘सोहम म्हणाला, ‘आप्पा चला,’ म्हणून मी आलो. खरं म्हणजे मला विशेष काही त्रास नाही. झोप लागायला थोडा उशीर होतो एवढंच. बाकी जसं आहे तसंच आहे.’’ असं सांगत आप्पा बोटं दुमडून स्वस्थ बसले. आप्पांना बाहेर बसायची विनंती करून मी सोहमकडे मोर्चा वळवला. ‘‘काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या वडिलांच्या बोलण्यावरुन फार सिरियस काही दिसत नाही.’’

‘‘आता सिरियस नाही.. पण होऊ शकतं. आप्पांनी को-ऑपरेट केलं नाही तर.’’ ‘‘म्हणजे?’’
‘‘सांगतो,’’ सोहमनं पार्श्वभूमी सांगायला सुरुवात केली. ‘‘आमचं मूळ गाव पिंगळी, जिल्हा नगर. थोडी शेतीवाडी, त्यातच चार खोल्यांचं घर. आप्पा तिथेच शिक्षक होते, आता निवृत्त. दहा वर्षांपूर्वी आई हार्टअटॅकनं अचानक गेली. माझी बायको उत्तर भारतीय आहे. तीही नोकरी करते. आम्हाला एक मुलगी आहे. आम्ही बंगळूरुला सेटल झालो आहोत..’’ मुलाखतीला प्रथम आपला ‘सीव्ही’ देऊन ‘पॉज’ घ्यावा तसा तो थांबला. मग हलकेच त्यानं दुसरा गिअर टाकला. ‘‘चार वर्षांपूर्वी आप्पांना अचानक हृदयरोगाची समस्या उद्भवली. सुदैवानं ते माझ्याकडेच होते. लगेच आम्ही कार्डिअॅूक आयसीयू गाठलं, पेसमेकर टाकला. ‘व्हाइटफील्ड’ या बंगळूरुच्या प्राइम लोकॅलिटीत माझा तीन बेडरूमचा फ्लॅट आहे. आप्पांना स्वतंत्र खोली आहे. खाली सोसायटीत वॉकिंग ट्रॅक आहे, रिक्रीएशन हॉल आहे. सगळया अमेनिटीज् आहेत. मात्र आप्पा कंटाळले आहेत. त्यांना झोप येत नाही. दिवसभर उतरलेलं तोंड घेऊन बसतात. वीकेंड ट्रिपला चला म्हटलं तर येत नाहीत.’’ ‘‘आप्पांना काही मित्रमंडळी?’’ ‘‘आमची सोसायटी उत्साही आहे. दर महिन्याला कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रम होतात, पण आप्पा सहभागी होत नाहीत. त्यांच्या मित्रांचे फोन येतात, तेवढयापुरते चांगले बोलतात. शनिवार-रविवार आम्ही दोघंही घरी असतो, तेव्हा त्यांना बरं वाटतं. पण तेवढयापुरतंच. आणखी एक..’’ तो आठवून सांगू लागला. ‘‘काही बाबतींत ते निष्कारण रिजिड होत चालले आहेत. रविवारी आम्ही जेवणाऐवजी फक्त इडली-डोसा करतो. ते त्यांना चालत नाही. खाली उतरून खानावळीत जातात. त्यांना रोजच्यासारखा भात-भाजी-वरण-पोळीचा नैवेद्यच लागतो. नाहीतर अपसेट होतात. मग बायकोचा मूड जातो. तिला सुट्टीचा आराम हवा असतो. वीकेंड एन्जॉय केल्याची भावना येत नाही. ती म्हणते, ‘सोहम, तुम्हारे डॅड के प्रॉब्लेमसे मुझे दूर ही रखना। मुझसे वो खुश हैं या नही पता नहीं। अगर नाराज हैं तो आय कान्ट हेल्प इट।’ मला तिचं पटतं. आप्पांच्या वागणुकीचे सगळया जणांवर असे परिणाम होत राहतात.’’ ‘कॉर्पोरेट मीटिंग’चा अहवाल मांडावा, तसा सोहमनं आप्पांच्या वागणुकीचा अहवाल मांडला! त्याचं आणि तिचं खरंच होतं. नव्या ‘आयटी’ पिढीला आपल्या कामातून फुरसत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत- ‘ऑबसोलीट’ पिढीच्या ताण्याबाण्यात कशाला गुंतवायचं?

आणखी वाचा-सांधा बदलताना : जुडे वाद-संवाद तो हितकारी…

‘‘आप्पांना आपल्या पत्नीची आठवण येते का?’’ ताण-तणावाचं सगळयात महत्त्वाचं कारण घटस्फोट वा जोडीदाराचा मृत्यू हेच असतं, हे शास्त्रीय सत्य.
‘‘ते आईला मिस करतात; पण ते सध्या महत्त्वाचं वाटत नाही. त्यांच्या वयाच्या इतरही सिनिअर मित्रांनी आपल्या जोडीदार गमावल्या होत्याच,’’ कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास करणाऱ्या सोहमनं ओरिजिनल बुद्धी वापरत मुद्देसूद केस मांडली होती.

मी आप्पांना आत बोलावून घेतलं. सारं काही मुलाला विचारून मी परस्पर त्यांच्यावर निदानाचा शिक्का मारतोय असं वाटू नये म्हणून आश्वस्त केलं. ‘‘आप्पा, मला तुमच्याशी सविस्तर बोलायचंय, जाणून घ्यायचंय. पण आता आठ दिवसांच्या गोळया देतो. किमान तुमची झोप नियमित होईल आणि या समस्येचा स्वच्छ विचार करण्याचं मानसिक बळ येईल.’’ मी त्यांना स्वतंत्रपणे येण्याचं निमंत्रण दिलं.

नंतर जेव्हा आले तेव्हा आप्पा थोडे उल्हसित दिसत होते. ‘‘डॉक्टर, मागल्या खेपेला सोहम मला तुमच्याकडे घेऊन आला, तेव्हा.. खोटं कशाला बोलू, ‘हा डॉक्टर माझं दु:ख काय ओळखणार?’ असं वाटलं. पण तुमच्या एका भाषणाचा गोषवारा वाचला अन् वाटलं, तुम्हीच ओळखू शकाल माझी मन:स्थिती. ‘आयुष्याच्या बेरीज-वजाबाकीत हातची उरली संध्याकाळ जर समाधानाची नसेल, तर कशालाच अर्थ नाही,’ हे किती छान सांगितलं होतं तुम्ही डॉक्टर..’’

‘‘मग तुमची संध्याकाळ समाधानाची का नाही आप्पा?’’ ‘‘खरं सांगू डॉक्टर, मला समाधानच हवंय. पण ते कशात आहे, कोणाच्या आनंदात आहे, हे कळेनासं झालंय. दहा वर्षांपूर्वी ही गेली, तेव्हाच मी एकाकी झालो होतो. मात्र गावी मन गुंतवत होतो. दुष्काळी भाग तो; मात्र माणूस-माणुसकी समृद्ध! गरिबीत माणसाला माणुसकी हा एकमेव अलंकार उरतो. आणि खरं तर तेवढाच पुरेसा असतो. घरामागेच चार-दोन एकर शेती आहे. समोर अंगणात बाज टाकून बसलं की कोणी कोणी भेटायला यायचं, कुणी सरकारी कागद भरून मागायचं, कुणी घरगुती कुरबुरींवर सल्ले घ्यायचं. वयानं आलेला वडीलकीचा मान होता. एके दिवशी अचानक छातीत धडधडायला लागलं, बसल्या जागी घाम आला. सगळा गाव धावून आला. मग सोहम आला आणि नगरहून बंगळूरूला घेऊन आला. आशियात प्रसिद्ध हॉस्पिटल. सोहमच्या कंपनीचे तिथे आरक्षित बेड्स आहेत. उपचार झाला आणि घरी आलो. आज आठ महिने मी मुलाकडे आहे. प्रशस्त फ्लॅट, श्रीमंत सोसायटी. पण सगळया समृद्धीचं अप्रूप महिनाभरात ओसरून गेलं. मी माणसांचा भुकेला. इथे माणसं आहेत, पण मी त्यांच्यात समरस होऊ शकत नाही. साधा मास्तर माणूस मी. खाली जॉगिंग ट्रॅकवर भेटतात ती शेअर मार्केटवर बोलणारी माणसं. सूनबाईला मराठी येत नाही. संवादच होत नाही, पण त्यामुळे फार अडत नाही. मला मुलीसारखी ती, पण अंतर राहतंच. नातीची चिवचिव गोड. पण तिला शिस्त जरुरी, असं सूनबाईचं म्हणणं. त्यामुळे साडेतीन वर्षांच्या नातीचे लाड करता येत नाहीत. जिथे हातचं राखून वागावं लागतं, तिथे जीव रमत नाही. एखाद्-दोन दिवस ठीक. पण रोज? आयुष्य कसं जाईल?’’

आणखी वाचा-सांदीत सापडलेले.. ! दोन ध्रुवांवर दोन पिढ्या..

आप्पा थकल्यासारखे झाले. ‘‘सारखं गावी जावंसं वाटतं. तिथे जीव रमतो. मात्र डॉक्टर परवानगी देत नाहीत. काय करावं?’’ आप्पांनी सुस्कारा सोडला. ‘‘माझ्या काळजीपोटीच तो मला जाऊ देत नाही हे कळतं. पण अशा जगण्याला काय अर्थ आहे? जिथे मन रमत नाही तिथलं काहीच गमत नाही. हा त्यांच्यावरही अन्याय आहे. त्यांना वाटतं, इतकं करूनही आप्पा निराश का? पण काय करणार?’’
एव्हाना सोहम आप्पांना घेऊन जायला दवाखान्यात येऊन पोहोचला होता. मी त्याला आत बोलावलं आणि मी थेट मुद्दयावर आलो. ‘‘सोहम, कार्डिऑलॉजिस्टचं काय म्हणणं आहे? आप्पांना ‘इमर्जन्सी इंटरव्हेन्शन’ लागण्याची किती शक्यता आहे?’’
सोहमनं आप्पांकडे पाहिलं, तेव्हा ते समंजसपणे बाहेर गेले. ‘‘ही शुड बी विदिन रीच ऑफ कार्डिऑलॉजिस्ट, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता तुम्ही सांगा सर, हे गावाकडे गेले आणि काही झालं, तर माझी किती धावपळ होईल? बेटर ही स्टेज क्वाएट हिअर.’’
‘‘मन मारून? कार्डिऑलॉजिस्टनं सूचना देऊन टाकली, पण आप्पांच्या मनाचं काय?’’

‘‘पण सर, आप्पांना जाऊ दिलं आणि उद्या गरज पडली, वेळेवर मदत मिळाली नाही, तर सारे मलाच बोलतील. माझी बहीण तर आजही आईला वेळेवर सॉर्बिट्रेटची गोळी मिळाली नाही म्हणून खंत करते. मी रिस्क कशी घेऊ?’’
‘‘नैराश्य हा धोका वाढवत नाही का? डिप्रेशन डीलेज हीलिंग! त्याउपर मी एक प्रश्न विचारतो- या क्षणी आप्पांसाठी काय महत्त्वाचं आहे? आहेत ते दिवस आनंदात जगणं, की निराशेत कुढून अधिकाधिक दिवस काढणं? आप्पांचा आनंद महत्त्वाचा? की आपल्या प्रतिमेची जपणूक? वडिलांबद्दल प्रेम असतंच, पण त्या प्रेमाचा बहुअंशी उगम ‘माझ्या माथी दोष नको’ या सावधगिरीच्या भावनेत तर नाही? आप्पांना गावीच करमेल, ते जितके दिवस जगतील तिथे आनंदानं जगतील आणि तेच महत्त्वाचं आहे, या वास्तवाच्या सहज स्वीकाराऐवजी, ‘आम्ही त्यांना इथे काय कमी पडू देतो?’ या अहंकाराची भलामण तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याआड करत नाही ना?’’

आणखी वाचा-सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

सोहम आपण घेतलेल्या भूमिकेचं कडाडून समर्थन करेल अशी शक्यता होती, पण तो समंजस निघाला. ‘‘यातून मार्ग काय डॉक्टर? तुम्हीच सांगा प्लीज.’’ तो अगतिक झाला.

‘‘सोहम, मी न्यायाधीश नाही. मी ज्ञानाच्या, अनुभवाच्या आधारे फक्त सल्ला देतो, निर्णय नाही. निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. माणूस आपल्या मनाच्या समर्थनार्थ अनेक कारणं, संरक्षक भूमिका उभ्या करतो. काही अपरिपक्व, काही मनाला समाधान देणाऱ्या, समाजोपयोगी. परोपकार हा एक ‘मॅच्युअर डिफेन्स’. आप्पांचं गाव छोटं, जिल्ह्याच्या ठिकाणापासून पंचावन्न किमी अंतरावर. रस्ता ठीकठाक असेल, तर तासाभरात दवाखाना गाठता येईल. तू आईच्या स्मरणार्थ गावाला एक छोटी रुग्णवाहिका दान दे. ती घरासमोर उभी राहील. एका तरुणाला ड्रायव्हरचा रोजगार मिळेल. गावातल्या आजारी लोकांची सोय होईल आणि गरज पडू नये, पण पडली, तर आप्पांच्या कामी येईल. आपण वडिलांच्या इच्छेचा मान केला आणि आवश्यकता पडलीच तर सोयही केली याचं समाधान मिळेल!’’

सोहमनं ते समाधान मिळवल्याचा पुरावा मला काही दिवसातच पाठवला. आईच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका गावाला ‘डोनेट’ करतानाचा फोटो ‘इन्स्टाग्राम’वर ‘शेअर’ करून! शेजारी अभिमानानं उभ्या आप्पांना आता ‘अॅ न्टी डिप्रेसन्ट’ची गरज नाही, हे माझ्या लगेच लक्षात आलं.

nmmulmule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should a person choose in the end to live in happiness as much as possible or to be happy in living as much as possible mrj