पालक म्हणून मुलांवर माया असणं, त्यांची काळजी घेणं आणि काळजी वाटणं या गोष्टी नैसर्गिक आहेत, पण पालकांनी त्यांचं आयुष्य मुलांच्या काळजीनं पूर्णपणे व्यापून टाकणं, यासाठी मुलं मोठी झाल्यावरही त्यांची रात्रंदिवस सेवा करणं, हे कितपत योग्य आहे? मुलांना स्वावलंबी करणं हाही त्यांच्यावरील प्रेमाचाच भाग आहे, त्यासाठी पालकांनी काय करायला हवं?
संध्याकाळी गणपतीच्या आरतीला जेव्हा वैदेही आली तेव्हा ती थोडी लंगडत होती हे नीलाच्या लक्षात आलं, पण ती काही बोलली नाही. वैदेही देवासमोर नमस्कारासाठी वाकली तेव्हा उभं राहताना तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसली तेव्हा मात्र नीलाला राहवेना. वैदेहीला दंडाला धरून तिनं बाजूला घेतलं. तेव्हा वैदेही पुन्हा विव्हळली. नीलाने पटकन तिचा हात सोडला आणि विचारलं, ‘‘अगं काय झालं? कसं लागलं अंगभर?’’ हे ऐकताच वैदेहीचे डोळे भरून आले. मंडपाच्या बाहेर गेल्यावर ती म्हणाली, ‘‘अगं, सोहम परत रागावला आहे आणि तुला तर माहिती आहे एकदा तो रागावला की, कशामुळे ट्रिगर होईल सांगता येत नाही.’’
हे ऐकून नीलाचा चेहरा रागानं लाल झाला ती म्हणाली, ‘‘सोहम स्वभावानं अवघड आहे हे अख्ख्या सोसायटीला माहिती आहे. पण एक मुलगा आपल्या आईला मारतो, हे जरा जास्तच आहे असं नाही का वाटत? आणि मुख्य म्हणजे तू हे का सहन करतेस? आणि कशासाठी?’’ बोलावं की नाही याचा बराच वेळ विचार करून शेवटी वैदेही म्हणाली, ‘‘एवढं काही नाही गं त्यात. यावेळी नीलेश शिपवरून आला की मी त्याला सांगणार आहे की, रिटायर हो नाही तर जमिनीवरचा व्यवसाय कर. सोहमला बापाचा आधार पाहिजे.’’ इतका वेळ स्वत:वर ताबा ठेवून शांत राहिलेली नीला आता भडकली. ‘‘अगं वैदेही, १४ वर्षांचा मुलगा आईवर हात उगारतो हे भयानक आहे. असं नाही वाटत का तुला?’’
हेही वाचा : स्त्रियांचं नागरिक असणं!
‘‘नाही गं. तो मुळीच वाईट नाहीये स्वभावानं. थोडासा रागीट आहे एवढंच. वडिलांवर गेला असावा. नीलेश समोर असला की तो अगदी तोंडसुद्धा वर करत नाही. एकदा नीलेश शिपवर परत गेला की सोहम अगदी खुलतो. वयात यायला लागल्यामुळे, हार्मोनल चेंजेसमुळे काहीतरी प्रॉब्लेम होत असेल बहुधा. एकदा नीलेश आला की मी सोहमला डॉक्टरांकडे घेऊन जाते. आणि आवश्यक त्या टेस्ट करून एकदा योग्य ट्रीटमेंट झाली की सगळं लगेच ठीक होईल.’’
नीलाने डोळे वटारले, ‘‘हे बघ तुझी मैत्रीण आणि इतक्या वर्षांची शेजारी म्हणून सांगतेय. हे जे काय तुझ्या घरात चाललंय ना ते काही ठीक नाहीये. तू इतकी शिकलेली, मुलाकडे पूर्ण लक्ष देता आलं पाहिजे म्हणून नोकरी सोडून घरी थांबलीस. सगळ्यांना दिसतंय की, आई म्हणून तू कणभरसुद्धा कमी करत नाहीस. उलट जरा गरजेपेक्षा जास्तच सीरियसली आईपणा करत असतेस.’’
वैदेहीने नीलाचं वाक्य अर्धवट तोडलं आणि म्हणाली, ‘‘हे बघ माझ्या लहानपणी आई-बाबा दोघंही नोकरी करायचे. मी एकटी मुलगी होते. मी शाळेतून आले की शेजाऱ्यांकडून किल्ली घेऊन घर उघडायचे, माझं माझं जेवण करून घ्यायचे, परत घराला कुलूप लावून ट्युशनला जायचे. आल्यावर माझा माझा अभ्यास संपवायचे आणि परत एकदा दार बंद करून माझी माझीच खेळायला जायचे. मी परत यायचे तेव्हा कुठे आई-बाबा कामावरून परत आलेले असायचे. शनिवारी तर शाळा लवकर सुटली की, मी पूर्ण दिवस घरी एकटीच बसलेली असे. रेडिओ ऐक, टीव्ही बघ असं करत मी सगळं लहानपण काढलं. आजूबाजूला खेळायला कोणी नव्हतं आणि मला दुसऱ्या कोणाच्या घरी जायची परवानगीही नव्हती. रविवारी आई-बाबांचा मूड बरा असेल, तर कुठंतरी जाणार. नाहीतर ‘शाळा, ट्युशन आणि घर’ असं माझं जग होतं. मी सात वर्षांची असल्यापासून अशीच राहिले आहे. मी तर आई-बाबांना किती वेळा म्हणायचे की मला होस्टेलला पाठवा. पण मुलींसाठी होस्टेल ही सुरक्षित जागा नाही म्हणून त्यांनी मला कधी पाठवलं नाही. शेवटी बारावीनंतर बीएस्सी करायला मी घराबाहेर पडले तेव्हा पहिल्यांदा होस्टेलला गेले आणि किती मजा आली. भरपूर मैत्रिणी आणि दिवसभर कॉलेज. रात्री उशिरापर्यंत कोणाच्या तरी रूममध्ये बसायचो. पत्त्यांचा डाव टाकायचा नाहीतर गप्पा मारायच्या. किती मजा यायची. तेव्हाच मी ठरवून टाकलं होतं की, माझ्या मुलाला मी कधीही असं एकटं सोडणार नाही आणि मुळीच कंटाळू देणार नाही.’’
हेही वाचा : सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
‘‘अगं मुलाला एकटं सोडणं आणि दासी असल्यासारखी त्याची रात्रंदिवस सेवा करणं यात काही फरक आहे की नाही? तू एवढ्या मोठ्या मुलाला ताट वाढून देते. खरकटी ताट-वाटीसुद्धा उचलून ठेवते. त्याच्या बुटांना पॉलिश करतेस. कपड्यांना इस्त्री करतेस. त्याची शाळेची बॅगसुद्धा भरून ठेवतेस. परवाच बिल्डिंगमधल्या काही जणी म्हणत होत्या की, सोहमच्या व्हॉट्सअॅपवरून मुलांच्या ग्रुपमध्येसुद्धा उत्तरं तूच देत असतेस म्हणे! अगं मुलांना बरोबर कळतं की आई-बाबा लिहीत आहेत.’’
वैदेहीची मान खालीच होती. ती हळू आवाजात म्हणाली, ‘‘अगं मुलं ग्रुपवर काय वाटेल त्या चर्चा करतात. आपण लक्ष नको का ठेवायला. त्यांना थोडी दिशा नको का द्यायला? जर मुलांच्या हातून काही चुकीचं झालं तर आई म्हणून माझ्याकडे बोट नाही का दाखवलं जाणार? मी जर त्याच्यासाठी घरी थांबले आहे, तर ती अशा चुका होऊ नये म्हणूनच ना. हे वय किती अवघड असतं. किती चुका व्हायची शक्यता असते.’’
‘‘अगं वैदेही, मुलांच्या हातून मोठ्या चुका होऊ नयेत यासाठी थोडं दुरून लक्ष ठेवणं आणि त्यांची प्रत्येक गोष्ट स्वत:च मॅनेज करणं याच्यात काही फरक आहे की नाही? तुझ्या या अशा वागण्यामुळे सोहमला इतर मुलंसुद्धा टाळतात, कारण त्याच्याशी बोललेलं काहीही सिक्रेट राहत नाही. ते लगेच तुला कळतं आणि तू त्या त्या मुलांच्या आई-वडिलांशी लगेच फोन करून बोलतेस. त्यामुळे इतर मुलांनी आता सोहमलाच बाजूला टाकलाय. अशा प्रकारे एकटा पडलेला मुलगा दिवसभर घरी बसून काहीतरी कॉम्प्युटर गेम खेळत राहतो आणि तू त्याची सेवा करत बसते.’’
‘‘सेवा नाही गं. त्याला इतका अभ्यास असतो की, मी आपली माझ्या परीने होईल ती मदत करते. आजकाल इतका होमवर्क देतात की संपतच नाही आणि मग होमवर्क पूर्ण नाही झाला की डायरीमध्ये रिमार्क येतो.’’
हेही वाचा : स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
‘‘त्याला जसं जमेल तसं करेल तो. शिक्षक आणि सोहम बघून घेतील. तू जर अशी सतत त्याच्या मागे असशील तर ते पोरगं चिडचिड करणारच ना? कोणाला आवडेल असं सतत कोणीतरी लक्ष ठेवून असलेलं. तो छोटा होता तेव्हा त्यांनी हे कदाचित सगळं सहन केलं असेल. त्याला आवडलंसुद्धा असेल. इतर सगळ्यांपेक्षा आपली आई आपले खूप जास्त लाड करते, सारखी आपल्यावर लक्ष ठेवून असते. प्रत्येक गोष्टीमध्ये ती आपल्याबरोबर असते याची कदाचित लहान मुलांना गंमत असेल. पण एकदा मूल शाळेत जायला लागलं की, हे थांबायला नको का? आता तर तो इतका मोठा झालेला आहे ते बघता ही तुझी माया त्याच्या गळ्याशी येत असेल.’’
‘‘हे बघ थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा बारावी झाला की तो घराबाहेर पडेल. कॉलेजला जाईल. कदाचित वेगळ्या शहरातसुद्धा जाईल. मग मी कुठे असणार आहे त्याची काळजी घ्यायला? ’’
‘‘बघ वैदेही, आमची सगळ्यांची काळजी तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये. जेव्हा जेव्हा आपण सगळेजण भेटतो तेव्हा तू फक्त सोहम आणि त्याचं आयुष्य याबद्दलच बोलत असतेस. त्याची प्रत्येक गोष्ट तूच मॅनेज करतेस. अगदी मुलं शाळेच्या ट्रिपला जातात तेव्हासुद्धा काही ना काही कारणं काढून दिवसातून दहा वेळा फोन करणारी तू एकुलती एक आहेस. यामध्ये काहीतरी गंडलं आहे असं मला वाटतं. काळजी घेणं, काळजी असणं, काळजीनं वागणं हे सगळ्यांना समजतं, पण तुझं आयुष्य हे मुलाच्या काळजीनं पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. थोड्या वेळासाठी, काही अवघड प्रसंगांमध्ये मुलांची इतकी काळजी वाटणं हे साहजिक आहे, पण तुझ्या बाबतीत हे ‘खग्रास ग्रहण’ १४ वर्षं झालं तरी सुटायला तयार नाहीये. वर म्हणते आहेस की त्याची बारावी झाली की बघू! म्हणजे अजून पुढची तीन-चार वर्षं हे असंच चालू ठेवणार आहेस? सोहम कायमचा तिरस्कार करायला लागेल तुझा.’’
‘‘असू दे. त्याचं आयुष्य व्यवस्थित होणार असेल तर त्याला मी नाही आवडले तरी चालेल. शेवटी मी त्याची आईच आहे ना.’’
‘‘तुझ्या काळजीला तू माया आणि जबाबदारी म्हणतेस. मला एक सांग इतर कोणाला आजपर्यंत कधी मुलं झाली नाहीत का? बाकी कोणाची पोरं मोठी झाली नाहीत का? का बाकी कोणाला आजपर्यंत ‘पालकत्व’ जमलेलंच नाहीये? आणि काय गं, तू एवढा मोठा उपद्व्याप केल्यानंतर सोहम काय अटकेपार झेंडे लावतोय आणि देशासाठी सुवर्णपदके मिळवून आणतोय की त्याचे सारखे हात-पाय दाबून द्यायची गरज आहे? लहान लहान गोष्टींसाठी तो तुझ्यावर चिडचिड करतो. अत्यंत उद्धटपणे बोलतो. आपण चारचौघांत आहोत याचंसुद्धा त्याला भान नसतं आणि आता तर रागाच्या भरात त्यानं तुझ्यावर हात उचलला. या वाढत्या वयाच्या मुलाचा हात तुला किती इजा करून जातोय ते सगळ्यांना दिसतंच आहे. मला असं वाटतं की यावेळेस नीलेश आला की मीच त्याच्याशी बोलणार आहे. कारण तू प्रत्येक गोष्ट ही अगदी साखरपेरणी करून सांगतेस.’’
‘‘आई-वडिलांना आजकाल मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो असं आपण नेहमी म्हणतो, पण तुमच्या घरी काहीतरी वेगळंच चाललंय आणि हे सुरक्षित वाटत नाहीये. काहीतरी भयंकर घडायच्या आत याबद्दल व्यवस्थित उपाययोजना करायला पाहिजे.’’
हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
वैदेहीने खूप वेळानंतर मान वर करून बघितलं. ‘‘मैत्रीण म्हणून तू माझी इतकी काळजी करतेस. मला अशा गोष्टींची सवय नाही. सगळं काही स्वत:च करायचं. उगाच कोणाकडे मदत मागायला जायचं नाही असं मी लहानपणीच शिकले आहे. त्यामुळे उगाच नीलेशच्या डोक्याला कशाला त्रास? तो तिथे बोटीवर असताना याच गोष्टी त्याच्या डोक्यात राहिल्या तर त्याच्या हातून काहीतरी चुकायचे, अपघात व्हायचा, याचीसुद्धा मला काळजी वाटते. पण तू म्हणते तेही बरोबर आहे. ही सगळी माझी जबाबदारी असं समजण्यात काहीतरी चुकतंय. मी नीलेशशी बोलायचा प्रयत्न करेन, पण तू थांबशील ना माझ्याबरोबर म्हणजे उगाच त्याचापण गैरसमज होणार नाही?’’
आता नीलाचा चेहरा खुलला. ‘‘मी काय म्हणते, एकदा नीलेश आला की आपण सगळेजण जेवायला जाऊया. मग मोकळ्या, खेळत्या वातावरणात त्याच्याशी बोलून घेऊ. उद्यापासून रोज संध्याकाळी तू आपल्या ‘क्लब हाऊस’मध्ये आमच्या सगळ्यांबरोबर योगाच्या क्लाससाठी यायला सुरुवात कर. एकटी राहू नकोस. एकटी पडू नकोस. आपण सगळेजण मिळून हे सोडवू या. एकट्याच्याने करायच्या गोष्टी नाहीत या.’’
chaturang@expressindia.com