डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

जगात असा कुठलाच मनुष्य नाही, की ज्याच्या वर्तनावर कधीच टीका झाली नाही. थोडक्यात, आपल्या वर्तनावर टीका होणं हे मानवी जीवनातलं एक अटळ सत्य आहे. मात्र काही जणांच्या बाबतीत ‘लोक काय म्हणतील’ ही धास्ती इतकी मोठी होते, की त्यांचं मूळचं व्यक्तिमत्त्वच त्याखाली दबून जातं. वैयक्तिक पातळीवर काही तंत्रं वापरली तर टप्प्याटप्प्यानं या भीतीतून बाहेर येता येईल आणि त्याचा सहज स्वीकार करता येईल.

‘‘लोक काय म्हणतील’ ही भीती माझा सतत पाठलाग करत असते. शाळेत असताना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला माहीत असली तरी मी कधीच हात वर करत नसे. जर उत्तर चुकलं तर सगळे माझी टर उडवतील अशा भीतीची टांगती तलवार कायम माझ्या डोक्यावर असायची आणि आता महाविद्यालयात आल्यावरही ती तशीच आहे. माझी उंची कमी आहे. माझ्याकडे पाहून लोक हसतील अशी धास्ती मला सतत वाटत राहाते. समाजमाध्यमांवरच्या माझ्या पोस्टला इतरांनी प्रतिक्रिया दिली नाही किंवा प्रतिक्रियेला वेळ लावला की मला वाटतं इतरांना माझा मजकूर आवडला नसावा. मग मी अस्वस्थ होते. माझ्या मित्रमत्रिणींपकी कुणीही माझा फोन उचलला नाही तर मला वाटतं की ते मला टाळत आहेत. मग मी रात्रंदिवस बेचन राहाते.’’ तन्वी सांगते.

अभिषेक सांगतो, ‘‘ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या मदतीला मी सदैव तत्पर असतो. प्रसंगी स्वत:ची  गरसोय सोसूनही त्यांची कामं करतो. माझं बोलणं कुणाला नापसंत तर पडणार नाही ना, कुणी दुखावलं तर जाणार नाही ना, कुणी टीका तर करणार नाही ना, याचा सतत विचार करत राहातो. त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांच्या न आवडलेल्या विनोदालाही दाद देतो. त्यांना आवडलेल्या चित्रपटाची वाहवा करतो. पण एवढं सांभाळूनही काही जण  स्वत:ची कामं माझ्यावर ढकलतात. माझ्या गरजेच्या वेळी काही तरी कारण सांगून अंग काढून घेतात. तरीही मी त्यांना ‘नाही’ म्हणू शकत नाही. पण अशा एकतर्फी सहन करण्याचा मला त्रास होतो.’’

तन्वी आणि अभिषेक यांच्या अस्वस्थतेच्या मुळाशी आहे, ती इतरांच्या पसंतीची मानसिक गरज (‘नीड फॉर अप्रूव्हल’). आपलं वर्तन लोकांना पसंत पडलं नाही तर ते नावं ठेवतील किंवा टीका करतील, ही भीती या गरजेतून निर्माण झाली आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही गरज कमी-अधिक प्रमाणात असते. इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशा स्वाभाविक ओढीमुळे ते टीका करतील असं वर्तन आपण सहसा टाळतो. सामाजिक नीतीनियम किंवा चालीरीती पाळण्यात ही गरज मदतही करते. पण तन्वी आणि अभिषेकनं मात्र लोकांची पसंती अत्यावश्यक करून घेतली आहे. अत्यावश्यक करून घेणं म्हणजे अगतिक होणं. छोटय़ा-मोठय़ा निर्णयातही इतरांच्या पसंतीची मोहोर उमटलीच पाहिजे अशी अनिवार्यता निर्माण होणं.

लोकांच्या पसंतीची अत्यावश्यकता एकदा मनावर स्वार झाली की तिचे वेगवेगळे आविष्कार दिसतात. तन्वीप्रमाणे आपण सतत धास्तावलेले असतो, नाही तर इतर आपल्याबद्दल नकारात्मक विचार करत आहेत अशी अवास्तव कल्पनाचित्रं मनात रंगवतो. इतरांना खूश करण्याची अभिषेकची धडपड याच अत्यावश्यकतेतून निपजलेली आहे. इतरांना न दुखावण्यासाठी आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागतोय असं त्याला वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ते दुखावले गेले तर आपण त्यांच्या मर्जीतून उतरू अशी भीती त्यामागे आहे. त्यामुळे इतर त्याच्या सौजन्याचा गरफायदा घेत असले तरी त्यांना नाही म्हणण्याचं धर्य तो दाखवू शकत नाही. परिणामी तन्वी आणि अभिषेक इतरांची मानसिक गुलामगिरी पत्करतात, न्यूनगंड जोपासतात, निर्णयक्षमता हरवून बसतात आणि  स्वत:ची ओळख पुसून टाकून व्यक्तिमत्त्व नि:सत्त्व करतात.

लोकांच्या पसंतीची गरज आपल्याला का भासते याची अनेक स्पष्टीकरणं मानसशास्त्रज्ञ देतात. काहींच्या मते आदिमानव जेव्हा टोळ्यांमध्ये राहात होता, तेव्हा टोळीपासून दूर झालं तर शारीरिक धोका उद्भवत असे. त्यामुळे गटापासून वेगळं होणं म्हणजे असुरक्षितता, हे साहचर्य मेंदूत भक्कम झालं. मनुष्य प्रगत झाल्यावर शारीरिक धोका उरला नसला तरी मेंदूतल्या साहचर्यामुळे गटापेक्षा वेगळं करण्याच्या नुसत्या विचारानंही धोक्याची घंटा वाजते. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती याचाच परिपाक आहे.

काहींच्या मते जवळच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया ‘लोक काय म्हणतील’ या भीतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. इतर नावं ठेवतील असं वागायचं नाही किंवा चारचौघांत बरं दिसेल असंच वागलं पाहिजे, असं पालक वारंवार सांगत असतील तर इतरांच्या पसंतीची अनिवार्यता मुलांवर ठसली जाते. अनेकदा पालक मुलाचा स्वीकार सशर्त करतात. मूल जर त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत असेल तरच त्याच्यावर प्रेमाचा वर्षांव केला जातो. त्यांच्या पसंतीपेक्षा वेगळं वर्तन केलं तर आपण त्यांच्या प्रेमापासून वंचित राहू, या भीतीनं केवळ त्यांना आवडेल असंच वर्तन करण्याची सवय मुलांना लागते. हळूहळू प्रत्येक गोष्टीतच इतरांची पसंती अत्यावश्यक समजली जाते.

जर तन्वी आणि अभिषेकला ‘लोक काय म्हणतील’ या भीतीशी  मुकाबला करायचा असेल तर  पुढील विचार आणि तंत्रं त्यांना उपयोगी पडतील.

अवास्तवतेचं उच्चाटन- सर्व लोकांची मर्जी राखणं किंवा त्यांना खूश ठेवणं ही एक अवास्तव कल्पना आहे. तिला वास्तवाचा आधार नाही. आपण नक्की काय केलं की लोक खूश होतील याचं नेमकं उत्तर कुणापाशीच नाही. मानवी व्यवहारात असं कुठलंच वर्तन नाही, की ज्याची हमखास प्रशंसा केली जाते. सद्वर्तनावरही टीका होते. काहीच वर्तन केलं नाही तरीही टीका होते. जगात असा कुठलाच मनुष्य नाही, की ज्याच्या वर्तनावर कधीच टीका झाली नाही. थोडक्यात, आपल्या वर्तनावर टीका होणं हे मानवी जीवनातलं एक अटळ सत्य आहे. त्याचा स्वीकार तन्वी आणि अभिषेकनं केला तर टीका हमखास होणार नाही अशा वर्तनाच्या पाठी न पळता त्या टीकेला निर्भयतेनं तोंड द्यायला ते शिकतील.

भावनांचं आत्मनियंत्रण- तन्वी आणि अभिषेकनं स्वत:च्या भावनांचं नियंत्रण स्वत:कडे घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण लोक काय म्हणतील याचा अवाजवी विचार करतो, तेव्हा स्वत:च्या भावनांचं नियंत्रण लोकांकडे देतो. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियांप्रमाणे आपल्या भावना वर-खाली होत राहातात. इतरांनी कौतुक केलं तर आपण आनंदी होतो आणि टीका केली तर दु:खी होतो. परंतु हा आनंदही क्षणिक असतो, कारण त्याच वर्तनाबाबत इतर कुणी तरी टीकाही करतात. ती ऐकली की आपण दु:खी होतो. म्हणजेच जेव्हा आपण भावनांचं नियंत्रण लोकांच्या हातात देतो, तेव्हा दीर्घकाळ आनंदी राहाण्याची शक्यता गमावून बसतो. याच्या जोडीला प्रत्येक कृती करताना लोक ती पसंत करतील का याचीही चिंता भेडसावत राहाते किंवा एकदा पसंती मिळाली तरी पुढे ती मिळेल की नाही याची सततची टांगती तलवार डोक्यावर राहाते. परिणामी एखाद्या कृतीतल्या प्रक्रियेचा आनंद घेण्याऐवजी परिणामांवर लक्ष केंद्रित होतं. म्हणूनच तन्वी स्वत:ला पटेल ते बोलू शकत नाही किंवा अभिषेक स्वत:च्या आवडीनिवडी मोकळेपणानं व्यक्त करू शकत नाही.

लज्जा निवारण तंत्र- ‘लोक काय म्हणतील’ या भीतीनं अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाला तरुण वयात पछाडलं होतं. तिच्यावर मात करण्यासाठी त्यांनी एक तंत्र शोधून काढलं. त्याचं नाव आहे, ‘लज्जा निवारण तंत्र’. लोक टीका करतील अशा कृती त्यांनी शोधून काढल्या आणि त्या अमलात आणण्याचा सराव केला. उदाहरणार्थ, एक सराव असा होता, की वर्दळीच्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना विचारायचं, की मी आताच वेडय़ांच्या इस्पितळातून बाहेर आलो आहे. कृपया मला आजचा दिवस आणि वार सांगू शकता का, असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याचं मत आपल्याबद्दल चांगलं होणार नाही हे त्यांना माहीत होतं. पण प्रत्यक्ष हा सराव केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला वाटतं तेवढय़ा भीतीदायक नसतात. आपण मात्र या टीकेचं इतकं महाभयंकर चित्र डोळ्यांसमोर रंगवतो की नुसत्या कल्पनेनंच गर्भगळीत होतो. जेव्हा आपण प्रत्यक्ष टीकेला तोंड देतो तेव्हा ती परिस्थिती कल्पनेइतकी भयावह नसते आणि आपण ती सहनही करू शकतो. या तंत्राचा वापर केल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेची वाटणारी भीती कमी झाली. त्यांना कळलं, की ‘लोक काय म्हणतील’ हे लोकांऐवजी आपणच मनात म्हणत असतो. लज्जा निवारण तंत्राचा वापर करून स्वत:च्या कमी उंचीवर स्वत:च विनोद करून सगळ्यांना हसवण्याचा सराव तन्वी स्वत:साठी निवडू शकते. तसंच अभिषेकही सर्वानी नावाजलेल्या पण त्याला न आवडलेल्या चित्रपटावर टीका करण्याचा सराव निवडू शकतो.

अतिसंवेदनशीलतेला टाचणी- ‘लोक काय म्हणतील’ ही भीती आपल्याला लोकांच्या प्रतिक्रियांबाबत अतिसंवेदनशील करते. त्यामुळे मित्रमत्रिणींनी फोन घेतला नाही तर त्यांच्या स्वत:च्या व्यवधानामुळे तो घेतला नसल्याची शक्यता तन्वीला दिसत नाही. तिला वाटतं की लोक भिंग लावून आपल्याकडे पाहात बसले आहेत. तिच्या कमी उंचीवर टिप्पणी करायला टपून बसले आहेत. तसंच अभिषेकही आपल्याला एखादा चित्रपट किंवा विनोद न आवडणं हे इतर जण कुठलाही आकस न धरता सहजपणे घेऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊ शकत नाही. अतिसंवेदनशील झालं, की आपल्याला वाटतं की लोक फक्त आपल्यावरच नजर ठेवून आहेत. वास्तव असं आहे की लोकांना आपल्या प्रतिक्रियांकडे नजर ठेवण्याशिवाय इतर अनेक उद्योग असतात. कित्येक वेळा तर आपण काय करत आहोत किंवा बोलत आहोत हे त्यांच्या खिजगणीतही नसतं. पण अतिसंवेदनशील झाल्यामुळे आपण इतरांची प्रत्येक प्रतिक्रिया स्वत:शी जोडून स्वत:ला अस्वस्थ करून घेतो.

टीके चे फायदे- तन्वी आणि अभिषेक टीकेला घाबरतात, कारण ते फक्त टीकेच्या तोटय़ांवरच लक्ष केंद्रित करतात. पण टीकेमुळे मानसिक दृष्टय़ा कणखर होण्याचा फायदा त्यांनी लक्षात घेतला तर  भावनिक स्वावलंबनाचा आनंद ते घेऊ शकतील. स्वत:चा आनंद जोपासण्यासाठी त्यांना लोकांवर अवलंबून राहाण्याची गरज भासणार नाही. स्वत:शी जास्तीत जास्त खरं राहिल्यानं अस्वस्थताही कमी होईल. लोकांच्या पसंतीशिवाय स्वत:हून केलेली एखादी गोष्ट चुकली तरीही स्वत:चा चुकण्याचा अधिकारही ते मान्य करतील. कारण आत्मस्वीकारासाठी लोकांवर अवलंबून राहाण्याची गरज नाही, हे त्यांना टीकेनं शिकवलं असेल.

तन्वी आणि अभिषेक यांनी या विचार आणि तंत्रांचा वापर केला, तर केवळ अनोळखी लोकांचीच नव्हे तर जवळच्या व्यक्तींची पसंतीही ते अत्यावश्यक समजणार नाहीत. त्यांच्या पसंतीसाठी ते प्रयत्न करतील, पण ती मिळवण्यासाठी जर त्यांची  स्वत:ची ओळख पुसली जात असेल, तर मात्र त्यांच्या पसंतीचं ओझं ते झुगारून देतील. तसं झालं तरीही ती परिस्थिती भीषण नसेल आणि तिलाही ते समर्थपणे तोंड देतील. कारण त्या वेळी ‘लोक काय म्हणतील’ यापेक्षा ‘मला काय म्हणायचं आहे’ याचा शोध त्यांनी घेतला असेल.

Story img Loader