योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या क्षेत्रात काम करून उत्तम नाव कमवावं, चार लोकांनी आपल्याला मानानं ओळखावं, असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण उरी बाळगत असतो. पण कितीही मन लावून काम केलं, तरी प्रत्येकाला रूढ अर्थानं यश कधी मिळेल, नाव कधी होईल हे सांगता येत नाही. मग तसं यश मिळेपर्यंत केलेली सगळी मेहनत वायाच समजायची का?.. बसच्या प्रवासात अचानक भेटलेल्या एका काकांनी त्याच्यासमोर त्यांचा अनुभव उलगडला आणि या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही..
बराच वेळ ट्रॅफिकमधून कासवाच्या गतीनं सरकणाऱ्या बसनं थोडा वेग घेतला. अपेक्षेपेक्षा जास्त रखडला गेलेला तो प्रवास आता पुढच्या काही मिनिटांत संपणार होता. पण संपत आलेल्या त्या प्रवासाआधी त्याला मनातल्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. भल्या पहाटे बसमध्ये बसल्यानंतर काही तास त्यानं मस्त ताणून दिली होती. बसची अवस्था, रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हरचा वेग अशा गोष्टींनी फरक न पडता चांगली झोप घेण्याचं कौशल्य त्यानं काही वर्षांपूर्वी तिशीत पदार्पण करताना आत्मसात केलं होतं.
आता जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा त्याला असं वाटलं की शेजारी बसलेले पन्नाशीतले काका हे कदाचित त्याला माहिती आहेत. पण त्यांचं नाव त्याला आठवेना. त्यांना कुठे भेटलो होतो हेही आठवेना, आणि वयातल्या अंतरामुळे काकांना थेट विचारणं त्याला प्रशस्त वाटेना. एकदा त्यानं ‘असतील कुणीतरी’ म्हणून प्रश्न झटकायचाही प्रयत्न केला, पण तो विचार काही त्याची पाठ सोडत नव्हता. काही वेळातच बस थांबली, की सगळे प्रवासी कायमचे विखुरणार.. हे लक्षात येऊन मनाचा हिय्या करत तो काकांना म्हणाला, ‘‘काका, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पण कुठे ते नेमकं लक्षात येत नाही. आपण याआधी कधी भेटलो आहोत का?’’ त्यावर काकांनी फक्त हसून नकारार्थी मान हलवली. तेव्हा पुढचे काही क्षण तो विचारात गढून गेला, आणि मग काहीतरी आठवून म्हणाला, ‘‘अरे हो! गेल्या आठवडय़ात मी जे नाटक बघितलं होतं, त्यात तुम्हीच होतात. आता समोर आहात म्हणून म्हणत नाही, पण तुमचं काम खरोखरच खूप चांगलं झालं.. त्यामुळेच तुम्ही लक्षात राहिलात. म्हणूनच सारखं वाटत होतं की आपली भेट झालेली आहे.’’ त्यावर विनम्रपणे काका त्याला ‘थँक्स’ म्हणाले. रंगमंदिरात बघितलेल्या, सध्या गाजत असलेल्या नाटकातला उत्तम काम करणारा कलाकार आपल्या शेजारी बसला आहे, हे समजल्यावर तो कमालीचा सुखावला. फक्त समस्या एकच होती, की त्याला काकांचं नाव माहिती नव्हतं. ‘काकांना बसमध्ये भेटलो,’ हे घरातल्या मंडळींना सांगायचं तर कसं सांगणार?, असा विचार त्याच्या मनात आला.
त्या क्षणी त्याला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तो काकांना म्हणाला,‘‘काका, आपला ‘सेल्फी’ घेऊ या का?, म्हणजे माझ्याबरोबर नाटक पाहण्यासाठी जे लोक आले होते त्यांच्याबरोबर आपला फोटो मला ‘शेअर’ करता येईल, आणि ‘फेसबुक’वरपण टाकता येईल.’’ काकांनी त्याला होकार दिला, आणि मग त्यानं चटकन ‘सेल्फी’ काढला. काकांचं नाव माहिती नसतानाही आपण वेळ चांगली मारून नेली आणि त्यांना दुखावलंही नाही, या आनंदात फोन खिशात ठेवत असतानाच काका त्याला म्हणाले, ‘‘आपला ‘सेल्फी’ फेसबुकवर अपलोड करताना ‘विथ’ म्हणून नाव काय लिहिणार?’’
काकांच्या त्या नेमक्या प्रश्नामुळे तो ओशाळून म्हणाला, ‘‘सॉरी..! पण मला तुमचं नाव माहीत नाही. तेव्हा नाटकाची जाहिरात किंवा नाटकाचं फेसबुक पेज बघून त्यावरून शोधू, असा विचार मी केला.’’ त्यावर खळखळून हसत काका म्हणाले, ‘‘या कंटाळवाण्या प्रवासात तुझ्यामुळे मला फार ड्रामॅटिक मोमेंट मिळाला.’’ काकांचं हसणं पाहून त्याला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो काकांना म्हणाला, ‘‘सॉरी!.. म्हणजे..’’
त्याचं वाक्य अध्र्यात तोडत काका समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘‘अरे सॉरी काय? मी तुझी जरा गंमत करत होतो. आता माझं नाव माहिती नाही, यात तुझी काय चूक? व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात करून मला जेमतेम तीन र्वष झाली आहेत. चांगलं चाललेलं हे माझं फक्त दुसरं नाटक आहे. पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट ही आहे, की माझं काम तुझ्या लक्षात राहिलं.’’
‘‘फक्त तीनच र्वष? मग त्याच्या आधी?’’ त्यानं उत्सुकतेनं विचारलं. त्यावर काका म्हणाले, ‘‘नोकरी! म्हणजे नोकरी सांभाळून हौशी नाटक करणं सुरू होतं. पुन्हा पूर्णवेळ या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न तीन वर्र्षांपूर्वी मी सुरू केला.’’
‘‘पुन्हा पूर्णवेळ? म्हणजे त्याआधी कधी तुम्ही तसा प्रयत्न केला होतात?’’ त्याचा पुढचा प्रश्न तयार होता.
त्यावर भूतकाळाचं स्मरण करत काका म्हणाले,‘‘माझं पदवीचं शिक्षण संपल्यानंतर ‘हाऊसफुल’ नाटकं देणारा अभिनेता म्हणून नाव कमावण्यासाठी पाच र्वष मी मुंबईत रीतसर ‘स्ट्रगल’ केला होता.’’
‘‘मग?’’ आता तो गप्प बसणं शक्यच नव्हतं. त्यावर सुस्कारा सोडत काका म्हणाले,‘‘खूप काम करूनही मनासारखं काहीच घडत नव्हतं. तेव्हा तर टीव्हीवरच्या मालिकापण मोजक्या होत्या. दुय्यम काम आणि ते मरमरून केल्यावरही कुठेही नाव नाही, हे पाहून मी वैतागलो. एक दिवस सगळं बंद करून माझ्या शहरात परत गेलो. दोन-तीन परीक्षा देऊन बँकेत नोकरी मिळवली. मग बँकांच्या नाटकांच्या स्पर्धाच्या निमित्तानं हौस भागवत राहिलो.’’
‘‘मग निवृत्तीनंतर पुन्हा या क्षेत्रात आलात? सॉरी, पण तुमचं वय काही तेवढं वाटत नाही.’’ त्यानं काहीशा अविश्वासानं विचारलं.
त्यावर काका म्हणाले,‘‘नाटक कमी झालं. पण आयुष्यात ‘ड्रामॅटिक मोमेंट्स’नी पाठ काही सोडली नाही. चार वर्षांपूर्वी माझ्या शाळेतल्या भौतिकशास्त्राच्या शिक्षकांचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम होता. ते सगळ्यांचेच आवडते सर असल्यामुळे, अनेक विद्यार्थी येणार म्हणून त्यांच्या कुटुंबानं मोठा कार्यक्रम केला. तेव्हा आम्ही काही जणांनी मिळून एका नाटकातून सरांचं आयुष्य उलगडलं. सरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, ते आमच्याकडून ‘सरप्राइज गिफ्ट’ होतं. सगळा कार्यक्रम संपल्यावर घरी जाण्यापूर्वी मला थोडं बाजूला बोलवत सर म्हणाले, ‘मला सांग, प्रकाशाचा वेग जास्त? की ध्वनीचा वेग?..’ काहीही सबंध नसताना सरांनी विचारलेला तो प्रश्न ऐकून मला गंमत वाटली. पण तरीही मी सरांना म्हणालो, ‘प्रकाशाचा वेग. प्रकाश डोळ्याला आधी दिसतो आणि मग कितीतरी वेळानं ध्वनी ऐकू येतो. वीज चमकलेली दिसली तरी तिचा गडगडाट काही वेळानं ऐकू येतो, हे त्याचं उदाहरण.’ तेव्हा सर शांतपणे म्हणाले, ‘मग हेच सूत्र एका अर्थानं तुझ्या नाटक-चित्रपटाच्या क्षेत्राबाबतीतही लागू पडतं असं तुला वाटत नाही का? म्हणजे तिथे काम करणाऱ्याचं काम प्रेक्षकांना आधी दिसतं, त्यांचं नाव प्रेक्षकांच्या कानावर पडण्यासाठी काही काळ जावा लागतो.’’
‘‘भारी!’’ काकांचं बोलणं ऐकून त्यानं दाद दिली.
काका म्हणाले, ‘‘मुंबई सोडण्यामागे इतर कारणांबरोबरच अपेक्षेप्रमाणे माझं नाव न होणं हे मुख्य कारण होतं. तेव्हा सरांच्या बोलण्याचा रोख मला समजला. ‘नाव कमावता आलं नाही’ हा एकच निकष लावून मी माझ्या पाच वर्षांच्या सगळ्या स्ट्रगलवर तो अपयशी ठरल्याचा शिक्का मारला होता. मग मी सरांना म्हणालो, की हे जर तेव्हा तुमच्या लक्षात आलं होतं, तर ते आज इतक्या वर्षांनी तुम्ही मला का सांगितलंत? त्यावर सर मला शांतपणे म्हणाले, ‘‘कारण माझं फिजिक्स चांगलं आहे. माझा आवाज तुझ्यापर्यंत नेमका कधी पोहोचेल हे मला माहिती होतं म्हणून!’’ तो किस्सा ऐकून नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे न समजून तो गप्प बसला. पण काकाच म्हणाले, ‘‘त्या दिवशी मी ठरवलं. पुन्हा एकदा स्वत:ला संधी द्यायची. जिथून मागे फिरलो तिथे पुन्हा जायचं. फक्त ज्या कारणामुळे मागे फिरलो ते कारण या वेळी अपेक्षांच्या यादीत ठेवायचं नाही.’’
काकांची ही गोष्ट ऐकून तो म्हणाला,‘‘मला तुमच्या क्षेत्रातलं फार काही कळत नाही. पण तुमच्या तरुण वयात गोष्टी अवघड असतील तर आता या वयात काम शोधताना, काम मिळवताना किती जास्त गुंतागुंत असेल? शिवाय त्या काळाच्या मानानं आता स्पर्धाही वाढलेली आहे. तुमच्या बाबतीतही ती असणारच ना?’’
त्यावर होकारार्थी मान हलवत काका म्हणाले, ‘‘स्पर्धा ही कायमच असते. तेव्हा आपली ओळख ही आपल्या कामामुळे होणार आहे, हेच उद्दिष्ट ठेवून काम करत राहणं माझ्या हातात आहे. आज तू काढलेल्या ‘सेल्फी’मुळे त्यात मला यशही मिळतं आहे असं म्हणायला काही हरकत नाही.. नाही का!’’
ते ऐकून तो हसून म्हणाला,‘‘नक्कीच! मग आता पुढे काय? चित्रपट? वेब सिरीज?..’’ त्यावर चटकन काका म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या माध्यमांत काम तर करायचं आहेच. त्यासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतो आहे. स्वत:ला ‘अपडेट’ करतो आहे. अर्थात उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे स्वत:शी स्पर्धा करत राहणं. स्वत:मधील सर्वोत्तम शोधत राहणं. आता गंमत बघ, नाटकाचे प्रयोग ‘हाऊसफुल’ व्हावेत हे माझ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न होतंच. गेले काही महिने हे मी जे नाटक करतोय, त्याचे प्रयोग सातत्यानं हाऊसफुल होत आहेत. त्या नाटकात माझी मुख्य भूमिका नाही. माझ्या नावावर नाटक चालत नाही की तिकिटाचं बुकिंग होत नाही, पण तरीही त्यात एका स्वप्नपूर्तीचा आनंद आहेच. नाटकात प्रमुख भूमिका करणारे नामवंत कलाकार प्रयोग झाल्यावर मला आवर्जून म्हणतात, की आज आपला अमुक ‘सीन’ चांगला रंगला, प्रयोग करताना मजा आली. काहीही झालं तरी माझी ‘रिप्लेसमेंट’ केली जाणार नाही, असं परवा आमच्या निर्मात्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. तेव्हा गोष्टी हळूहळू
का होईना, पण घडत आहेत आणि मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. शेवटी तेच साध्य करायचं आहे ना?’’
तेवढय़ात शेवटच्या थांब्यावर बस थांबली. सगळ्यांची उतरण्याची लगबग सुरू झाली. तसं तो पुन्हा म्हणाला, ‘‘इतकं सगळं सांगितलंत, तर मग तुमचं नाव सांगाल का?’’ त्यावर काका शांतपणे म्हणाले, ‘‘आता इतकं सांगितलंय म्हटल्यावर माझं नाव तर तुझ्यापर्यंत आपोआपच पोहोचायला हवं नाही का? डोंट वरी! ते पोहोचण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.’’ असं म्हणत काका बसमधून उतरून बाहेरच्या गर्दीत दिसेनासे झाले.