‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य
पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. अन्यथा दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे हे काही
गमतीशीर(?) अनुभव..
भाग -१
अब्जावधी लोकांना खुळं बनवून अब्जावधी डॉलर्स खिशात टाकणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या त्या दोन निर्मात्यांना आधी दोन्ही हात जोडून कोपरांपासून नमस्कार करतो! ‘व्हॉट्सअप, डॉक?’, असं कुणी सहज जरी विचारलं तर डोकंच फिरतं हल्ली माझं! आज ज्याच्याकडे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ नाही, त्याच्याकडे अतिशय तुच्छतेनं पाहिलं जातं! म्हणजे, सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर निमूटपणे गाडी थांबवणाऱ्या वाहनचालकाकडे बेदरकारपणे गाडी हाकणारे ज्या तुच्छतेनं कटाक्ष टाकतात, तशाच तुच्छतेनं! आणि अशा अनेक तुच्छ नजरांना बळी पडून तोही बिचारा कालांतराने ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या कळपात सामील होतो आणि अल्पावधीतच त्या मायाजाळात स्वत:ला गुरफटून घेतो!
मागच्याच महिन्यात एक चिंतातुर आई तिच्या तितक्याच बेफिकीर मुलीला घेऊन माझ्याकडे आली. ‘‘डॉक्टर, काही तरी करा हो हिचं! हल्ली बोलतच नाहीय आमच्याशी ही!’’ मी त्या मुलीकडे पाहिलं. ती आपली मान खाली घालून बसली होती. मी त्या मातेला म्हटलं, ‘‘अहो, किती नम्र आहे ही!’’ ‘‘अहो, डॉक्टर, कसली डोंबलाची आलीय आज्ञाधारक? ते म्हणतात ना, खाली मुंडी, आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी! (अशी नवीन म्हण आलीय? हे मला माहीतच नव्हतं!) अशी अवस्था झालीय हिची! तुम्ही काहीही करा आणि हिला त्यातून बाहेर आणा हो!’’ ती आई अगदी व्याकूळ होऊन बोलत होती.
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर चित्र तरळलं, मी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ व्यसनमुक्ती केंद्र’ चालवतोय! (ही आयडिया सुचली कशी नाही कोणाला अजून? सुचेल, सुचेल, काही दिवसांनी याचंही मार्केटिंग करणारे पैदा होतील!) मी त्या आईला शक्य होईल तितक्या नम्रपणे सांगितलं, ‘‘अशा गोष्टींसाठी औषधं नसतात हो! हिला समुपदेशनाची गरज आहे!’’ लगेच ती आई म्हणाली, ‘‘मग करा नं समुपदेशन! म्हणूनच तर आणलंय मी हिला इथे!’’ त्यानंतर पुढची वीस मिनिटं मी आणि ती मुलगी एकमेकांचं बौद्धिक घेत होतो. ती मुलगी मला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे फायदे काय असतात, त्याने कसं फुकटात चॅटिंग करता येतं, हे सांगत होती. (ही आणखी एक गंमत! टू चॅट म्हणजे गप्पा मारणे.. आम्ही मित्र इराण्याच्या कॅफेत किंवा पार्कातल्या कट्टय़ावर गप्पा मारायचो! अजूनही मारतो. पण आताची पिढी काहीही संवाद न साधता अशा प्रकारे गप्पा ‘मारते’!) आणि मी तिला हे वरवरून जरी फ्री वाटत असलं तरी त्यामध्ये वेळ किती खर्च होतो, डोळ्यांवर कसा ताण पडतो, हातांच्या बोटांच्या सांध्यांची कशी वाट लागते, अशा निरनिराळ्या प्रकारांनी तिला समजावून सांगत होतो. शेवटी, ‘ओके, मी विचार करते याचा’ असं ती म्हणाली आणि मी हुश्श केलं. तिच्या आईकडे उगाचच एक विजयी कटाक्ष टाकला. त्या दोघी जणी बाहेर जायला उठल्या, तेवढय़ात त्या मुलीच्या मोबाइलची चिमणी चिवचिवली आणि ती साधं थँक्सही न बोलता, मोबाइलमध्ये डोकं खुपसून माझ्या केबिनमधून बाहेर पडली!
पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्या माय-लेकी माझ्याकडे आल्या तेव्हा एकदम ‘ट्रान्स्फर सीन’ होता. आता त्या दोघींचीही अवस्था ‘‘खाली मुंडी, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी’’ अशी झाली होती! मी बोलायचा क्षीण प्रयत्न केला, तेव्हा त्या माऊलीनं मला सांगितलं, ‘‘एक सेकंद हं, डॉक, हा जरा मेसेज पाठवते आणि मग आपण बोलूया!’’ दोन मिनिटं बोटांनी गप्पा मारून झाल्यावर, त्या समाधीवस्थेतून बाहेर आल्यावर तिनं माझ्याकडे पाहिलं. मी व्याकूळ होऊन तिला विचारलं, ‘‘अहो, काय हे? तुम्हाला तर या प्रकाराचा तिटकारा होता ना?’’ त्यावर, तिने ‘हाय, कम्बक्त, तूने पी ही नहीं’ असा एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि म्हणाली, ‘‘अहो, हिच्यासाठी म्हणून मी सुरू केलं एकदाचं ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि खरंच, किती गमतीशीर आहे हो हे! वेळ कसा जातो, ते कळतच नाही! छे बुवा, हा मेसेज जात का नाहीय?’’ शेवटचं वाक्य तिनं मला उद्देशून नक्कीच म्हटलं नव्हतं! ती मुलगी तिच्या आईला म्हणाली, ‘‘अगं, मी सांगतेय ना तुला, नेट पॅक वाढवून घे तुझं!’’ अच्छा, म्हणजे आता ती मुलगी तिच्या आईची सल्लागार झाली होती तर! मग, न रहावून मीसुद्धा त्यांना एक सल्ला देऊनच टाकला, ‘‘मला वाटतं, तुम्ही मोबाइलही नवीन घ्या. थ्री जी सपोर्ट करणारा!’’ ‘‘अय्या, खरंच की! थॅँक्स, डॉक, मला वाटतं, आपण आधी नवीन मोबाइल घेऊ या आणि नंतर नेट पॅक वाढवून घेऊ या!’’ हे शेवटचं वाक्य अर्थातच तिच्या मुलीला उद्देशून होतं! आता, त्या दोघींनाही माझ्या सल्ल्याची गरज नव्हती! त्यांच्यात ‘संवाद’ साधणारं एक नवीन अ‍ॅप त्यांना मिळालं होतं! नवीन मोबाइल कोणता घ्यायचा यावर चर्चा करत त्या बाहेर पडल्या आणि मोबाइलचा खर्च वाढला, नेट पॅकचा खर्च वाढला तरीही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ कसं फ्री आहे, हे लोकांच्या गळी उतरवणाऱ्या त्या महान निर्मात्या द्वयीला मी पुन्हा एकदा कोपरापासून नमस्कार केला!
भाग -२
वर्ष १९९०
माझ्या दवाखान्यात एक रुग्ण आले. येताक्षणीच त्यांनी टेबलावर सात पाकिटे ओळीने मांडून ठेवली. आता हे कोणती जादू शिकवणार की काय, असा विचार मनात येतच होता, तेवढय़ात ते म्हणाले, ‘‘हे माझे केस!’’ त्यांचा व्याकरणाचा काही गोंधळ होतोय असं वाटून मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्हाला ही माझी केस असं म्हणायचंय का?’’
‘‘नाही, हेच केस म्हणायचंय मला.’’ इति रुग्ण, ‘‘अहो, गेले काही दिवस प्रचंड प्रमाणात केस गळती सुरू झालीय. दररोज किती गळतात ते तुम्हाला कळावं म्हणून पाकिटात गोळा करून आणलेत हे. हे पाकीट सोमवार, हे मंगळवार, हे बुधवार..’’ त्यांच्या केसचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने उपचार सुरू केले.
वर्ष २०१५
वेळ : सोमवार, रात्री ११. माझी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. मी मोबाइल पाहिला. स्क्रिनवर केसांच्या गुंत्याचा एक फोटो! खाली एक रडक्या चेहऱ्याचं स्माइली (?)
मंगळवार, रात्री ११.. पुन्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा चिवचिवाट.. पुन्हा केसांच्या गुंत्याचा एक फोटो.. रडका चेहरा, पण आता पुढे एक प्रश्नचिन्हही होतं!
बुधवार, गुरुवार, शुक्रवार.. वेळ तीच.. रात्री ११.. तेच फोटो.. केसांच्या गुंत्याचे.. फक्त आता प्रश्नचिन्हं वाढत चालली होती.. हे काय चाललंय ते मला कळेना, शेवटी मीच उलट टपाली एक प्रश्नचिन्ह पाठवले. तेव्हा कुठे त्या व्यक्तीने मला संदेश पाठवला, ‘‘डॉक्टर, मी गेला आठवडाभर तुम्हाला माझ्या गळणाऱ्या केसांचे फोटो पाठवतेय, पण तुम्ही काहीच रिस्पाँस देत नाही आहात.’’
आता यावर उत्तर देणं मला भाग होतं. मी लिहिलं, ‘‘आपली केस खूपच गुंतागुंतीची दिसतेय. पण असे चिन्हांकित संवाद साधण्यापेक्षा आपण जर समोरासमोर येऊन संवाद साधलात तर फायदा तुमचाच होईल.’’ एक रुग्ण कायमचा गमावल्याच्या दु:खापेक्षा रात्री अकरा वाजता होणारा तो चिवचिवाट कायमचा बंद झाल्याचा आनंद जास्त होता!
असाच एक तरुण रुग्ण.. आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा! लठ्ठ पगाराच्या ओझ्याखाली दबून गेलेला! आपला रक्तदाब वाढलंय,
असं सतत वाटायचं त्याला! त्याच भीतीपोटी रोज रात्री मला त्याचा
‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेज यायला लागले. आत्ता प्रेशर १२०/८० आहे, आत्ता ११०/८२.. तुला काहीही झालेलं नाही, तुझं प्रेशर नॉर्मल असतं, असं सांगून मी थकलो. शेवटी मी त्याच्या त्याच त्याच मेसेजेसना उत्तर देणं बंद केलं. एका रात्री तर त्याने कहरच केला. दर तासांनी तो घरच्या मशीनवर प्रेशर बघून मला तसे मेसेजेस पाठवायला लागला. माझं काहीच उत्तर नाही हे पाहिल्यावर त्याने मला विचारलं, (अर्थात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच!) ‘‘हे काय, तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही.. काय करू, काही तरी सांगा ना!’’ आता यावर, मी ‘‘जमल्यास ते मशीन बाहेर फेकून दे,’’ असं उत्तर दिलं तर त्यात माझं काही चुकलं का? तुम्हीच सांगा!
आत्ताच जेवायला बसलो असताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. एक रुग्ण म्हणतोय, ‘‘पोट जरा बिघडल्यासारखं वाटतंय.’’ हे वाचून माझ्या पोटात गोळा आलाय! या रुग्णाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ब्लॉक करावं की माझं ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंटच डीलीट करून टाकावं, या पेचात मी पडलोय!
त्या दिवशी मुंबईच्या कुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅममधून वाट काढत काढत घरी चाललो होतो. एका चौकात सिग्नलच्या लाल दिव्याला गाडय़ा चक्क थांबल्या होत्या! काही सेकंदांनी उजव्या बाजूला जाण्यासाठीचा सिग्नल सुरू झाला, पण माझ्या बाजूची गाडी काही हलेना. त्याच्या मागचे वाहनचालक लागले बोंबलायला! लाल दिवा असला तरी थांबत नाही, इकडे तर हिरवा दिवा लागलाय तरी जाता येत नाही म्हणजे काय? त्यांच्या स्वाभिमानाला जणू ठेच लागली होती! न राहवून मी त्या गाडीच्या खिडकीवर ठोठावलं. काच खाली झाली तर चालक माझा रुग्णच निघाला. महाशय मोबाइलवर काही तरी पाहण्यात दंग होते. ‘‘ओ, सॉरी! व्हॉट्सअप, डॉक?’’ असं काहीबाहीसं पुटपुटत स्वारी भरधाव वेगाने निघूनही गेली. या वेळी लाल दिवा असूनही! आता पुढच्या वेळी हा येईल तेव्हा त्याला चांगलंच झापायचं, असं मी मनोमन ठरवून टाकलं.
एक महिन्यानंतर तो माझ्याकडे आला.. आला तो लंगडतच! हातात एक वॉकर.. आतमध्ये आला, खुर्चीवर बसून म्हणाला, ‘‘व्हॉट्सअप, डॉक?’’
‘‘माझं सोड, तुझं हे काय झालंय? हा वॉकर?’’ मी विचारलं.
‘‘बघा ना, काय वेळ आलीय? हातातली जॉनीवॉकर जाऊन आता हा वॉकर आलाय!’’ त्याच्या या उत्तरावर काय बोलावं तेच कळेना! कोणाची विनोदबुद्धी, कधी जागृत होईल, काही सांगता येत नाही, हेच खरं! मनावर खूप ताबा ठेवून मी त्याला विचारलं, ‘‘जरा नीट सांगशील का, काय झालं ते?’’
‘‘तुम्हाला माहीतच आहे, मला गाडी चालवताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे मेसेजेस वाचायची सवय आहे!’’ हे सांगताना अशा चांगल्या सवयी असाव्यात माणसाला, असा त्याचा आविर्भाव होता.
‘‘आहे म्हणजे होती.’’ तो पुढे सांगायला लागला, ‘‘तर त्या दिवशी मी गाडी चालवताना सौभाग्यवतींनी त्यांचा एक फोटो पाठवला. नुकताच हेयर कट करून आल्यानंतर काढलेला! तो फोटो पाहून दचकलोच मी! आणि कचकन् ब्रेक दाबला. मागून येणारी गाडी आदळली माझ्या गाडीवर! आणि हे असं झालं!’’ आता बोला! ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे घटस्फोट होतात हे नुकतंच वाचलं होतं मी, पण असा विचित्र अपघातही होऊ शकतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर होतं! या विचित्र अपघाताचे फोटो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरही आले असतीलच! फक्त त्याच्यामागचं कारण तुम्हाला आत्ता कळलं असेल!
हे सगळं वाचल्यावर तुमचा जर असा समज झाला असेल की ‘व्हॉट्सअ‍ॅप’बद्दल माझ्या मनात आकस आहे, तर तो चुकीचा आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. पण, त्याचा अतिरेक झाला किंवा त्याच्या आहारी गेलात तर त्याचे दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात, वरची सारी उदाहरणे हेच तर सांगतात!
डॉ. समीर भुरे -samirbhure@gmail.com

Story img Loader