आम्ही शाळेतून आल्याबरोबर दप्तर फेकून द्यायचो आणि आईला म्हणायचो, ‘आ शा सु भू ला’ आईला ते बरोबर कळत असे आणि तिने खाऊ सुद्धा तयार ठेवलेला असे. त्यानंतर माझ्या मुलींची ‘डीडीएलजे’ भाषा सुरू झाली आणि आताच्या पिढीची व्हॉट्सअॅप भाषा, jevan zale ka? त्या त्या काळाची ती ती भाषा.
Ssup
ttul
कळला का काही अर्थ? नाही ना? मलाही नव्हता कळला. नात तिच्या मैत्रिणीबरोबर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत होती. मी जवळच बसले होते, सहज लक्ष गेले. मला तिने लिहिलेल्या शब्दांचा काही अर्थच लागेना. शेवटी न राहवून विचारलेच.
आता आजीनेच विचारले म्हटल्यावर काय, (माझ्या विचारण्यातले कौतुकही तिच्या लक्षात आलेच असणार.) पठ्ठी भराभर सांगू लागली. शाळेतील अभ्यासाच्या प्रश्नांची उत्तरेही एवढी स्पष्ट आणि बिनचूक देत नसतील मुले.
मी पाहतच राहिले तिच्याकडे. क्षणभर वाटले, उगाचच आपण या भानगडीत पडलो. पण नाही. एकदा त्यात नाक खुपसले ना, तर मग पूर्ण समाधान झाल्याशिवाय मी तरी कशी माघार घेणार? मग नातीनेच जवळजवळ अर्धा तास माझा ‘क्लास’ घेतला. तशा या विषयातल्या प्राथमिक गोष्टी मला माहीत होत्या. पण अजून काय काय नवीन भांडार आपल्यापुढे खुले होणार आहे या जिज्ञासेने मी तिच्यासमोर ‘तिळा तिळा दार उघड’ या मंत्रासारखे ‘हे म्हणजे काय गं’, ‘ते म्हणजे काय गं’ असे मंत्रोच्चार करत होते आणि माझी नात माझ्यासमोर तिचे अगाध ज्ञान उलगडून दाखवीत होती.
तर हा विषय आहे व्हॉट्सअॅपच्या विविध शॉर्टफॉर्मचा ..
Ssup म्हणजे whatsapp!
काय चाललंय?
ttul म्हणजे talk to you later
ही यांची सांकेतिक भाषा.
हल्ली जुन्या पिढीतील लोकही मोबाइल फोन, स्मार्टफोन वापरायला लागले आहेत. सुरुवातीला फोन घेताना असे वाटते, निदान फोन करता आला पाहिजे आणि घेता आला पाहिजे, इतके जमले तरी पुष्कळ! मग हळूहळू मेसेज करणे, नेट वापरणे, मोबाइलमधील इतर गोष्टींचा वापर सुरू झाला आणि आबालवृद्धांच्या जगण्याचा तो भागच झाला.
मलाही मुलीने कोरा करकरीत स्मार्टफोन घेऊन दिला. वाय फाय कनेक्शन होतेच, त्यामुळे सगळे छान सेटिंग करून झाले. आणि मग एक दिवस अलीबाबाची गुहा उघडावी तसा व्हॉट्सअॅपचा आयकॉन समोर आला. हिरव्या गोलातील पांढऱ्या फोन रिसीव्हरचा तो लोगो. एक नवीन जगच उघडून दिले त्याने. लवकरच तो खूप जवळचा वाटायला लागला.
मुलीने चॅटिंग कसे करायचे ते शिकवले. पण सुरुवातीला तिने काय लिहिले ते वाचण्याइतपतच मजल गेली, पण तेवढय़ावरच कसे थांबायचे? उत्तर तर द्यायला पाहिजे, प्रश्न तर विचारायलाच पाहिजेत. आपला मूळ स्वभाव कसा विसरून चालेल?.. हळूहळू जमेल तसे टाइप करायला लागले. आम्ही लोक पूर्ण वाक्य स्पेलिंग न चुकता लिहिणार. चुकले तर ते पुन्हा दुरुस्त करणार जसं, jevan zale ka? आता जेवण या शब्दाला j1 असे लिहावे हे आमच्या टाळक्यात कसे शिरणार? पण यांची भाषा म्हणजे.. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषांचा असा काही कचरा केलाय, भाषेचे, व्याकरणाचे नियम असे काही गुंडाळून धाब्यावर बसवले आहेत की ब्रह्मदेवाला पण ती भाषा कळणार नाही.
पण म्हणतात ना ‘पाण्यात राहून माशाशी वैर कशाला?’ थोडे थोडे कळून घ्यायचा प्रयत्न करू लागले. सुरुवातीला gm, gn, tc हे शब्द कळायला लागले. थोडी मजा वाटली. लहानपणी शाळेत असताना आपणही आईशी असेच बोलत होतो ते आठवले..
शाळेतून आल्याबरोबर दप्तर एका बाजूला फेकून द्यायचे आणि आईला म्हणायचे, ‘आ शा सु भू ला’ आम्हाला काय म्हणायचे ते आईला बरोबर कळत असे आणि तिने खाऊ पण तयार ठेवलेला असे. कधी शिरा, कधी चिवडा तर कधी पोळीचा लाडू. आम्ही खूश. त्यानंतर मग मैत्रिणींबरोबर बोलताना ‘च’ची भाषा, ‘म’ची भाषा आणि ‘धूम’ची भाषा शिकायला मिळाली. पण आमच्या या सगळ्या भाषा आईला मात्र कशा कळायच्या कोण जाणे. (आम्हाला मात्र आमच्या या नवीन पिढीची नवीन भाषा शिकताना नाकात दम येतो.) ‘च’ची भाषा म्हणजे ‘चलाम चकभू चगलीला.’ (मला भूक लागली.) ‘म’ची भाषा म्हणजे ‘मपमला भूपमुक लापमागली’ (मला भूक लागली.)
एखाद्या शब्दाच्या शेवटी असलेला शब्द च किंवा म घालून आधी म्हणायचा, मच्या भाषेत मधेच प घालायचे. आता ते सगळे आठवले तरी हसू येते. थोडे भराभर बोलले की ज्याला कळायला हवे त्यालाच ते कळणार. इतरांना काही कळत नव्हते. ज्याला कळायचे त्याला बरोबर कळात असे, बाकीचे तोंडाकडे बघत बसत असत.
वयोमानपरत्वे या शाळेतल्या गोष्टी बंद पडल्या. नंतर कॉलेजची भाषा सुरू झाली आणि नंतर घरसंसार मागे लागल्यावर तर या सगळ्या गोष्टींचा विचारही डोक्यात येईनासा झाला. संसाराची एक नवीनच भाषा मागे लागली. मुली लहान असतांना त्यांनी मधूनमधून ही च किंवा म ची भाषा बोलायचा प्रयत्न केला पण त्या काही त्यात एवढय़ा रमल्या नाहीत. त्यांचे काही तरी वेगळेच गुपित शिजत होते हे मला नंतर कळले. एक दिवस अशाच त्या घाईघाईने शाळेतून आल्या आणि म्हणाल्या, ‘आई आम्ही डीडीएलजे बघायला जाऊ?’
‘डीडीएलजे’ म्हणजे काय?’ मला कळेना. मी जेव्हा त्यांना त्याचा अर्थ विचारला तेव्हा दोघींनी डोळे विस्फारून माझ्याकडे बघितले.
‘तुला माहीत नाही?’ त्यांनी मला विचारले.
‘नाही. सांगा न. डीडीएलजे म्हणजे तुमची कुणी मैत्रीण आहे का?’
‘हो.’ हसतच त्या म्हणाल्या. आणि एकमेकींकडे बघत डोळे मिचकावून म्हणाल्या, ‘ती आमची मैत्रीण आहे ना काजोल, तिला भेटायला जायचंय.’
त्यांची काजोल नावाची कुणीच मैत्रीण मला माहीत नव्हती. त्यांच्या हसण्यावरून आणि बोलण्यावरून तर त्या आपली चेष्टा करीत आहेत याची मला खात्रीच पटली.
‘काय गं, सांगा ना. मला काय ते कळल्याशिवाय मी तुम्हाला परवानगी कशी देणार?’
परवानगीचा विषय काढला तशी त्या एकदम विनवण्या करायला लागल्या.
‘अगं आई, असं काय करतेस? डीडीएलजे म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’
‘ओह! असं आहे का?’ आता कुठे माझ्या टाळक्यात प्रकाश पडला. म्हणजे आमच्या ‘आ भू ला’ या भाषेचा तो रिव्हाइज्ड फॉर्म होता तर.
आणि मग त्यांच्या या शब्दांचा सिलसिला सुरू झाला. मलाही त्यातले बरचसे कळायला लागले होते.
एमपीके, आरएचटीडीएम, के२एच२ ..
एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या त्या वयातली मानसिकता तीच असते. फक्त ती व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेले होते, तेव्हा तिथल्या नातीला मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून आम्ही तिच्याशी बरेच खेळ खेळत असू. त्यात शब्दांच्या भेंडय़ा, नावांच्या, वस्तूंच्या भेंडय़ा, समानार्थी शब्द असे बरेच आणि आणखी काही नवीन खेळ शोधून काढले होते. तेव्हा मी तिला ‘आ भू ला’ हा खेळ पण शिकवला. ती पण खूप आवडीने तो खेळ खेळायची. विचार करून नवीन नवीन वाक्ये, शब्द तयार करायची. तिच्या शंका विचारायची.
माझीही आता बरीच प्रगती झाली होती. व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवणे, गप्पा मारणे, इकडचे जोक तिकडे फॉरवर्ड करणे, नवीन नवीन व्हिडीओ एकमेकांना पाठवणे इतपत माहिती झाली होती.
त्यात आणखी एकाची भर पडली ती म्हणजे, वेगवेगळ्या इमोशन्स. सुरुवाती सुरुवातीला मला नवल वाटायचे, एवढी सगळी बारीकसारीक चित्रे यांना कुठून मिळतात. इमोशन्स दाखवताना कंसाचा, टिंबांचा, उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह यांचा वापर करायचा इतपत माहीत होते, पण आता भलतेच. हसणे, रडणे, वेगवेगळे चेहरे, लाइक, डिसलाइकशिवाय वाढदिवसाला केक, फटाके, बलून्स, गिफ्ट, छत्री, प्राणी, घर, गाडी हे सगळे बघून थक्क होण्याचीच वेळ आली.
ssup (काय चाललंय),
ttyl (टॉक टू यू लेटर),
gtg (गॉट टू गेट),
sd (स्वीट ड्रीम्स)
gn (गुड नाइट),
tc (टेक केअर),
bfn (बाय फॉर नाऊ)
इतर सगळ्या गोष्टी बदलल्या तसे हेही बदलले. नवीन पिढीची नवीन भाषा सुरू झाली. आता तर या भाषेत कादंबरी निघाल्याचे समजले.
अरे, काय हे? अॅडव्हान्स अॅडव्हान्स म्हणजे अजून किती? काही दिवसांनी फक्त एक टिंब लिहून पाठवले जाईल आणि तेही त्यांचे त्यांना काय म्हणायचे ते कळेल. आणि त्यानंतर तर मग ब्लँक मॅसेज, का आणखी काही तरी नवीन, जे आत्ताच्या पिढीला पण कळणार नाही. १४०० वर्षांच्या चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरा कागद पाठवला होता. तो ज्ञानेश्वरांना बरोबर कळला. ज्या भिंतीवर ते त्यांच्या भावंडांसोबत बसले होते त्याच भिंतीला चालायला लावून ते चांगदेव महाराजांना सामोरे गेले होते. जुने दिवस परत येत आहेत म्हणतात ते कोणत्या अर्थाने खरे होईल का ते एक त्या परमेश्वरालाच माहीत!
नंदिनी देशमुख -nandini.deshmukh@gmail .com
‘आ शा सु भू ला’
आम्ही शाळेतून आल्याबरोबर दप्तर फेकून द्यायचो आणि आईला म्हणायचो, ‘आ शा सु भू ला’ आईला ते बरोबर कळत असे आणि तिने खाऊ सुद्धा तयार ठेवलेला असे.
First published on: 09-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp language of new generation