अंधश्रद्धेच्या नावाखाली आजही काही ठिकाणी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. यामुळे अनेक स्त्रिया मनोविकाराच्या शिकार होत आहेत. समाजातील विकृत प्रवृत्तींचा हा साखळदंड कसा सुटेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगात येणं, भुतानं झपाटणं एक तर मानसिक आजार असतो किंवा ते ढोंग असतं. आपल्या समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, तिच्या मानसिक, शारीरिक आरोग्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष यातून आजही अनेक स्त्रिया मनोविकाराच्या शिकार होतात. कधी त्या नैराश्यात जातात, तर कधी त्या घुमतात. त्यांच्या आजारी मनावरचे ओरखडे समाजाच्याच नाही, पण कुटुंबीयांच्याही लक्षात येत नाहीत. अशा व्यक्तींना बरं करण्याच्या नावाखाली अंधश्रद्धामूलक कृतींचा आधार घेतला जातो.

२०१६मधील गणेश स्थापनेच्या दोन दिवस आधी मला वेगवेगळ्या वेळी दोन व्यक्तींचे फोन आले. ‘‘आमच्या गावात भटक्या वस्तीत एका १५-१६ वर्षांच्या पोरीला साखळदंड लावून खांबाला बांधून ठेवलं आहे. तिला गेले आठ दिवस रोज मारहाण होते आहे. कालपासून ती पोरगी मेल्या मढ्यागत जमिनीवर झोपून आहे. पण तरीही साखळदंडाने तिला आवळलेलं आहे. तुम्ही त्या पोरीचा जीव वाचवा’’, असं त्यांनी सांगितलं. दोन्ही व्यक्तींचा फोनवरील संवादाचा आशय एकच होता. त्या व्यक्तींनी सांगितलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळवणं आवश्यक होतं. हाती वेळ थोडाच होता. कारण त्या दोघांनीही वर्णन केल्यानुसार मुलीची स्थिती गंभीर होती. मुलगी असलेल्या गावात माझे परिचित काही लोक राहत होते. त्यांना फोन करून घटनेची पडताळणी केली. त्यांनीही त्या मुलीची अवस्था गंभीर असल्याचं सांगितलं. चौकशी करण्यात तो दिवस सरला. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता मी स्वत: व सोबत माझे सहकारी काशिनाथ गुंजाळ, रामराव गुंजाळ, सोमनाथ जोर्वेकर, अशोक गवांदे असे आम्ही पाच लोक पीडित मुलीच्या गावी जाण्यासाठी निघालो. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून पीडितेपर्यंत पोहचण्याचं अंतर तसं खूपच कमी होतं. पावसानं हजेरी लावल्यानं आम्हाला दुचाकीनं प्रवास करण्यात व्यत्यय आला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आम्ही पीडितेच्या गावी पोहोचलो.

गावात पोहचल्यानंतरही गुप्तता पाळत पुन्हा सविस्तर चौकशी केली. तेव्हा समजलं की, १६ वर्षांची उषा ८वीपर्यंत शिकलेली. ८वीमध्येच शाळा सोडून घरी बसली. उषाचे वडील पेटी घेऊन बाळ्या-बुगड्या-विक्री करतात. आई मोलमजुरी करते. सुमारे १२-१३ वर्षांपासून ते त्या छोट्या खेड्यात राहतात. उषा २-३ महिन्यांपासून आजारी आहे. ती खात-पीत नाही. मनात आले तर कामधंदा करते. नाही तर एका जागी बसून राहते.

आता तिच्या अंगात येणंही सुरू झालं. उषाचा मामेभाऊ किसन. त्यांच्या अंगात अलीकडे पिराची हवा येऊ लागली. उषाच्या आईनं किसनच्या अंगात आल्यावर उषाविषयी प्रश्न विचारला. किसननं सांगितलं, ‘‘ती ओढ्यावर धुणं धुवायला गेली व्हती, तवा तिला सात चुडेलींनी (चेटकीण) धरलं आहे.’’ त्यावर उपाय काय असं विचारलं असता, ‘‘मी त्या चुडेलींना हाकलतो. झाडाला (उषाला) माझ्या स्वाधीन करा.’’ झालं. रोज संध्याकाळी किसन पिराची हवा घेत होता. रोजच उषाला त्याच्या समोर हजर केलं जायचं. किसन रोज तिला काठीनं, कधी चाबकानं मारहाण करत असे. उषा जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत होती. उषाबाबत कोणालाही कणव वाटत नव्हती. रोजच्या मारहाणीमुळे उषा धास्तावली होती. तिचं खाणं-पिणं कमी झालं. मारहाणीच्या धाकानं उषानं पळून जाण्याचाही प्रयत्न केला. चुडेलींना पळवून लावण्यासाठीच्या अमानुष मारहाणीला उषा प्रतिकार करते म्हणून किसननं सांगितलं की, ‘‘चुडेल फार जहाल आहेत. त्या लवकर झाडाला सोडणार नाहीत. म्हणून तिला साखळदंडात बांधून ठेवा. त्याप्रमाणं तिला लोखंडी साखळीनं बांधून ठेवलं होतं. रोजच मारहाण सुरू होती. गावात परिसरात फिरून आम्ही सविस्तर माहिती मिळेपर्यंत सायंकाळचे सात वाजले. काळाकुट्ट अंधार झाला होता. पावसामुळे गावातील लाइट गेले होते. पोलीस मदत घेऊन वस्तीवर जायचं ठरलं, परंतु पोलीस ठाण्यात फोन लागत नव्हता. जास्त वेळ दवडून चालणार नव्हतं. उषाचा जीवन-मरणाचा प्रश्न होता. गावातील काही विश्वासू लोकांना सोबत घेऊन आम्ही शोभाच्या वस्तीवर पोहोचलो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक गावात आले आहेत व ते वस्तीवर येणार आहेत अशी बातमी आम्ही वस्तीवर पोहचण्यापूर्वीच उषाच्या घरच्या लोकांना व वस्तीला मिळाली होती. आम्ही उषाच्या घराजवळ जाताच आमच्या भोवती लोकांचा जमाव गोळा झाला. आमच्या सोबत उषाच्या घरातील ४-६ लोक आले. उषाचं घर म्हणजे साधारण १२ बाय १५ची मोठी खोली. त्या खोलीत मध्यभागी उषा एखाद्या मृत व्यक्तिगत पडलेली होती. तिच्या उशा-पायथ्याशी १०-१५ लोक बसलेले होते. आम्ही उषाच्या घरात जाताच तिच्या आईकडे चौकशी केली असता तिनं सांगितलं की, ‘‘उषा २-३ महिन्यांपासून आजारी आहे. दवा-डॉक्टर केला, पण गुण काही येत नाही.’’

मी व माझ्या सहकाऱ्यांनी उषाच्या घरच्या लोकांशी जुजबी चर्चा केली. त्या वेळी उषाचे वडील उपस्थित नव्हते. त्यांच्याविषयी चौकशी केली तेव्हा उषाच्या आईनं ते गावाला गेले, असं तुटकपणे सांगितलं. आम्हाला उषाशी एकटीशी बोलायचं आहे, असं सांगितलं. उषाभोवती जमलेले एवढे लोक बाजूला जाणं शक्य नव्हतं. म्हणून उषाच्या एका नातेवाईक स्त्रीच्या मदतीनं उषाला उठवून बसवलं. तिला पाणी पाजलं. बिस्कीट खायला दिलं व त्याच स्त्रीच्या मदतीनं तिला घराच्या बाहेर आणलं. एका दगडावर भिंतीला टेकून बसवलं व माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की, इकडे कोणालाही येऊ देऊ नका. उषाला मी बोलतं केलं. खरं तर उषामध्ये बोलण्याचे त्राण शिल्लक नव्हते, परंतु माझ्याबद्दल, माझ्या सहकाऱ्यांबद्दल उषाला माहिती दिली व तुझ्या जिवाला धोका आहे, असं समजल्यामुळे आम्ही इथे आलो. हे सांगितल्यावर उषाला आमच्याबद्दल विश्वास वाटला.

आज तुझे वडील इथे का नाहीत? असं विचारलं असता तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. तिनं सांगितलं, ‘‘माझे वडील सहा महिन्यांपासून आम्हाला सोडून माझ्या मावशीबरोबर दुसरीकडे राहतात. त्यांना आमचं काही देणंघेणं नाही.’’ उषाला मावशीबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘‘मावशी माझ्याच वयाची असल. त्यांचं सारं नीट आहे. पण माझं लग्न, भावाचं शिक्षण याची त्यांना काळजी नाही.’’ हे बोलून उषा एकदम गप्प झाली. ती पुढे काही बोलेचना. मी तिला तिच्या अंगात येण्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली, ‘‘मला काहीच कळत नाही. पण अंगात यायला लागल्यापासून किसन मला रोजचा लई मारतो. माझ्या हाता-पायाला लोखंडी साखळीने बांधून ठवतो. तुम्ही लोक आल्याचं समजल्यावर मला मोकळ केलं.’’

उषा शारीरिक व मानसिकदृष्ट्या जास्त बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. उषाच्या आजाराचं व अंगात येण्याचं कारण ढोबळमानानं लक्षात आलं होतं. उषाला पुन्हा उचलून घरात नेलं. तिच्या आईला तिच्यासाठी उबदार जागेत चांगला बिछाना घालण्यास सांगून उषाला त्यावर झोपवलं. गावातच असलेल्या डॉक्टरांना फोन करून उषाच्या घरी बोलावून घेतलं. उषाच्या आईशी चर्चा केली. मामाशी बोलले. उषाच्या वडिलांविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्या बहिणीनं (उषाच्या मावशीनं) शेण खाल्लंय. ती वस्तीतच वेगळी राहत्यात. मेहुण्याची समाजात चांगली ऊठ-बस आहे. माझ्या या बहिणीच्या (उषाच्या आईचे) आयुष्याचं मात्र मातेर झालं. समाजही तिलाच दोष देतो. लग्नकार्यात येऊ देत नाहीत.’’ किसनला बोलावणं पाठवलं, परंतु अंनिसचे लोक आल्याचं समजल्यानं तो वस्तीतून गायब झाला होता. गावातील काही लोकांनी किसनला शोधून उषाच्या घरी आणलं.

किसनशी उषाच्या आजाराबद्दल बोललो. तू उषाला जीवघेणी मारहाण केली, तुझ्याविरुद्ध आत्ता केस दाखल करणार असं त्याला सांगितलं. आमच्या सोबत साध्या वेशातील पोलीस आले आहेत, असंही त्यास सांगितल्यानंतर अंनिसचे लोक, गावकरी व अन्य लोकांचा आम्हाला असलेला पाठिंबा, उषाविषयीची सहानुभूती व एकंदरच त्याच्या विरोधातला सर्व माहोल आणि शेवटी मी व माझ्या सहकाऱ्यांनी तिथे जमलेल्या जमावाला अंगात येणं ढोंग किंवा मानसिक विकार असतो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक उदाहरणं दिली. आमच्या कामाची माहिती दिली. बऱ्याच वेळानंतर किसननं मला काही कळत नाही, मी अंदाजानं सांगत होतो असं म्हणत अंगात येण्याच्या ढोंगाची अप्रत्यक्ष कबुली दिली. इथून पुढे मी असं काही करणार नाही, असंही तो म्हणाला. परंतु उषाचा आजार आणि तिची शारीरिक, मानसिक स्थिती गंभीर होती.

उषाचे वडील तिच्याच वयाच्या मावशीसोबत घर सोडून गेल्यामुळे उषाच्या मनावर मानसिक आघात झाला होता. तिचं मन आजारी झालं, त्यामुळे ती घुमायला लागली व त्या परिस्थितीत अडाणी, अशिक्षित व हतबल असलेल्या तिच्या आईनं अंधश्रद्धामूलक गोष्टींचा आधार घेत ढोंगी किसनच्या ताब्यात उषाला दिलं. मुळातच उषावर डोळा असलेल्या किसनला उषानं कधीही जुमानलं नाही. आत्ता मात्र उषा त्याच्या तावडीत सापडली होती. त्यानं पिराची हवा घेत उषावर सूड उगवला होता. गावातील डॉक्टर उगले हे उषाच्या घरी आल्यावर मी, माझे सहकारी आणि डॉक्टरांनी उषाच्या आईला तिच्या मानसिक आजाराबाबत समजावून सांगितलं व तिला आपण उपचाराची व्यवस्था करू तुम्हाला उपचारासाठी काही आर्थिक मदतही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. असं सांगून मानसोपचारतज्ज्ञाचा पत्ता दिला. त्या मानसोपचारतज्ज्ञांशी मी स्वत: बोलले. त्यांनीही कमी खर्चात उपचार करण्याचं मान्य केलं. सुमारे सात महिने समुपदेशन व उपचार घेतल्यानंतर उषा पूर्णपणे बरी झाली. उषाच्या आईनं मामाच्या मदतीनं तिचं लग्न ठरवलं, परंतु उषाला १८ वर्षं पूर्ण झाल्याशिवाय तिचं लग्न करू नका, असं तिच्या आईला समजावून सांगितलं. शेजारच्याच खेड्यातील उषाच्या सासरच्या लोकांशीही बोलले व ते लोक उषाला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत थांबण्यास तयार झाले. दरम्यान, उषाला शिवणक्लास करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे तिनं क्लास पूर्ण केला. ती शिवणकाम शिकली. उषाचं लग्न झालं. तिचा संसार सुरळीत सुरू आहे.

ती दोन-तीनशे रुपये रोज कमावते आहे. आईलाही हातभार लावते. भरल्या संसाराला लाथ मारून, बायको-मुलांना वाऱ्यावर सोडून आपल्या मुलीच्याच वयाच्या अज्ञान मेहुणीबरोबर संसार थाटणारा उषाचा बाप, त्याला मिळणारी समाजमान्यता, बापाच्या क्रूरकर्मामुळे उषावर झालेला आघात, त्यातून तिला आलेलं मानसिक आजारपण, किसनसारख्या क्रूरकर्म्याकडून झालेली मारहाण. हे सर्व बदलण्यासाठी आपल्या समाजात मानसिक स्वास्थ्यावर खूप काम होणं गरजेचं आहेच, परंतु उषाच्या वडिलांसारख्या विकृत प्रवृत्तींना आवर घालणं, प्रतिबंध करणं गरजेचं आहे. समाजात असणाऱ्या सद्प्रवृतींच्या आधारे ते शक्यही आहे. उषाच्या गावातील लोकांनी केलेली मदत व घेतलेल्या पुढाकारानं उषाचे प्राण वाचले.

(या लेखातील सर्व व्यक्तींची नावे बदलली आहेत.)