पुस्तक वाचून जसे पोहता येत नाही, तसे पुस्तक वाचून जीवनात यशस्वी होता येत नाही! पुस्तके आपल्यासमोर फक्त दिशादर्शक यंत्रासारखी असतात. जे आपल्या वकुबात, आवाक्यात आहे तोच भाग घ्यायचा. कोणीही कॉपी करून यशस्वी होत नाही. यशस्वी पुरुषांची चरित्रे ही प्रेरणेचे निमित्त होऊ शकतात, पण त्यांचे मूल्य त्यांनी परिस्थितीला भावनिकरीत्या कसे हाताळले हे जाणून घेण्यात आहे.             
बाजारात इंग्रजीमधील स्व-मदत पुस्तकांच्या अनुवादाचे पेव फुटले आहे. प्रकाशकसुद्धा ‘यशस्वी व्हा’ , ‘मजेत जगा’, ‘गोल्स’, अशा प्रकारची पुस्तके भरपूर प्रमाणात प्रकाशित करीत आहेत. त्यातली अनेक पुस्तके चांगली आहेत याबद्दल दुमत नाही. आणि आश्चर्य म्हणजे अलीकडे मराठी पुरुषवर्गही या अशा पुस्तकांकडे ओढला जात आहे. आणि ती पुस्तके विकत घेऊन वाचत आहे. काही वर्षांपूर्वी अशी पुस्तके वाचणे हे स्त्रीवर्गासाठी राखीव असल्यासारखे होते, परंतु कॉर्पोरेट जगात ‘एच आर’ आपल्या लोकांसाठी सतत प्रशिक्षण वर्ग घेत असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये एक ‘मोटिव्हेशन’ प्रेरणा निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणजे अशी पुस्तके वाचावीत, किमान संग्रही ठेवावीत, अशी पुरुषवर्गाची धारणा होऊ लागली आहे.
माझा मित्र डॉ. सुहास भास्कर जोशी अशी काही प्रशिक्षण शिबिरे घेतो. शिबिराच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही काही पुस्तके सांगा, अशी आवर्जून विचारणा होते आणि त्याची पुस्तके बाजारात असल्यामुळे तो लगेच त्यांची मागणी पुरी करू शकतो. शिवराज गोल्रे,         डॉ. आनंद नाडकर्णी यांचा अनुभवही तसाच आहे. म्हणून डॉ. नाडकर्णीची पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली आहेत. तात्पर्य, पुरुषांना आतून कुठेतरी आपल्या स्वभावात आणि वागण्या-बोलण्यात बदल घडवून आणावा असे वाटू लागले आहे.
यासह यशस्वी व्यावसायिकांची चरित्रे/आत्मचरित्रे अशी काही  प्रेरक पुस्तके आहेत आणि त्यांनाही मागणी आहे. प्रामुख्याने ओबामा, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, गुगल स्टोरी आदी अशी चरित्रे- सक्सेस स्टोरी वाचण्याकडे पुरुष मंडळींचा कल आाहे. आणि आश्चर्य म्हणजे ‘इमोशनल इंटेलिजन्स’, ‘सोशल इंटेलिजन्स’ अशा पुस्तकांनाही मागणी आहे. अजून एक फरक म्हणजे नातेसंबंधांविषयीचे लिखाणसुद्धा पुरुष वाचू लागले आहेत. हा बदल होत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे पुरुषांना, ‘वर्क, वूमन आणि वेल्थ’ या तिन्ही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असते.
मग या पुस्तकात मिळालेली प्रेरणा, या पुस्तकात सांगितलेली कौशल्ये अमलात आणली तर प्रत्येक वाचक आत्माविश्वासपूर्वक, निर्धाराने, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला लागतो का?
इथेच तर गोची आहे. अनेकांना प्रेरणा मिळते , ती मंडळी पुस्तकाबरहुकूम वागायचा प्रयत्न करतात. अगदी आमच्या शिशिरसारखे. भारतातील एका प्रसिद्ध लेखकाच्या पुस्तकाने तो झपाटून गेला. त्या पुस्तकाचे चारपाच वेळा तरी पारायण त्याने केले आणि ज्याला त्याला ते पुस्तक वाचायचा आग्रह तो करीत असे. त्यात मीही होतोच. आणि माझ्या व्यवसायामुळे ऐकण्याचा कंटाळा येत नाही. समोरचा माणूस जर आपणहून काही सांगत असेल, स्वतबद्दलच्या समस्या असो वा सुखाच्या गोष्टी असोत मी माझ्या मित्र-मंडळीना कान देतो. शिशिर त्या पुस्तकातील बऱ्याच गोष्टी करू पाहत होता, पण सातत्याने त्या गोष्टी करणे त्याला जमत नव्हते. सुरुवातीला त्याची प्रतिक्रिया होती ‘यातलं सगळं करता येण्यासारखं आहे.’  मी म्हणालो, ‘मग वाट कशाची बघतोस, लगेच स्वतत बदल करायला लाग.’
एक महिन्यानंतर तो भेटला. मी विचारले, ‘काय बदल होताहेत का?’ तो म्हणाला, ‘मी पुस्तक अनेकदा वाचलं. वाचताना सोप्पं वाटतं, पण प्रत्यक्ष करायला लागलो की अनेक शंका निर्माण होतात. आता मी असं ठरवलंय की त्यांची कार्यशाळा करायची. जातील तीस हजार रुपये, पण त्यांची थेट भेट होईल आणि शंका विचारता येतील. जर इतकी माणसे यशस्वी होतात तर मी का होणार नाही?’ मी म्हणालो, ‘होशील! नक्की होशील. नंतर सांग मला काय होईल ते.’
  दोन महिने झाले तो भेटला नव्हता. मला उत्सुकता होती इतके पसे खर्च करून त्याच्यात काय बदल झाले आहेत? एका लग्न समारंभात भेटला. तो आता विषय काढेल आणि भरपूर बोलेल अशी माझी भाबडी आशा होती. पण पठय़ा तो विषय सोडून आभाळाखालच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होता. मला राहवलं नाही, मीच विचारलं, ‘तुझ्या कार्यशाळेचं पुढे काय झाले?’
 ‘काय सांगू. कार्यशाळा चांगलीच होती. शिकण्यासारखे खूप होते पण मला कळून चुकले या जन्मात मी शिकल्याप्रमाणे काही वागू शकणार नाही. त्याकरता जे गुण लागतात तेच नाहीत ना माझ्याकडे. जी यशस्वी माणसे असतात त्यांचा खाक्याच वेगळा असतो. आपण  ‘टू बेडरूम किचन’ मध्ये वाढलेली मध्यमवर्गीय मानसिकतेची मंडळी. यश आपल्यासाठी स्वप्नवतच असतं फक्त. आपण कितीही मरमर कष्ट केले तरी यश दुसऱ्या कुणाच्या तरी वाटय़ाला येणार! विठ्ठल कामत कसे मोठे झाले? मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल, प्रेमजी यांची उदाहरणे वाचली की वाटते वो मेरे लिये नही. त्यांच्या युक्त्या कॉपी करून मला काही साध्य करता येणार नाही. माझी धाव कुंपणापर्यंत. च्यायला उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करीत बसलो. पसे गेले. वेळ गेला. मी जसा आहे तसा बरा आहे.’ त्याच्या चेहऱ्यावर साफ निराशा दिसत होती.
त्याला जो साक्षात्कार झाला तो मला खूप काही शिकवून गेला. पुस्तक वाचून जसे पोहता येत नाही, तसे पुस्तक वाचून जीवनात यशस्वी होता येत नाही! पुस्तके आपल्यासमोर फक्त दिशादर्शक यंत्रासारखी असतात. जे आपल्या वकुबात, आवाक्यात आहे तोच भाग घ्यायचा. कोणीही कॉपी करून यशस्वी होत नाही. यशस्वी पुरुषांची चरित्रे ही प्रेरणेचे निमित्त होऊ शकतात, पण त्यांचे मूल्य त्यांनी परिस्थितीला भावनिकरीत्या कसे हाताळले हे जाणून घेण्यात आहे.
जर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वागणे मला जमत नसेल तर मी कमी प्रतीचा माणूस ठरत नाही. जर स्वतत सकारात्मक बदल घडवून आणता येत नसतील तर त्याचा अर्थ माझ्या प्रयत्नांची दिशा कुठेतरी चुकते आहे आणि ते नेमके काय चुकते आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. कुठल्याही पुरुष व्यक्तीला यशस्वी होणे सातत्याने, प्रामाणिकपणे आणि खुले मन राखून कष्टसाध्य आहे.
मी मुद्दाम पुरुष व्यक्ती असा उल्लेख केला आहे, कारण स्त्रियांना लग्न झाल्यावर मोठय़ा प्रमाणात स्वतमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कष्ट करावे लागतात. पुरुषांना मात्र स्त्रियांच्या तुलनेत बदल करीत जगण्याचा अनुभव कमी असतो. भारतीय समाजात पुरुष असणं हे जन्मत: काहीतरी विशेष असतं.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे गेल्या आठवडय़ात मी एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो. तिथे कादंबरी -कथा विभागात तुरळक माणसे होती, परंतु स्व-मदत पुस्तकांचे दालन तरुण-मध्यमवयीन पुरुषांनी भरले होते. लागोपाठ मला एका कार्यशाळेत ‘बदल घडणे’ या विषयावर व्याख्याता म्हणून बोलावले होते. त्याची तयारी करताकरता हे सारे पुन्हा एकदा नजरेसमोर आले. या कार्यशाळेत सर्व अधिकारी उच्चशिक्षित आणि वरिष्ठ पदावर काम करीत होते. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील मोठय़ा-मोठय़ा पदव्या घेतल्या होत्या आणि मला अनुभवातून बदलांचा मागोवा घ्यायचा होता.
मला नेहमी अशा वेळी ‘अनामिक मद्यपी’ या संघटनेची आठवण होते. त्यात दिलेली वचने, घोषणा या खूप वैश्विक आहेत. कोणत्याही माणसाला बदल घडवून आणण्यासाठी भरपूर मार्गदर्शक सूचना त्यात आहे. त्यापकी एक सर्वात महत्त्वाचे वचन म्हणजे -कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल करायला हवा.
आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट आपल्या मनाला बजावून सांगावी लागते ती म्हणजे बदल आपोआप घडत नाहीत. त्याकरता सतत शिकत राहावे लागते. आपल्या दिवसभरातील घटनांचा आढावा घेऊन  हातून घडलेल्या चुकांची स्वतशी कबुली द्यावी लागते. ही चूक मी दुरुस्त करीन असे निर्धाराने मनाला सांगावे लागते.
बदल घडवून आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वत:च्या शक्तीस्थानाचे आणि मर्यादांचे भान ठेवत स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा निश्चय करणे. बाहेरच्या  परिस्थितीतील कोणते घटक आपल्या नियंत्रणाखाली असतात आणि कोणते घटक आपल्या नियंत्रणात नसतात हे मनात घोळवून ठेवावे लागते.
अडथळ्यांची शर्यत  
स्वतमध्ये सकारात्मक बदल करीत यशस्वी होणे अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. काही आपणच केलेले, काही इतरांनी उभे केलेले तर काही परिस्थितीमुळे निर्माण झालेले. भरगच्च भरलेली मनाची पाटी हा सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा काम करावे लागेल. अनेक वेळा आपले जुने अनुभव, संस्कार, विचारसरणी, विचार करण्याची वृत्ती, आपल्या काही वारंवार घोटून घोटून गिरवलेल्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलेल्या आपल्या सवयी मनाच्या पाटीवर कोरलेल्या असतात. त्या पाटीवर नवे काही लिहायला जागाच नसते. आपल्या मनात काही सामाजिक, नतिक गृहीतके असतात ती विचारांच्या पाश्र्वभूमीवर आपोआप वाजत राहतात. त्यामुळे मन नवीन काही करण्यासाठी धजावतच नाही. या पाटीवर जे काही लिहिलंय ते पुन्हा एकदा तपासून पहावं लागतं.
प्रत्येक गोष्टीला आपले आपण प्रश्न विचारायचे, हे विचार माझी प्रगती करतील का, की आहे त्या स्थितीतच ठेवतील? या सवयी मला घातक आहेत का पूरक? जर उत्तर नकारात्मक असेल तर त्या गोष्टी पाटीवरून पुसून टाकायला हव्या आहेत. आणि जोपर्यंत हा विरूप विचार वृत्तींचा गजबजाट पुसला जात नाही तोपर्यंत काही खरे नाही. आमचे डॉ. अनिल अवचट म्हणतात, ‘काही दिवसांनी मन म्हणजे न धुतलेल्या पोतेऱ्यासारखे होते. त्याची सांडलेले नवे काही शोषून घेण्याची ना क्षमता राहते ना साफ करण्याची. उलटपक्षी त्या पोतेऱ्याचीच घाण जमिनीला लागते. म्हणून पोतेरे वारंवार धुवून स्वच्छ करावे लागते, तशी आपल्या मनाची साफसफाई करावी लागते.’ डॉ. राजेंद्र बर्वे याला हार्ड डिस्क फॉरमेटिंग म्हणतात.
माझ्याकडे समुपदेशनाला आलेल्या मिहिरला मी जेव्हा हे सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘म्हणजे सगळे पुसून टाकायचं?’ ‘मी असे म्हणालोच नाही. जे चांगले आहे ते जपून ठेवायचे आणि बाकीचे काढून टाकायचे.’ ‘आता बघ तू म्हणालास सगळ्या बायका कटकटय़ा असतात? मला सांग हे सर्व स्त्रियांना लागू होतं का? नाही. तो फक्त तुला ज्या स्त्रियांचा अनुभव आला  त्यापुरता मर्यादित आहे. म्हणजे हा विचार बदलायला हवा. दुसरं, तू हिरिरीने सांगत होतास मुंबईसारखी स्वस्त लोकल सेवा जगात नाही. मान्य, पण तुझे विचार तू तपासून पाहिलेस का? इतर देशात काय घडते याची तुला माहिती आहे का? तू म्हणतोस, लेडी बॉस असेल तर त्या पुरुषांवर सूड उगवतात, हा वैश्विक नियम आहे का? की फक्त तुझ्या अनुभवापुरता मर्यादित आहे?
अशा अनेक मनात साचलेल्या गोष्टी स्वच्छ केल्याशिवाय प्रगती होत नाही. आणि प्रगती नेहमी आतून व्हायला हवी. आणि ती सारखी सारखी करत रहाणं गरजेचं असतं.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा