संध्याकाळी संध्या घरी आली की एक तर तिच्या बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात. ही तर भावनिक गळचेपी. ते सुद्धा या युगात. कारण एकच-स्वार्थी वृत्ती. गृहीत धरणं म्हणतात ते हे!
त सं पाहायला गेलं तर विषय नेहमीचाच, पण गाभा निराळा.. वृद्धांविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी आपण जे वाचतो, पाहतो आणि विचार करतो त्यात सहानुभूती जास्त आणि डोळसपणा कमी आढळतो. कोणतेही मत सरसकट कोणालाच लागू होत नाही; मग ते बाल असोत, वा तरुण वा वृद्ध. खूप वय वाढलं म्हणून माणूस परिपक्व होतो हे विधान तर चुकीचंच वाटतं..
परवा संध्याकडे गेले होते.. माझी बालमैत्रीण.. बऱ्याच दिवसांनी भेटत होतो..किती सांगू आणि किती नको असं दोघींनाही झालं होतं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. मग चहा घेताना टीव्हीचा विषय निघाला. मी तिला सहजच म्हटलं, ‘‘आजचा ‘तो’ कार्यक्रम बघ हं नक्की!’’ तिचा चेहरा कोरडाठाक!
‘‘का गं, कुठे जायचंय का? मग उद्या पुनप्र्रक्षेपण बघ.’’
ती एकदम अस्वस्थ झाली. मला म्हणाली, ‘‘खरं सांगू सारिका, मला टीव्ही बघायला मिळतच नाही.’’ मी अवाक्. ऐकलं तर ही कथा.
ही संध्या-घरातली सून- सकाळीच साडेसातला घराबाहेर पडते ती रात्री ७-८ ला परत येते. तिला एक मुलगी. तीही त्याच वेळी शाळेला निघते; ४ वाजता आल्यावर शिकवणी, खेळ यात बिझी असते.  आठवी-नववीत आहे.. नवराही सकाळी साडेनऊला निघतो आणि संध्याकाळी ७-८ पर्यंत घरी येतो. घरात दिवसभर सासू-सासरे असतात..
घर प्रशस्त आहे. तीन बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट आहे. पण दिवसभर काम करून घरी आल्यावर घरी आल्यावर साहजिकच माणसाला चार गोष्टी बोलायच्या असतात. टीव्हीवर एखादी बातमी, गाणं पाहावं वाटतं. पण घरात आल्यावर मोठय़ा आवाजात टीव्हीवर सीरियल्स चालू असतात. सासूबाई-सासरे यांचा व्यवहार अखंडपणे बाहेरच्या खोलीत. टीव्ही पाहणं, वर्तमानपत्र वाचणं, तिथेच आडवं पडणं.. कोणीही घरी आले तरी आपले नित्यक्रम त्याच पद्धतीने चालू ठेवणं. घरातील पाहुणे वा सून त्यांचे ते पाहून घेतील (!) असं वागणं. त्यांचे रोजचे व्यवहार घडय़ाळाच्या काटय़ावर चालतात म्हणे. मग त्याला टीव्हीवरच्या मालिकांच्या वेळा तरी अपवाद कशा असणार. बरं दोघे खूप हसून-खेळून मनमोकळ्या स्वभावाचेही नाहीत, त्यामुळे असे पुतळे कसे आवडतील कोणाला? संध्या घरातल्या अबोल्यालाच वैतागलेली वाटली.
मला खूप वैषम्य वाटलं.. या घरात तिला स्वत:ला काही स्पेस नव्हती. मी तिला म्हटलं, ‘‘संध्या अगं तू टीव्ही घे न तुझ्यासाठी वेगळा!’’ पण त्यावरचं तिचं उत्तर अंतर्मुख बनवून गेलं..
‘‘सारिका, अगं दुसरा टीव्ही हा पर्याय नाहीये..हा वृत्तीचा भाग आहे.. माया, आपुलकी, एकमेकांबद्दल आदर, दुसऱ्याचा विचार करण्याची सहजता ही आपण बाहेरून ओतू शकत नाही कुणात.. बारा तास मोकळेपणा, घरात सगळ्या कामांना बायका, कसलीही जबाबदारी नाही.. तरीही त्याचं जग खूप स्वकेंद्रित आहे. नातीच्या भुकेचाही विचार त्यांच्या मनात येत नाही. मग मी आणि त्यांचा मुलगा यांचा विचार तर फार लांब.. ते इथे एक लॉज असल्यासारखे राहतात.’’
 मी तिला समजावत होते की तिने हे सगळं स्वच्छ बोलून गुंता सोडवला पाहिजे. तिचं उत्तर. ‘‘टीव्ही हा एकच मुद्दा नाही गं.. माणसं प्रेमळ असली की या छोटय़ा गोष्टींचं ओझं वाटत नाही.. सुरुवातीला मी पाहिला प्रयत्न करून पण.. अगं, मी काही मोठय़ा मनाची वगैरे नाही. मला या सगळ्याचा प्रचंड ताण येतो.. राग येतो.. पण घरात भांडणं नकोत.. आणि अशा गोष्टी सांगून करून घेण्यात काय मजा? वयाप्रमाणे काही गोष्टी त्यांनाच नको का समजायला. मला तणावाचे वातावरण झेपणार नाही गं..’’
संध्याकाळी संध्या घरी आली की एक तर तिच्या बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात. ही तर भावनिक गळचेपी आहे. ते सुद्धा या युगात. कारण एकच-स्वार्थी वृत्ती. गृहीत धरणं म्हणतात ना ते हे! संध्याला टीव्ही, बाहेरची खोली लागत नाही, असा गोड गैरसमज करून घेतलाय तिच्या सासू-सासऱ्यांनी..  अरे, पण तिला आपल्या नवऱ्याबरोबर मोकळ्या गप्पा मारायला, एखादा कार्यक्रम पाहायला आवडेल ना!!  सगळ्यात वाईट याचं वाटलं की संध्या आता त्यांच्याशी संवाद करू शकत नाही. तिचं मन उडालं या माणसांवरून.. ते फक्त एकमेकांशी कामापुरते बोलतात..
सगळ्यांच्या घरात असं दृश्य पाहायला मिळेल असं नाही. पण ज्यांच्या घरात असं आहे त्यांनी थोडं समजून -जमवून घ्यायला काय हरकत आहे? वृद्धांनी आपल्याला जमतील त्या चार गोष्टी आत्मीयतेनं कुटुंबासाठी केल्या तर आजच्या सुना काही वाईट नाहीत हो. त्यांचेही ताण समजून घ्यायला हवेत. मायेचा ओलावा नसणारी माणसं कोणालाच प्रिय नसतात.
एकत्र राहून सुख-दु:खात साथ देणारी, नव्या पिढीची ओढाताण समजावून घेऊन कुटुंबाचा आधारवड होणारी ज्येष्ठांची पिढी नव्या सुनांनाही हवीहवीशीच वाटत आहे. संध्यासारख्या स्त्रियांना तरी नक्कीच!   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा