अभ्यास घेताना एक तत्त्व मी नेहमीच पाळते. जे मुलांना पाठ करायला द्यायचं, मग कविता असो वा संस्कृतचे श्लोक, व्याकरणातील तक्ते वा गणिताची सूत्रे मी आधी पाठ करते. त्यामुळे मला त्यातल्या अडचणी समजतात आणि मला येतंय म्हणून मुलंही करतात..
मुलं अभ्यास करत नाहीत अशी ओरड पालक नेहमीच करतो. एका जागी बसायलाच ती तयार होत नाहीत, सतत पेनशी नाही तर पेन्सिलीशी चाळा, मी आपलं शिकवतेय, पण याचं लक्ष भलतीकडेच, अशा प्रतिक्रियाही ऐकतो. पण क्षणभर विचार करा बरं. हे सगळं खूप स्वाभाविक नाही का? आपल्यालाही न आवडणारी गोष्ट आपण कुठे लक्ष देवून करतो. निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, पण मुलांना नको? त्यांना मात्र आपण एका चौकटीत बसवतो. ठराविक आणि नेमून दिलेला अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे. जमत नाही म्हणजे काय? जमलंच पाहिजे. त्यासाठी टय़ूशन्स, क्लास हे सगळे पर्याय आपल्याला मान्य असतात.
मूल ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिलाही तिच्या वयानुसार का होईना आपले विचार आहेत, हे स्वीकारायच्या स्थितीतच नसतो आपण! अधिकाराचा हक्क बजावायची जणू घाईच झालेली असते आपल्याला.
खरं सांगू माझं ही काहीसं असंच होत होतं. माझाही मुलगा फार चंचल होता. सतत कसला ना कसला तरी चाळा करत असे. तो अक्षर सुंदर पण लिहिण्याचा भारी कंटाळा. त्याचा अभ्यास घ्यायचा म्हणजे अगदी कसोटीच लागायची. अभ्यासाकडे त्याला कसं वळवावं यासाठी मी सतत विचार करत असे. मारून मुटकून अभ्यास करण्यापेक्षा त्याला त्यात गोडी वाटेल व तो आपणहून करावा वाटेल असं काहीतरी करायचं ठरवलं.
त्यासाठी माझा मीच एक प्रयोग केला. सायन्सचा अगदी पहिला धडा निवडला. धडा वाचून त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपून घेतले. त्याचा छोटा कागद बरोबर घेतला आणि त्याला घेऊन संध्याकाळी फिरायला-खेळायला म्हणून देशमुख उद्यानात गेले. तिथे एक औषधी वनस्पतींचा विभाग आहे. ओळीने लावलेली सुंदर झाडं आहेत. धडय़ाचे मुद्दे डोक्यात होतेच. त्यानुसार मूळ, खोड, पान हे झाडाचे अवयव, पानं अन्न कशी तयार करतात. वेल, झाड, झुडूप यातील फरक, माती-मूळ यांचा संबंध सगळं सगळं समजावून सांगितलं, पण अभ्यास करतो आहोत, असं काहीही न भासवता अगदी सहज.
घरी मी आधीच काही ‘हरबेरियमस्’ तयार करून ठेवली होती. (हरबेरियमस् म्हणजे झाड, पान, फूल यांचे वाळलेले नमुने) प्रत्यक्ष अभ्यास घ्यायला बसल्यावर त्याला बागेतील गोष्टी पुस्तकात दिसल्यावर विलक्षण आनंद झाला. ‘‘आई, हे तर आपण पाहिलंय.’’ असं म्हणतच त्याचा तो धडा चुटकीसरशी संपला. गोकर्णीचा वेल, आंब्याची डहाळी, नारळाचं बाळरुप, जास्वंदीची फुलं, मुळांचे नमुने (सोटमूळ, तंतूमूळ) असं सगळं चित्रांबरोबर प्रत्यक्ष बघितल्यावर तो आनंदला, आता त्याचा पेन्सिलीचा चाळा थांबला होता. मांडी हलवणं नाही, आई.. दहा मिनिटांची रिसेस दे ना म्हणून भुणभूण नाही, काहीही नाही. अभ्यासात तो अगदी पूर्ण रमला!
एकदा युक्ती सफल झाली म्हटल्यावर मग ती मी इतरही विषयांसाठी वापरली. इंग्रजीच्या पुस्तकातील ‘मंडे मॉर्निगचा’ धडा वाचायच्या आधी ‘मालगुडी डेज’ची डीव्हीडी आम्ही पाहिली. फिजिक्समधील तत्त्वांचा अभ्यास करण्याआधी ‘नेहरू सायन्स सेंटर’ची सहल केली. संस्कृत शिकवताना रोजच्या वापरातील वस्तूंची संस्कृत नावे मी आधीच शोधून ठेवत असे. मग ती ओळखण्याचीस्पर्धा होत असे. प्रत्येक धडा, प्रत्येक विषय शिकवताना मी नवी पद्धत वापरे, अशा नवीन युक्त्या, प्रयुक्त्या, नवीन खेळ यामुळे अभ्यास ओझं वाटत नव्हता.
मुलासाठी वापरलेल्या या युक्त्यांचा उपयोग होतोय म्हटल्यावर पहिलीतील माझ्या छोटीसाठीही मी त्या वापरू लागले. गणितातील पाढे पाठ करणं, ही आमची फार मोठी अडचण होती. त्यावर एक कल्पना सुचली. आपण लहानपणी झिम्मा खेळत असू तसा एक खेळ ती शिकून आली होती. ‘आओ मीना सुपर सेना’ असं गाणं असलेल्या त्या गाण्याच्या ठेक्यावरच मी पाढे बसवले व चुटकीसरशी हीसुद्धा अडचण सुटली.
एक तत्त्व मात्र मी नेहमीच पाळलं जे मुलांना पाठ करायला द्यायचं, मग कविता असो वा संस्कृतचे श्लोक, व्याकरणातील तक्ते वा गणिताची सूत्रे. मी ते आधी पाठ करते. त्यामुळे मला त्यातल्या अडचणी समजतात. मला येतंय म्हटल्यावर मुलंही ते करतात. नाहीतर कागद हातात त्यांचं पाठांतर घ्यायचं म्हणजे त्यांच्या अडचणी समजत नाहीतच. उलट पाठ होत नाही म्हणून आपलीच चीडचीड होते.
अभ्यासाबरोबर पूरक वाचनही हवंच. ज्ञानासाठी आणि मनोरंजनासाठीही वाचन करा म्हणून मूल वाचणार नव्हतीच, अवांतर वाचनाची गोडी त्यांना लागावी म्हणून जाणीवपूर्वक मी त्यांना पुस्तक प्रदर्शनांना नेऊ लागले. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या प्रभादेवी येथील कार्यालयात नेऊन स्वत:ची पुस्तक त्यांना स्वत:च निवडायला लावली. त्यातून आपोआपच पुस्तकांबद्दल एक आपलेपणा निर्माण झाला. मी माझं माझ्यासाठी निवडलेलं पुस्तक म्हणून त्याची जपणूकही आपसूकच होऊ लागली. झोपायच्या आधी एक गोष्ट वाचून दाखवण्याचा परिपाठही ठेवला. अत्र्यांची नवयुग वाचनमाला, भा. रा. भागवतांचा बालमित्र, प्रभावळकरांचा बोक्या व ना. धो. ताम्हनकरांचा गोटय़ा, फास्टर फेणे, फालूदा, व्यामकेश तशी सगळ्या मंडळीशी अगदी रोजची भेट घडली. कविता महाजनांची ‘कुहू’ व त्यातला सप्पू साप तर विशेष आवडीचा!
या सगळ्यासाठी वेळ तर दयावा लागलाच आणि मेहनतही. पण यातून मिळालं आई होण्याच्या कर्तव्यपूर्तीचं समाधान आणि तेच अधिक महत्त्वाचं आहे नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा