रजनी परांजपे

पालकांना वारंवार शाळेत जाण्याची, तेथील शिक्षकांशी बोलण्याची सवय करून द्यावी लागते. त्यांच्या मनातली शाळेची, शिक्षकांची भीती घालवणे हे महत्त्वाचे काम. वारंवार जागा बदलून इकडे तिकडे फिरणाऱ्या मंडळींच्या बाबतीत तर त्यांच्या मनातली ही भीती घालवणे फारच महत्त्वाचे. कारण दुसरीकडे गेल्यावर मुलाला शाळेत घालणे हे काम तर त्यांचे त्यांनाच जमले पाहिजे.. पालकांसोबत काम करतानाचे प्रश्न आणि अनुभवांतून शोधलेल्या उत्तरांची चर्चा करणारा भाग २

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Dhirubhai Ambani International School Fees
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
Devarpade School, Dada Bhuse Visit Malegaon Taluka ,
मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’

मागील लेखात (६ जुलै) आपण पालकांना सक्षम करणे कसे गरजेचे आहे ते पाहिले. तसेच पालकांबरोबर काम करताना शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया त्यांना समजावून सांगणे हे जसे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडून ते प्रत्यक्ष करवून घेणे, शाळा आणि शिक्षक यांच्याशी त्यांचा परिचय आपण स्वत: सोबत जाऊन करून देणे का गरजेचे आहे तेही बघितले. आज काळाच्या ज्या टप्प्यावर आपण उभे आहोत त्या टप्प्यावर मुले शाळेत दाखल होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे, असे आपल्याला दिसते, पण शाळेत नाव घातले की झाले, रोज शाळेत गेलेच पाहिजे असे नाही, सवडीप्रमाणे जावे-यावे असे करणारी मुले खूप दिसतात. ‘शाळेतली हजेरी किमान ८० टक्के असावी,’ अशी सरकारी शाळांची अपेक्षा. इथूनच घसरणीला सुरुवात होते.

अशी ८० टक्के हजेरी खासगी शाळांमधून चालत नाही. तिथे एक दिवस गैरहजर राहायचे झाले तरी परवानगी काढावी लागते आणि तीही सहजासहजी मिळत नाही. साहजिकच रोजच्या हजेरीचे महत्त्व पालकांना पटवून देणे महत्त्वाचे ठरते. तेही केवळ तोंडी सांगून भागत नाही तर हजेरी नियमित होईल यासाठी प्रयत्न करावे लागतात. मुलांना वेळेवर तयार करण्यासाठी पालकांना सूचना द्याव्या लागतात. आणि तेही पुरले नाही तर सुरुवातीला प्रत्यक्ष जाऊन मुलांना तयार करून शाळेत पोहोचवावे लागते. शाळेत माध्यान्ह भोजन मिळते, पण शाळा सकाळची असेल तर भोजन मिळेपर्यंत साडेदहा-अकरा वाजतात. दुपारचे भोजन साधारण अडीच ते तीनच्या सुमारास येते. त्यामुळे मुलांना डबा देणे गरजेचे ठरते. लहान मुलांना भूक लागते. सकाळी लवकर गडबडीच्या वेळी डबा तयार करून देणे सर्वानाच जमते असे नाही. मग मुलांच्या हातावर खाऊसाठी पैसे दिले जातात. पैसे देण्यात दोन प्रकारचे धोके असतात. एक म्हणजे मूल मधल्या सुट्टीत शाळेबाहेर गेले आणि परत न येता इकडे-तिकडेच हिंडत बसले तर ते हरवण्याचा धोका आणि दुसरे म्हणजे, त्याच पशांनी गुटखा विगैरे विकत घेऊन खाण्याची सवय लागण्याचा धोका असतो. त्यामुळे ‘मुलाच्या हातात खाऊला पैसे देऊ नका. विकतचे आणून द्यायचे असले तरी ते तुम्ही घरीच आणून ठेवा आणि शाळेत जाताना मुलाच्या हातात द्या.’ असे सांगावे लागते. पण सांगितले म्हणजे सगळेच पालक ऐकतात असे तर नसतेच. म्हणून मुलांनी डबा आणला आहे किंवा नाही हे बघावे लागते आणि पालकांना सवय लागेपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो.

पालकांबरोबर सतत संपर्कात राहून त्यांना शाळा, शाळेचे वेळापत्रक, रोजचे, सुट्टय़ांचे आणि परीक्षांचे वेळापत्रक, शाळेची पुस्तके आणि त्यातले धडे, त्यातले किती मुलाला येणे अपेक्षित आहे आणि पालक स्वत: अडाणी असले तरी ते कसे समजून देऊ  शकतात आदी गोष्टींची सविस्तर माहिती त्यांना करून द्यावी लागते. मुलांची शाळा चालू असताना मध्येच गावची जत्रा, कुणाचे लग्नकार्य किंवा तत्सम गोष्टींसाठी गावी गेल्याने मुलांचे नुकसान होते हा विचार आधीपासूनच पालकांच्या मनावर बिंबवावा लागतो. आणि तसे करावेच लागणार असेल तर मुलाला इथेच ठेवून जाण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार त्यांच्याकडून होईल अशा तऱ्हेने पालक गटाबरोबर चर्चा करून त्यांची कळत नकळत मानसिक तयारी करून घ्यावी लागते. ऐन वेळेला, म्हणजे उद्या गावाला जाणार असे समजल्यावर, आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण पालकांचा बेत बदलू शकत नाही.

याशिवाय पालकांना वारंवार शाळेत जाण्याची, तेथील शिक्षकांशी बोलण्याची सवय करून द्यावी लागते. त्यांच्या मनातली शाळेची, शिक्षकांची भीती घालवणे हे महत्त्वाचे काम. प्रथम माणसे बुजतात. पण मग हळूहळू जमते. वारंवार जागा बदलून इकडे-तिकडे फिरणाऱ्या मंडळींच्या बाबतीत तर त्यांच्या मनातली ही भीती घालवणे फारच महत्त्वाचे असते. कारण दुसरीकडे गेल्यावर मुलाला शाळेत घालणे हे काम तर त्यांचे त्यांनाच जमले पाहिजे.

मूल शाळेतून आल्यावर त्याच्याशी शाळेबद्दल बोलणे, त्याने दिवसभर काय केले हे विचारणे, हे पुष्कळदा सुशिक्षित पालकांकडूनही होत नाही. मध्यंतरी दूरचित्रवाणीवर ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची एक मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी त्यांची आई त्यांचा आणि भावंडांचा अभ्यास कसा घ्यायची याचा एक किस्सा सांगितला. आई स्वत: शिकलेली नाही. पण मुले शाळेतून घरी आली की, ती स्वयंपाक करता करता मुलांना आपल्यासमोर अभ्यासाला बसवायची आणि त्यांनी केलेला अभ्यास ‘दाखवा बघू’, असे म्हणून तपासायचीसुद्धा. आणि ‘छान, चला पुढे.’ असे प्रोत्साहनही द्यायची. आपल्या आईला वाचता येत नाही हे मुलांना बरेच वर्षे कळलेच नव्हते. आणि जेव्हा कळले तेव्हा नियमाने अभ्यास करण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली होती. त्यांची आईही कार्यक्रमात होती. ही गोष्ट ऐकून ती हसली आणि म्हणाली, ‘‘अभ्यास चूक का बरोबर ते बाई बघतील, पण मुलांना अभ्यासाला बसवणे हे माझे काम. ‘मला काही येत नाही.’ असे सांगितले असते तर ती बसली असती का अभ्यासाला?’’ आम्हीही पालकांना हेच सांगतो, ‘तुम्हाला येत नसले तरी तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवा.’

पालकांना घरचा अभ्यास किंवा गृहपाठ याविषयी कशी अजिबातच कल्पना नसते याचा एक गमतीचा किस्सा आठवला. जुनी गोष्ट आहे, सुट्टीमध्ये मुलांना करण्यासाठी म्हणून आम्ही खास सराव पुस्तिका तयार केली. लहानच, चार पानांची. मुलांना ‘घरी अभ्यास करा’ असे सांगून ते कागद दिलेही. सुट्टी संपली. मुले परत आली. सराव पुस्तिकाही परत आणल्या. काही कोऱ्या करकरीत तर काही बिनचूक सोडवलेल्या. काही पालकांनी त्या स्वत:च सोडवल्या. तर काहींनी त्या हरवू किंवा फाटू नाहीत म्हणून उचलून ठेवल्या! मुलांनी सोडवलेल्या अशा थोडय़ाच.

पालक साधारण तीन गटांत विभागता येतात. काही पालक हे मुलांना शाळेत घातले पाहिजे, शिकवले पाहिजे या मताचे असतात. पण त्यांना काय करावे, शाळा कुठे आहे, शाळेत नाव घालण्यासाठी काय करावे लागते, इत्यादी माहिती नसते. आपण ती माहिती दिली, नुसते बोट दाखवले तरी पुरते. बोट धरून चालवण्याची गरज नसते. काही जणांना बोट धरून चालवावे लागते. पण बोट धरले की पुरते. चालण्याचा प्रयत्न त्यांचा ते करतात आणि हळूहळू आपले बोट सोडून चालायलाही शिकतात. तिसरा गट थोडा अवघड. शाळा आणि शिक्षण याबद्दल त्यांची भूमिका नकारात्मक असते आणि आपल्या मतावर ते ठाम असतात. अशा पालकांबरोबर थोडे जास्त काम करावे लागते, पण हळूहळू फरक पडतोही. आणि तसा फरक होण्यासाठी आपल्या प्रयत्नांपेक्षाही मुलांनी लावलेला रेटा जास्त कारणीभूत ठरतो. आजूबाजूची मुले शाळेत जाताना पाहिली की आपणही शाळेत जावे, असे मुलांना साहजिकच वाटते आणि ती आपल्याला हवे तसे करून घेतातच.

वस्तीत पालकांपैकी किंवा स्वत: पालक नसतानाही ‘शिक्षण’ या विषयाचे महत्त्व पटलेल्यासुद्धा काही व्यक्ती असतात. आम्हाला अशा व्यक्ती दिसतात, त्यांची माहिती होते. त्यांनी आपणहून कुठल्या तरी मुलाला शाळेत घातले, माहिती दिली असे समजते. आम्ही अशी माणसे हेरून त्यांच्याबरोबर संबंध वाढवतो. त्यांना ‘शिक्षण मित्र’ नाव देऊन त्यांच्याबरोबर निराळ्या प्रकारे काम करतो. ‘शिक्षण मित्र’ वस्तीत कशा प्रकारे काम करतात, आम्ही त्यांना प्रशिक्षित आणि सक्षम कसे करतो आणि त्यांच्यामार्फत शिक्षण प्रसाराचे काम पुढे कसे नेतो ते पुढच्या लेखात (३ ऑगस्ट)पाहू.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

Story img Loader