एका अपघातात तिचे दोन्ही हात व पाय तुटले. अपंग होऊनही तिने आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग होऊ दिलं नाही. तिने जगण्याचा पर्याय स्वीकारला आणि एक आदर्श निर्माण केला त्या डॅनिएला गार्सियाची ही सत्यघटना.
चिली देशातली डॅनिएला.. डॅनिएला गार्सिया.. I choose to live असे अभिमानाने म्हणते आणि म्हणू शकते.
डॅनिएला .. उत्तम खेळाडू, देखणी, बुद्धिमान आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी भावी डॉक्टर. वडील डॉक्टर- रेडिओलॉजिस्ट. छोटय़ा मुलांच्या रेडिओलॉजीचे विशेषज्ञ.. आई डेंटिस्ट. रिकाडरे स्ट्रब हा खास (प्रेमाचा) मित्र, तोही हुशार खेळाडू .. तरुण मुलीच्या दृष्टीने ‘आदर्श’ स्थिती. रूप, गुण, पैसा, शिक्षण, कौटुंबिक स्थिती, बॉयफ्रेंड काहीच कमतरता नव्हती.
मेडिकल कॉलेजमधली शेवटची सेमेस्टर. पुढच्या वर्षी डॅनिएला डॉक्टर होण्याची जिद्द. त्यामुळे अभ्यास आणि अभ्यास आणि येस! ‘सॉकर’ खेळण्याशिवाय पर्यायच नाही. अभ्यासाइतकेच प्रेम खेळावर (तेही रिकाडरेसोबत अधिक मजेत) ऑक्टोबर २००२ सॅनडिआगो या चिलीपासून सहाशे सत्तर मैलावरच्या शहरी आंतर मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स होणार होत्या. चुरशीच्या, महत्त्वाच्या सतरा मेडिकल कॉलेजेस सहभागी होणार असतात. या स्पर्धा, स्नूकरचा खेळ मनाला आवाहन करीत असतात. पण नको! मेडिकलचा अभ्यास, डॉक्टर होणे अधिक महत्त्वाचे. पण दोस्त स्ट्रब आणि इतर खेळाडू, स्नेही यांनी खूपच जोर केला आणि ऐनवेळी खेळाच्या स्पर्धेला जायचा निर्णय झाला..
या स्पर्धेसाठी प्रचंड संख्येने विद्यार्थी खेळाडू प्रवास करणार होते. प्रवासही मोठाच, नऊ-दहा तासांचा तरी.. रेल्वेने ही संख्या पाहून अधिक गाडय़ा सोडल्या. जुन्यापुराण्या.. अस्वच्छ.. मोडकळीला आलेल्या. तरुण मुले-मुली त्याही प्रवासात आनंदात होती. नाचत-गात होती. गिटार वाजवत होती. पॅक करून आणलेले बर्गर खात होती. डॅनिएला मात्र दमली होती. आदल्या रात्रीपर्यंत जागून केलेला अभ्यास.. आता गरज होती ती शांत झोपेची. ती बसलेल्या बोगीत हे शक्यच नव्हते. रिकाडरे म्हणाला, ‘‘तू पुढच्या बोगीत का जात नाहीस? तिथे शांतपणा मिळेल तुला..’’ ‘‘ओके!’’ म्हणत डॅनिएला एका बोगीतून दुसऱ्या बोगीकडे निघाली. अंधारे रेल्वे डबे, बाहेरही अंधार. जुनाट रेल्वेचा कुरकुरणारा आवाज. दोन डबे जोडणाऱ्या लिंक्स (बहुतेक) नीट नव्हत्याच. एका वळणावर गाडी वळली आणि मधल्या पॅसेजमधून हळूहळू चालत जाणारी डॅनिएला खाली रुळात पडली. ट्रेन पुढे पुढे जात राहिली..
किती काळ गेला? वेळ कोणती? आणि ठिकाण? डॅनिएला हळूहळू शुद्धीवर येत होती. फक्त वेदनेची जाणीव. केस चेहऱ्यावर रक्ताने घट्ट चिकटले होते. ते दूर करण्यासाठी तिने हात चेहऱ्याकडे नेले. तर.. तर तिच्या लक्षात आले की, दोन्ही हातांच्या दंडांनंतर तिला हातच नव्हते. दोन्ही हात तुटून त्यातून भळभळणारा रक्तप्रवाह जमिनीकडे चालला होता आणि तीच स्थिती पायांची.. एक पाय गुडघ्याखाली अस्तित्वातच नव्हता. दुसरा पाय तर मांडीतूनच तुटलेला. उरला फक्त हातपाय नसलेला, रक्तभरला वेदनामय देह. तुटलेले हातपाय दूर जाऊन पडलेले. आपण जिवंत कसे राहिलो? तिला एकदम जाणवलं ते दु:ख, वेदना, भय..!
मन जिवंत होतं! बुद्धी शाबूत होती. तिने डॅनिएलातल्या डॉक्टरला इशारा केला. ‘उठ, तू जिवंत आहेस.’ डॅनिएलाला जाणवलं. आपला तुटका देह रुळावर पडला आहे. एवढय़ात दुसरी ट्रेन येऊ शकते आणि ..अर्थात चिरडून मरण! ज्याअर्थी हातपाय तुटूनही आपण जिवंत आहोत. त्याची “I have to choose to live, But how?”
दुसरी ट्रेन रुळावरून जाण्यापूर्वीच काहीतरी हालचाल (?) करायला हवी. जीव एकवटला.. पोट आणि पाठ दोनच शिल्लक अवयवात जोर आणला आणि रुळांवरून देह कडेला ढकलला. दुसरी ट्रेन दहाच मिनिटांत त्या रुळांवरून धडधडत गेली.
जीव तर बचावला! आता पुढे? तिने जिवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. ‘हेल्प.. हेल्प.. प्लीज.’ सुदैवाने रिकाडरे मोरेन नावाचा तरुण रेल्वे रुळाजवळ सहज गंमत म्हणून सिगरेट ओढत उभा होता. त्याने तत्परतेने तिला धीर दिला आणि लगोलग समोरच्या पेट्रोलपंपावर जाऊन इमर्जन्सी सव्र्हिसला फोन केला. इमर्जन्सी सव्र्हिसची व्हॅन तत्परतेने डॉक्टरना, नर्सला घेऊन आली. तोवर डॅनिएला बेशुद्ध झाली होती. शरीर रक्ताने भरलेले. ही व्यक्ती जिवंत असेल, असे व्हॅनमधल्या कुणालाही वाटलेच नाही. पुढे हॉस्पिटल.. आता डॅनिएला शुद्धीवर आली. हाही एक चमत्कारच आणि तिने तिचे डॉक्टर वडील, काका, मित्र-मैत्रिणी, भाऊ. सर्वाचेच अचूक फोन नंबर्स आणि पत्ते अचूक दिले. डॉक्टर वडील आल्यानंतर सुरु झाली ऑपरेशन्सची मालिका. एक, दोन, तीन. कुजलेला भाग कापला गेला. परत जखमा, फिरून रक्त. शरीर नुसते वेदनाघर झालेलं.. असह्य़ कळा, दाह, रुग्णशय्या म्हणजे दु:खाचे आगर झाले. वेदनाशामक औषधांचा काही असर होत नव्हता.
तरीही ती डॉक्टरना विचारायची, ‘‘मी परत चांगली होईन?’’ ‘‘हो नक्की!’’ जगण्याची उमेद कायम ठेवीत, ती फिलाडेल्फियामधील ‘मॉस रिहॅबिलेशन सेंटर’मध्ये दाखल झाली. कृत्रिम अवयव बसवण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी.
आता तिचे जीवन, तिची दैनंदिनी वेगळीच झाली. सकाळी चार ते दुपारी चार फिजिओथेरपी, त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी. कृत्रिम पायांवर कसे चालायचे? कृत्रिम हातांनी जेवायचे कसे? शरीराच्या प्रत्येक हालचाली कृत्रिम अवयवांद्वारे करणं सोपे नव्हतेच. पण मेडिकल कॉलेजमधले अॅनाटोमीचे ज्ञान कामी आले. डॅनिएलाचे मुख्य डॉक्टर इस्कनाझींशी विशेष स्नेह निर्माण झाला. कारण त्यांना स्वत:लाच कृत्रिम उजवा हात बसवावा लागलेला होता. (स्फोटात त्यांचा हात तुटला होता.) तरी ते सर्व हालचाली सफाईने करीत. इस्कनाझी तिचे प्रेरणास्थान ठरले.
रेल्वे रुळावरची काळीकुट्ट रात्र हळूहळू विस्मरणात जाणीवपूर्वक नेली. आता कृत्रिम हातापायांनी वस्तू उचलणे, जेवणे, हुक्स लावणे आणि पुढे पुढे तर मेकअप करणे आणि चक्क विणकाम करणे. इथपर्यंत तिची मजल गेली. (इथे सुधा चंद्रन या नृत्यअभिनय निपुण कलावतीची आठवण येते.) एकीकडे अपूर्णतेची अस्वस्थ जाणीव होतीच. आपण पूर्वीसारख्या होणार नाही. हे वास्तव नकोसे होते. तरी अनिवार्य. आता? कृत्रिम अवयवांसह जास्तीत जास्त स्वयंपूर्ण जगायचे.
फिजिओथेरपी पूर्ण करून ती घरी सॅनशिअॅगोला परतली, ती विमानापासून चालत चालतच आली. चेहरा आनंदलेला, भोगळ्या दु:खाचा मागमूसही नाही. रिकाडरे स्ट्रब तिला रिसिव्ह करायला गेला, तो साशंक मनानेच, काय दिसेल? काय पाहावे लागेल? कशी असेल डॅनिएल? डॅनिएलच्या निर्मळ हास्याने आणि प्रेमभरल्या आलिंगनाने सर्व शंका फिटल्या.
पुढच्या महिन्यात ती नव्याने सायकल चालवायला शिकली आणि पूर्वीसारखीच रिकाडरेसह ‘बाईकराईड’ करायला लागली. एक वर्षांने मेडिकलचा उर्वरित अभ्यासक्रम पुरा करून डॉक्टर झाली. डॉ. डॅनिएला! लहान मुलांचे पुनर्वसन करणारी उत्तम डॉक्टर! स्वत: आत्मनिर्भर तर ती झालीच झाली. कार ड्रायव्हिंग, कुकिंग, मेडिकल प्रॅक्टिस.. परिपूर्ण डॅनिएला!
तिची महती पुढेच आहे. स्वत:च्या स्वयंपूर्णतेच्या कितीतरी पुढे.. स्वत: ज्या दु:खातून गेली, त्या दु:खातून गेलेल्या मुलांना वैद्यकीय मदत करता करता त्यांना धीर देणारी, त्यांचे मन जाणणारी, आशा जागवणारी डॅनिएला एक श्रेष्ठ मानवतावादी डॉक्टर झाली.
आता एकीकडे तिने रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातासंदर्भात रेल्वेवरती दावा लावला. तिच्या या दाव्यामुळे (पुढे कार्यामुळे) ती चिली देशात सर्वाना माहीत झाली. रेल्वेने तिला २००३ साली भरपूर नुकसान भरपाई दिली. परंतु आता तिची जीवनदृष्टी व्यापक झाली होती. पैसा घेऊन उर्वरित जीवन मजेत काढणे, ही कल्पनाही तिला मान्य नव्हती. राष्ट्रीय टेलेथॉन मॅरॅथॉनसाठी निधी जमा करण्यासाठी तिने व्यासपीठावर जाऊन आवाहन केले. आता अवघे राष्ट्र तिला ओळखू लागले होते. तिच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लाखो डॉलर्सचा निधी जमला. एकीकडे मुलांच्या पुनर्वसनाचे काम चालू होते. पत्रकार, मीडिया.. सर्वत्र मुलाखती छापून येऊ लागल्या, प्रसारित होऊ लागल्या. कीर्ती दिगंत होऊ लागली.
पण डॅनिएलाला या प्रसिद्धीची, कीर्तीची हाव नव्हतीच. तिच्या लक्षात आले की, मीडिया कधी (सोयीने) चुकीची माहिती देतात, तर कधी अतिरंजित बातम्या देतात. कधी अवास्तव स्तुती करतात. देवत्व बहाल करतात. हे सर्व टाळायचे म्हणून तिने आत्मचरित्र लिहिले. प्रामाणिकपणे, खरेखरे. Elegi Vivir-I choose to live. ‘माझी गोष्ट दु:खाची नाही, तर आनंदाची आहे. अपघातानंतर कृत्रिम अवयवांनिशी जगताना मला एक बहुमोल जीवन मिळाले. मी जे गमावले, त्याहून अधिक आनंद मिळवला. रँडम हाऊसने प्रसिद्ध केलेले हे आत्मकथन जगभरात इतके प्रसिद्ध पावले की, त्याच्या चौदा आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. हजारो अपंग लोकांना एक नवी आशा नवी दिशा मिळाली. तिने आपल्या कृत्रिम हातांनी रुग्णपरीक्षा करून हजारो अपंगांचे पुनर्वसन केले. तिचे रिकाडरेशी लग्न झाले आणि तिचे कार्य अधिकच जोमाने सुरू झाले. इतक्या यातना भोगूनही ती तिच्या जगण्याला ‘आनंदाची गोष्ट’ मानते. तिचे डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट म्हणतात, ‘‘आम्ही तिला शिकवले, त्याहून अधिक तिनेच आम्हाला शिकवले.’’
chaturang@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा