समकालीन पुरुषांमध्ये किशोरावस्थेपासून वृद्ध होईपर्यंत ‘व्यक्त’ होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्याला आता भावना शब्दांत मांडण्याचे शिक्षण घ्यावे लागणार आहे. भावनांचे नियमन करायचे शिक्षण घ्यावे लागणार आहे आणि हे जर केले गेले नाही, तर भावनांचे दमन करणारे पुरुष चुकीच्या मार्गवर जातील हे सत्य आहे..
अमुक एक व्यक्ती अशी का वागते याचा शोध घेणे म्हणजे त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करणे असते. कोणत्याही व्यक्तीचे वर्तन त्याच्यामध्ये उतरलेले आनुवंशिक घटक आणि तिच्यावर झालेले संस्कार आणि त्याच्या भवतालावर मोठय़ा प्रमाणात अवलंबून असते. याशिवाय त्याची स्वतंत्र अशी बुद्धी त्या वेळी वागण्याचा कोणता पर्याय निवडते हा भागही महत्त्वाचा असतो. त्याची निर्णय घेण्याची कृती स्वतंत्र असली तरी त्या कृतीमागे त्याच्या मेंदूचे हार्ड डिस्कवर जे अनुभव असतात त्या अनुभवातून बनलेले  पूर्वग्रह त्याच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असतात. थोडक्यात कोणत्याही व्यक्तीची कोणतीही कृती ही नेहमीच त्याची निवड असते. अनेकदा व्यक्ती प्रतिसाद क्षणार्धात देतात. जणू काही संगणकावर क्लिक करण्याचा अवकाश, काही सेकंदांत अभिप्रेत कमांड प्रत्यक्षात उतरते.
खरे सांगायचे तर आपल्या कृतीमागे नेमका कोणता हेतू होता? आपल्या नेमक्या कोणत्या अनुभवावर आधारित अशी आपण निवड केली, त्या कृतीपूर्वी आपल्या मनात स्वत:शी कोणता संवाद सुरू होता यातील एकही गोष्ट त्या व्यक्तीला आठवत नाही, कारण काही कृती सातत्याने वर्षांनुवर्षे करत राहिल्यामुळे ज्या वेगाने मेंदू कोणती कृती करायची, कसा शारीरिक प्रतिसाद द्यायचा, कोणता शब्द समूह कोणत्या स्वरात आणि पट्टीत बोलायचा निर्णय घेतो त्या वेगाची जाणीव लक्षात घेऊन प्रतिसाद देणे ही गोष्ट सरावाशिवाय होत नाही. आपल्या स्वत:च्या प्रत्येक कृतीच्या आधी आपण नेमका काय विचार केला, तेव्हा आपल्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या याची जाणीव थोडय़ा माणसांना असते. इथे मी प्रतिक्षिप्त कृतीबद्दल बोलत नाही, कारण स्वत:चे रक्षण करण्यासाठी व्यक्ती तीन वेगवेगळ्या प्रकारांनी प्रतिसाद देत असते. पळ, थिजून जा किंवा लढ, हे प्रतिसाद सामान्यपणे प्रत्यक्ष समोर उभ्या राहिलेल्या शारीरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी असतात. अशी जी आव्हाने असतात त्यांच्याबाबत तोंड देण्यासाठी काही भावना आपोआप येतात आणि मग ती स्त्री असो वा पुरुष, सारख्याच असतात. भीती, चिंता-नराश्य आणि संताप या भावना जगण्याशी थेट संबंध असलेल्या आहेत. म्हणून स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही सारख्याच लागू पडतात.
उत्क्रांतीवादी मानसशास्त्राप्रमाणे या चार मूळ भावना आहेत. मानसशास्त्राची ही स्वतंत्र शाखा नाही. ती एक मांडणी आहे आणि माणसाचे मन आणि त्याच्या वागण्याच्या रीती याची तर्कसुसंगत मांडणी करते. या मांडणीत माणसाची जसजशी उत्क्रांती झाली तसतसे त्याच्या विचारधारेत बदल होऊ लागले आणि नव्या विचारातून भावनांचे नवे कंगोरे दिसू लागले.
माणूस जसजसा प्रगत होऊ लागला तसतसे त्याच्या जीवनात आणि उद्दिष्टांत बदल होऊ लागले आणि त्याच्यासमोर नवनवी आव्हाने उभी राहू लागली आणि या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याचे मन वेगवेगळ्या रीतींनी विचार करू लागले. त्यामध्ये काही विचार अनुभवांवर आधारित होते, तर काही विचार घटनेबद्दल विश्लेषण करून योग्य पर्याय निवडणारे होते. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला सहकार्य का शत्रुता, लंगिक आकर्षण का अपकर्षण, मत्सर का आव्हान, आक्रमण का पळपुटेपणा, असे काही प्रश्न होते, तिथे त्याला निवड करणे भाग होते. ही निवड करताना स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांचा फायदा घेणे किंवा त्याक्षणी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणे हे पर्याय होते. त्याचबरोबर माणसांमध्ये नातेसंबंध निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात स्त्रीबद्दल आकर्षण आणि प्रेम, पालक म्हणून प्रेम, मत्री तसेच उत्तान भावना मेंदूत रुजू लागल्या. रक्ताच्या नात्यात लंगिक संबंध टाळणे आणि कुटुंब जीवन कसे असावे असे नवे अनुभव मनोकायिक आव्हाने म्हणून उभे राहू लागले.
श्रमविभागणीमुळे पुरुषांच्या काही भावना विशेष करून वाढल्या. कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी कुटुंबावर प्रेम, बाहेरील संकटांना तोंड देण्यासाठी जिद्द, आक्रमकता, चिंता, नराश्य अशा भावना अनुरूप प्रतिसादासाठी विकसित झाल्या. कोणती स्त्री आपल्या वंशास पुढे नेण्यास समर्थ आहे हे शोधून तिचा अनुनय करण्याची नवी कामे त्याला करायची होती. त्यामुळे आवड, आकर्षण, प्रेम आणि मालकी हक्क अशा भावना पुरुषांमध्ये निर्माण झाल्या, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला आवडलेली स्त्री न मिळाल्यास मत्सर, आकर्षणातून आक्रमकता, अन्न मिळवण्याबाबत चिंता, तर कधी निराशा, नसíगक आपत्तींना तोंड देण्याचे धर्य या भावना हजारो वर्षे पुरुषांमध्ये विकसित
होत गेल्या. विकसनाच्या या प्रक्रियेत भौगोलिक परिसरावर मालकी, आपल्या टोळीतील-कुटुंबातील- समाजातील व्यक्तींवर राज्य करण्याची नेतृत्वाची भावना, विस्तार व्हावा म्हणून ईर्षां, त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि जय मिळाल्यास उत्सवी आनंद आणि पराभव झाल्यास निराशेची टोचणी या भावना पुरुषांनी अंगीकारल्या.
अगदी आज २०१४ चे स्वागत करताना, बहुसंख्य पुरुषांमध्ये याच प्रतिसादाच्या भावना स्पष्टपणे दिसून येतात. कुटुंबावर प्रेम करणे, पत्नीबाबत स्वामित्वाची भावना असणे, नोकरी-व्यवसायात ईर्षां बाळगत यश-जय मिळवणे, अपेक्षित यश न मिळाल्यास निराश होणे, नसíगक आपत्तींना (किंवा मानवनिर्मित संकटांना) तोंड देणे शक्य झाल्यास समाधान आणि त्या संकटांशी जुळवून घेण्याची चिंता आणि आपल्या मर्यादांमुळे आलेल्या संकटांना तोंड देण्यात आलेले अपयश आणि त्यातून निर्माण होणारी खिन्नता, आपल्यापेक्षा काही स्त्रिया अधिक प्रगती करीत आहेत हे न पाहवून मनात निर्माण होणारा मत्सर या भावना समकालीन पुरुष अनुभवत आहेत.
सगळ्यात पहिल्यांदा आपण एका गोष्टीचा स्वीकार करू या. मेंदू हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त कार्य करणारे यंत्र आहे. या यंत्राची  विहित/निर्धारित कामे आहेत. पहिली म्हणजे शारीरिक कामे आणि दुसरे अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करणे. शारीरिक कामे मज्जासंस्थेद्वारा केली जातात, तर माहितीचे विश्लेषण करणे, त्याची स्मृती ठेवणे, हवी तेव्हा त्या माहितीला आठवून योग्य तो निर्णय घेणे ही सारी मानसिक कामे मेंदू करीत असतो आणि आपले मन म्हणजे मेंदूचे कार्य! आणि उत्क्रांतीच्या कालावधीत मेंदू हा अवयव सर्वात जास्त प्रमाणात उत्क्रांत झाला आणि शारीरिक आणि मानसिक काय्रे नवनव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाधिक कार्यक्षम होऊ लागला. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक कार्यातील परस्परपूरकता यांचा अभ्यास सध्या मोठय़ा प्रमाणावर चालू आहे.
गेल्या काही शतकांत तंत्र आणि यंत्र यांची अविश्वसनीय गतीने प्रगती झाली. माणसांनी पर्यावरणाची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे नसíगक आपत्तींना तोंड देण्याचा प्रश्न उभा राहिला. स्वामित्वाच्या भावनेतून नातेसंबंध बिघडण्याचे प्रमाण वाढले. धर्माधतेने दहशतवाद फोफावला. आजही अनेक देशांत भौगोलिक सीमांवरून संघर्ष होत आहेत. कोसळती अर्थव्यवस्था, सदैव वाढती स्पर्धा, जातीचे राजकारण अशा सर्व गोष्टी समकालीन पुरुषांना आव्हान ठरल्या आहेत आणि या आव्हानांना योग्य भावनिक प्रतिसाद कसा द्यावा, हे प्रश्न त्याच्यासमोर उभे आहेत.
मुलांवर घराघरांतून होणारे संस्कार त्याला भावनायोग्य मार्गाने व्यक्त करण्याचे शिकवीत नाहीत. त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा पालकांच्या लक्षात येत नाही. हे कमी म्हणून की काय मुलांकडून अनेक अपेक्षा असतात, त्या अपेक्षांचे ओझे बाळगत त्याला करिअर बनवायचे असते. अलीकडील काळात त्याला त्याची करिअर उद्दिष्टे गाठण्यासाठी मुलींशी स्पर्धा असते आणि अनेकदा तो त्या स्पध्रेत मागे पडत चालल्याचे दृश्य महाराष्ट्रात तरी दिसत आहे. टीन एजपासून मुलीबद्दल अमाप आकर्षण निर्माण होते आणि त्यातून कोवळी प्रेमप्रकरणे घडतात आणि मुली जरा जास्त समंजस झाल्या, की आपले प्रेम प्लेटोनिक असल्याचे जाणवते आणि संवेदनशील वयात ब्रेक-अप होतात. त्यातून नराश्य किंवा खुन्नस अशा टोकाच्या भावना तयार होतात. त्याची परिणती आत्महत्या ते समोरच्या मुलीवर अ‍ॅसिड टाकण्यापर्यंत होते.
 मुळात पुरुषांकडे भावना विशेषत: नकारात्मक भावना व्यक्त करायच्या नाहीत असे संस्कार झालेले असतात. अशा दमन केलेल्या भावनाच्या उद्रेकामुळे मुलींपेक्षा मुलांमधील आत्महत्येचे आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्येच्या प्रयत्नांची संख्या मुलींमध्ये जास्त असली तरी प्रत्यक्ष मुलेच जास्त प्रमाणात आत्महत्या करतात.
समकालीन पुरुषांमध्ये किशोरावस्थेपासून वृद्ध होईपर्यंत ‘व्यक्त’ होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्याला आता भावना शब्दांत मांडण्याचे शिक्षण घ्यावे लागणार आहे. भावनांचे नियमन करायचे शिक्षण घ्यावे लागणार आहे आणि हे जर केले गेले नाही तर भावनांचे दमन करणारे पुरुष चुकीच्या मार्गावर जातील हे सत्य आहे.. त्यांना आता आपली विचारभावना आणि वर्तनपद्धती काळानुसार बदलावी लागणार आहे.
.. आणि आता बदल अपरिहार्य आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा