‘तरुणपणी अनेक गोष्टी मनासारख्या करता आल्या नाहीत’ त्याचं दुख उगाळत पुढचं आयुष्य काढायचं?’ की ‘कशासाठी आपण स्वतला बिचारे समजतो?’ असा स्वच्छ प्रश्न एकदा स्वतला विचारून त्या स्वघोषित बिचारेपणातून मुक्त व्हायचं? किंवा जुनं सोडून देऊन आज जे करणं शक्य आहे, ते करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय शोधायचे? सगळं काही कुणाच्याच मनासारखं होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. राजाने खांद्यावर घेताच वेताळ म्हणाला, ‘‘ये राजा, माझी गोष्ट तयार आहे, बघ.’’
‘‘सिया, जरा तुझा पसारा आवर ग.’’
‘‘ आई, शाळेच्या प्रोजेक्टचं खूप काम राहिलंय. नंतर आवरते.’’
‘‘अशा कशा ग तुम्ही हल्लीच्या मुली? रोज काहीतरी नवं कारण.’’
‘‘अगं, खरंच वेळ नाहीये आई. आवराआवरीला मूड लागतो. रविवारी मस्त आवरते सगळं.’’
‘‘ तुझ्यासारखं काहीतरी निमित्त सांगून कामात टंगळमंगळ केली असती ना, तर माझ्या आईनं दोन रट्टेच लगावले असते. अगदी बारावीपर्यंत मार खाल्लाय मी.’’
‘‘ म्हणून आता तू पण मला बारावी होईपर्यंत मारणारेस का? आजी मारायची ते जसं काही भूषण असल्यासारखं सांगतेयस?’’ सिया मजेनं हसत म्हणाली.
‘‘भूषण असल्यासारखं? किती फटकळपणे बोलतेस ग? मी मऊ आहे म्हणून चालतंय सगळं ’’ आई त्राग्याने म्हणाली.
‘‘तू मऊच आहेस. त्यात लहानपणी एवढा मार गुपचूप खाल्ल्यामुळे आणखी मऊ झालीयस.’’
‘‘सिया आगाऊपणा पुरे हं. तेव्हा गुपचूप मार खाण्याशिवाय पर्यायच नव्हता. माझ्या लहानपणी आई म्हणजे टेरर होती. आताशी जरा निवळलीय.’’
०
‘‘सिया, तुला एम.पी.टी. कॉलेजला अॅडमिशन मिळेल ना ग? मला लहानपणापासून त्या कॉलेजची खूप क्रेझ आहे.’’
‘‘हो? मग? अॅडमिशन का नाही मिळाली?’’
‘‘अॅडमिशन मिळाली असती, मार्क भरपूर होते. पण आईला ते मुला-मुलींचं एकत्र कॉलेज चालत नव्हतं. घातलं मुलींच्या कॉलेजात. ग्रॅज्युएशन पण पूर्ण करू दिलं नाही. चांगलं स्थळ आलं म्हणून शेवटच्या सेमिस्टरलाच लग्न करून टाकलं. माझी शिकण्याची हौस अपुरीच राहिली.’’
‘‘आता कर ना आई राहिलेलं शेवटचं वर्ष. नाही तर मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतेस का?’’
‘‘आता काय शक्य आहे एवढय़ा वर्षांनी? तेही संसाराच्या धबडग्यात.? तुम्हाला मुलांना ना, सगळया गोष्टी खूप सोप्प्या वाटतात.’’
०
सिया आईसोबत ड्रेस खरेदी करत होती.
‘‘आई, हा ड्रेस तुला खूप मस्त दिसेल. घे ना.’’
‘‘नको ग. आजीआजोबांना आवडायचं नाही. काहीतरी म्हणतील.’’
‘‘ आई, लग्नाला २० वर्षे झाली तुझ्या. आता एखाद्या वेळी ड्रेस घातलास तर काय आजीआजोबांचं मत लगेच वाईट होणार आहे का तुझ्याबद्दल? रोज थोडीच घालायचाय?’’
‘‘नाही. पण नकोच. मला माहितीय त्यांना नाही आवडायचं. या एकत्र कुटुंबात माझी हौसमौज कायमच बाजूला ठेवलीय मी. सवय झाली आता.’’
‘‘खरं सांगू का आई, तुला सतत कुणाच्या ना कुणाच्या मनासारखं करत राहायची एवढी सवय झालीय ना, की स्वतच्या मनासारख्या साध्या साध्या गोष्टी पण करता येत नाहीत. घेऊन टाक बरं ड्रेस. मी सांगते आजीला.’’
‘‘नको सिया. तुला नाही ते कळायचं. एवढय़ा-तेवढय़ावरून घरात भांडणं आणि येता जाता टोमणे. नकोच ते. आपल्या नशिबात असंच होतं म्हणून गप्पं बसायचं झालं.’’
‘‘मला नाही पटत आई तुझं. आपल्याला वाटतात त्या गोष्टी करून टाकायच्या. त्यातून कुणाचं नुकसान होत नाही ना, एवढंच पाहायचं. तुझ्यासारखी २०-२० वर्षे मनात इच्छा ठेवून मी कुढत नाही बसणार.’’
‘‘हं. तूच राहिली होतीस शिकवायची. या घरात तू तरी मला समजून घेशील असं वाटलं होतं सिया.’’
आईच्या उदास चेहऱ्यावर फोकस होत दृश्य दिसेनासं झालं.
०
‘‘राजा, कुटुंबासाठी स्वतचं करिअर सोडून एवढी वर्षे राबणाऱ्या आईच्या इच्छा-अपेक्षांची घरात कुणालाच कदर नाही का? सियासुद्धा आईला समजून का घेऊ शकत नाही? ती अशी फटकळपणे का बोलते? या प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही तू दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची १०० शकलं..’’
‘‘वेताळा, खंत करत राहणं हा सियाच्या आईचा स्वभाव बनलेला दिसतो. एखादी गोष्ट करणं शक्य असताना काही कारणाने ती केली जात नाही तेव्हा तिची खंत उरते. खंत म्हणजे एक प्रकारे स्वतची कीव करणं असतं. ‘माझ्या नशिबातच नाही’ असं सतत म्हणत राहणं म्हणजे सतत स्वतला ‘बिचारं’ समजत राहणं. अनेक गोष्टी हातातून सुटल्याबद्दल खंत करत आई सहानुभूती शोधत राहते. सियाकडून सहानुभूती न मिळता इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग मिळतात तेव्हा ‘तू तरी समजून घेशीलसं वाटलं होतं’ म्हणून ती सियालाच दोष देते.
खरं तर आईची गरज आहे ‘आपल्याला सर्वानी सतत चांगलंच म्हटलं पाहिजे’ ही. त्यामुळे ती कुणालाही विरोध करणं टाळते. कायमच सर्वाच्या कलाने वागते. लहानपणी स्वतच्या आईला विरोध करणं नसेल जमलं, पण ती विरोध स्वीकारूही शकत नाही. टोमण्यांना खूप गंभीरपणे घेऊन त्यांचा त्रास करून घेते. टोमण्यांनी माणूस दुखावला जावा हा टोमणे मारणाऱ्याचा हेतू असतो. त्यामुळे ऐकणाऱ्याने त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर टोमण्यांची शक्ती कमी होते. इथे प्रत्यक्ष टोमणे आणि भांडणांपेक्षा आईच्या मनातली त्यांची भीती जास्त आहे असंही असू शकतं. कुणाला दुखावता न येण्यानं कदाचित लोक तिला चांगलं म्हणतही असतील.(किंवा नसतीलही) पण त्यात तिच्या स्वतच्या इच्छा अपुऱ्या राहतात. ‘भांडणासाठी भांडण करणं आणि योग्य गोष्टीसाठी विरोध करणं यात फरक असतो. कुणाला विरोधच न करता येणं हा दोषच. पण आई आजही त्या दृष्टीने विचार करत नाही, खंत संपवण्यासाठी सियानं सुचवलेले उपाय मानत नाही, स्वतला बदलू इच्छित नाही, उलट सियाला म्हणते, ‘तुम्हाला मुलांना सगळं सोप्पंच वाटतं.’
सियाचे विचार स्पष्ट आहेत. आईसारखी ‘सर्वासमोर चांगलं दिसण्यात’ ती अडकलेली नाही. फटकळ असणं तिला चालत असलं तरी आपल्याला वाटेल तशी मनमानी करावी याही मताची ती नाही. ‘आपल्याला वाटतात त्या गोष्टी करून टाकायच्या. त्यातून कुणाचं नुकसान होत नाही ना, एवढंच पाहायचं.’ असं ती म्हणते.
‘लहानपणी गुपचूप मार खाल्लास म्हणून मऊ झालीस.’ किंवा ‘तुला सतत कुणाच्या ना कुणाच्या मनासारखं करत राहायची सवय झालीय, त्यामुळे स्वतच्या मनासारख्या साध्यासाध्या गोष्टी पण करता येत नाहीत.’ हे सिया स्वतच्या निरीक्षणातून बोलते. आईचं स्वतची कीव करणं ती अनुकरणानं स्वीकारत नाही उलट, ‘तुझ्यासारखी २०-२० वर्षे मनात इच्छा ठेवून मी कुढत नाही बसणार.’ म्हणते. तिचं बोलणं थोडं फटकळ असलं तरी तिनं आईचा, आईच्या स्वभावाचा विचार केला आहे. ‘सियासुद्धा आपल्याला समजून घेत नाही,’ असं आईला वाटत असलं तरी सियाला आईची खंत करण्याची समस्या समजते आहे. म्हणून तर आईची खंत कुरवाळत न बसता आपल्या परीनं ती दूर करायला पर्याय सुचवते, मदत करायला तयार असते.
आईच्या मऊपणाचा काही भाग हा लहानपणीच्या माराच्या भीतीतून आला आहे हे सियाला खूप नीट कळतं. आपल्या स्वभावातला ‘कशालाच ठामपणे विरोध करता न येण्याचा दोष’ असा सहजपणे सियानं समोर उघडून ठेवलेलाही आईला सहन होत नाही. कारण खंत कुरवाळणं हे तिच्या मऊ असण्यावरचं कवच झालं आहे. ती तिची स्वसंरक्षण यंत्रणा (Self diffence mechanism) बनली आहे.
‘‘याचा अर्थ, सियाच्या आईचं आयुष्य अशी खंत करण्यातच संपणार असं म्हणायचंय का तुला? सिया किंवा घरचे तिचं श्रेय तिला कधी देणारच नाहीत का राजा?’’
‘‘ केलेल्या कामाचं श्रेय मिळणं आणि लोकांनी चांगलं म्हणणं यातला फरक सियाच्या आईनं लक्षात घेतला नाही तर आयुष्यभर असेच खंत करण्याचे नवीन विषय तिला सापडत जातील. शिवाय जुन्या जपलेल्या खंती आहेतच. आईनंच ठरवायचंय की ‘तरुणपणी अनेक गोष्टी मनासारख्या करता आल्या नाहीत’ त्याचं दुख उगाळत पुढचं आयुष्य काढायचं?’ की ‘कशासाठी आपण स्वतला बिचारे समजतो?’ असा स्वच्छ प्रश्न एकदा स्वतला विचारून त्या स्वघोषित बिचारेपणातून मुक्त व्हायचं? जुनं सोडून देऊन आज जे करणं शक्य आहे, ते करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय शोधायचे? सगळं काही कुणाच्याच मनासारखं होत नाही. पण आपल्या स्वभावाचा पॅटर्न बदलण्यासाठी आईला सियाची मदत घेता येईल. राहून गेलेल्या थोडय़ा फार गोष्टी करता येतील. यापुढच्या इच्छा डोळसपणे पूर्ण करता येतील. यातलं काय जमेल वेताळा सियाच्या आईला?’’ राजा म्हणाला.
‘‘ते आता तिनंच ठरवायचंय. मला माहीत नाही.’’ असं म्हणत वेताळ अदृश्य होऊन झाडाला लोंबकळू लागला.
बोधिवृक्ष : सर्वव्यापी ईश्वर
परमेश्वर सर्वत्र आहे, मग चेतन-अचेतन भेद राहील कोठे? आत्मा आणि शरीर, दोन्ही ईश्वराचीच रूपे आहेत. चेतन-अचेतनात जो भेद आहे, तो सापेक्ष आहे. आम्ही ज्याला अचेतन म्हणतो त्याचे परिवर्तन चेतनेमध्ये होऊ शकते आणि ज्याला चेतन म्हणतो त्याचे परिवर्तन अचेतनात होऊ शकते. मी तर असे मानतो की जगात सगळे चेतनच आहे. काही आहे निद्रिस्त चेतन आणि काही आहे जागृत चेतन. जसा हा दगड आहे त्यात चेतन आहे, पण ते निद्रिस्त चेतन आहे. मनुष्यात आणि इतर सगळ्या प्राण्यांमध्ये जे चेतन आहे ते जागृत चेतन आहे. या दृष्टीने पाहू तर सगळी सृष्टी जागृत चेतनयुक्त वाटेल.
एक ज्ञानी आहे, गणिताचा ज्ञाता आहे, पण झोपलेला आहे. तर त्याच्या ज्ञानाचा प्रभाव दिसून येणार नाही. म्हणजे निद्रिस्त अवस्थेत चेतन पण जडवत होते. त्या दृष्टीने मी दगडाला पण चेतन मानतो. तो निद्रिस्त चेतन आहे आणि मनुष्य जागृत चेतन आहे. आता दुसऱ्या दृष्टीने विचार करू. आपण जी दगडाची पूजा करतो ती काय आहे? दगडात चेतनभाव आहे, असे कल्पून आपण दगडाची पूजा करतो. मनुष्यात अनेक प्रकारचे विकार असतात. मनुष्य समाधीत जातो तेव्हा निर्विकार असतो. त्या दृष्टीने पाहू तर चेतन जेवढे अप्रकट आहे असे दिसेल, तेवढे ते गहन समाधीत आहे, असे वाटेल.
सृष्टीत श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद केलेले चालणार नाही. इतकेच नाही, ती मुळी निर्विकारच आहे. नदीच्या पाण्यामुळे कुठे पिके चांगली येतात तर कुठे पुरामुळे गावेच्या गावे वाहून जातात. गावे वाहून गेली तर त्याचे पाप नदीला लागणार नाही. पिके चांगली आली तर त्याचे पुण्य नदीला मिळणार नाही. नदी दोन्हीहून वेगळी आहे. परंतु मी मात्र जसे करीन तसे होईल. जसे नदीचे तसेच प्रकाशाचे. सूर्याच्या प्रकाशात तुम्ही वाईट कामे करू शकता आणि चांगली कामेही करू शकता. दोन्ही प्रकारच्या कामात सूर्यप्रकाश तुम्हाला मदत करेल. रात्री घराचा मालक वाचत बसला आहे. दिव्याची त्याला मदत होते. रात्री चोर टॉर्च घेऊन चोरी करायला घरात शिरले, त्या टॉर्चची त्यांना मदत होते. प्रकाशाची मदत दोघांनाही झाली. पण प्रकाश कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार नाही. तसेच परमेश्वर निर्विकार होऊन प्रत्येक वस्तूत राहतो. कोणात जागृत आहे, कोणात निद्रिस्त.
ईश्वर आणि त्याची प्रकृती दोन्ही अनादि आहेत. जेव्हापासून ईश्वर आहे तेव्हापासून प्रकृती पण आहे. प्रकृतीचे असणेच ईश्वराचे ईश्वरत्व आहे. प्रकृतीतून अनेकविध सृष्टी उत्पन्न होते आणि त्यातच ती विलीन होते. अशा अनेक सृष्टय़ा येतात आणि जातात, प्रकृती कायम राहते. सृष्टीनंतर मनुष्य येतो. तो सृष्टीचाच एक भाग आहे आणि स्रष्टय़ाचा एक अंश आहे. सृष्टीमुळे त्याच्या देहाचे धारण होते आणि सृष्टीतूनच त्याच्या हृदयाला पोषण मिळते. मनुष्याकरता अन्नाचे भांडार आणि बोधाचा खजिना, अशा दुहेरी रूपात सृष्टी सजलेली आहे.
सृष्टी आणि मानवामध्ये पडदा नाही. मानव सरळ सृष्टीतून बोध ग्रहण करू शकतो आणि तसे तो सतत करीत आला आहे. तोच बोध वाणीत उतरून वाङ्मयाच्या आणि सरस्वतीच्या कृपेने सारस्वत बनतो.
एकदा एकाने मला एक प्रश्न विचारला- ज्या परमेश्वराच्या नावाने शोषक जमात आपले कार्य चालवीत आहे आणि अन्याय करते आहे, त्याच परमेश्वराचे नाव आम्ही भूदानवाले घेत असतो. जर आम्हीही तेच नाव घेत राहू तर समाजाचे शोषण करण्याची ही पद्धत तशीच चालू नाही राहणार?
या प्रश्नाच्या संदर्भात दोन गोष्टींवर विचार करावा लागेल. एक तर असे की शोषणाचे कार्य करणारे परमेश्वराचे नाव घेत असले तरी त्यांना ते नाव घेण्याचा अधिकार आहे का? शोषण-कार्य आणि परमेश्वराचे नाव यांचा संबंधच काय? आणि जर यांचा काही संबंध नसेल तर ज्यांना शोषण करण्याची इच्छा नाही, त्यांनी त्या नावाला का सोडावे? म्हणून काही लोक जर त्या नावांचा दुरुपयोग करत असतील तर ते नाव त्यांनाच सोपवून द्यायचे का, यावर विचार केला पाहिजे. आणि मग त्या परिस्थितीत आपले नुकसान होईल की लाभ, हेही पाहिले पाहिजे.
सर्पराज तक्षकाची कहाणी सगळ्यांना माहीत आहे. जनमेजयाने नागयज्ञ केला आणि त्यामुळे तक्षकाने इंद्राचे संरक्षण घेतले. तो इंद्राच्या मागे जाऊन लपला. इकडे ऋषींनी आहुति दिली – इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्राच्या संरक्षणामुळे तक्षकाची आहुति होत नव्हती म्हणून इंद्रासकट तक्षकाची आहुति दिली. पण इंद्र तर अमर होता. म्हणून तो तर मेला नाहीच, पण त्याच्यासमोर तक्षक पण अमर झाला. वास्तविक ज्यांच्यामुळे तक्षक इंद्रापासून दूर झाला असता अशी कुठली तरी युक्ती शोधायला हवी होती. तसे केले नाही. त्यामुळे तक्षक अमर झाला. तक्षकाला इंद्रापासून निराळे करण्याऐवजी त्याच्याबरोबर जोडून देऊ तर आम्हाला यश मिळणार नाही.
आपण जर शोषकाबरोबर परमेश्वराला पण संपविण्याचा विचार करू तर ते होऊ शकणार नाही. वस्तुत: हे शस्त्र आमचे आहे. ज्या लोकांना त्याचा उपयोग करता येत नाही आणि जे केवळ त्यांचे ढोंगच करू शकतात, त्यांना जर आम्ही आमचे ते शस्त्र देऊन टाकले तर आम्ही नाहक निरीश्वरवादी, नास्तिक बनतो. आपले शस्त्र सोडून देणे, ही प्रक्रियाच चुकीची आहे. यात आमचेच नुकसान आहे.
दुसरी गोष्ट ही की ज्या ईश्वराच्या नावाचा दुरुपयोग केला गेला आहे किंवा केला जातो तो ईश्वर दुसरा आहे. पश्चिमेच्या भक्तीमार्गी लोकांनी जो स्वर्गात राहणारा दयाळू पिता आहे त्याला ईश्वर म्हटले आहे. आमच्या येथल्या विचारांप्रमाणे ‘ईश्वर घट-घटवासी, सर्वव्यापी, अंत:सूत्री आणि सगळ्यांच्या हृदयात विराजमान आहे.’ आमच्या येथला अनुभव हाच आहे की तो सर्वत्र विराजमान आहे, प्रत्येक शरीरात विद्यमान आहे. इंग्रजी भाषेत सांगायचे झाले तर आमचा ईश्वर ‘ऑब्जेक्टिव्ह ट्रथ’ म्हणजे वास्तविक सत्य आहे. त्याला आपण टाळू शकत नाही. त्याच्या अस्तित्वाला नाकारण्यात आपल्या स्वत:च्याच अस्तित्वाचा अस्वीकार होतो. इतकेच नाही तर आपल्या शक्तीलाच नाकारले जाते.
ज्या ईश्वराचे आम्ही आवाहन केले आहे, तो केवळ जगत्पती नाही, तो रोमरोमव्यापी आहे. आम्ही कैलासवासी, स्वर्गवासी वगैरे शब्दांचा उपयोग करतो पण ते केवळ रूपक असते. तो तर सर्वच ठिकाणी असतो. प्रकट तेथे होतो, जेथे शीतलता असते, परमशांति असते, सामान्य प्रपंचापासून अलिप्तता असते.
‘ईश्वर आमच्यात नाही, आम्ही रिक्त आहोत,’ असे मानणारा मनुष्य आत्मावलंबी होऊ शकणार नाही. तो परावलंबीच असेल. आम्ही ज्याला प्रत्यक्ष मानू, त्याच्या मदतीनेच आम्ही स्वावलंबी बनू शकू आणि निर्भय बनू शकू. मग आणखी कोणाला शरण जावे लागत नाही. पण जेथे पडद्याचा विचार मान्य केला जातो तेथे निष्क्रियता येते आणि अनेक प्रकारची दुर्बलता येते.
वास्तविक ईश्वरावर श्रद्धा असणे, हा मानव-जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. या वस्तूला तर्काच्या परिभाषेत ठेवणे कठीण आहे. हे श्रद्धेवर आणि आत्मप्रत्ययावर निर्भर आहे. तर्काच्या परे आहे. मानवाची मनुष्यमात्राच्या सद्वृत्तीवर अतूट श्रद्धा असायला हवी. ही मानव-निष्ठा ईश्वरनिष्ठेचा श्रीगणेश आहे. मनुष्याच्या सत्प्रवृत्तींच्या विकासावर आणि पुऱ्या मानव-जीवनाला प्रभावित करणाऱ्या शक्तीवर जर कोणाची श्रद्धा असेल तर तो पण ईश्वरनिष्ठेचा पर्याय मानला पाहिजे.
कुराणात याविषयी एक फार सुंदर प्रसंग येतो. महंमद पैगंबरांनी सांगितले होते की ‘तुम्ही जर येथे चांगले काम केले तर मृत्युनंतर परमेश्वराच्या जवळ बसू शकाल.’ लोकांचा यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा पैगंबर म्हणाले की ‘अरे, तुम्ही कसे आहात ? तुम्ही चांगली कामे करालही आणि मृत्युनंतर ईश्वराजवळ पाठवले जाल, ईश्वराला आपल्याजवळ पाहाल आणि तरीही तुमचा संशय जाणार नाही. तुम्ही विचाराल, खरेच का हा ईश्वर आहे ?’ त्यासाठी थोडय़ा फार श्रद्धेची तर गरज असतेच. त्याच्या शिवाय जगात पराक्रमाची कामे होत नाहीत. साध्या पराक्रमाच्या कामातही श्रद्धेची गरज असते.
ईश्वर ‘आहे’ म्हणावे की ‘नाही’ म्हणावे या संदर्भात तुकारामांचे एक चांगले वचन आहे. असे वचन दुसरीकडे कुठे क्वचितच मिळेल. ते म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनीं अनुभवावा.’ वाणीने ईश्वर आहे असे बोलावे ; आणि मनात ईश्वर नाही असे अनुभवावे. कुठले तत्त्वज्ञान ह्य़ाहून जास्त काही सांगू शकेल ?
(परंधाम प्रकाशन, पवनार यांच्या ‘धर्मामृत’ या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)
गोष्ट भावभावनांची : का बाळगायची खंत?
‘तरुणपणी अनेक गोष्टी मनासारख्या करता आल्या नाहीत’ त्याचं दुख उगाळत पुढचं आयुष्य काढायचं?’ की ‘कशासाठी आपण स्वतला बिचारे समजतो?’ असा स्वच्छ प्रश्न एकदा स्वतला विचारून त्या स्वघोषित बिचारेपणातून मुक्त व्हायचं? किंवा जुनं सोडून देऊन आज जे करणं शक्य आहे, ते करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय शोधायचे? सगळं काही कुणाच्याच मनासारखं होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
First published on: 08-12-2012 at 05:42 IST
मराठीतील सर्व गोष्ट भावभावनांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why we should worry