शिरीषकुमार पाठक
आयुष्यातल्या प्रवासात जोडप्यातील कुणी तरी एक आधीं निघून जाणार हे ठरलेलं असतं, पण मनाची तयारी किती जण आधीपासून करतात? बहुतांशी नाहीच. त्यामुळेच मग अनेकदा निराश एकाकीपण वाटय़ाला येतं. विधुरांच्या बाबतीत तर हे प्रामुख्याने जाणवतं..
अर्थातच मी विधुर! विधुरत्व येऊन सहा वर्ष होऊन गेली. या काळात पत्नीच्या आठवणींनी किती वेळा भावनावश झालो याची गणतीच नाही.. तिच्या साहचर्याची ४० वर्ष. आम्हाला दोन मुली आणि एक मुलगा. पत्नीसह जगताना आमच्या सांसारिक जबाबदाऱ्या सर्वार्थानं पूर्ण झाल्या नव्हत्या. मुलींची शिक्षणं आणि लग्नं झाली होती, मुलाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुढे प्रत्येक पावलावर ती सोबत हवी होती, हे मला प्रकर्षांनं जाणवे. मी स्वत: जे काही करतो आहे, ते बरोबर की चूक हे मला समजत नसे. माझं करणं तिला आवडलं असतं, असं गृहीत धरून मी पुढील करय पार पाडली.. तिच्या फोटोसन्मुख. मुलं मोठी होती, तरी त्यांना आईचा खूपच लळा होता, सहवास होता. त्यांना तिची पोकळी खूपच जाणवे. मुलांना शहाणपण आलेलं असल्यामुळे त्यांनी मला माझी कर्तव्यं पार पाडताना अत्यंत मदत केली. मी सत्तरी पार केलेला. काही व्याधींसह जगतोय. जेव्हा मी पत्नीच्या आठवणींनी व्याकूळ व्हायचो, तेव्हा मुलं मला सावरायची. तेव्हा दु:ख नक्कीच हलकं व्हायचं. पत्नी निवर्तली तेव्हा तिचं वय ६८ वर्ष होतं आणि मी ७० वर्षांचा होतो. ती हृदयरोगानं अचानक गेल्यामुळे पुढील जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, याबाबत तिच्याशी चर्चा होऊ शकली नव्हती; पण आधी म्हणालो, तसं जाणत्या मुलांशी चर्चा करून उर्वरित दायित्वं पूर्ण करण्यात यशस्वी झालो. आता मुलाकडे राहून, सुनेच्या मदतीनं, नियमित औषधांच्या सहाय्यानं जीवनप्रवास चालू आहे. द्वितीय विवाह सर्व दृष्टींनी अशक्य. त्यामुळे जीवननौका एकटय़ानंच तडीस लावणं हेच भागधेय. असं म्हणतात, की आपलं दु:ख हलकं करण्यासाठी जो अति-दु:खव्याप्त आहे त्याचं स्मरण करावं. हे एक चांगलं सूत्र आहे; किंबहुना ते विचारांमध्ये अमलात आणूनच मी माझा जीवनप्रवास सुखेनैव चालवू शकतो.
अशाच काही विधुर व्यक्तींचा शोध घेताना माझ्या मित्रांमध्येच अनेक उदाहरणं डोळय़ांपुढे आली. त्यांचं आयुष्य, त्यांचे अनुभव मी जवळून पाहिलेत, पाहतोय. हे सारे कमीअधिक प्रमाणात आर्थिकदृष्टय़ा सधन, उच्चशिक्षित, नेहमी माणसांच्या सहवासात रमणारे आणि स्वत:शी समतोल राखणारे. त्यांच्याकडे बघताना ‘मी एकटा नाहीये,’ ही भावना वारंवार मनात येते. असं हायसं वाटणं चांगलं की वाईट हे माहिती नाही. स्त्रियांच्या बाबतीत वैधव्य ही संकल्पना आपण सहजत: जाणून असतो.आजूबाजूलाच नव्हे, पण साहित्यकृतींमधूनही विधवांची दु:खं आपल्यापर्यंत पोहोचलेली असतात; पण विधुर असणं काय असतं, हे मला मी विधुर झाल्यावरच उमगलं. माझ्यासारख्या इतरांकडे पाहताना त्याची खोली नव्यानं कळत गेली.
माझा मित्र कृष्णकांत. ३७ वर्ष वैवाहिक जीवन पूर्ण झाल्यावर पत्नी कर्करोगानं इहलोक सोडून गेली, तिच्या साठाव्या वर्षी. तेव्हा हा मित्र ६५ वर्षांचा होता. दोन विवाहित कन्या होत्या. दोन्ही सुस्थितीत. एक गुणी मुलगा. पत्नी असतानाच त्याचं लग्न ठरलेलं होतं. नंतर मुलींच्या सहाय्यानं या मुलाचा विवाह व्यवस्थित पार पडला. वयाच्या ६७ व्या वर्षी सर्व जबाबदारी पूर्ण करून कृष्णकांत त्यातून मुक्त झाला. कधी मुलाकडे, तर कधी मुलींकडे जाऊन राहतो. नेहमीच्या व्याधींचा तोही मित्र आहे! वैद्यकीय सल्ल्यानं वागतो. कंटाळा आल्यास मित्रांबरोबर सहली, गप्पागोष्टी करून वेळ घालवतो; पण तरी त्याला पत्नीविरह जाणवतोच. कधी तरी घुसमट होते, रडूही येतं. मग तो अध्यात्मात मन रमवतो..
दुसऱ्या एका सख्याचं नाव सदाशिव. पत्नीचं २८ वर्षांचं साहचर्य होतं. पदरी तीन मुली आणि एक मुलगा. सर्वाची लग्नं पत्नी असतानाच ठरलेली होती. पत्नी अर्धागवायूचा झटका येऊन मरण पावली. सदाशिव अल्पशिक्षित आहे; पण बऱ्यापैकी शेती बाळगून आहे. पत्नीही अल्पशिक्षित होती. मुलांच्या लग्नाची पूर्ती सदाशिवनं थोडी थोडी जमीन विकून केली. तो ग्रामीण भागातला; त्यामुळं असावं, पण त्याची तब्येत ठणठणीत आहे. परंतु तो अपंग आहे आणि ठार बहिरेपणे. त्याच्या मुलानं चांगलं शिक्षण घेतलं आणि चांगली नोकरी मिळवली. तिन्ही मुलींची लग्नंही व्यवस्थित पार पडली. नंतर सदाशिव शहरात राहात असलेल्या मुलाकडे राहू लागला. मुलगी आणि जावयांशी त्याचं नीटसं पटत नाही. त्यामुळे मुला-सुनेवर अवलंबित्व. मात्र परिस्थितीच्या रेटय़ानं निगरगट्ट मन! एकेक दिवस तो मित्रमंडळींच्या सहवासात ढकलतो.. क्वचित देवधर्म करतो.. पण आता त्याला अनेक गोष्टी जाणवतात. पत्नीचं घराप्रति, संसाराप्रति असणारं प्रेम. कर्तव्यापेक्षा जबाबदारी. अल्पशिक्षित असूनही अनुभवातून तिनं पदरी गोळा केलेलं जीवनाचं सार संकटाच्या वेळी त्याला सावरत होतं. आता त्याची कमतरता सदाशिवला जाणवते. तिचं सतत आजूबाजूला असणारं अस्तित्व आपलं कुणी तरी आहे, याची जाणीव देत असे. आता मुलांच्या ‘बिझी’ आयुष्यात कितीही गोष्टींत मन रमवलं तरी एकटेपण वेढून येतंच, विशेषत: संध्याकाळनंतर.
तिसरा माझा जवळचा मित्र- नवीनचंद्र. त्याचा एक मुलगा लग्नाचा, तर एक विवाहित मुलगी आहे. मुलाचं शिक्षण पूर्ण होऊन तो नुकताच नोकरीस लागला होता आणि त्याला करोनानं ग्रासलं. तेव्हाच नवीनही करोनाच्या अमलाखाली आला. दोघांचे दवाखाने, औषध करता करता बायको बिचारी थकली. तिला अशक्तपणा आला. मुलगा खूप प्रयत्नांती करोनामुक्त झाला आणि नवीनही औषधोपचारानंतर विलगीकरणात गेला. एवढं झाल्यावर पत्नीला करोनाचा विळखा पडला आणि ती दवाखान्यात भरती झाली. अर्थातच हे दोघं तिला तिच्या आजारपणात फारशी मदत करू शकले नाहीत. तिची आबाळ झाली. योग्य औषधं, सकस अन्न मिळालं नाही आणि त्याच आजारपणात तिचा मृत्यू झाला. नवीनचं वैवाहिक आयुष्य केवळ २७ वर्षांचं. तो नुकताच सेवानिवृत्त झाला होता. मुलाचं लग्न करून आता तोही मुलासुनेच्या मदतीनं आयुष्य ‘रेटतोय’. सुनेची नोकरी असल्यानं तिला घरकामात थोडी मदतही करतो. आताशी त्यानं साठी ओलांडली आहे. पत्नीची आठवण सतत सतावते. वाचनवेडा असल्यानं तो रोज तीन वर्तमानपत्रांचं वाचन करतो आणि ग्रंथालयातली पुस्तकं सोबतीला घेऊन मन रमवतो.
या साखळीतलं माझ्या डोळय़ांपुढचं पुढचं उदाहरण रामलाल यांचं. ते शासकीय नोकरीतून लिपिक म्हणून निवृत्त झाले. संसारापुरतं वेतन होतं, शिवाय दोन मुलं. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं आणि पत्नीवर कर्करोगानं घाला घातला. मुलांच्या मदतीनं रामलाल पत्नीचं आजारपण सांभाळू लागले. कधी कधी मेटाकुटीला येत. २४ वर्षांच्या साहचर्यानंतर पत्नी त्यांना सोडून गेली. रामलाल आणि मुलांमध्ये वडील-मुलांच्या प्रेमाचा घट्ट धागा कधी तयारच झाला नव्हता. अर्थातच पत्नी गेल्यावर रामलाल मुलांपासून दुरावले. मुलांची लग्नं होताच ती स्वतंत्र झाली. सुनांचाही दुरावा आहे. आता रामलाल एकटेच लहानशा घरात राहतात. सांधेदुखी वगळता तब्येतीची तक्रार नाहीये. खानावळीतून डबा मागवतात. लेखन जमतं, त्यामुळे लेखनातून आपली भूक भागवतात; पण भावनिक भुकेचं काय? पठ्ठय़ानं वयाच्या ७४ व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचा प्रयत्नही केला.. पण समाजानं त्यांना साथ दिली नाही. मित्रमंडळींचा अभाव आहे, त्यामुळे मनातले भाव व्यक्त करण्यासाठी कुठे जागाच नाही. खूप वेळा मी त्यांना भावनाविवश होताना, रडवेलं होताना पाहिलंय; पण मोकळेपणानं रडण्यासाठी हवा असलेला खांदा यापूर्वी फक्त पत्नीचा होता. आता तीच नसल्यामुळे एकदम एकाकी पडले आहेत ते.
हे सर्व असं का होतं! दोन जीव एकत्र आल्यावर सुखदायी संसार सुरू होतो.. पण सर्व जबाबदाऱ्या पार पाडेपर्यंत संसारगाडी उताराला लागलेली असते. दोघांची वयं वाढतात. एकोप्यानं सर्व चालू असताना दोघांपैकी एकाचं आयुष्य संपणं आणि दुसरा मागे राहणं ओघानं आलंच. खरं तर हे निसर्गचक्रच. मागे राहणारी ‘ती’ असेल तर पुनर्विवाहाचा विचार तिच्या मनात सहसा येतच नाही. तिच्याकडे स्वत:चा उत्पन्नाचा स्रोत नसला, तर तिची कुचंबणा होते, हेही खरंच. आजारी पडल्यावर, आर्थिक चणचण निर्माण झाल्यावर तिच्यापुढे प्रश्न उभे राहतात. शिवाय कुणाकडे मोकळेपणानं व्यक्त होण्यावर मर्यादा येतात; पण तरीही मी असं पाहिलंय, की घरकाम, नातवंडांचा सांभाळ, स्वयंपाकपाणी यात अशा एकाकी राहिलेल्या स्त्रिया रममाण होण्याचा प्रयत्न करतात. तिच्याही जीवनात कारुण्य असतंच; पण खूपदा मुलांना आईबद्दल अधिक जवळीक वाटते, सहानुभूती असते, त्यामुळे स्त्रीला काही प्रमाणात प्रेमही अनुभवता येतं. मागे राहणारा ‘तो’ असेल, तर मात्र अडचणी अनेक पटींनी जास्त असतात असं मला वाटतं. पत्नी गेल्यानंतर पुरुष एकदम खचून जातात. अगदी दैनंदिन प्रत्येक बाबतीत ‘त्या’ला ‘ती’च्या साथीची, तिचा सल्ला, तिची मदत घेण्याची आजवर सवय झालेली असल्यामुळे असेल किंवा कदाचित स्त्रिया पुरुषांपेक्षा मनानं अधिक खंबीर असतील.. पण विधुराची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,’ यापेक्षा वेगळी नसते..
सुरू करून इतरांची लग्नं जमवली खरी, पण त्यांचं स्वत:चं दुसरं लग्न जमू शकलं नाही. एकाकीपणामुळे रात्र त्यांना खायला उठायची. तशात निद्रानाश जडला. अबोलत्व आलं. जीवननौका हेलकावे खात पुढे चालली आहे.
त्यांचे लहान बंधू मनोहर २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर विधुर झाले. पत्नी ५५ वर्षांची होती आणि ते ६० वर्षांचे. अर्थातच निवृत्त झालेले. दोन मुली, एका मुलाचं शिक्षण, लग्नं उरकून जबाबदारीतून मुक्त झालेले. नशिबानं त्यांना जावई प्रेमळ लाभला. सासऱ्याची कदर करणारा. त्यामुळे कधी मुलींकडे पाहुणचार असतो, तर कधी मुलाकडे परदेशात जाऊन राहतात. आर्थिकदृष्टय़ा सशक्त आहेत. धार्मिक कार्यात रस घेतात, मित्रमंडळी राखून असल्यानं त्या जोरावर मनोहरभाऊ मजेत जगतात. पत्नीची स्मृती कधी कधी असाहाय्य करते, पण ते आल्या प्रसंगाला धीरानं तोंड देण्यात यशस्वी झाले आहेत.
मी जवळून पाहिलेलं आणखी एक, जरा ‘टिपिकल’ वाटणारं उदाहरण दिवाकर मास्तरांचं. त्यांचा एकुलता एक मुलगा जन्मापासून अपंग आहे. तो नेहमी घरातच. मास्तर निवृत्त जीवन जगत होते. बऱ्यापैकी निवृत्तिवेतन मिळतं. अशात पत्नी असाध्य रोगामुळे अर्धा संसार मध्येच टाकून कायमची निघून गेली. मुलाला शिकवणं शक्य नव्हतं. त्याची अवस्था अशी, की त्याला फक्त सांभाळायचं.. त्यामुळे पत्नीच्या नंतर मुलाचा सांभाळ हेच मास्तरांचं जीवन झालं. स्वयंपाकाला मावशी येतात, पण मास्तरांना कुठे बाहेर जाता येत नाही. औषधांचा प्रचंड खर्च होतो. मुलाला उचलून डॉक्टरकडे नेणं, तेवढा काळच जणू विरंगुळा. पाच वर्तमानपत्रं घेऊन ती वाचतात. सोबत मोबाइल आहेच. परिचित आणि मित्रांशी त्याद्वारे तासंतास संपर्कात राहणं ही त्यांची एकमेव करमणूक आहे. पत्नी असती तर जीवनाला सार्थकता होती, असं त्यांना वारंवार वाटतं; पण परिस्थितीवर उपाय किती आणि काय करावा?..
एक उदाहरणं किशोररावांचं. त्यांचा स्वभाव खेळकर. बँकेत अधिकारीपदावरून निवृत्त झालेले, भारतभ्रमण केलेले. पेन्शन उत्तम. पत्नीचीही उत्तम साथ होती. दोन तरुण, उच्चशिक्षित मुलं. त्यातला एक पुण्यात, दुसरा दिल्लीत. दोन्ही सुनाही मान देणाऱ्या. सर्व चांगलं चाललेलं असताना, ध्यानीमनी असताना पत्नीला अर्धागवायूचा झटका आला. त्या आजारपणात ती गेली. आज इतकी वर्ष होऊन गेली तरी पत्नीची आठवण त्यांच्या मनातून जात नाही. तिला ज्या गोष्टी आवडत त्या ते अजूनही करतात. कधी भावना अनावर झाल्या, की ‘मानव नियतीपुढे हतबल आहे,’ असं म्हणतात. धार्मिक आहेत, त्यामुळे त्या कामांत त्यांचा वेळ जातो. इतर वेळी ढकलगाडी!
नियतीचे फटकारे खरंच माणसांचे संसार उद्ध्वस्त करतात. आता नानासाहेबांचंच पाहा ना.. उत्तम नोकरीत होते, त्यामुळे त्यांनाही निवृत्तिवेतन चांगलं होतं. पत्नी सुविद्य. मात्र अपत्य नव्हतं दोघांना. त्यासाठी पूर्वी डॉक्टर-वैद्य करून झाले होते, नंतर त्यांनी त्याचा नाद सोडला. दोघांना उतारवयात मधुमेह आणि हृदयविकारानं ग्रासलं. दोघं घरकोंबडे होऊन गेले! त्यातच पत्नी गेली. नानासाहेब एकटे आणि मितभाषी असल्यानं त्यांची आणखीनच पंचाईत होऊ लागली. शेवटी नातलगांनी त्यांना एका वृद्धाश्रमात भरती केलं. वारसदार नाहीये, त्यामुळे भरीव दानधर्म करतात आणि त्यातून बरं वाटून घेण्याचा प्रयत्न करतात. असं झालं की पुढच्या आयुष्याचा प्रवास हेलकावे खात, ठेचकळत होते, हे त्यांच्याकडे बघताना जाणवतं.
एकटेपणावर अगदी अजिबातच उपाय नाहीयेत असं नाही. काही ना काही उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीनं करतो. आमची सोसायटी मोठी आहे. शेजारीपाजारी राहणारे जे कुणी एकेकटे, पत्नीवियोगानंतर मागे राहिलेले पुरुष आहेत, असे मित्रमंडळींमध्ये जीव रमवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्या घरातली माणसं बाहेरगावी गेलीत किंवा जे एकटेच जेवतात, ते मित्र मित्र एका कुणाच्या तरी घरी आपापले डबे घेऊन जातात. थोडा वेळ तरी हसतखेळत गप्पा मारतात, ‘डब्बा पार्टी’ करतात. एक विधुर सोसायटीतच ‘साहित्य कट्टा’ चालवतात. सामाजिक उपक्रमही करतात. क्रियाशील राहून आपला वेळ सत्कारणी लावायचा प्रयत्न करतात. माझ्या ओळखीचे एक नाशिकचे विधुर (जे आता हयात नाहीत) ते आपल्या आवडत्या वृक्षांची लागवड आणि झाडांचं संगोपन, यात वेळ देत होते. स्थानिक महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांनी काही ठिकाणी औषधी वृक्षांची लागवड केली होती, वृक्षांवर त्या-त्या नावाच्या पाटय़ा लावल्या होत्या. इतरांना ते त्या वृक्षांची सविस्तर माहितीही देत असत. अधिकाधिक कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करतात. एकाने रोज संध्याकाळी परिसरातल्या लहान मुलांना एकत्र करून खेळ घ्यायला किंवा गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे.
ही आजूबाजूची काही उदाहरणे. आयुष्याच्या प्रवासात जोडप्यातील एक कुणी तरी आधी जाणार हे ठरलेलं असतंच. फक्त त्याची तयारी कुणी करत नाही. कशाला अभद्र बोलायचं, म्हणून विषय टाळला जातो; परंतु वार्धक्यातलं, अगदी साठीनंतरचं एकाकी आयुष्यही अनेकदा सहन होत नाही. कारण आजकालचं इतरांचं व्यग्र जीवन. माणसांना माणूस प्रत्यक्ष भेटत नाही, आभासी वा virtually भेटणंच जास्त होतं. त्यामुळे सहवासाची ओढ राहातेच. वृद्ध आणि तेही एकाकी माणसांकडे पाहायला खरंच फारसा वेळ नाही कुणाकडे; पण हा तरुण पिढीचा दोष मानता येईल का? वृद्ध पिढीही त्यांच्या तरुणपणी असंच वागली असू शकते. त्यासाठीच वृद्ध पिढीने आपल्या भविष्याचा, मुख्य म्हणजे आपला जोडीदार आपल्या आधी गेला तर कसं आयुष्य जगायचं? त्यासाठी आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती कशी चांगली ठेवायची याचा विचार करायला हवा नाही का?
परदेशात फार पूर्वीपासून वृद्ध कल्याण शास्त्राचा अभ्यास केला जातोय. आपल्याकडेही तो वाढायला हवा (सोबत याच विषयावरचा लेख आहे.) हसता, खेळता, आपल्या अनुभवाने परिपक्व होऊन गोड झालेला, सगळ्यांना मदत करणारा आजोबा सगळय़ांना हवा असतो. तसा आजोबा व्हायचा निदान प्रयत्न करायला हवा.
जोडप्यांतील एकाचं आयुष्य संपणं आणि दुसरा मागे राहणं ओघानं आलंच. खरं तर हे निसर्गचक्रच. मागे राहणारा ‘तो’ असेल, तर मात्र अडचणी अनेक पटींनी जास्त असतात. पत्नी गेल्यानंतर पुरुष एकदम खचून जातात. अगदी दैनंदिन प्रत्येक बाबतीत ‘त्या’ला ‘ती’च्या साथीची, तिचा सल्ला, तिची मदत घेण्याची आजवर सवय झालेली असल्यामुळे असेल किंवा कदाचित स्त्रिया पुरुषांपेक्षा मनानं अधिक खंबीर असतील म्हणून असेल, पण विधुराची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,’ यापेक्षा वेगळी नसते..
shirish1848@gmail.com