sanwadविधवांना कुंकू लावण्याचा समारंभ स्त्रियांनी केला १९३५ मध्ये तोही अकोल्यात. महादेवशास्त्री दिवेकर यांनी सुवासिनी कुंकू लावतात त्याला कोणताच शास्त्राधार नाही. तेव्हा विधवांचा कुंकू लावण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही, असे मत दिले. शालिनीबाई जमखिंडीकर यांनी ‘स्त्री’च्या संपादकांना आपण कुंकू लावण्यास सुरुवात केल्याचे कळवले. जळगावच्या लक्ष्मीबाई नातू यांनी ‘विधवा आणि कुंकू’ या विषयावरची चर्चा वाचून मतपरिवर्तन कसे झाले ही सर्व हकिकत कळवली. एकूणच मासिकातूही हा विषय नुसता चर्चिला गेला असे नाही तर कृती केली गेली.

शं करराव किलरेस्कर यांच्या संपादन कार्याचे वर्णन करताना ज्येष्ठ कादंबरीकार वि. स. खांडेकर यांनी उद्गार काढले होते. ‘संपादन! छे, नांगरणी आणि पेरणी.’ शं.वा.किंनी स्त्री-मनाची नांगरणी जोडीने मशागत करताना विविध संदर्भात कालसंगत नवविचारांची पेरणीसुद्धा कौशल्याने केली. संपादनाविषयी त्यांची एक तात्त्विक भूमिका होती. ‘‘मानवी जीवन सुधारण्याच्या ते जीवन अधिक सुखी, सुंदर, समाधानी व समृद्ध करण्याच्या धडपडीत जे नाटय़ भरलेले आहे त्याची गोडी काही वेगळीच आहे. खऱ्याखुऱ्या समाधानाचा अनुभव येतो तो त्या व्यक्तीच्या सुप्त शक्ती जागृत करून तिला विकसित जीवनाचा लाभ घडवून देताना. दुसऱ्या व्यक्तीचे जीवन फुलविण्याच्या या क्रियेत एक वेगळेच ‘नाटय़’ असते. अशा नाटय़ात सामील होण्यात एक आव्हान, कर्तृत्व असते! ’’ याच भूमिकेतून ‘किलरेस्कर’नंतर ‘स्त्री’चे संपादन करताना काही उद्दिष्टे शं.वा.किंच्या मनात होती. स्त्रियांचे समाजातील स्थान व त्यांचे हक्क यांची त्यांना जाणीव करून देणे. स्त्रिया अबला आहेत, ही भ्रामक समजूत दूर करणे. स्त्रियांना आपले विचार व आकांक्षा पुढे मांडण्यास एक साधन उपलब्ध करून देणे.’ ‘फिड देम अॅण्ड एनरिच देअर इन्फर्मेशन’ या पत्रकारितेतील सूत्रानुसार स्त्रियांना नवविचारांबरोबर विविध स्वरूपाची माहिती देणे आवश्यक असल्याने शं.वा.किंनी नांगरणी, मशागत आणि पेरणी या तिन्हींचा सुयोग्य मेळ घालत, समतोल राखीत ‘स्त्री’मधील आशय-विषयांची मांडणी केली.
वाचकांना म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांनासुद्धा ‘नांगरणी-पेरणी’च्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. नांगरणी तर करायचीच. परंतु पेरणीपूर्व अवस्थेत मशागत हवी. त्यानंतर नवविचारांची पेरणी केली की काळाबरोबर येणारे नवे पीक अपेक्षित रूप घेऊन येईल याबद्दल त्यांना खात्री होती. स्त्रियांचे प्रश्न समाजजीवनाशी, व्यक्तिजीवनाशी निगडित असल्याने स्त्रियांचा-पुरुषांचा विषयांशी साक्षात संबंध होताच मासिकाद्वारे वैचारिक अभिसरण घडून नवविचारांच्या दृष्टीने नांगरणी आणि पेरणी एकाच वेळी विविध उपक्रमांतून साधता येईल. अशी द्रष्टय़ा संपादकाची दृष्टीही त्यांच्याकडे अचूक होती.
पांढरपेशा, मध्यमवर्गीय समाजातील शिक्षित स्त्री त्यांच्या समोर होती. नवीन ज्ञान, माहिती आणि बदलणारे जग यांच्याकडे बघणारी, आतून विकसित होत आलेली ही स्त्री आहे. आज ती विकसनशील अवस्थेत आहे. प्रारंभीचे प्रगतीचे टप्पे तिने ओलांडले आहेत. तिला अधिक प्रगत अवस्थेकडे जायचे आहे. अशा स्त्रीच्या प्रबोधनासाठी संपादकांनी एक नवीन, अभिनव पद्धत सुरू करून विकसित केली. ‘स्त्री’चे ते वैशिष्टय़ बनले.
‘स्त्री’मध्ये अनेक विषयांचा समावेश होता. कर्तृत्ववान स्त्रियांच्या परिचयापासून स्वयंपाकघरापर्यंत आशयाचा पल्ला मोठा व्यापक होता. कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय देतानासुद्धा आदर्श प्रतिमा त्यांना स्त्रियांसमोर ठेवायची नव्हती. आज स्त्रीचे कर्तृत्व क्षेत्र विस्तारत आहे. स्त्रियांची जीवनदृष्टी प्राधान्यक्रम बदलत आहे. स्त्रिया जिद्दीने कार्य करून स्वत:चे कर्तृत्व कसे घडवीत आहेत हे वाचकांना समजावे. अनेकांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी हा हेतू होता. त्यासाठी शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, कलाक्षेत्र, साहित्य इत्यादी सर्वच क्षेत्रांतील स्त्रियांचा परिचय करून देताना मराठी स्त्रिया, राष्ट्रीय स्तरावरील स्त्रिया, तसेच परदेशातील स्त्रियांचाही समावेश आवर्जून केला होता. अनसूयाबाई काळे, अवंतिकाबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय, हिराबाई बडोदेकर, अंबिका धुरंधर यांच्या बरोबर मादाम माँटेसरी, हेलन केलर, इसा डोरा डंकन यासुद्धा स्त्रिया होत्या. हे सदर ‘स्त्री’मध्ये सातत्याने प्रसिद्ध होत होते. नवीन स्त्रियांच्या नावांची भर पडत होती.
स्त्रियांच्या हक्क आणि अधिकाराच्या दृष्टीने कायदेविषयक तरतुदींना महत्त्व होते. स्त्रियांचा वारसा हक्क, पोटगी, द्वितीय विवाह इत्यादी विषय चर्चेत होते. त्यासाठीच ‘हिंदू स्त्रियांचे कायदेशीर हक्क आणि सुधारणेच्या विधायक सूचना’ ही वासुदेव विनायक जोशी याची लेखमालाच सुरू केली. जोडीला वा. वि. जोशी, रा. के. रानडे यांच्यासारखे कायदेतज्ज्ञ ‘कायदेशीर सल्ला’ देत. एकदा विवाह झाला की लग्नाचे बंधन आले. पती-पत्नी दोघांनी जन्मभर निभवायचे, परंतु प्रत्यक्षात सर्वच पतिपत्नींचे सूर जमतात असे नाही. समाजात ‘बदसूर जोडपी’ असतात आणि आता तर काळ बदलत होता. स्त्री-पुरुषांनी दोघांनी विचार करावा यासाठी   वा. वि. जोशी यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे ‘बदसूर जोडपी’ सदरातून काही नमुने वाचकांसमोर ठेवले. एकाच विषयाला किती बाजूंनी मोकळे करण्याचा संपादकांचा प्रयत्न होता, हे यातून दिसून येते.
काळाबरोबर कुटुंबव्यवस्था बदलत होती. स्त्रीची नोकरी अन्य कामे इत्यादींमुळे कुटुंबरचनेत, वातावरणात, नातेसंबंधांतसुद्धा बदल होणार होता. संसारावर, प्रापंचिक जीवनावर नेमका कोणता परिणाम होणार? समाजाची या संदर्भात मानसिकता कोणती आहे? विचारांची दिशा कोणती आहे? याचे चित्र, वास्तव स्पष्ट होण्याच्या दृष्टीने अनेक विषय संपादकांनी चर्चेसाठी ठेवले. प्रतिक्रिया मागवल्या. पहिल्याच वर्षी ‘माझे वैवाहिक जीवन’ या विषयावर अनुभवकथन करण्याचे संपादकांनी आवाहन केले. ‘आमची विवाह संस्था संसारिक आनंद व स्त्री-पुरुषांची आत्मिक उन्नती या दृष्टीने कितपत समाधानकारक आहे याचा थांग लावण्यासाठी हे सदर सुरू करीत आहोत. यात समाजातील स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक आयुष्याचे खरेखुरे अनुभव मांडण्यात येतील. तुमचा स्वत:चा तसा काही खास अनुभव असल्यास तो ‘स्त्री’ मासिकाकडे अवश्य पाठवा. समाजाची सुधारणा घडून येण्यास त्याचा उपयोग होईल. लेख टोपण नावाने पाठवा. या आवाहनाबरोबरच नकली पत्रे पाठवू नका. पत्रांतील खाणाखुणांवरून खोटे पत्र केव्हाच ओळखता येते, असा इशाराही दिला. वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला तीन पत्रे प्रसिद्ध होत. ‘स्त्री श्रेष्ठ की पुरुष’, ‘स्त्रियांचे वैवाहिक जीवन समाजकार्याच्या आड येते का?’, ‘तुमच्या जन्माचा जोडीदार कसा निवडाल?’ यांसारख्या विषयांवर संपादक सतत वाचक-चर्चा घेत.
स्त्रियांना लिहिते करण्यासाठी संपादकांनी विशेष प्रयत्न केले. ‘पत्रलेखनातून’ स्त्रियांचे मन अधिक मोकळे होईल या विचारांनी ‘पत्रमैत्रीण संघ’ स्थापन केला. ‘स्त्री आणि धर्म’सारख्या विषयांवर पत्रे मागवली. पत्रलेखन स्पर्धा असे. स्त्रियांशी हितगुज, कमला वहिनींची पत्रे सोबत होतीच. अनेक महिलामंडळे, स्त्रीसंघ त्या काळात उमेदीने कार्य करीत. एखादा विषय स्त्रियांना सांस्कृतिक दृष्टीने क्रांतिकारक कार्य करण्याससुद्धा प्रेरणा देत असे.
१९३५ साली विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याचा समारंभ स्त्रियांनी केला. ती सर्वच हकिकत विलक्षण आहे. मात्र आपल्याकडे आजही या विषयावर अनेक ठिकाणी फक्त चर्चाच सुरू आहे. ‘विधवांनी कुंकू लावावे का?’ किंवा ‘लावू नये’ यासाठी काही शास्त्राधार आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारे कांतागौरी यांचे ‘श्रीशक्ती’ या गुजराती मासिकात प्रसिद्ध झालेले पत्र मराठीत भाषांतर करून जून १९३१ च्या अंकात प्रसिद्ध झाले. ‘कांता गौरी’ यांना या प्रश्नावर शास्त्रीय व ऐतिहासिक आधार हवे आहेत. पण आमच्या वाचक भगिनींनी या विषयाकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहावे व सध्याच्या परिस्थितीत विधवांनी कुंकू लावणे इष्ट का अनिष्ट या विषयावर आपले विचार कळवावेत, असे संपादकांनी आवाहन केले. पत्ररूपी प्रतिक्रिया आल्याच. परंतु महादेवशास्त्री दिवेकर यांनी, सुवासिनी कुंकू लावतात त्याला कोणताच शास्त्राधार नाही. तेव्हा विधवांचा कुंकू लावण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही, असे मत दिले.
या चर्चेने स्त्रियांना प्रेरणा मिळाली. अकोल्यातील काही स्त्रियांनी पुढाकार घेतला. संक्रांतीचे हळदीकुंकू करून विधवांना सन्मानाने बोलावून समारंभपूर्वक कुंकू लावण्याचा समारंभ करण्याचे ठरवले. त्यासाठी पत्रक काढून सह्य़ा गोळा केल्या. सनातनी स्त्रियांच्या मंडळाने विरोधी पत्र काढले. परंतु हळदीकुंकू समारंभ झाला. सुभद्राबाई जोशी कुंकू लावून घेण्यास पुढे आल्या व समारंभ पुण्या-मुंबईत होत नसून अकोल्यात १९३५ साली झाला. हे वाचकांनी लक्षात घ्यावे. या समारंभाचे बाह्य़ परिणाम, महत्त्वाचे झाले. बनारस येथे अहिल्याबाई भगिनी मंडळाने असाच समारंभ साजरा केला. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरसुद्धा स्त्रियांना मानसिक बळ मिळाले. शालिनीबाई जमखिंडीकर यांनी ‘स्त्री’च्या संपादकांना आपण कुंकू लावण्यास सुरुवात केल्याचे कळवले. जळगावच्या लक्ष्मीबाई नातू यांनी ‘विधवा आणि कुंकू’ या विषयावरची चर्चा वाचून मतपरिवर्तन कसे झाले ही सर्व हकिकत ‘महिला’ मासिकाच्या संपादकांना कळवली. लक्ष्मीबाईंनी दिवेकर शास्त्रींना पत्र पाठवून आपल्या मनातील सर्व शंका विचारल्या. दिवेकर शास्त्रींनीसुद्धा लक्ष्मीबाईंना खुलासा देणारे सविस्तर उत्तर पाठवले. त्यानंतर लक्ष्मीबाईंनी कुंकू लावण्याचे ठरविले. ‘त्यांचे उत्तर आल्यावर त्या दिवसापासून मी कुंकू लावण्यास सुरुवात केली. आडमुठय़ा लोकांनी टीका केली. परंतु त्यांचा राग येण्याऐवजी कीव आली. तेव्हा विधवांनी कुंकू न लावण्याची ही रूढी सुज्ञ, शिकलेल्या भगिनींनी मोडण्याचा प्रयत्न करावा,’ अशी विनंती लक्ष्मीबाई नातूंनी पत्रात केली.
‘स्त्री’मधून संपादकांची सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण संवादाने स्त्रियांची मने जिंकली. स्त्री-वर्गात स्त्री मासिकाची एक प्रतिमा निर्माण झाली. स्त्री (मासिक) ही साधी सरळ, निर्भीड व धीट सशक्त स्त्री आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडून धिटाईने बंड करण्यासाठीच या ‘स्त्री’चा जन्म आहे. असे वर्णन सरला नाईक यांनी ‘स्त्री’च्या अंकाचे केले. म्हणूनच एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत ‘स्त्री’चे ३००० वर्गणीदार झाले. ‘स्त्री’- महाराष्ट्रीय स्त्रियांचे आवडते मासिक झाले!
डॉ. स्वाती कर्वे – dr.swatikarve@gmail.com

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन