योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com
बायकोला नवऱ्यापेक्षा पगार अधिक असणं, ही आताच्या काळात अनेकांच्या बाबतीत घडणारी गोष्ट. पण आपल्या समाजाला अजूनही पगारातली अशी तफावत पचलेली नाही. अनेकदा लग्न ठरवण्यापूर्वी मुलींना त्यांचा खरा पगार लपवावा लागणं, किंवा अधिक पगार असलेली मुलगी मुलाला बायको म्हणून पसंत असली तरी घरच्यांकडूनच तिला नापसंती मिळणं, हे सर्रास घडतं. शिळ्या विचारांची ही भुतं निष्कारण पती-पत्नीच्या मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न होतो. पण काही जण आपल्या परीनं त्यावरही उपाय शोधतात.
लग्न बरोबर मुहूर्तावर पार पडलं. मग आलेले बहुतेक पाहुणे हे पुढच्या पाचच मिनिटांत नवदांपत्याला भेटणाऱ्यांच्या किंवा जेवणाच्या ओळीत विभागले गेले. नवऱ्या मुलीचे आणि मुलाचे आई-वडील, आजी-आजोबा आणि सख्खी भावंडं सोडली तर आता घरातल्या बाकीच्या मंडळींना जरा निवांत वेळ मिळणार होता. सकाळपासून सगळ्यांनीच बरीच धावपळ केली होती. व्यासपीठाचा ताबा छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर मंडळींनी घेतल्यावर ‘तो’ बाजूला झाला आणि तिथून खाली उतरताना त्यानं समोर मांडलेल्या खुच्र्यांच्या दिशेनं पाहिलं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे बरोबर सर्वांत शेवटच्या ओळीच्या कोपऱ्यात त्याचा दादा बसला होता आणि तीन-चार छोटी मुलं त्याच्याशी गप्पा मारत होती.
पन्नाशीच्या जवळपास असलेला हा दादा म्हणजे त्याच्यापेक्षा २० वर्षांंनी मोठा असलेला त्याचा चुलत भाऊ. कुटुंब मोठं असलं की स्वाभाविकपणे वयात असं अंतर बघायला मिळतंच. पण चांगली गोष्ट ही होती, की त्याचं दादाबरोबर मस्त जमायचं. तसं पाहिलं तर घरातल्या तरुण पिढीतल्या सगळ्यांचीच दादाबरोबर गट्टी होती आणि त्याचं कारण होतं.. लहानपणापासून दादानं सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी! घरात कोणताही कार्यक्रम असला, ‘फॅमिली गेट- टुगेदर’ असलं, की मुलांचा घोळका हा दादाभोवतीच असायचा. दर वेळेला कोणती तरी भन्नाट भुताची गोष्ट दादा सांगायचा. गोष्ट इतकी रंगायची, की ती ऐकताना मुलांना खाण्यापिण्याचं भानही राहायचं नाही. कमालीची भीती आणि उत्सुकता याचा अनुभव घेत मुलं गोष्ट ऐकण्यात तल्लीन व्हायची. कधी कधी कार्यक्रम लांबला तर दादा पाठोपाठ दोन-तीन गोष्टी सांगायचा. आज दादाला पाहून गोष्ट ऐकण्याची त्याची तल्लफ पुन्हा उफाळून आली. मग दादापाशी जाऊन तो म्हणाला, ‘‘मग कशी आहेत तुझी भुतं?’’
आपल्या आजूबाजूच्या मुलांना दादानं दुसऱ्या उद्योगात गुंतवलं आणि मग त्याच्याकडे थंडपणे पाहात दादा म्हणाला, ‘‘नेमकी कोणती भुतं? म्हणजे वाडय़ाच्या तळघरात पुरलेल्या खजिन्याचं रक्षण करणारी?, की टेकडीवरच्या त्या पडक्या घरात हमखास असणारी?, की किल्लय़ाच्या सर्वांत उंच बुरुजावर दबा धरून बसलेली?, की बंद पडलेल्या ‘आय.टी.पार्क’च्या गच्चीवर धुडगूस घालणारी?’’ दादाचं बोलणं अर्धवट तोडत तो म्हणाला,‘‘आय.टी. पार्कच्या गच्चीवर? ही मी न ऐकलेली कोणती गोष्ट आहे?’’ त्यावर हसून दादा म्हणाला, ‘‘फक्त तुमच्या सिस्टिमचे डेटाबेस अपडेट होतात असं नाही. माझ्या गोष्टींचा डेटाबेसही हळूहळू का होईना, पण अपडेट होत असतो आणि तुला जर ही गोष्ट माहिती नसेल, तर त्याच्या पुढच्या किमान २० गोष्टी तरी तुझ्या ऐकायच्या राहिलेल्या आहेत, असं समज. नोकरी सुरू झाल्यापासून तू भेटतोस तरी कुठे?’’ दादाचं बोलणं ऐकल्यावर आपल्या हातून काहीतरी कमालीचं निसटलं आहे, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.
क्षणभर विचार करून तो म्हणाला,‘‘येत्या शनिवारी रात्री तुझ्याकडे किंवा माझ्याकडे जमू. बाकीच्यांना पण बोलावतो. एक मस्त ‘नाईट आऊट’ मारू आणि शक्य तितका बॅकलॉग भरून काढू.’’ त्यावर दादानं फक्त होकारार्थी मान हलवली. तो दादाला म्हणाला, ‘‘बरं, मला बऱ्याच दिवसांपासून तुला विचारायचं होतं, या भुतांच्या गोष्टी सांगायला तू नेमकी सुरुवात कधी केलीस?’’
‘‘अरे, खूप वर्षं झाली.. नेमकं आठवत नाही,’’ दादा विषय टाळत म्हणाला. पण तो ऐकणार नव्हता, ‘‘मला हे आठवतं आहे, की आधी तू गोष्टी सांगायचा नाहीस. पण एक दिवस अचानक गोष्टी सांगायला लागलास.’’
तेव्हा काहीतरी विचार करून दादा म्हणाला, ‘‘आता तू पुरेसा मोठा झाला आहेस, तेव्हा सांगायला हरकत नाही. जेव्हापासून माझ्या बायकोचा पगार माझ्यापेक्षा जास्त झाला, तेव्हापासून माझ्या गोष्टी सुरू झाल्या.’’
‘‘म्हणजे?’’ त्याला काहीच समजेना. दादा असं काही उत्तर देईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं.
‘‘आमच्या लग्नानंतर सहाच महिन्यांत तिचं प्रमोशन झालं. तसं ते होणारच होतं. पण त्याच दरम्यान तिच्या कंपनीची धोरणं बदलली, ज्याचा फायदा होऊन तिला घसघशीत पगारवाढ मिळाली. ही गोष्ट मी मोठय़ा कौतुकानं आपल्या सगळ्या मंडळींना सांगितली. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. लोकांनी मला मी कशी कमी मेहनत घेतो, करिअरकडे लक्ष देण्याऐवजी टवाळक्या करत बसतो, असं ऐकवायला सुरुवात केली. वास्तविक माझं माझ्या कंपनीत उत्तम सुरू होतं. शिवाय फक्त ‘कंपनी एके कंपनी’ न करता माझं ट्रेकिंग,बॅडमिंटन आणि वाचन मला चालू ठेवायचं होतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळतो तो तिच्या गुणवत्तेमुळे, असं माझं ठाम मत आहे. त्याबद्दल कोणतीही तक्रार, आकस माझ्या मनात कधीही नव्हता. पण, आपल्या घरच्या मंडळींना ते पटलं नाही,’’ सुस्कारा सोडत दादा म्हणाला.
‘‘मग?’’ त्यानं न राहावून विचारलं.
‘‘मग काय? मी भेटलो, की हा विषय निघायचाच. अप्रत्यक्षपणे टोमणेही मारले जायचे. बाहेरचे लोक असं वागले तर एकवेळ आपण समजू शकतो. पण घरातल्या लोकांचं काय करायचं, हे काही समजेना. बरं, काहीही झालं, तरी या सगळ्या वैतागाचा परिणाम मला आमच्या नात्यावर होऊ द्यायचा नव्हता. ती मला एका शब्दानं काही म्हणाली नाही. उलट तिनं कायमच तिच्या परीनं गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला. अनेक टोमणे माझ्यापर्यंत पोहोचूही दिले नाहीत. पण आमच्या पगारातल्या तफावतीचं भूत माझ्या मानगुटीवर या मंडळींनी असं काही बसवलं होतं, की माझाच तोल जाण्याची शक्यता जास्त होती.’’
‘‘अरे, पण मग तू सगळ्यांना समोर बसवून बोलायला हवं होतंस,’’ तो न राहावून म्हणाला. ‘‘तेही करण्याचा मी प्रयत्न केला. पण संवाद अशा लोकांबरोबरच होऊ शकतो, जिथे एकमेकांचं बोलणं ऐकून घेण्याची दोघांचीही तयारी असते. माझा तोही प्रयत्न फसला. मी कमालीचा वैतागलो. असं वाटलं, की सगळ्यांबरोबरचे संबंध संपवावेत. पण मग विचार केला, की हा एक विषय सोडला तर आपले बाकी कोणतेच वाद नाहीत. शिवाय मोठं कुटुंब म्हटलं की भांडय़ाला भांडं लागणारच. काय करावं काही समजत नव्हतं. फॅमिली गेट-टुगेदरला आणि कार्यक्रमांना जाताना माझ्या पोटात गोळा यायला लागला. कोण, कधी, कुठे, कसा विषय काढेल याची काही कल्पना नसायची. मानगुटीवर बसलेलं भूत मला घाबरवत होतं.’’
दादानं सांगितलेलं पगाराच्या तफावतीबद्दलचं ‘गॉसिप’ त्यानंही ऐकलं होतं. पण दादानं मांडलेली ही बाजू त्याच्यासाठी नवीन होती. थोडा विचार करून तो म्हणाला, ‘‘मुलापेक्षा मुलीचा पगार जास्त हा खरंच आपल्याकडे गुंतागुंतीचा विषय आहे. आता माझ्यासाठी मुली बघणं सुरू आहे. असं कधी होईल का, की माझ्यापेक्षा जास्त पगार असणारी मुलगी मला मागणी घालेल?’’ त्याचं बोलणं थांबवत दादा म्हणाला, ‘‘बहुतेक नाहीच. पण त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे, की तसं झालं तर तू तिला होकार देशील का, की तू लोक काय म्हणतील या भीतीनं नकार देशील, किंवा तुला नकार देण्यासाठी भाग पाडलं जाईल. आपल्याकडे नवरा-बायकोचं नातं हे फक्त नातं म्हणून बघितलं जात नाही. त्याला गणितात बांधलं जातं आणि हे असं करण्यात स्त्री-पुरुष दोघंही आघाडीवर असतात. यात कोणीही एकमेकांपेक्षा कमी नाही. दुसऱ्याच्या नात्याबद्दल तर्कवितर्क करत राहणं, आपल्या दृष्टिकोनातून त्यातल्या उणिवा काढणं, कोणीही विचारलं नसतानाही त्या उणिवा जगजाहीर करणं, हे आपलं मोठं अपयश आहे. ‘जगा आणि जगू द्या,’ ही कल्पना आपल्याकडे नाही.’’
‘‘हं.. माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्यांनी आपला खरा पगार लग्न ठरवताना सांगितला नाही. उगाच मुलापेक्षा आपला पगार जास्त म्हणून लग्न मोडण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. तुझ्याशी बोलल्यावर त्यांनी असं का केलं असेल, हे मला जास्त नीट समजतंय.’’ तो मोकळेपणानं कबूल करत म्हणाला. ‘‘अरे, आपल्याकडचा घोळ बराच मोठा असतो. एकदा मुद्दा मिळाला, की मग तो विषय जितका खेचला जाईल तितका खेचण्याकडेच लोकांचा कल असतो. दिवस, महिने, वर्षं असं त्याला कोणतंही बंधन नाही. मी गेल्या वर्षी ‘बुलेट’ घेतली, तेव्हाही मला लोकांनी ‘बायकोनं गिफ्ट दिलं का?,’ असं विचारलं. मग मीही ‘हो. नाहीतर मला कसं परवडणार?,’ असं म्हणून मोकळा झालो. लोकांना जे ऐकायचं होतं, ते त्यांना मिळालं, त्यामुळे चर्चाही लगेच संपली आणि बुलेट घेण्याचा माझा आनंद मला अनुभवता आला.’’ दादा डोळे मिचकावत म्हणाला.
‘‘काय मूर्खपणा आहे,’ तो भडकून म्हणाला. ‘‘आहे ना. पण तो हाताळण्याचं तंत्रही आपल्यालाच शोधावं लागतं. आता तू मगाशी विचारलेल्या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. सुरुवातीला मीही आगाऊ प्रश्न ऐकून असाच तडकायचो. मानगुटीवर बसलेलं भूत उतरवण्याचे सगळे प्रयत्न फसल्यावर एक दिवस ते भूत काही हलणार नाही हे मी मान्य केलं. थोडक्यात ‘लोक असे का वागतात?,’ यावर विचार करून वेळ घालवण्यापेक्षा ‘लोक असेच वागतात,’ असं स्वत:ला समजावलं आणि मला उपाय सापडला. माझ्या पिढीशी आणि वरच्या पिढीशी माझे खटके उडायचे. पण कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर संपर्क टाळणं शक्य नव्हतं. पण तो मर्यादित ठेवणं शक्य आहे, हे माझ्या लक्षात आलं. त्यासाठी तुमच्या पिढीबरोबर दोस्ती करणं हा सगळ्यात मस्त उपाय होता. तसंही कार्यक्रमात मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला आवडत नसतं. ती जबाबदारी मी उचलली. बरं, तुम्ही लोकही सहजासहजी माझं ऐकणार नव्हतात. तेव्हा गोष्ट सांगण्याची कल्पना सुचली. त्यात भुतांची गोष्ट असेल तर घाबरत घाबरत का होईना, पण सगळे ऐकतात. माणसांनी माझ्या मानगुटीवर बसवलेल्या भुतानं दिलेला सगळा त्रास या कल्पनेतल्या भुतांनी कमी केला आणि फिट्टमफाट झाली.’’
दादाचं हे बोलणं ऐकून तो मिश्किलपणे म्हणाला, ‘‘खरी फिट्टमफाट तू केलीस. तुला कायम भीती दाखवणाऱ्यांच्या मुलांना गोष्टींमधून का होईना पण भीती दाखवून!’’
‘‘अरे, हा मुद्दा माझ्या कधी लक्षातच आला नाही. पण तू म्हणतो आहेस ती फिट्टमफाट जास्त चांगली आहे,’’ दादाने त्याला दाद दिली. मग तो म्हणाला, ‘‘पण असं नाही तुला वाटत, की या सगळ्यामुळे तू थोडा वेगळा पडलास? मी नेहमी बघतो, प्रत्येक कार्यक्रमात तू असा शेवटच्या ओळीत बसलेला असतोस.’’
‘‘नाही रे.. अजिबात नाही. एकतर त्या गर्दीत जीव गुदमरतो. दुसरं म्हणजे, कोणाला काही बाहेरून आणायचं असेल तर इथून लगेच बाहेर पडता येतं. आता मगाशीच काकूच्या घरी राहिलेली साडय़ांची पिशवी मी मुहूर्ताच्या आधी आणून दिली आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे काही काम असेल तर तुम्हाला शोधत लोक येतात. आता आजचंच बघ, या सभागृहाचा मालक माझा वर्गमित्र आहे. तेव्हा त्याच्याकडून ‘डिस्काउंट’ मिळवण्यासाठी मलाच पुढे केलं गेलं.’’
‘‘आपल्याकडचे लोक अशक्य आहेत,’’ तो वैतागून म्हणाला.
‘‘अरे, असंच असतं. मी म्हटलं ना तुला, असं का आहे, हा विचार करून स्वत:ला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. ‘असंच आहे,’ हा विचार करून पुढे जाणं महत्त्वाचं. सगळं आपल्या गोष्टीसारखं आहे, बाकी काही नाही तरी शेवट आपल्या मनासारखा होईल अशी खूणगाठ बांधून पुढे चालत राहायचं. मग मानगुटीवर कितीही मोठं भूत बसलं तरी त्याचं काही वाटत नाही,’’ दादा समाधानानं म्हणाला.
ते ऐकून तो लगेच म्हणाला, ‘‘अरे, तू इतकी जर भुतांची भीती घालवतो आहेस, तर मग आपला ‘नाईट आऊट’ अगदीच सपक होईल. त्याचं काय?’’ त्यावर दादा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘तू नाईट आऊटला येताना तुला जास्तीत जास्त ऊब देणारं तुझ्या आवडीचं पांघरूण घेऊन ये. कारण भूत कितीही खोटं असलं तरी माझ्या गोष्टीमुळे तुला हुडहुडी भरणार, हे नक्की.’’ दादाच्या त्या बोलण्यावर दोघंही खळखळून हसले.