‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. या सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो. एखाद्या चुकीसाठी आयुष्य मोजायचं नसतं. सरळ उच्चारायचे तीन शब्द, ‘माफ करशील मला?’
‘चुकतो तोच माणूस’, प्रत्येकाकडून जाणते अजाणतेपणे काहीतरी चुकतेच. म्हणून माणसाला कायम चुका करायचा परवाना नसतो. प्रत्येक चुकेतून शहाणपण शिकायचं असतं, भविष्याला घडवायचं असतं. चुका उगाळत बसायचं नाही, तसंच त्याचं भांडवलही करायचं नाही. चुकांच्या पायऱ्या असतात. लहान, मोठी, क्षम्य, अक्षम्य. त्यानुसार त्याचं अवडंबर माजते. अक्षम्य अपराध्याला कडक शिक्षा द्यायलाच हवी
. चूक घडते, तेव्हा परिणाम माहीत असेलच असे नाही. नाते तुटावे अशी इच्छा नसते, पण परिस्थितीत बदल घडवताना प्रत्येकाचे वागणे भिन्न असते, कृती चुकीची होते आणि सगळेच बिनसते. चूक तंद्रीत केली जाते. कशी का असेना, चूक ती चूकच असते. तिला स्वीकारावेच लागते. चुकांचा परिणाम स्वत:वर होतो, तसाच इतरांवरसुद्धा. आपल्या एकटय़ावर होणाऱ्या परिणामांचा मनस्ताप पोखरत जातो. कोणाजवळ व्यक्तही होता येत नाही. माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे, नाते अलिप्त होऊ पाहत आहे ही जाणीव छळते. काय करावे अशा वेळी?
आपल्या कौटुंबिक नात्यात तर असे प्रसंग नेहमीचेच. जितकं नातं जवळचं तितके गैरसमज, दुरावा, अबोला नेहमीचाच. एखादा अधिक-उणा शब्द बोलला जातो. मन दुखावतं. ते क्षणाचं असतं कारण, प्रेम कायमचं असतं. जिवंत असतं. अशा वेळी एकच शब्द कामी येतो, ‘माफ करशील मला?’ अर्थात तुम्ही ते कसं बोलता, कसं व्यक्त करता यावर ज्याला तुम्ही दुखावलंय ती व्यक्ती तुम्हाला माफ करणार की नाही ते ठरत असतं. पण तुमचं चुकलं असेल तर माफी मागायला काहीच हरकत नसते. तो असतो केवळ एक शब्द. पण त्यामागे असते भावना प्रेमाची. आपुलकीची!
हा दुरावा येतो, नवरा-बायकोत, आई-वडील आणि मुलांत, भावंडांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये. नात्याचे अनेक पदर असतात. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याशी कमी-अधिक प्रमाणात, कमी- अधिक काळासाठी जोडली गेलेली असते. आयुष्य एकच असतं, मग नात्यांना सांभाळायचं की अहंकार जोपासत बसायचं, हाच खरा मुद्दा. फक्त त्यासाठी लागतं मोठं मन. काही तरी सोडून द्यावं लागतं, स्वीकारायला लागतं त्या व्यक्तीला ती व्यक्ती आहे तशी. मग मात्र आयुष्य सुखी होऊ शकतं..
अनेकदा वादळ असतं कपातलं. शब्दाशब्दानं तुटू पाहणारं, तर त्याच शब्दांनी पुन्हा जुळणारं. प्रसंगानुरूप होते वादावादी, देवाणघेवाण, ताणले जातात नातेबंध. असं असलं तरी जेवायचं टेबल एकच असते प्रत्येक घरात. घडलेला प्रसंग पुसला जातो. पाटी स्वच्छ धुतली जाते. आपल्या माणसांसाठी सर्वस्व देण्याची मानसिकता हवी. गळामिठी पडून अश्रूंनी वाट मोकळी केली जाते. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. आणखीन काय हवं असतं चार भिंतींना? इतकंच खूप असतं. छोटय़ाछोटय़ा गोष्टींमधले चुकीचे वागणं सहवासात असलेल्याला त्रासदायक होतं. हळवं मन विचारात बुडून जातं, अस्वस्थ होतं. अशा वेळी पटकन, ‘चुकून झालं, आय एम सॉरी. मुद्दाम नाही केलं मी. प्लीज, माफ करशील मला. झाली चूक माझ्याकडून. मला गरज आहे तुझी.’ माफी मागायला आत्मिक बळ प्रबळ लागतं. झालेल्या चुकीची बोचणी, तिचा स्वीकार, सगळेच समोरच्याला हेलावून टाकणारे आहे. दोघांनाही एकमेकांची गरज असतेच. जाणीव जेव्हढी खोल, तितकी किंबहुना त्याहूनही अधिक आर्जव शब्दांमधून पाझरावं. पश्चात्तापाच्या भावनेने ओथंबलेले स्वर, डोळ्यात प्रतििबबित अपराधांची गहराई, अश्रूंच्या प्रत्येक थेंबात प्रतीत होणारी चुकांची कबुली, आणि आपण दोघे एकमेकांना हवे आहोत याची जाणीव करून देणारा स्पर्श ज्या माफीमध्ये असतो. तेथे प्रेमाचं पारडे जड होऊन दोन मनांची पुनभ्रेट, नातेबंधांची जुळणी, पुनर्मिलन अटळ असते. नातं कुठलेही असो, तुटत नाही. राग, नाराजी, तेढ विरघळते. जवळीक घट्ट होऊन वाढीस लागते. प्रसंग विस्मृतीत गेला नाही तरी विश्लेषणात मऊ होऊन दाह संपतो. नव्या जोमाने, उत्साहाने एकत्र राहून आनंद घेता येतो.
तरीही माफी मागायला जीभ जड होते. अहं, भावनिक विरोध, ‘मीच बरोबर’चा आग्रह तसं वागू देत नाही. घडलेल्या प्रसंगात प्रत्येकजण आपापल्याच वागण्याचे समर्थन देत राहतो. त्रास भोगणारा तडफडतो. वेदना जाणून घेणं सर्वाना जमत नाही, तशी इच्छा पाहिजे. समजा जाणलं तरी वाकणं दुरापास्त असेल तर माफी कशी मागितली जाईल पटकन? वागणंच त्रासदायक, अडचणी निर्माण करणारे असल्यावर स्वीकारही अवघड असतो. कधीकधी समोरच्याची भूमिका, दृष्टिकोन स्वीकारला तर त्यात पराभव लपलेला दिसतो. अहं दुखावतो. मी फक्त त्याची मते जाणून घेतली, स्वीकारली थोडीच, असंच स्वत:ला समजवावं. त्याने आपलेच वागणे सुधारते, संवेदनशीलता जागृत होते. जीभ सल सोडून वाट्टेल तसे बोलायला, वागायला जमते, तीच जीभ आखडून घेतली जाते.
शीतयुद्ध चालू होते. गैरसमज व्हायला सुरुवात होतात. एक दिवस तोंड फुटते, फटाफट शब्दफेक नात्याचे बंध कापत जाते. शब्द शस्त्रांपेक्षा धारदार असतात. केसानं गळा कापल्यावर सगळे अडकतात गरसमजांच्या गत्रेत. प्रत्येकाला वाटतं माझं कोणी ऐकतच नाही. टोचतात आणि गरसमज पसरवतात माझ्याबद्दल. संताप उफाळतो. डोळे वटारून आवाज टिपेला जातो. हात उगारून सगळेच हमरीतुमरीवर येतात. अति झालं म्हणत एखादा त्रागात्रागाने हातापाया पडायला जातो. कोपऱ्यापासून जोडलेले हात, पट्टीतला कर्कश्य स्वर, ‘चुकलो बाबा. सॉरी. तुम्ही नाही का चुकत? लोटांगण घालू का तुला? ये, कुठेत तुझे पाय? धरतो एकदाचा. मग तरी माफ करशील मला?’ संतापात चुकीचा स्वीकार नसतो. असतो फक्त त्रागा, तापटपणा, दुसऱ्याला कमी लेखणं. अशा वागण्याला अर्थ नसतो. समोर उभा असणाऱ्याच्या मनातली नकारात्मक भावना बळावते. तेढ वाढतेच. फालतू नाटकांना कोणी भीक घालत नाही, माफी तर अशक्यच.
भांडण झाल्यावर दोन वा अधिक व्यक्ती त्यांची कुटुंबे दुभंगली जातात, माफी कोणी मागायची, पडतं कोणी घ्यायचं, यावर सर्व अवलंबून. दुराव्याचा कालावधी स्वभावानुसार बदलतो. उच्चारायचे असतात, ‘फक्त तीन शब्द’, ‘माफ कर मला’. ‘करशील ना माफ?’ ‘आय एम सॉरी.’ तुमचा आवाज, शब्दफेक, चेहरा, डोळे, स्पर्श, संपूर्ण देहबोली खूप महत्त्वाची असते. शब्दांचा खरेपणा इथेच जोखला जातो. समोरच्याच्या भावनाही जागृत असतात. आवाजातील ओलावा जसा जाणवला, तसं झालं गेलं सोडून दिलं. सामंजस्याने संवाद वाढतो. धीर धरावा, वेळ द्यावा. नातेसंबंध आहे तसेच ठेवायची गरज असते. निदान प्रयत्न नोंदविला नक्कीच जातो.
तुटलेली नाती शांतपणे जगू देत नाहीत. कालांतराने वरवर खपली धरली गेली की गरसमज स्पष्ट होतात. वेळ गेलेली असते. हळव्या मनात कायम ठुसठुसते बोचणी. खंत बोचते, सल छळते. असह्य़ वेदना होऊन जीवाच्या आकांताने ओरडावेसे वाटते. धावत जावून गळ्यात पडून सांगावेसे वाटते, ‘किती हा दुरावा. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माझे मला मी माफ केले नाही. संपली माझी ताकद. आठवणी नकोशा होतात. का वागलो असा मुर्खासारखा? संपवू या दरी. पूर्वीचीच प्रेमाची, आपलेपणाची भावना घेऊन ये. बोल ना माझ्याशी एकदातरी. हो म्हण. त्याशिवाय माझे प्राण जाणार नाहीत. जाताना ओझं नको.’ वाढतं वय किती कळवळलं, तरी पोचत नाही तिच्या-त्याच्यापर्यंत. चिठ्ठी, पत्र, फोन, निरोप, इमेल सगळं केलं आणि नाही भेटली तर. कशी पोचवायची भावना? सगळेच मार्ग बंद.?
अनेक अपराधांची कबुली द्यायला आणि घ्यायला लेखणी उत्सुक असते. खद्खद्णारे शब्द, वादळ, जे झालं ते सगळे याची बारकाईने कबुली द्यायची एका कोऱ्या कागदावर. डायरीत उतरवल्यावर जरा शांती मिळते. परत परत वाचायचं लिहिलेलं, अश्रूंवाटे मोकळं होताना आतून कणकण निरावेग व्हायचं. बोचणी कमी होऊन उभारी येते. वर जाताना घेऊन जायच्या नसतात आतल्या गाठी. जाण्यापूर्वी हिशोब पूर्ण करायला हवा. एका तिऱ्हाइताच्या नजरेतून घडलेल्या प्रसंगाचे, चुकांचे गांभीर्य, खोलवरपणा जाणवू लागतो. मनाला हायसं वाटतं आणि हेच जाता जाता पुरेसे असतं.
‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो. निसर्ग आयुष्यामधील प्रत्येक समस्येला उत्तर देतो. आपल्या तुटपुंज्या आढय़तेचा टेंभा मिरवता येत नाही. माफी मागायला लागणारं आत्मबळ. निसर्गाच्या सान्निध्यात मिळते. निसर्गात गेल्यावर मन शांत होते. संतापलेल्या वखवखणाऱ्या वेदनांवर मलमपट्टी होते. चूक कितीही भयंकर असली, समोरच्याकडे माफी मागणं अशक्य असताना आतल्या आत तडफडणारा जीव किती काळ तसाच राहणार? एखाद्या चुकीसाठी आयुष्य मोजायचं नसतं. काही चुकांची जातकुळी खपली धरू देत नाही. अशा वेळी, प्रारब्धावर सर्व टाकून वर्तमानातील क्षण हुंगावा. सगळं मारावं नशिबाच्या माथी. देव असतोच खापर आपल्या माथी फोडून घ्यायला राजी.
माफ करशील मला?
‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. या सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो.
आणखी वाचा
First published on: 29-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will you forgive me