– संकेत पै
लहानपणापासून आजूबाजूच्या माणसांचे आपल्याला जे अनुभव येत असतात, त्यावरून आपल्या वागण्याची एक चौकट तयार होते. अनेकांच्या बाबतीत ही चौकट इतकी पक्की असते, की त्याबाहेरचे अनुभव घेणं शक्य आहे, हे त्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. यामुळे आपण नकळत स्वत:वर अनेक मर्यादा घालत जातो. प्रगतीला खीळ घालणारी ही चौकट मोडायची असेल, तर प्रथम आपल्या जगण्याचं स्वामित्व स्वत:कडे घ्यायला हवं.
आजच्या जगात प्रत्येकामध्येच जिंकत राहण्याची चढाओढ लागली आहे. जिंकण्यासाठी कोणाला तरी हरवणं, हेच अनेकांचं ध्येय असतं. यशाचा पाठलाग करताना आपण आयुष्याचीच एक अटळ शर्यत करून टाकतो. आपली शिक्षणपद्धतीही शिकण्याऐवजी स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रित करून या तणावात अधिकच भर घालत असते. केवळ मिळालेल्या श्रेणीवरून विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवलं जातं.. अगदी काही गुण कमी मिळाल्यानंही त्यांना डावललं जातं, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
अशा पद्धतीनं जगताना आयुष्य आपल्याला ते एकतर काळं किंवा पांढरं अशा दोनच रंगांत दिसू लागतं. त्या दोन रंगांच्या मधल्या छटा आपोआपच दिसेनाशा होतात. शर्यतीत धावताना आपण स्वत:ला आणि इतरांनाही सूट द्यायला, काही गोष्टी सोडून द्यायला अजिबात तयार नसतो. त्यामुळे जगण्यातले अनेक कोपरे-कंगोरे बारकाईनं पाहायचे राहून जातात. याला ‘जिंकणं’ म्हणावंसं मला वाटत नाही. हे फक्त ‘जगण्यासाठी जगणं’ आहे.
मी एकदा वाचलं होतं, ‘जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे पिढ्यान्पिढ्या तुमचं नुकसान होत राहतं, तेव्हा माणूस म्हणून उत्क्रांत होताना अशी एखादी संवेदना, प्रेरणा उपजते, की ज्यामुळे भविष्यात ते संभाव्य नुकसान ओळखता येतं, टाळताही येतं. या विधानानं आपल्या पूर्वजांच्या जीवन-पद्धतीबाबत विचार करायला मला भाग पाडलं.
हेही वाचा – ‘भय’भूती : भीती माणसांचीच!
आपले पूर्वज अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात, लहान लहान समूह करून भटकत असत. हिंस्र प्राणी आणि इतर आक्रमक समूह, अशा कित्येक संकटांचा त्यांना सामना करावा लागला असेल. कालांतरानं ते अखंड सावध राहायला शिकले. त्यायोगे येऊ घातलेल्या धोक्यांची, संकटांची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा त्यांनी तयार केल्या. प्रत्येकाला आपापलं आयुष्य निर्धोकपणे जगता यावं, म्हणून ते एकमेकांना सहकार्य करायला शिकले. पण तरी त्यांच्यातले काहीजण मात्र इतरांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी प्रयत्न करत राहिले. असा विचार करा, की जर त्या वेळी तुम्ही तिथे असता आणि स्वत:ची वेगळी भूमिका मांडली असती, तर कदाचित तुम्हाला संपवण्यात आलं असतं किंवा मरण्यासाठी एकट्याला सोडून देण्यात आलं असतं. आणि जंगलात एकटे भटकत असताना तुम्ही कदाचित एखाद्या वाघाची शिकार झाला असता..
आज आपण पूर्वजांप्रमाणे रानटी जीवन जगत नाही, पण जगण्यासाठीचा संघर्ष मात्र आपल्या नसानसांत भिनलेला आहे. जणू एखादं संकट आपल्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलंय, तसे आजही आपण भयाच्या, संशयाच्या अमलाखाली वावरत असतो. समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानात्मक परिस्थितीस आपण किती चतुर वा कल्पकतेने प्रतिसाद देतो, यावर आपलं जिंकणं अवलंबून असल्याच्या संभ्रमात राहून आपण वागतो. पूर्वजांच्या वाट्याला आलेल्या आव्हानात्मक परिस्थितीच्या तुलनेत आताचं जग आधुनिक, सुरक्षित असतानाही ही प्रवृत्ती वरचढ कशी ठरते?
अलीकडचं एक संशोधन असं सांगतं, की एका दिवसात सरासरी ६ हजार विचार आपल्या मनात येतात- म्हणजे एका मिनिटाला अंदाजे ४ ते ५ विचार. आणखी एका अभ्यासानुसार या विचारांपैकी ८० टक्के विचार नकारात्मक असतात. संभाव्य समस्यांनी सतत लक्ष वेधलेलं असल्यामुळे आपण नेहमी जागरूक राहतो. सतत ‘लढा किंवा माघार घ्या’ या दोनच अवस्थांचा आपला मेंदू विचार करत राहतो. म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांप्रमाणेच! आज राहणीमान कितीही सुधारलेलं असलं तरी आपला मेंदू मात्र आनंदानं जगण्यापेक्षा संभाव्य धोक्यांवर लक्ष केंद्रित करून तग धरण्याला प्राधान्य देतो. उत्क्रांतीच्या कालौघात आपला मेंदू स्वसंरक्षणाच्या काही युक्त्या विकसित करायला शिकला. असं असलं तरी केवळ टिकून राहण्यास- किंबहुना सतत जिंकण्यास प्राधान्य देणारी मानसिकता आजच्या जगात उपयोगाची नाही. यामुळे जगण्याचा मूळ उद्देशच हरवून जातो. सतत कोणत्या ना कोणत्या ओझ्याखाली राहिल्यानं चिंताग्रस्ततेची भावना वाढीस लागू शकते. ज्या युक्त्या पूर्वजांच्या कामी आल्या, तो आपल्या प्रगतीचा मार्ग असेलच असं नाही.
सजगतेनं जगण्याची वाट धरताना त्यासाठीच्या काही युक्त्या शोधून काढणं आणि त्या तुमच्या जीवनात कशा उपयुक्त ठरतील यासाठी प्रयत्न करणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्या एका मैत्रिणीची- राधाची गोष्ट सांगतो.
राधा महाराष्ट्रातच एका छोट्या गावात दोन भावंडांसह वाढली. आईवडील प्रतिष्ठित आणि राधा त्याचं दुसरं अपत्य. गावच्या संकुचित वातावरणात तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. लहान वयातच आईबरोबर घरकाम करणं, ते मुलगी म्हणून शालेय शिक्षणापासून परावृत्त केलं जाणं, अशा विविध पातळ्यांवर तिला भेदभावाला सामोरं जावं लागलं. मात्र बाहेरच्यांचा नसला, तरी कुटुंबाचा तिला पाठिंबा होता. त्यामुळे राधा गावातल्या अलिखित नियमांना बाजूला सारून जीन्स घालत असे, मोटारसायकलही चालवत असे. गावाबाहेर जाऊन उच्च शिक्षण घेणारी ती तिथली पहिली मुलगी ठरली. पदवीधर झाल्यानंतर राधा शहरात आली. इतरांप्रमाणेच तीही महत्त्वाकांक्षी होती खरी, पण त्या वृत्तीवर तिच्या मनात रेंगाळणाऱ्या भूतकाळातल्या दुय्यम वागणुकीच्या आठवणींनी कुरघोडी केली. त्याचा तिच्या प्रगतीवर परिणाम झाला. हा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन मनात खोलवर रुजल्यानं सहकाऱ्यांबरोबरचा तिचा संवाद, नवनव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठीचा आत्मविश्वास, याला झळ बसली. यश मिळत असूनही राधा दीर्घकाळ स्वत:च्या क्षमतांबाबत साशंक होती. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीसाठी निवड करताना तिला वगळलं जाऊ लागलं. हळूहळू या गोष्टींचा तिच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होऊ लागला. मुलाबरोबर आणि पतीबरोबर असलेल्या नात्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ लागले. एका महत्त्वाच्या प्रकल्पात राधाला उत्तम ज्ञान असूनही ती पूर्ण योगदान देऊ शकली नाही. या प्रसंगामुळे ती आत्मचिंतन करू लागली. आता यासाठी मदत घ्यायला हवी, असं तिला जाणवलं.
स्वत:विषयी असं कायम साशंक असण्याच्या कारणांच्या मुळाशी ती गेली, तेव्हा असं लक्षात आलं की भूतकाळात तिला लोकांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे तिच्या मनात स्वत:बद्दल एक विशिष्ट कल्पना रुजली होती. एक स्त्री म्हणून घरात स्वयंपाक करणं आणि कुटुंबाची काळजी घेणं, एवढ्यापुरतीच आपली भूमिका मर्यादित आहे आणि इतर पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण कमकुवत आहोत, ते स्वाभाविकच अधिक सक्षम आहेत, असा गैरसमज तिच्या मनात दृढ झाला होता. यातून स्वत:वरच दोषारोप करण्याची वृत्तीही बळावली होती. याचा तिलाच त्रास होत होता. हळूहळू ती स्वत:ला एक संपूर्णपणे अपयशी व्यक्ती म्हणून पाहू लागली. कधी ऑफिसमध्ये वरिष्ठ नाराज किंवा चिडलेले दिसले, की ‘आपलंच काहीतरी चुकलं असणार,’ असं राधाला वाटायचं.
राधानं ज्या संकल्पना अनेक वर्षे जोपासल्या होत्या, त्या काय होत्या? स्वसंरक्षणासाठी मेंदू अनेक युक्त्या शोधत असतो, हे आपल्याला ज्ञात आहेच. यातला पहिला प्रकार म्हणजे- ‘एकच तत्त्व सर्वांना सरसकट लागू’. आपल्याला आलेल्या एखाद्दुसऱ्या अनुभवावरून आपण ‘हे असंच असतं’ अशी समजूत करून घेतो. अर्थात त्या एका अनुभवाचा साचा त्या प्रकारच्या सर्वच अनुभवांना लावतो. राधानं तिच्या बालपणीच्या अनुभवावरून असं ठरवून टाकलं होतं, की सर्वच पुरुष निसर्गत:च तिच्या वरचढ आहेत. म्हणजे नोकरीतल्या पदोन्नतीच्या बाबतीत ते तिला मागे टाकणारच. दुसरा प्रकार- ‘सर्वकाही.. किंवा काहीच नाही!’ ही मानसिकता. यामुळे राधा स्वत:ला पूर्णत: अपयशी समजू लागली. ‘मी ही अशीच आहे!’ असं मर्यादांचं कुंपण घालून घेऊन तिनं स्वत:ला संकुचित करून टाकलं. मेंदूच्या या खेळाचा तिसरा प्रकार- ‘स्वत:ला केंद्रस्थानी समजणं’. यामुळे आपल्यावर सतत कुणीतरी लक्ष ठेवून आहे, वरिष्ठांच्या चिडचिडीला आपणच जबाबदार आहोत, असं राधाला वाटायचं. बाह्य जगाशी घडणाऱ्या आपल्या क्रिया-प्रतिक्रियांमध्ये मेंदूनं चटकन शोधलेले हे तीन प्रतिसादाचे पर्याय आहेत. या बाबतीत वेळीच सावध होऊन जागरूक राहिल्यानं, त्यांना बळी न पडता, आलेली परिस्थिती योग्य तऱ्हेनं कशी हाताळायची हे आपण ठरवू शकतो.
मागील लेखात, तुमच्या जीवनगाथेचे कथाकार तुम्हीच आहात हे व्यक्तीनं ओळखायला हवं, असं मी लिहिलं होतं. आता आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आपल्या जगण्या-वागण्याचं स्वामित्व आपल्याकडे घ्यायचं आहे. ज्यांना हे उमगत नाही, त्यांना सतत इतरांच्या मान्यतेची गरज पडते. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बाह्य जगाच्या स्वीकृतीची गरज पडते. यात त्यांना पावलोपावली तडजोडी कराव्या लागतात. मध्यममार्ग अवलंबत जे मिळेल त्यात समाधान मानावं लागतं. जे घडतंय त्यावर आपलं नियंत्रण नाही, आपल्यात काही बदल होणं शक्य नाही, अशी त्यांची मानसिकता होत जाते.
हेही वाचा – इतिश्री : ‘आईगिरी’चं ‘बेबीसिटिंग’
आपल्याला येणाऱ्या अनुभवांवरून मेंदूनं अशा प्रकारे प्रतिसाद देणं कसं आणि का सुरू झालं असावं, यावर गांभीर्यानं विचार करायला हवा. तुम्ही कोणकोणत्या वेळी ‘एकच तत्त्व सरसकट लागू’ या विचारांचा अवलंब करता? ‘सर्वकाही.. नाही तर काहीच नाही,’ या सूत्राला केव्हा केव्हा चिकटून राहता?..
स्वत:च्या जीवनावर आपला असलेला अधिकार मान्य करणं, एवढंच पुरेसं नाही, तर त्या पद्धतीनं वागणं महत्त्वाचं आहे. जगात चाललेली स्पर्धा, त्यातली महत्त्वाकांक्षी वृत्ती, हे सर्व आपल्यासमोर पदोपदी उभं राहणार आहे. त्यास आव्हान द्यायचं असेल, तर हा अधिकार ओळखायला शिकलंच पाहिजे.
sanket@sanketpai.com