बैठी जीवनशैली. व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचं सेवन, जेवण कमी घेतलं तरी अधूनमधून होणारं सॉफ्ट ड्रिंक, चहा-कॉफी आणि बंद पाकिटांमधल्या पदार्थांचं सेवन… मला खूप घरकाम असतं, त्यामुळे घरातच खूप धावपळ होते, या कारणास्तव व्यायामाकडे पूर्णत: दुर्लक्ष करणं हा वजनवाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरतो.

एकदा लक्ष्मी यशोदा नावाच्या तिच्या मैत्रिणीला माझ्याकडे घेऊन आली. यशोदाच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या… कंबर दुखतेय, पोट दुखतंय, अशक्तपणा येतोय, हातापायात गोळे येतायत… यशोदा या तक्रारींचा पाढा वाचत असतानाच तिला मधेच थांबवून लक्ष्मी म्हणाली, ‘‘डॉक्टर, गेल्या चार वर्षांपूर्वीच हिचं अंग बाहेर आलं आहे. हिला लघवीचा त्रास होतोय आणि हे सगळं कोणालाही न सांगता ती इतके दिवस अंगावर काढतेय. त्यामुळे कुठे बाहेर यायलादेखील सतत नकार देत असते.’’

ऋतुसमाप्तीनंतर होणाऱ्या अनेक आजारांपैकी हा एक. शरीरातील स्नायूंचा सैलपणा, वारंवार झालेली बाळंतपणं किंवा गर्भपात आदी कारणांमुळे गर्भाशयाची पिशवी आणि योनीमार्ग सैल पडणं, तिथून गर्भाशयाची पिशवी खाली सरकणं असं या आजाराचं स्वरूप. वैज्ञानिक भाषेत आम्ही याला ‘यूटेराइन प्रोल्याप्स (uterine prolapse ) ’ असं म्हणतो. वारंवार लघवीला जावंसं वाटणं, खोकला आला, ठसका लागला तरी लघवी होणं… अशा तक्रारी उद्भवतात. परिणामी सर्वांसमोर आपली फजिती होईल या भीतीपोटी स्त्रियांच्या सार्वजनिक कामांतील सहभागावर मर्यादा येतात. अनेक स्त्रियांना बाहेर न पडलेलंच बरं असं वाटून एकटेपणा उद्भवू शकतो. परंतु वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली तर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यावर सहज इलाज शक्य आहेत. त्यासाठी या आजाराबाबत गुप्तता न पाळणं, संकोच न बाळगणं गरजेचं आहे.

अलका मागच्या २० वर्षांपासून माझ्याकडे तपासणीसाठी येतेय. तिची दोन्ही बाळंतपणं मी केली. तिच्या मुलांना मोठं होताना मी पाहिलं आहे. हल्ली ती वरचेवर तपासणीला येत होती. तशा तिला शारीरिक व्याधी नव्हत्या, आजाराच्या तक्रारीसुद्धा फार नसत, त्यामुळे तिला नक्की काय झालं आहे याचा अंदाज येत नव्हता. एके दिवशी पोटात दुखतंय म्हणून आली. रडू लागली. म्हणाली, ‘‘डॉक्टर कसं सांगू? मागचे अनेक दिवस शारीरिक संबंध ठेवताना प्रचंड वेदना होत आहेत. आम्हा दोघांनाही कळत नाहीये नक्की काय झालं आहे ते. आणि कसं सांगावं हेही कळत नव्हतं. गेले काही दिवस मी तुमच्याकडे येतेय, पण सांगण्याची हिंमत होत नव्हती. नक्की कशामुळे हा त्रास होतोय? त्यासाठी काय करू? नवरा समजून घेतोय, पण त्यामागचं कारण तर कळायला हवं ना!’’

ऋतुसमाप्तीनंतर संप्रेरकांच्या कमतरतेमुळे योनीमार्गातील स्राव कमी होऊन त्या जागी कोरडेपणा येतो, परिणामी शारीरिक संबंध ठेवणे वेदनादायी ठरू शकते. अनेकदा याचा त्रास भावानिक आणि मानसिक स्तरावरही उद्भवतो हे अनेकांच्या लक्षातदेखील येत नाही. या विषयाबद्दल आपल्याकडे कायमच गुप्तता पाळली जात असल्यामुळे मोकळेपणानं चर्चा करण्याचा प्रश्न दूरच. खरं म्हणजे काही औषधं, मलम वापरण्यानं या तक्रारी काही प्रमाणात दूर होऊ शकतात.

या वयापर्यंत आल्यावर जवळीक साधण्यासाठी जोडप्यांमध्ये आलेली प्रगल्भता, एकमेकांविषयीचा आदर आणि नात्यात आलेली मोकळीक या अनुषंगानं विचार होणं गरजेचं आहे. केवळ स्पर्शातून मिळणारं समाधानही महत्त्वाचं असतं. परंतु याबद्दलसुद्धा स्त्रिया किंवा जोडीदार मोकळेपणानं बोलायचं टाळतात. या सर्वांचा भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी याविषयी माहिती करून घेणं आणि शंकानिरसन करून घेणं, योग्य उपचार घेणं हीदेखील या वयोगटातील स्त्री-पुरुषांची गरज असते. त्यांनी जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्याबद्दल समुपदेशन किंवा सल्ला घेणं, मोकळेपणानं बोलणं अतिशय महत्त्वाचं असतं.

या सर्व आजारांबद्दल अनेकदा स्त्रिया गुप्तता पाळत असल्या तरी एक गोष्ट मात्र त्या अगदी कळकळीनं विचारतात, त्याबद्दल आवर्जून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ती गोष्ट म्हणजे, वाढत असलेलं वजन. त्यांचं एकच म्हणणं असतं, ‘‘मी आहार खूपच कमी ठेवला आहे आणि गोडही जास्त खात नाही. पण पाणी प्यायलं तरी माझं वजन वाढतंय. एवढं करूनही ते नियंत्रणात येत नाहीए.’’ स्त्री-पुरुष कोणीही असो, एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे दोन गोष्टींमुळेच वजनवाढीचा प्रश्न उद्भवू शकतो. एक- आपण घेतलेल्या कॅलरीजची (उष्मांक) मात्रा ही खर्च केलेल्या कॅलरीच्या मात्रेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असणं. आणि त्याला कारणीभूत असणारे घटक म्हणजे आज-काल असलेली बैठी जीवनशैली. व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचं सेवन, जेवण कमी घेतलं तरी अधूनमधून होणारं सॉफ्ट ड्रिंक, चहा-कॉफी आणि बंद पाकिटांमधल्या पदार्थांचं सेवन. मला खूप घरकाम असतं, त्यामुळे घरातच खूप धावपळ होते. या कारणास्तव व्यायामकडे पूर्णत: दुर्लक्ष करणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक वजनवाढीसाठी कारणीभूत ठरतो. वाढलेल्या वजनामुळे बॉडी इमेजचा प्रश्न निर्माण होऊन नैराश्यासारखी भावना तुम्हाला पुन्हा अति खाण्याच्या (ओव्हर इटिंग) दिशेने ढकलते. आणि दुसरं कारण म्हणजे हायपोथायरॉइड, कुशिंग सिंड्रोम, पीसीओडी किंवा इतर हॉर्मोनल डिसीजेस. तसेच गर्भनिरोधक किंवा तत्सम गोळ्यांचे सेवनदेखील वजनवाढीस कारणीभूत ठरू शकतं. तुम्हाला आजार जडले असतील तर योग्य तपासण्यांद्वारे निदान करून त्यावर उपचार करता येतात. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून भावनिक गोंधळ, मानसिक नैराश्य आणि त्यातून अति खाणं, सतत काहीतरी खावंसं वाटणं, भूक लागणं या गोष्टी वजनवाढीत भरच टाकतात. त्यामुळे सतत बसून राहण्यापेक्षा थोडं उभं राहणं, चालण्यापेक्षा धावणं, एकूण काय तर शरीराची हालचाल चालू ठेवणं या गोष्टींना पर्याय नाही. स्नायूंची आणि शरीराची हालचाल, सांधे मोकळे करणं यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं केलेला व्यायाम- मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तो अतिशय महत्त्वाचा ठरतो.

कोणत्याही वयात प्रत्येकानं दिसण्यापेक्षा शरीरानं तंदुरुस्त असणं महत्त्वाचं असतं. या वयात अनुभवानं, वयानं आपण परिपक्व झालेलो असतो. एक प्रकारचं व्यावहारिक शहाणपण आलेलं असतं. स्वत:बाबतची अनिश्चितता, असुरक्षितता, स्वत:बद्दलचा गोंधळ हे सगळं जाणून घेतलेल्या अनुभवांचं आत्मविश्वासात परिवर्तन होत असतं. म्हणतात ना, ताज्या फळांपेक्षा सुकामेव्याची किंमत जास्त असते, तसंच काहीसं!

savitamohiterbk@gmail.com

Story img Loader