भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला आणि जाज्वल्य देशप्रेमाने सारा देश भारून गेला. ‘जिंकू किंवा मरू’ या प्रेरणेने सारे लढायला तयार झाले. यात भारतीय स्त्रियाही मागे नव्हत्या. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य अनामिक स्त्रिया भारतभूमीसाठी आपले प्राण धारातीर्थी अर्पण करायला सज्ज झाल्या.. काहींनी तर ते दिलेही. लाठय़ा खाल्या, तुरुंगवास भोगला. अशाच या असंख्य अप्रकाशित तेजस्वी शलाका. प्रत्येकीची कहाणी प्रेरणादायी.. १९ व्या व २० व्या शतकातील स्वातंत्र्य लढय़ात इंग्रजांविरुद्ध शस्त्र परजणाऱ्या अखिल हिंदुस्थानी ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या योगदानाचा हा धावता आढावा.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने.
१५ऑगस्ट, १९४७ रोजी हिंदुस्थान स्वतंत्र झाला. दरवर्षी या तारखेला भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय राहतात तिथे हा दिवस दिमाखात साजरा होतो. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ अशा कवीच्या प्रश्नाला आम्हा भारतीयांचे उत्तर आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हिंदी जनतेने जो अपूर्व लढा दिला त्याचं फळ म्हणजे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य! हिंदुस्थानचे दोन तुकडे या दिवशी झाले. स्वातंत्र्य घेताना आमच्या एका डोळ्यातून आनंदाश्रू तर अखंड हिंदुस्थान दुखंड झाल्याबद्दल दुसऱ्या डोळ्यातून दुखाश्रूंचा पूर येत होता. आपल्या देशातल्या लोकांनी अनेक लढे देऊन आपले रक्त सांडले, बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले व त्यातून देशबांधवांचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला. त्यात पौरुषत्व गाजविणाऱ्या पुरुषांच्या वाटेला गौरवच गौरव आला. ते योग्यही होते. पण स्वातंत्र्याच्या लढय़ात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या काही महत्त्वाचे अपवाद वगळता अनेक स्त्रियांची उपेक्षाच झाली. भारतीय स्त्रीने केलेला त्याग, तिने प्रसंगोप्रसंगी दाखविलेले धैर्य व चाणाक्षपणा वास्तविक अवर्णनीय आहे. या स्त्रिया कुठल्याही राज अगर सरदार घराण्यातील नव्हत्या. त्या होत्या सामान्य मध्यमवर्गीय तसेच तळागाळातील शेतमजूर, कामगार महिला. स्वातंत्र्यदिनी त्यांची आठवण येणे स्वाभाविकच आहे. या दिनानिमित्ताने १९ व्या व २० व्या शतकातील स्वातंत्र्य लढय़ात इंग्रजांविरुद्ध शस्त्र परजणाऱ्या अखिल हिंदुस्थानी स्त्रियांच्या योगदानाचा हा धावता आढावा.
१९ व्या शतकात राणी लक्ष्मीबाई व तिच्या सहकारिणी यांच्या १८५७ मधील सहभागाची गाथा सर्वाना ठाऊक आहे. त्याही पूर्वी कर्नाटकातील कित्तूर या छोटय़ा संस्थानाची राणी चेन्नम्मा हिने ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशिक्षित सेनेशी निकराने प्रतिकार केला. पराभूत चेन्नम्मा धारवाडच्या तुरुंगात १८२४ ते १८३० पर्यंत होती. तुरुंगात मरण पावलेली ही आपली पहिली स्वातंत्र्यसैनिका. दुसऱ्या, नानासाहेब पेशव्यांची कन्या मैनावती हिने जिंवत जळून जात असतानाही नानासाहेबांचा ठावठिकाणा सांगितला नाही. तर १८५७ च्या उठावात ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणीला कडवा विरोध करत आलिया बेगम व अझीझन यांनी धारातीर्थी देह ठेवला.
याच सुमारास बिहारमधल्या सिंगभूम जिल्ह्य़ातील आदिवासी महिलांना बंडात भाग घेतला म्हणून सक्तमजुरीची शिक्षा झाली. १८५७ मध्येच खानदेशात हजारो भिल्लांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. १८५८ मध्ये पोलीस आयुक्त गृहसचिवाला लिहितो, ‘भिल्ल स्त्रिया पुरुषांइतक्याच उपद्रव देतात तसेच त्या लढतातही. त्यांचे पुढारी भागोजी व अन्या नाईक यांना पकडेपर्यंत या बायकांना ओलीस ठेवले पाहिजे’ आणि तसे घडलेही. जदोनीग या नागा बंडखोर नेत्याला ऑगस्ट १९३१ रोजी फाशी झाली. त्याचे बंड गायडिनल हिने मणिपूरमधून पुढे चालू ठेवले. ती १९३२ पासून १६ ऑगस्ट १९४७ पर्यंत तुरुंगात होती. नेहरुंसहित सर्व नेत्यांनी या ‘सामान्य’ बाईचा उल्लेख ‘राणी गायडिलू’ असा केला आहे.
बंगालमध्ये ब्राह्मण, कायस्थ व वैश्य या तीन जातींच्या लोकांना ‘भद्र’ म्हणतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भद्रकन्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार बऱ्यापैकी होता. या स्त्रियांनी बंगालच्या क्रांतिकारकांना हर तऱ्हेची मदत विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकात केली. सांकेतिक भाषेत क्रांतिकारकांना निरोप देणे, फरारींना आपल्या घरात आश्रय देणे, आजारी स्वयंसेवकांची सेवा करणे, रिव्हॉल्व्हर व बंदुका, दारू सामान यांची चोरटी आयात करून आपल्या घरात लपवून ठेवणे. जप्त झालेल्या पुस्तकांची गुपचूप विक्री करणे ही कामे त्या करीत असत. य. दि. फडके यांच्या म्हणण्याप्रमाणे क्रांतिकार्यात तरुण मुलींची भरती करून प्रशिक्षण देण्याचे काम प्रौढ महिला करीत. प्रीतिलता, कल्पना दत्त, सुनीती व शांती घोष, बीना दास व उज्ज्वला मुझुमदार या अग्रणी क्रांतिकारक महिला होत्या.
महात्मा गांधींच्या भारतातील आगमनापूर्वी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वश्रेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणजे भिकाईजी रुस्तुम कामा ऊर्फ मादाम कामा. त्यांच्या प्रमाणेच परदेशात राहून, भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी आणखी एक हिंदकन्या म्हणजे कुमारी वेलुयाम्मा. आफ्रिकेत गांधीजींच्या आदेशाप्रमाणे तिने स्त्रियांचे सत्याग्रही पथक तयार केले. कैदेत तिला उपाशी ठेवले गेले, मारझोड झाली. गांधीजींचा निरोप येऊनही तिने माघार घेतली नाही. अवघ्या १६ व्या वर्षी वेलुयाम्माचा तुरुंगात मृत्यू झाला. विसाव्या शतकातील आणि आफ्रिकेतील ती पहिली महिला हुतात्मा. संबंध हिंदुस्थान तिचे धैर्य पाहून अवाक् झाला आणि ही कळी उमलण्यापूर्वी हिंदमातेच्या चरणी अर्पण झाली म्हणून हळहळलाही.
महात्मा गांधींच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर त्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या सभांतील भाषणांमुळे व त्यांच्या कार्यक्रमाकडे हळूहळू देशातल्या स्त्रिया ओढल्या जाऊ लागल्या. लाडोराणी झुत्सी ही अशीच एक उत्तर भारतीय महिला. तिने दारू दुकाने पेटविली. परदेशी कपडय़ांच्या होळ्या केल्या. निदर्शने करत असता पंजाब पोलिसांनी तिला मरेपर्यंत मारले होते. १९२० ते १९४२ पर्यंत सर्व आंदोलनात भाग घेतल्यामुळे तिला सतत कारावास घडला. दारोदार फिरत स्वातंत्र्यलढय़ाकरता महिला शक्ती जागृत करण्याचे काम लाडोराणीने केले. लाडोराणीचा काळ हा गांधी युगाचा आरंभ होय.
आधुनिक काळात महात्मा गांधींनी स्त्रियांना प्रथम त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. गांधीजींची पहिली शिष्या मुंबईच्या अवंतिकाबाई गोखले. १९३० मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीत स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. रवींद्रनाथ टागोर यांची नात (पुतण्याची मुलगी) सरलादेवी चौधरी यांनी बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारकांच्या शक्तीला एकत्र आणण्याचे काम केले. १ जानेवारी १९०९ मध्ये नव वर्ष साजरे करण्याकरिता जमलेल्यांसमोर ‘वन्दे मातरम्’ ची घोषणा देऊन त्यांना चकित केले होते.
गुजरातमधील हंसा मेहता ही धनिक कन्या. १९१९ मध्ये उच्च शिक्षणासाठी विलायतेला गेली, पण परत आली ती राष्ट्रीय चळवळीत काम करण्याचे ठरवूनच. सायमन कमिशनला सक्रिय विरोध करत तिने कारावासही भोगला. सरलाबेन साराभाई यांनी स्वातंत्र्य आंदोलन गुजरातच्या तळागाळापर्यंत पोहोचविले. गुजरातमध्ये जानकी देवी बजाज, मृदुला साराभाई, भक्तीबा देसाई यांसारख्या नामांकित घराण्यातील लेकीसुना स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत सत्याग्रहात सामील होत तुरुंगात येत जात राहिल्या. मुंबईमधल्या गुजराती समाजातील मणीबेन नानावटी, मणीबेन पटेल, ताराबेन मश्रुवालांचे योगदान फार मोठे आहे.
स्वातंत्र्याच्या लढय़ात नेत्या म्हणून पुढे आल्या त्या सुसंस्कृत व उच्चमध्यमवर्गीय सुशिक्षित महिला. सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, दादाभाई नौरोजींच्या नाती, पेरीन, खुर्शीद, गोशीबेन, मिठीबेन पेटिट, अंबिकाबाई गोखले, रुक्मिणी अरुंडेल, मुथुलक्ष्मी रेड्डी, प्रेमा कंटक, अनसूया काळे, मनमोहिनी झुत्सी अशा अनेक जणी. महात्मा गांधींच्या शब्दाची व तळमळीची जादू ही सर्व धर्मीय स्त्रियांवर सारखीच होती. हिंदू, मुस्लीम, शीख, पारसी सर्व धर्मातल्या स्त्रिया तर होत्याच, पण अनेक विदेशी स्त्रियांनीही गांधीमार्ग पत्करला व आपला नसलेल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. १९२०-२२ साली खिलाफत चळवळीत पुढे आलेल्या बेगम अमनबानू यांनी आपले दोन मुलगे शौकत अली व महंमद अली यांना चळवळीत जाण्याची प्रेरणा दिली. महम्मद अलींची पत्नीही चळवळीत उतरली. या सासूसुनांनी पडदा पाळणे बंद केले व मुस्लीम स्त्रियांना त्याबद्दल प्रेरणा दिली. रहेना तय्यबजींनी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी अविश्रांत श्रम केले. बिबी अग्तु सलाम या पतियाळाच्या. गांधींच्या चळवळीतील एक बिनीची लढवय्यी. १९३०-३१ मध्ये गांधीजींबरोबर राहून काम करण्यासाठी त्या गुजरातमध्ये आल्या. हिंदू-मुस्लिम दंग्याच्या क्षेत्रात घुसून दोन्ही पक्षांचे मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांना जिवाची पर्वाही केली नाही. मुंबईच्या कुल्सुमबेन सयानी (रेडिओ सिलोनवरचे प्रख्यात निवेदक अमीन सयानींची आई) यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीतील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. अज्ञान व अंधश्रद्धांचा निपात झाला पाहिजे तरच स्वातंत्र्य मिळेल तेव्हा देश चांगला चालेल, असा त्यांचा विश्वास होता. सफिया सोमजी ही मुंबईच्या न्यायमूर्ती सोमजी या सरकारी नोकराची मुलगी. निदर्शनात भाग घेतल्याबद्दल १९३४ मध्ये तिला अटक झाली. सफियाचा विवाह खान अब्दुल गफारखान यांचे पुतणे सादुल्लाखान यांच्या बरोबर झाला. काँग्रेस सेवा दलाच्या त्या प्रमुख होता. १९४२ साली त्या स्थानबद्ध होत्या. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब सरहद्द प्रांती गेले. सफिया बराच काळ गेल्या नाहीत. मुलेही तिकडेच गेल्यामुळे शेवटी त्या तिकडे गेल्या. मात्र आपले आजारपण गंभीर आहे असे कळल्यावर आपण आपल्या जन्मभूमीतच मरणार, असा हट्ट धरून मुंबईत येऊन त्या पैगंबरवासी झाल्या.
महात्मा गांधींच्या विधायक कार्यक्रमाकडे आकर्षित झालेल्या मध्यमवर्गीय व तळागाळातील स्त्रियांची संख्या फार मोठी होती. सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीपासून ही संख्या वाढत गेली. स्त्रियांनी दांडी सत्याग्रहात भाग घेण्यापेक्षा पिछाडीला राहून जखमी सत्याग्रहींची देखभाल करावी असे गांधीजींनी ठरविले. गांधीजींचा हा निर्णय सरोजिनी नायडूंना समजल्यावर त्या गांधीजींना म्हणाल्या, सत्याग्रहींची देखभाल आम्ही जरूर करू. पण आम्ही सत्याग्रहात भाग घेऊन देशासाठी बलिदान करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्या ध्येयापासून वंचित करणे हा अन्याय आहे. सरोजिनीदेवींनी गांधीजींना असेही सांगितले, की सत्याग्रहात भाग घेण्याच्या मुद्दय़ावर आम्ही स्त्रिया तुमच्यासमोर प्रथम सत्याग्रह करू ते शस्त्र तुम्हीच आम्हाला वापरायला शिकवले आहे. सत्याग्रहात भाग घेऊन लाठी-गोळी खाणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे. शेवटी गांधीजींना स्त्रियांचे म्हणणे मान्य करावेच लागले. परिणामी देशभरच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत हजारो स्त्रिया सामील झाल्या. अगदी तळागाळातील स्त्रियाही तुरुंगात गेल्या. त्यांनी तुरुंग भरून टाकले. कराचीच्या काँग्रेस अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी स्त्रियांचे खूपच कौतुक केले.
देशासाठी प्राण देण्याकरिताच नव्हे तर देशभक्तांचे प्राण वाचविण्यासही या स्त्रिया मागेपुढे पाहत नसत. त्याबद्दलचे एक उल्लेखनीय उदाहरण – सत्यभामा कुवळेकर या वीसबावीस वर्षांच्या तरुणीचे. सत्यभामा ही बालविधवा. गांधीजींचे १९२० मधील किलरेस्कर थिएटरातील भाषण ऐकून प्रभावित झालेल्या सत्यभामेने आपल्या अंगावरचे दागिने काढून गांधीजींना देशकार्यासाठी दिले. आजन्म सोने न वापरण्याची त्यांच्या समोर शपथ घेऊन ती मृत्यूपर्यंत पाळली. व्यंकटराव हरोलीकर नावाच्या कार्यकर्त्यांला तुरुंगात महारोग झाला म्हणून सोडून दिले होते. ते एकटेच राहत. स्वत:चे कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, जखमा धुणे ही कामे स्वत: करीत. त्यांची सेवा करायला कुणी नात्यागोत्याचे नव्हते. एका सच्चा देशभक्ताची आबाळ सत्यभामेला पाहावली नाही. देशकार्यासाठी अशा सच्चा देशभक्ताची जरुरी आहे. तो वाचलाच पाहिजे म्हणून ती रोज त्यांच्या घरी जाऊन सर्व कामे करू लागली. एक बालविधवा एकटय़ा पुरुषासाठी त्याच्या घरी ४/५ तास घालवते याबद्दल लोकापवादाला तोंड फुटणे साहजिकच होते. तो टाळावा म्हणून तिने व्यंकटरावाशी लग्न केले. स्वत: व्यंकटराव व सत्यभामेचे सासरे यांनी तिला नाइलाजाने परवानगी दिली. सत्यभामा हीच पद्मावतीबाई हरोलीकर. व्यंकटेशरावाबरोबर पुढे जवळजवळ वीस वर्षे तिने विधायक कार्यकर्ता म्हणून काम केले. स्त्रियांच्या अशा किती तरी कथा गावोगावी आहेत. त्या कथा त्या काळात घराचा उंबराही न ओलांडणारी स्त्रीही स्वातंत्र्याच्या कल्पनेने किती झपाटली होती त्याचे उदाहरण आहेत.
गांधीजींबद्दल अत्यंत आदर असला, तरी त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान न पटणाऱ्या स्त्रियाही होत्या. शस्त्रांचा वापर केल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असा विचार करणाऱ्या तरुण मुलींची संख्याही मोठी होती. त्यांना क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचे होते. त्याकरिता करावी लागणारी हिंसा त्यांना मान्य होती. पंजाबच्या सत्यवतीदेवी व सुशीलादीदी या प्रसिद्ध क्रांतिकारक. सत्यवतीचे स्वप्न शेतकरी कामकरी यांचे क्रांतिद्वारा राज्य हे होते. सुशीलादीदीने काकोरी खटला चालविण्यासाठी आपले सर्व दागिने दिले होते. सरदार भगतसिंग व इतर क्रांतिकारकांना तिने भूमिगत राहून मदत केली. तिला पकडून देणाऱ्यास दोन हजार रुपयांचे बक्षीस होते. सर्व संपत्ती देशकार्याला वाहिलेल्या या क्रांतिज्वालेचा गरिबी व आजार यांनी १९६३ मध्ये मृत्यू झाला, पण त्याची दाद कुणीही घेतली नाही.
बंगाली कन्या वीणा दासने सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी मुलींचा गट तयार केला. १९३२ साली स्वत:ची पदवी घेण्यासाठी ती व्यासपीठावर चढली. गव्हर्नर जॅक्सन हे तिला पदवी देणार इतक्यातच तिने पदराखाली लपविलेले पिस्तूल काढून त्यांना गोळ्या झाडल्या. नागालँडची राणी गिदालू ही स्वातंत्र्यलढय़ात स्त्रियांना झालेल्या शिक्षेत सर्वात अधिक शिक्षा भोगलेली क्रांतिकारक. १७ व्या वर्षी तिला शिक्षा झाली. ते साल होतं १९३२. १५ ऑगस्ट १९४७ नंतर ती सुटली. आसाममधील कनकलता बारुआ १६ वर्षांची असताना तिने पोलीस स्टेशनसमोर झेंडावंदन करून प्रक्षोभक भाषण केले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कनकलतेचा अंत झाला. विसाव्या शतकात भारतभूमीवर हुतात्मा होण्याचा भारतीय युवतीत पहिला मान कनकलतेला मिळाला व ती अमर झाली.
१९४२ मध्ये ब्रिटिशांनो ‘चालते व्हा’ व ‘जिंकू किंवा मरू’ या घोषणांनी भारताचा कानाकोपरा दुमदुमला. गांधीजी म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण हा अखेरचा लढा देत आहोत.’ ते खरे ठरले. सर्वच नेते गोवालिया टँकवर एका छताखाली पकडले गेले. तरुणांना असे होणार याची कुणकुण होती म्हणून कुणी शिताफीने निसटले तर कुणी भूमिगत झाले. पुढे ४ वर्षे हा लढा चालविला गेला. तरुणींनी प्राणावर उदार होऊन गुप्त संदेश व चिठ्ठय़ा पोहोचविणे, गस्त घालणे, स्फोटक द्रव्ये योग्य ठिकाणी नेऊन पोहोचविणे, रेल्वे रूळ उखडणे, स्टेशन जाळणे इत्यादी गोष्टी केल्या. गृहिणी व उघडपणे काम न करू शकलेल्या मुलींनी पत्रकांच्या नकला करून त्या सार्वजनिक ठिकाणी ठेवणे, भूमिगतांच्या घरी मदत पोहोचविणे ही कामे केली. १९४२ सालच्या या लढय़ात पकडलेल्या मुलींना ठेवायला तुरुंग अपुरे पडले. येरवडा जेलमध्ये तर स्त्रियांची सोय करायला तंबू ठोकले होते.
‘चले जाव’च्या आंदोलनात सुचेता कृपलानी, अरुणा असफअली, मृदुला साराभाई, उषाबेन मेहता, सावित्री मदान, पद्मजा नायडू, किसन घुमटकर, मृणालिनी देसाई, अनसूया लिमये यांनी स्वत:ला झोकून दिले. सुचेता कृपलानी प्रशासन पाहत, अरुणा असफअली पत्रके तयार करीत व भूमिगत नेत्यांशी संपर्क साधून कामाचे धोरण ठरवीत. त्यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपयांचे बक्षीस होते. पण त्या शेवटपर्यंत सापडल्या नाहीत.
शहरवासीय मुलींप्रमाणेच ग्रामीणकन्याही यात पुढे होत्या. सातारा जिल्ह्य़ातील ग्रामीण जनतेने क्रांतिवीर नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपले स्वातंत्र्य घोषित केले व समांतर सरकार स्थापन केले. ते पत्रिसरकार. तुफान दल नावाची सैनिक व्यवस्थाही स्थापन केली. तुफान दलाची स्त्रीशाखाही होती. येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगीत असताना खानदेशमधील लीला पाटील पळून सातारला पत्रिसरकाला मिळाली. ती स्त्रीशाखा प्रमुख होती. त्यांनी डोंगरकपारीतल्या अशिक्षित बायांना संघटित केले. त्या बंदुका व स्वयंचलित शस्त्रे चालवायला शिकल्या. गुप्त बातम्या आणून देणे, धान्याच्या साठय़ात बंदुका व अस्त्रे लपविणे. भूमिगतांना लपविणे, संकेतस्थळावर त्यांना कांदाभाकर पोहोचविणे ही कामे त्यांनी अत्यंत निष्ठेने वठवली. त्यातील काही महिला कार्यकर्त्यांचा पोलिसांनी पकडून छळ केला. लक्ष्मीबाई नायकवडी या अशा छळामुळे अखेपर्यंत मनोरुग्ण राहिल्या. काशीबाई हणवर हिने आपल्या नवऱ्याचा ठावठिकाणा सांगावा म्हणून तिच्या गुप्तांगात मिरची पूड भरल्याचे प्रकरण त्या वेळी गाजले होते. इंग्रजांना न जमलेला दरोडेखोरांना शिक्षा देण्याचा धडा राजमणी पाटील ऊर्फ जैनाची ताई वा अैतवडय़ाच्या ताईनी दिला. स्वातंत्र्यानंतर व प्रौढपणी त्यांचा विवाह होऊन त्या राजमती बिरनाळे झाल्या. तुफान दलातील स्त्री शाखेविषयी क्रांतिवीर नाना पाटील यांनी मुंबईच्या नरे पार्कवरील आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले, ‘‘आमच्या भगिनी जर आम्हाला मदत करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या नसत्या, वेळेवर आम्हाला भाकर तुकडा खायला दिला नसता, जिवावर उदार होऊन वेळेवर आम्हाला आसरा दिला नसता, तर आम्हाला यश मिळविणे कठीण होते.’’ या त्यांच्या एका वाक्यातच या ९५ टक्के अशिक्षित व अडाणी स्त्रियांच्या देशभक्तीचे प्रतिबिंब दिसते. देशभक्ती, देशकार्य, समाजकार्य हा काही शहरी व सुशिक्षितांचा मक्ता नाही हे पटते.
१९४२ पर्यंतच्या चळवळीत स्त्रियांनी कसा भाग घेतला हे अत्यंत स्थूलमानाने या लेखात दिले. गावोगावी आजही अशा (विकलांग व जराजर्जर) स्वातंत्र्यसैनिका भेटतात. गांधी-नेहरूंच्या नावानेही त्यांचे विझत चाललेले डोळे लकाकतात. स्वातंत्र्यापर्यंत या देशातील नागरिक स्त्रियांनी योगदान दिले तसेच आग्नेय आशियातील भारतीय रहिवासी मुलींनीही दिले आहे. त्यात रबराच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला होत्या. तशाच शाळा कॉलेजात शिकणाऱ्या सिंगापूर, ब्रह्मदेश, बँकॉक यांमधील सुस्थापित घरातल्या मुलीही होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या आझाद हिंद फौजेची ‘राणी झाशी रेजिमेंट’ ही महिला पलटण बनविली होती. हिंदुस्थानला कधीही भेट न दिलेल्या महिला या पलटणीत होत्या. लष्करी शिक्षण व शिस्त पाळत देशाच्या सीमेवर आधुनिक शस्त्रास्त्रांनी लढणाऱ्या कधी जळवांच्या जंगलात तर कधी मुसळधार पावसात नेताजींच्या प्रेमळ छत्राखाली व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या सेनापतिपदाखाली त्या लढण्यासाठी त्या भारत सीमेपर्यंत पोहोचल्या होत्या. भारतातल्या स्वातंत्र्यसैनिकांना जेलमध्ये शिक्षा भोगल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व मानधन मिळाले. पण या स्त्रिया जेलमध्ये नव्हत्या त्यांना कॅ. लक्ष्मीकडून ओळखपत्र आणायचे होते. केरळ व तामिळनाडूमध्ये परतलेल्या व खेडय़ात घरे असलेल्या या स्त्रियांपर्यंत सरकारी घोषणा पोहोचलीच नाही. अनेकींना अगदी विपन्नावस्थेत मरण आले. जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असताना एका वाचक कार्यकर्त्यांने ही माहिती त्यांना दिली. जॉर्ज फर्नाडिस यांच्या प्रयत्नाने काही स्त्रियांना मानधन मिळाले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ही महिला पलटण जगातली पहिलीच १५०० जणींची प्रशिक्षित व त्या काळच्या सर्व शस्त्रास्त्रांचा वापर करणारी महिला पलटण होती. या पलटणीला आघाडीवर ठेवून सुभाषबाबू हिंदुस्थानच्या हद्दीत प्रवेश करणार होते. दुर्दैवाने ते घडले नाही. पण म्हणून हजारो कोस दूर असलेल्या, न पाहिलेल्या आपल्या देशासाठी प्राण द्यायला निघालेल्या आझाद हिंद फौजेच्या राणी झाशी रेजिमेंटला स्वतंत्रतादेवीच्या पुजारी म्हणून सलाम करायलाच हवा!
या देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रियांनी, मुलींनी व अगदी बालिकांनीही आपल्याला जमेल तसा खारीचा वाटा उचलला. गांधीजींच्या चळवळीत १९२० ते १९३० मध्ये सत्याग्रही पुरुषांच्या स्त्रियांनी तर जिवंतपणे मरण भोगलेय. येसूवहिनी सावरकर, चापेकर जावा या जेलमध्ये गेल्या नाहीत, पण त्या सर्व पिढीने आपल्या पतीसारख्याच यातना बाहेर राहून भोगल्यात. त्यांच्यासाठी कोण पोवाडा म्हणणार? या लेखाद्वारा या ज्ञात-अज्ञात अशा सर्व स्वातंत्र्यवीरांगनांना मानाचा मुजरा. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे आम्ही खरेखुरे स्वराज्य बनवू हेच मनोमनी ठरवून त्या कामाला आपण लागणे. हीच स्वातंत्र्यदिनी त्यांना श्रद्धांजली.
gawankar.rohini@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा