स्त्रीला गृहीत धरणं, हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलं आहेच आणि आजही तसंच सुरू आहे. ना उच्च शिक्षणाने त्यात फरक पडला ना, सुसंस्कारित होण्याने. कदाचित स्त्रीला कायम गृहीत धरू नये, हा संस्कार आपल्या मुलांवर करण्यात स्त्रीच कमी पडत असावी.
ए कदा एका छोटय़ा बाळाला भाजलं म्हणून आमच्याकडे आणलं होतं. त्याची भाजलेली चामडी काढून, जखमा साफ करून त्यावर कोलॅजेन नावाचा पापुद्रा बसवण्याचं काम करायचं, असं त्याच्या ऑपरेशनचं स्वरूप होतं. सुरुवातीलाच बाळाच्या आई-वडिलांना ऑपरेशनसकट दोन दिवसांच्या हॉस्पिटल बिलाचा अंदाज देण्यात आला व त्यांनी त्याला मान्यता दिल्यावर त्या बाळाचं ऑपरेशन केलं. सर्व उपाययोजना पूर्ण झाल्यावर डिस्चार्जची वेळ आली तेव्हा ठरलेल्या अंदाजाप्रमाणे बिल करून त्यांना दिलं. ते दिल्यावर ‘पसा ले के आता हूं’ असं सांगून बाळाचे वडील जे गेले, ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांचा पत्ताच नाही. त्या बाईला विचारलं तर ती म्हणाली, ‘मुझे नही मालूम ये पसा लेकर कब आयेंगे.’ बाळाला भेटायला येणाऱ्या नातेवाईकांना तिला आíथक मदत करायला सांगितलं, तर ते म्हणत, ‘हां, हां जरूर देंगे!’ आणि निघून जात. तिसऱ्या दिवशी मी ‘राऊंड’ला गेल्यावर तिथून बाळच गायब झाल्याचं लक्षात आलं. तिला विचारलं, तर ती म्हणाली, ‘वो बच्चेके चाचा आये थे ना, त्याचा जीवच जडलाय पोरावर म्हणून ते त्याला घेऊन गेले.’ अशा रीतीने आíथक मदत करण्याऐवजी बाळाला सोडवून नेण्याची मदत चाचाने छानच केली होती. मी शेवटी तिला न राहवून विचारलं, ‘अगर हमने आप को पहलेसे खच्रे का अंदाजा दिया था, तेव्हा का नाही सांगितलं? तुमची पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही आमचं बिल मागतो आहोत ना. मग? तुमच्याकडून अॅडव्हान्स घेतला नाही हीच आमची मोठी चूक होती.’ मी असा सात्त्विक संताप व्यक्त केल्यावर ती बाई वरमली. तिला मनातून तर ते पटलं होतं. ‘आज संध्याकाळपर्यंत ते नक्की पैसे घेऊन येतील,’ असं आश्वासनही तिने मला दिलं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तिचा नवरा आला तो कटाक्षाने बाळाला घरी ठेवून व बिलाची अर्धी रक्कम घेऊन. त्याच्याशी पुन्हा तीच रेकॉर्ड लावून झाल्यावर तो काय म्हणाला, ‘डॉक्टरसाहब, म आपका पूरा पसा देनेवाला हूं. मी नाही कधी म्हटलंय? माझ्या बायकोला इथेच ठेवा. बाकीचे पैसे आणले की मग तिला घेऊन जातो. आता इथेच राहू देत.’
त्या वेळेपर्यंत तीन दिवस त्या बाईला घरून जेवण, घालायला स्वच्छ कपडेदेखील आले नव्हते. पुन्हा त्याचं ‘बायकोला ठेवून घ्या’ हे पालुपद ऐकून माझा संयम ढळायला लागला. बायकोला काय गहाण ठेवलं होतं का माझ्याकडे? का तिच्याकडून काही काम करून घ्या व बिल मिळालं समजा; असा त्याचा विचार होता? गेले बहात्तर तास ती बाई उपासमार, शरीराची अस्वच्छता, मानहानी सहन करत होती, तिचा काहीसुद्धा विचार नाही? स्त्रीला अखंड गृहीतच धरायची? त्या ऐवजी पहिल्याच दिवशी खर्च परवडत नसल्याचं सांगितलं असतं, तर स्वस्तातली जाळी वापरणं, सँपलची औषधं देणं, बिलात सूट देणं हे नक्कीच केलं असतं, आम्ही ते करतोच; पण कोणासाठी? जो प्रामाणिकपणे प्रथमच हे सांगेल त्याच्यासाठी, शिताफीने बाळाला घरी नेऊन वर बायकोला ठेवून घ्या – सांगणाऱ्यांसाठी नाही! माझ्या मनातली उद्विग्नता विचारांची वादळं उठवू लागली. स्त्री-कायमच गृहीत का?
स्त्रीला गृहीत धरण्याची प्रथा किती तरी प्राचीन आहे. पांचालीला हक्काची वस्तू समजून पणाला लावायला तो धर्मराज कुठे कचरला? लक्ष्मणाने राम-सीतेबरोबर वनवासाला जाताना ऊर्मिला मागे अयोध्येतच राहणार हे गृहीत नव्हतं का धरलं? रोजच्या व्यवहारातदेखील रस्त्यावरून जाताना -जोडप्यातील नवरा झपाझप पुढे जाताना व बायको मागून धडपडत त्याला गाठायचा आटापिटा करतानाची काही उदाहरणं पाहायला मिळतात. ‘जाते कुठे; येईलच की आपल्यामागे.’ ही ती वृत्ती! न सांगता उशिरा घरी येणं, न कळवता पाहुण्यांना जेवायला घरी आणणं, आपण जेवताना घरच्या बायकांसाठी काही शिल्लक राहतं की नाही याचा विचार न करणं अशी किती तरी उदाहरणं देता येतील ज्यात स्त्रीला गृहीतच धरलं जातं. चांगली शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या मूठभर संस्कारी घरांमध्ये हे चित्र वेगळं असेलही; पण बऱ्याच घरांतून अजूनही हे प्रकार दिसतात. यात बदल घडत असला तरी तो अत्यल्प आहे किंवा गृहीत धरण्याची कारणं फक्त बदलत आहेत.
वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या एका स्त्रीरोगतज्ज्ञ मित्राची प्रॅक्टिस अपेक्षेप्रमाणे चालत नव्हती तेव्हा तो तक्रारीच्या सुरात म्हणायचा, ‘स्त्री डॉक्टर बरोबर असल्यास पेशंट खूप मिळतात, माझ्या घरात कोणी स्त्री डॉक्टर नसल्यामुळे मला रिकामं बसावं लागतं.’ यावर माझा दुसरा मित्र पटकन मत्रीखातर बोलून गेला, ‘एवढंच वाटतं ना तुला, मग मी रोज संध्याकाळी माझ्या बायकोला एक तास तुझ्या हॉस्पिटलला कन्सिल्टगला पाठवून देइन’. त्याची बायको होती डोळ्यांची स्पेशालिस्ट. मी विचार केला, ‘तिचा विषय डोळ्यांचा; त्या मित्राचा विषय स्त्रीरोग, मग ती तिथे जाऊन त्याची प्रॅक्टिस कशी वाढावी? आणि हे बोलण्यापूर्वी तिला विचारणं गरजेचं नाही का?’ की पुन्हा तेच गृहीत धरणं.
इतकंच काय, काही वर्षांपूर्वी मी व माझी एक सर्जन मत्रीण कॉन्फरन्सला जाताना बघून तिच्या चौदा-पंधरा वर्षांच्या मुलीने माझ्या साडीचं, दागिन्यांचं फारच कौतुक केलं. मी तिला समजावलं, ‘अगं, तू मोठी झाल्यावर तुलापण हे सगळं मिळेल बरं!’ त्यावर ती तत्काळ उत्तरली; ‘हो मिळेल ना, मी कुठे तक्रार करते आहे? माझे बाबा मला सगळ्या छान छान गोष्टी घेऊन देतीलच.’ मी चाट पडले. कळायला लागल्यापासून जी मुलगी अखंड हॉस्पिटलच्या वातावरणातच वाढली, जिने तिच्या आईला, वडिलांबरोबरच हॉस्पिटलला जाताना, पेशंट तपासताना, ऑपरेशन्स करताना पाहिलं आहे, जिला आईचं शिक्षण कळतं आहे; तरी तिला आपल्याला भारी वस्तू बाबाच आणून देतील, आई नाही असं वाटणं; म्हणजे वडिलांच्या कमावण्याबद्दल गाढ विश्वास आणि आईबद्दल अविश्वास हे त्या उद्गारांतून जाणवत होतं. अर्थार्जनाच्या प्रांतात आईची दखलही न घेणं -हा गृहीत धरण्याचाच प्रकार आम्ही पुढच्या पीढीकडून अनुभवत होतो. ‘मीपण तुला ह्य़ा सगळ्या गोष्टी घेऊन देऊ शकते, पण मी तरी कशाला, तू खूप खूप अभ्यास करून आमच्यापेक्षा जास्त शिकलीस तर तू स्वत:ही अशा गोष्टी आणू शकशील’ अशी आत्मविकासाची जाणीव माझ्या मत्रिणीने तिला समजावणीच्या सुरात दिली.
एकदा आमच्या हॉस्पिटलच्या वतीने आम्ही एक कॉन्फरन्स आयोजित केली होती व माझ्या सेक्रेटरीच्या हस्ते सर्व डॉक्टरांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या. माझी अगदी जवळची बालरोगतज्ज्ञ मत्रीण त्या सभेला न आल्यामुळे मी जरा अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झाले. नंतर माझ्या सेक्रेटरीला याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘त्या मॅडमकडे त्या दिवशी जास्त पेशंट होते म्हणून मी सरांकडे निमंत्रणपत्रिका ठेवली व मॅडमना न भेटता परत आले. मला वाटलं, सर आले म्हणजे मॅडमपण येतीलच.’ अजून खोलात चौकशी केली तेव्हा हेदेखील कळलं, की आमच्या सेक्रेटरीने निमंत्रणावर फक्त डॉक्टरांचंच नाव घातलं होतं. डॉक्टर मॅडमना वेगळं निमंत्रण द्यावं लागतं, वेगळं भेटावं लागतं, किंवा एका पत्रिकेवर दोघांची नावं घालून तोंडी तरी मॅडमना सांगावं; ह्य़ाची तिला जाणीवही नव्हती. एक स्त्रीपण दुसऱ्या स्त्रीला गृहीतच धरत होती की नाही, की नवरा आला म्हणजे बायको येणारच त्याच्या जोडीला! मी तिच्या समजण्यामधली गफलत तिला समजावून सांगितली तेव्हा तिला ते पटलं. आता स्त्रीचीच ही जबाबदारी आहे दुसऱ्या स्त्रीवर किंवा आपल्या मुलांवर असा संस्कार करण्याची.
‘स्त्री’ ही एक ‘व्यक्ती’ म्हणून समाजाचा स्वतंत्र घटक आहे, तिच्या अस्तित्वाची वेगळी दखल घेतली जाणं गरजेचं आहे. ती पतीची ‘प्रेमाची सावली’ होणं स्वेच्छेने पसंत करेलही; पण प्रत्येक वेळी सावलीप्रमाणे त्याच्या मागोमाग जाईलच, असं या पुढे गृहीत धरता येणार नाही!
स्त्री कायमच गृहीत?
स्त्रीला गृहीत धरणं, हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलं आहेच आणि आजही तसंच सुरू आहे. ना उच्च शिक्षणाने त्यात फरक पडला ना, सुसंस्कारित होण्याने. कदाचित स्त्रीला कायम गृहीत धरू नये, हा संस्कार आपल्या मुलांवर करण्यात स्त्रीच कमी पडत असावी.
आणखी वाचा
First published on: 02-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women are always taken for granted