लग्नकार्य आणि स्त्रियांना आमंत्रणच नाही? शीतला गावातल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आजच्या काळातलाही हा अगम्य अनुभव.
कुमाऊनी खेडय़ांमधली पुरुषकेंद्रित संस्कृती म्हणजे कमालीची एकांगी. इतकी की राग येतायेता एकदम हसूच यावं. तिची चुणूक मला संजयच्या लग्नाच्या वेळी मिळाली होती. संजय आमच्या ऑफिसमधला गुणी हरकाम्या, मूळचा पौडी-गढवालचा. लग्न ठरलं तेव्हा होणाऱ्या बायकोने आणि त्याने एकमेकांना पाहिलंसुद्धा नव्हतं. वडील वारल्याने संजयच्या मामांनीच लग्न ठरवून टाकलं होतं. लग्नाचं आमंत्रण त्याने फक्त अरविंदला केलं. गडी तसा रोखठोक होता, म्हणून वगळली गेल्याची रुखरुख मनातून काढायला मी विचारलं, तर म्हणाला, ‘आप तो ‘लेडीज’ है ना? आप बारात में नहीं जा सकती. हमारे यहाँ लेडीज बारात में नहीं जाती..’ मला ते विचित्रच वाटलं. दागिने, सुंदर साडय़ा आणि नटल्या-सजलेल्या बायकांशिवाय लग्न? पण असेल एखाद्या गावाची रीत म्हणून सोडून दिलं.
नंतर काही वर्षांनी आम्ही नैनिताल जिल्ह्य़ातल्या सुरम्य शीतला गावात राहायला आलो. कमालीचं शांत आणि सुंदर खेडं. आमचा शेजारी आहे केशव. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे सधन निपुत्रिक जमीनदाराला दत्तक गेलेला. शिक्षण कमी, पण स्वभावाने सज्जन. अर्थात मी स्त्री असल्याने गावाच्या अलिखित परंपरेनुसार माझ्याशी नमस्कारापलीकडे बोलणं नाही. अरविंदशी मात्र गावगप्पा. मागच्याच महिन्यात त्याच्या वयोवृद्ध वडिलांनी ‘केशवचं लग्न ठरलं’ अशी आनंदाची बातमी दिली. आमंत्रण व पत्रिकाही फक्त अरविंदला! गावातल्या सगळ्यात सधन कुटुंबातलं लग्न असल्याने साग्रसंगीत सोहळा तीन दिवस चालणार होता.
आदल्या दिवशी आपल्याकडे शकुनाचे कानवले करतात तसा एक विधी होता ‘सुआल-पथाई’ म्हणून. लाडू वळून, पुऱ्या तळायच्या असतात. म्हणजे विधी पूर्णपणे बायकांचा! उत्सुकता होती, पण जावं, न जावं करता नाहीच गेले. मजा म्हणजे संध्याकाळी फिरून येताना केशव बाहेर दिसला. आम्हाला पाहताच पुढे येऊन तो म्हणाला, ‘अरे सर, आप आये नहीं दोपहर में?’ नजर अरविंदवर खिळलेली. बाजूला उभ्या माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष. म्हणजे घ्या! विधी बायकांचा, त्याला एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला बोलावतोय तेही आणि उपस्थित शेजारणींना उपेक्षित ठेवून. बारात हल्दवानीला जाणार होती. शीतलापासून दोन तासांच्या अंतरावर. मग केशवने अरविंदला लग्नस्थळ, जायचा रस्ता वगैरे समजावून सांगितलं. सर्व संभाषणाच्या दरम्यान माझ्याकडे एक कटाक्षही नाही आणि किमान तोंडदेखलं ‘तुम्ही पण यायचं बरं का’ वगैरे तर अजिबातच नाही.
दुसऱ्या दिवशी लग्नाच्या बारातीत गावातले तमाम नरपुंगत्व वाहनांच्या ताफ्यातून रवाना झाले. गावात राहिल्या फक्त बायका, पोरं आणि म्हातारेकोतारे! संध्याकाळी परतल्यावर अरिवदने मला सांगितलं, ‘तुझ्यासाठी खूप लोक विचारत होते.’ बायकांशी अक्षरानेही न बोलणे आणि त्यांच्याकडे नजरही न टाकणे म्हणजे त्यांना मान देणे, असा इथला सामाजिक संकेत आहे असं एकानं अरविंदला सांगितलं होतं. आमच्यात नाही हो येत बायका, पण मॅमनी यायला हरकत नव्हती. तुमचं वेगळं पडतं, तुम्ही शहरी माणसं, असा एकंदरीत सूर दिसला म्हणे. पण झालं ते एकापरीने बरंच झालं, कारण बारात विवाहस्थळी पोहोचेतो बहुसंख्य मंडळी तर्र्र झालेली होती- तशाच अवस्थेत अंगात आल्यागत नाचत होती. ती लग्न लागल्यावर आणखी पिणार आणि दोन तासांची पूर्ण घाटातली ड्राइव्ह करून घरी कशी सुखरूप पोहोचणार हा आता आमच्या चिंतेचा विषय बनला होता. लग्नात शाळकरी मुलंही ‘पितात!’ दुसऱ्या दिवशी कहरच झाला!! पत्रिकेत १२ ते २ ‘लेडीज संगीत’ आणि २ ते ४ ‘प्रीतिभोज’ असा कार्यक्रम छापला होता. त्याला मात्र गावातल्या झाडून सगळ्या बायका येणार होत्या. त्यात मीही एक! आम्हांपैकी एकीलाही निमंत्रण नसून तिथे दोनेकशे बायका -पोरी गोळा झाल्या होत्या. शामियाना गच्चीवर टाकला होता. त्यात चक्क डान्सफ्लोअरही होता. अडीचच्या सुमाराला वर-वधूचं आगमन झालं. ते त्यांच्या सिंहासनावर विराजमान झाल्यावर एका तरुणाच्या टोळक्यानं एकमेकांना खेचत डान्स फ्लोअरचा ताबा घेतला आणि ‘फेविकोल से’पासून ‘चिकनी चमेली’ची आवर्तनं सुरू केली. मी आपली वधूकडेच निरखून-निरखून पाहत होते. झालं काय की तिचा ‘कॅमेरा-रेडी’ चेहरा तिरका वगैरे दिसत होताच, पण त्यावर एका भरभक्कम आठीनं ठाण मांडलेलं होतं. त्यामुळे ती कमालीची त्रासलेली, उखडलेली वाटत होती. उघडउघड नाराज दिसत होती. बायाबापडय़ा जवळ जाऊन आहेर करत, तेव्हा ती नमस्काराला जराशी वाकायची, हात जोडायची, पण हसू मात्र नाही म्हणजे नाही!
मला राहवेना. मनात शंका-कुशंका येऊ लागल्या. हिला काही दुखतंय-खुपतंय का? मी शेजारी बसलेल्या दीपाला विचारलं तर म्हणाली, ‘आमच्यात नवऱ्या मुलीनं असंच बसायचं असतं, शांत, गंभीर! हसलं तर वाईट समजतात.’
नववधूच्या चेहऱ्यावर हसू बघण्याची माझी इच्छा अखेर एकदा पुरी झाली. एकदा फोटोग्राफरनं व्हिडीओ घेताना तिला सुचवलं आणि ती दोन-तीनदा हसली. नाहीतर केशवच्या गाववाल्यांवर ती प्रथमदर्शनीच नाराज झालीय असं वाटून मला फारच अवघडल्यासारखं झालं होतं. (मर्यादा आणि नम्रतेच्या कल्पनाच वेगळ्या.) नवी नवरी म्हणजे हसरी, भिरभिरत्या नजरेची, अधूनमधून उगीचच लाजणारी,  पण यापैकी इथे काहीच नव्हतं- भावनेचं कोरेपण मला धास्तावणारं वाटत होतं- ओलावा इतरत्रही कुठे टिपूसभरही सापडत नव्हता. तर तासभर तरी त्या बाप्यांनी डान्स फ्लोअरवर धुडगूस घातल्यावर ‘लेडीज संगीत’ कधी सुरू होणार, असा प्रश्न माझ्या मनात पिंगा घालू लागला. कुमाऊनी लग्नाची नाच-गाणी पाहायला आम्ही कमालीचे उत्सुक होतो- शेवटी त्या उत्साही नाचणाऱ्यांची बऱ्यापैकी मनधरणी करून तासाभराच्या बोलीवर त्यांना ‘चान्स’ देण्यात आला, आणि मग एक मजेशीर विरोधाभास समोर उलगडला. गावातल्या १०-१२ वर्षांच्या पोरींनी अगदी फिल्मी लटके-झटके देत ‘छम्मक छल्लो’,‘फेविकोल’आदी नखरेल, शृंगारिक गाणी अगदी नि:संकोचपणे सादर केली. गाणं ‘रामजी की कृपा से’ असो की ‘नगाडा बजा’, चेहऱ्यावर भाव तेच! १२ ते २० वयाच्या पोरी एकामागोमाग एक नाचत होत्या- गावचे बडे-बूढे पाहत होते. उभयपक्षी संकोच किंवा चोरलेपण कुठेही नव्हतं- एरव्ही ह्य़ाच मुली, त्यापैकी काही माझ्या विद्यार्थिनी, अत्यंत सोज्वळ, शालीन. ते रूप खरं की हे. चारच्या सुमाराला आम्हाला केशवच्या भावानं अगदी अगत्यानं जेवायला खाली नेलं. मोठमोठय़ा कढयांमध्ये अन्नानं तळ गाठल्याचं दिसत होतं- आधी जेवणाऱ्या बाप्या मंडळींनी आडवा हात मारल्यानं मागाहून खाणाऱ्या स्त्री वर्गासाठी २-३ पदार्थ तर चवीलाही शिल्लक नव्हते. म्हणजे लग्नप्रसंगीसुद्धा रोजचीच कहाणी. इथे स्त्रियांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जगजाहीर आहे, त्याचा प्रत्यय आला.
कारणमीमांसा करायची तर गाव तसं लहान. मागच्याच वर्षी तर इथे एका न्हाव्यानं दुकान उघडलंय- त्याच्या आधी एका शिंप्यानंही टपरी टाकलीय. सगळ्यांकडे मोठमोठे जमिनीचे तुकडे- गाय, बकऱ्या, परसात भाजीपाला, लिंबं, जरदाळू, नाशपती, आलुबुखारे आणि आडूंची झाडं. पण नोकरीच्या संधी कमी. आहेत त्यात मिळकतही जेमतेम भागवणारी. त्यामुळे जो तो आपापल्या घरी खाऊनपिऊन बरा. आसपास हॉटेल वगैरे नसल्यानं ‘बाहेरचं’ खाण्याची संधी अशी एकतर लग्नकार्य किंवा पुत्रप्राप्तीमुळे किंवा सरळ बाराव्याला किंवा श्राद्धाला. ती कुणी दडवत नाही. त्यासाठी आमंत्रणाची वाटही बघत नाहीत. पोरंसोरं अन्नावर अक्षरश: तुटून पडतात. कधी गावात अशी चारी ठाव जेवण्याची केवढी तरी भूक दाबून ठेवलेली असावी आणि तिचा असा सामूहिक उपशम होत असावा असं वाटून जातं. माझ्या मध्यमवर्गीय मनाला ती भराभर रिकामी होणारी भांडी आणि मागच्यांचा विचार येतो आणि भडभडून येतं. तोंड गोड करायलाही जीवावर येतं..
दरम्यान, वरच्या गच्चीत तरुणाईनं परत डान्स फ्लोअरचा ताबा घेऊन ‘राधा तेरा झुमका..’ आणि ‘छम्मक छल्लो’चा जल्लोष परत सुरू केला होता. लग्नाच्या ‘लेडीज संगीतात’ कुमाऊनी नाच-गाणी रेकॉर्ड करण्याची अरविंदची इच्छा मात्र कॅमेरा एकदाही न उघडावा लागल्याने उगी-मुगी होऊन कोपऱ्यात उभी होती आणि मला पुलंच्या ‘वाऱ्यावरली वरात’मधला पुलं आणि श्रीकांत मोघे यांतला संवाद आठवून हसू येत होतं.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Story img Loader