प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com
स्टेम (STEM) – म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार विद्याशाखांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अगदी जगभरात, कायमच कमी असल्याचं आपल्याला दिसतं. याबरोबरीनं अर्थशास्त्रही येतं. अगदी अर्थशास्त्रासाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकाच्या ५१ वर्षांच्या इतिहासात ८४ जणांपैकी फक्त दोन स्त्रियांना हे पारितोषिक दिलं गेलं आहे. अर्थशास्त्र या ‘तर्क शुद्ध’ समजल्या गेलेल्या विषयात उच्चपदी पोहोचलेल्या स्त्रियांची संख्या सामाजिक मानसिकतेमुळे पुरुषांपेक्षा कमी असावी; परंतु यालाही अपवाद आहेतच. अर्थसाक्षरतेकडून अर्थतज्ज्ञ होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यासाठी अनेक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणाऱ्या, अर्थशास्त्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही अर्थतज्ज्ञांविषयी-
स्कॉटिश विचारवंत अॅडम स्मिथनं १७७६ मध्ये ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे पुस्तक लिहिलं आणि आज आपण ज्या स्वरूपात अर्थशास्त्र पाहातो त्याचा पाया रचला. या पुस्तकात त्यानं अर्थशास्त्रातला मूलभूत प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे, तुम्हाला अन्न कसं मिळतं? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही. याच्या उत्तरामध्ये अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया दडल्या आहेत. या प्रश्नाचं अॅडम स्मिथचं उत्तर म्हणजे आधुनिक अर्थशास्त्र आणि जवळजवळ सर्वच अर्थव्यवस्थांमागचं गृहीतक आहे.
It is not from the benevolence of the butcher, the brewer or the baker that we expect our dinner, but from their regard to their own self-interest. (थोडक्यात, त्याच्या सांगण्याचा आशय होता, आपल्याला मिळणारं अन्न हे कुणा खाटकाच्या, दारू गाळणाऱ्याच्या किंवा पाव बनवणाऱ्याच्या उपकारामुळे मिळत नाही, तर त्यांच्या स्वहित किंवा स्वार्थ जपण्याच्या हेतूमुळे मिळतं.) अॅडम स्मिथच्या या मांडणीच्या आधारे ‘स्वार्थ’ हा अर्थशास्त्राचा आणि त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थांचा पाया बनला; पण अॅडम स्मिथला किंवा कु णालाही मिळणारं अन्न हे शिजवलं कु णी? अॅडम स्मिथचं लग्न झालेलं नव्हतं. तो स्कॉटलँडमध्ये त्याच्या आईबरोबर राहायचा. तेव्हा तो खात असलेलं अन्न त्याच्या आईनं किंवा मदतनीस स्त्रीनं शिजवलं असणार असं मानायला हरकत नाही. अर्थशास्त्राच्या या जनकाला त्याच्या आईनं दिलेलं अन्न हे केवळ स्वार्थामुळे दिलं, असं म्हणणं थोडी अतिशयोक्ती ठरेल. स्वार्थाबरोबर त्यात माया, आपलेपणा, काळजी या भावनाही असणार; पण अॅडम स्मिथ एवढा मोठा सिद्धांत मांडताना त्याच्या आईच्या, थोडक्यात स्त्रीच्या या भावनांचा विचार करायला विसरला का? अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी बजावणाऱ्या, घरात येणाऱ्या पै-पैशाचा विनिमय योग्य प्रकारे करणाऱ्या, निगुतीनं संसार करणाऱ्या स्त्रिया या अर्थशास्त्रामध्ये अभावानं का दिसतात या कोडय़ाचं उत्तर या अनुल्लेखातही दडलं असावं.
२०१९ मध्ये एस्तेर डुफ्लो, अभिजीत बॅनर्जी आणि मायकेल क्रेमर यांना ‘जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरच्या कामासाठी अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक दिलं गेलं. या तिघांच्या वतीनं डुफ्लो यांनी हे पारितोषिक स्वीकारलं. वयाच्या ४६ व्या वर्षी नोबेल मिळवलेल्या डुफ्लो, अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली. हे पारितोषिक स्वीकारताना बॅनर्जी आणि क्रेमर यांच्या वतीनं केलेल्या भाषणात डुफ्लो यांनी जास्तीत जास्त स्त्रियांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात काम करायला हवं याविषयी आपलं मत मांडलं. याबरोबरच महत्त्वाचं काम करूनही मिळायला हवा तेवढा न्याय आणि प्रसिद्धी मिळालेली नाही अशा अनेक स्त्री अर्थतज्ज्ञांच्या कामांकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधलं. त्या म्हणतात, की या क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढायला हवं असेल तर विद्यार्थिनींसमोर स्त्री अर्थतज्ज्ञांच्या उदाहरणांची गरज आहे. आमच्या नोबेल पारितोषिकामुळे या क्षेत्राकडे वळण्याची आणि टिकू न राहण्याची प्रेरणा अनेक मुलींना मिळेल.
डुफ्लो या फ्रें च-अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ. त्यांनी १९९९ मध्ये अमेरिकेच्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून (‘एमआयटी’) पीएच.डी. पूर्ण केली. याअंतर्गत त्यांनी इंडोनेशियामध्ये १९७० मध्ये झालेल्या शिक्षणविस्ताराच्या कार्यक्रमाचा अभ्यास केला. विकसनशील देशांमध्ये शिक्षणाची इयत्ता जेवढी जास्त त्या प्रमाणात लोकांना मिळणाऱ्या पगारातही वाढ होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. पीएच.डी.नंतर वयाच्या २९ व्या वर्षी त्या ‘एमआयटी’मध्ये पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम करू लागल्या. या विद्यापीठात प्राध्यापिकेचं पद मिळवणारी ती सर्वात तरुण व्यक्ती ठरली. २००२ मध्ये त्यांनी याच विद्यापीठात ‘अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’ची स्थापना केली. यामार्फत त्यांनी २०० हून अधिक संशोधन कार्यक्रम राबवले. २०११ मध्ये अभिजीत बॅनर्जी यांच्याबरोबर ‘पुअर इकॉनॉमिक्स’ आणि २०१९ मध्ये ‘गुड इकॉनॉमिक्स फॉर द हार्ड टाइम्स’ या पुस्तकांचं लेखन केलं. सध्या डुफ्लो या ‘एमआयटी’मध्ये विकासात्मक अर्थशास्त्र आणि दारिद्रय़ निर्मूलन या विषयाच्या प्राध्यापक आहेत. २०१५ मध्ये त्यांचा अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्याशी विवाह झाला हे खरं असलं तरी या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करूनही गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाल्यावर अनेक प्रख्यात वृत्तपत्रांनी मथळ्यात त्यांचा उल्लेख केवळ ‘अभिजीत बॅनर्जी यांची पत्नी’ असा केला होता हे अन्यायकारकच होतं.
‘नोबेल पारितोषिकां’च्या ५१ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत ८४ जणांना अर्थशास्त्रातला हा बहुमान दिला गेला. या यादीमध्येही केवळ दोन स्त्रियांचा समावेश आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या स्त्री अर्थशास्त्रज्ञ म्हणजे इलनॉर ऑस्ट्रॉम.
२००९ मध्ये- म्हणजे त्यांच्या वयाच्या ७६ व्या वर्षी ऑस्ट्रॉम आणि त्यांचे सहकारी ऑलिव्हर विल्यमसन यांना हा बहुमान विभागून दिला गेला. ऑस्ट्रॉम यांच्या संशोधनाचा विषय होता सार्वजनिक संसाधनं. हवा, जंगलं, मोकळ्या जागा, पाणी, इथली जीवसृष्टी, अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचं (ज्याला आपण ‘कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स’ असंही म्हणतो.) व्यवस्थापन, सरकारी किंवा खासगी या दोघांच्याही हस्तक्षेपाशिवाय सहकारी पद्धतीनं कशा प्रकारे करता येईल, हा त्यांच्या अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय. हा योगायोगही असेल कदाचित, पण नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या या दोघींच्याही अभ्यासाचा विषय हा विकासात्मक अर्थशास्त्र किंवा ‘डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स’ या उपशाखेतलाच आहे. दोघींनीही, आपल्या अभ्यासासाठी प्रत्यक्ष समाजामध्ये मिसळून, सर्वेक्षण करून स्थानिक लोकांच्या सवयींचा, स्वभावाचा अभ्यास करून मगच सिद्धांत मांडले. पत्रकार क्रिस्टियान अमानपूर यांना दिलेल्या मुलाखतीत डुफ्लो म्हणतात त्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये ‘डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स’ किंवा विकासात्मक अर्थशास्त्र आणि जागतिक दारिद्रय़ निर्मूलन ही अशी विद्याशाखा आहे, की ज्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण समसमान आहे. ‘मायक्रो इकॉनॉमिक्स’, ‘मार्केट इकॉनॉमिक्स’पेक्षा या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रियांचा ओढा हा नैसर्गिकरीत्याच विकासात्मक अर्थशास्त्राकडे अधिक असतो, असंही त्या म्हणाल्या.
सुरुवातीला उल्लेख के लेल्या ‘स्टेम’ शाखांप्रमाणेच अर्थशास्त्रात स्त्रियांचा अल्प सहभाग हा चिंतेचा विषय आहे; पण विशेष करून अर्थशास्त्रामध्ये पदवी शिक्षणासाठीही येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अतिशय कमी आहे. भारतापुरतं बोलायचं झालं, तर १२ वीपर्यंत अर्थशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या मुली आणि मुलांची संख्या जवळजवळ सारखीच असते; परंतु पुढच्या इयत्तांमध्ये ती संख्या घटत जाते. यातील पदव्युत्तर शिक्षण तर फक्त २० टक्के स्त्रियाच घेतात. त्यामुळे त्यापुढील शिक्षणातील स्त्रियांची संख्या फारच कमी असते. साहजिकच खूपच कमी स्त्रिया प्राध्यापक पदापर्यंत पोहोचतात. त्यातही स्त्रियांकडे अर्थशास्त्रासाठी लागणारी मानसिक बैठक नसते, असा समज आहे. तोदेखील त्यांच्या प्रगतीच्या आड येतो. शिकागो विद्यापीठातले प्राध्यापक आणि १९८२ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारविजेते शास्त्रज्ञ जॉर्ज स्टिगलर एका वर्गात शिकवत असताना म्हणाले होते, की ज्या दिवशी शिकागो विद्यापीठ अर्थशास्त्र शिकवण्यासाठी स्त्रीची नेमणूक करेल, त्या दिवशी ते विद्यापीठ सोडून जातील. हे त्याचच उदाहरण.
२०१८ मध्ये ‘अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन’नं एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला. अर्थशास्त्र या विद्याशाखेमधील स्त्रियांच्या सहभागाबद्दलचा हा अहवाल होता. त्यामध्ये मुलाखत घेतलेल्यांपैकी १०० जणींनी त्यांचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण झालं असल्याचं कबूल केलं, तर २०० स्त्रियांनी आपला विनयभंग झाल्याचं सांगितलं. अध्र्याहून अधिक स्त्रियांनी सांगितलं, की त्यांची टिंगल होऊ नये म्हणून त्यांनी अनेकदा चर्चासत्रांमध्ये सहभागी होणं टाळलं आहे. या मानसिकतेमुळे आज अमेरिके तील विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांपैकी केवळ २५ टक्के स्त्रिया आहेत, तर युरोपीय विद्यापीठांमध्ये हे प्रमाण २० टक्के आहे. संशोधनाच्या जगतामध्ये वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल, तर प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये तुमचे शोधनिबंध प्रकाशित होणं गरजेचं असतं; पण जाणीवपूर्वक पाहिल्यावर असं लक्षात आलं, की असे शोधनिबंध प्रकाशित करूनही तेवढय़ाच वर्षांचा आणि कामाचा अनुभव असलेल्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना बढती किंवा कामाला प्रसिद्धी मिळालेली नाही.
अशी परिस्थिती असली तरी गीता गोपीनाथ या ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ या पदापर्यंत पोहोचल्या. क्रिस्टीन लागार्ड यांनी ‘युरोपीय सेंट्रल बँके’चं अध्यक्षपद भूषवलं. भारताच्या निर्मला सीतारामन यांच्याप्रमाणेच जगातल्या अनेक देशांचं अर्थमंत्रिपद आज स्त्रिया सांभाळत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सरकारवर जबर टीका करणाऱ्या माजी प्रधान आर्थिक सल्लागार इला पटनायक यांच्यासारख्या आर्थिक सल्लागार भारताला लाभल्या आहेत. मात्र या क्षेत्रात आणि संशोधनाच्या क्षेत्रातही स्त्रियांचं प्रमाण वाढायला हवं आहे.
२०१५ पासून ‘द इकॉनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय अर्थविषयक साप्ताहिकाचं प्रमुख संपादकपद भूषवणाऱ्या ब्रिटिश पत्रकार झ्ॉनी मिंटन बेडोस यांचा इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. या अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या पदापर्यंत मजल मारलेल्या बेडोस या पहिल्याच स्त्री ठरल्या. १९६७ मध्ये जन्मलेल्या बेडोस यांनी १९९४ मध्ये ‘द इकोनॉमिस्ट’मध्ये कामास सुरुवात के ली. तत्पूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्येही अर्थतज्ज्ञ म्हणून काम के लं होतं.
आत्तापर्यंत बघायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल, की अर्थशास्त्र हे काही महत्त्वाच्या आर्थिक उलाढालींचं भाकीत करू शकलेलं नाही. एवढंच नव्हे, तर जागतिक आर्थिक मंदीचा धोकाही सांगू शकलं नाही. याचं मुख्य कारण हे शास्त्र ‘होमो इकॉनॉमिक्स’च्या गृहीतकावर आधारलेलं आहे. या शास्त्राच्या मते प्रत्येक मानव हा केवळ स्वार्थावर आधारित, तर्कशुद्ध निर्णय घेत असतो. त्यामध्ये भावनांना, करुणेला, त्यागाला म्हणजे थोडक्यात ‘बायकी’ गुणांना स्थान नाही. मानव अतिशय भावनात्मक निर्णय घेत असतो. त्याची प्रत्येक कृती ही स्वार्थावर अवलंबून नसते. त्यामुळे आता नव्या, तर्काबरोबर भावनांनाही विचारात घेणाऱ्या, स्वार्थाबरोबर त्यागाची किंमतही जाणणाऱ्या मानवाचा विचार होण्याची गरज आहे.
सध्या ‘करोना’ संकटामुळे आपलं जग एका विचित्र संक्रमण काळातून जात आहे. अनेक अर्थव्यवस्थांना याचा फटका बसला आहे आणि पुढेही बसणार आहे. अर्थशास्त्रामध्ये नवीन विचार आणायचा असेल तर त्यासाठी अर्थशास्त्राच्या संशोधनामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींमध्ये विविधता असायला हवी. यासाठी अर्थशास्त्राला अधिक स्त्री तज्ज्ञांची गरज आहे.
अॅडम स्मिथनं केलं नाही, परंतु यापुढे स्त्रीच्या कष्टाला, त्यागाला, प्रेमाला अर्थकारणात जागा द्यायला हवी.