– सुवर्णा दामले

ग्रामीण भागांत शेतमजूर स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर रोजगारांपेक्षा सुरक्षित वाटणाऱ्या या व्यवसायात स्थिरावण्यासाठी यांतील अनेक एकल स्त्रियांनी भाडेतत्त्वावर शेती कसायला घेतली. अडखळत सुरू झालेली त्यांची वाटचाल आता स्वत:ला आत्मविश्वासाने ‘शेतकरी’ म्हणवून घेण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. हे आहेत अशा स्त्रियांचे प्रत्यक्ष अनुभव. त्यांच्या आत्मभानाचे तेज त्यात आहेच, पण सावकाश का होईना, बदलणाऱ्या सामाजिक मानसिकतेचेही हे प्रतिबिंब आहे.

loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
Is America Ready for Female Leadership Kamala Harris Hillary Clinton
स्त्री नेतृत्वासाठी अमेरिका तयार आहे का ?
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत

महाराष्ट्रात आधी आणि देशात त्याच्यानंतर रोजगार हमी देणाऱ्या सरकारी योजना सुरू झाल्या. तरीसुद्धा ग्रामीण भागांतील अधिकाधिक स्त्रिया रोजगारासाठी शेती आणि शेती-आधारित इतर रोजगारांवर मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ६५ टक्के स्त्रिया शेतीसंबंधीची कामे करतात. याचे कारण विचारात घेतल्यास बहुतांश ग्रामीण स्त्रियांना शेतीचे काम आपण करू शकतो, असा विश्वास वाटत असल्याचे लक्षात येते. इतर रोजगार किंवा व्यवसायांच्या तुलनेत शेतीचे काम स्त्रियांना सुरक्षित आणि शाश्वत वाटते.

हेही वाचा – जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

या संदर्भात ‘प्रकृती’ संस्थेतर्फे ठेक्याने (भाडेतत्त्वावर) शेती करणाऱ्या एकल स्त्रियांशी चर्चा करण्यात आली. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या अकोला आणि नागपूरमधील ११८ स्त्रियांशी संवाद साधला. या सर्वच एकल स्त्रियांनी सांगितले की, एकल असल्यामुळे रोजगारासाठी त्यांना इतर स्त्रियांपेक्षा कमी संधी मिळते. कुटुंबाची जबाबदारीही असते. त्यामुळे गावातच किंवा जवळपास शेती करणे त्यांना सोयीचे वाटते. पण केवळ ‘सोयीचे वाटते’ म्हणून या एकल स्त्रिया स्वत:कडे शेती नसताना किंवा असतानाही ठेक्याने शेती करतात का? तर असे नाही. या स्त्रिया म्हणतात, की सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे आणि एकटीलाच सर्व काही करावे लागत असल्यामुळे त्यांना फारसा फायदा झाला नव्हता; मात्र हळूहळू त्यांनी तीच शेती नफ्याची करून दाखवली. शेतीतील स्त्रिया असा विषय येतो, तेव्हा नजरेसमोर प्रथम शेतमजूर स्त्रियाच येतात. पण शेतमजूर म्हणून सुरुवात करून आत्मविश्वासाने ‘शेतकरी’ म्हणवून घेण्यापर्यंत पोहोचलेल्या या स्त्रियांचे अनुभव, त्यांनी कमावलेले शहाणपण, हे सर्व जाणून घ्यावे असेच.

‘कष्टकऱ्याची जात आपली! हिंमत ठेवलीच पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखे पाषाणांवर टिकलेच पाहिजे,’ या ओळी नेमक्या कुणी लिहिल्या माहिती नाही, पण रंजनाताईंच्या बाबतीत त्या अगदी लागू पडतात. भूमिहीन कुटुंबात लग्न झाल्यावर रंजनाताईंवर मजुरीला जाण्याची वेळ आली नव्हती, कारण मुलांच्या संगोपनात वेळ गेला आणि मग शेतीच्या कामांची सवय नाही म्हणून त्या घरीच राहिल्या. भूमिहीन असल्यामुळे त्यांचे पती ठेक्याने दुसऱ्याची शेती करत होते. त्याच वेळी त्यांच्या पतीचे शेतीच्या जागेवरून वाद सुरू झाले. नंतर वाढत गेले आणि त्या वादांतून त्यांची हत्या झाली. पतीच्या मृत्यूची माहिती रंजनाताईंपर्यंत पोहोचायलाही दोन दिवस लागले होते, कारण ही हत्या लांबच्या ठिकाणी झाली होती. पतीनिधनानंतर उपजीविकेचा कोणताही पर्याय नसल्यामुळे रंजनाताईंनीच पतीकडे ठेक्याने असलेली शेती स्वत: करायचा निश्चय केला. अनेक संकटांवर मात करून त्या गेली सात वर्षे एकट्या ठेक्याने शेती करत आहेत.

ग्रामीण भागात राहणाऱ्या एकल (मुख्यत्वे विधवा) स्त्रियांना शेतीशिवाय उपजीविकेचे दुसरे पर्याय नाहीत. आधी म्हटल्याप्रमाणे अनेक एकल स्त्रियांच्या मते शेती हा पर्याय त्यांना इतर उपजीविकेच्या पर्यायांच्या तुलनेने अधिक सुरक्षित वाटतो. आधी कमी शेती ठेका पद्धतीने करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू अनुभव आणि गरज दोन्हींचा विचार करून बहुतेक एकल स्त्रियांनी ठेक्याची शेती वाढवली. विशेष म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना शेतीचा ठेका देणे अधिक सोयीचे आणि फायद्याचे आहे, असे स्वत:ची शेती ठेक्याने देणाऱ्या पुरुष शेतकऱ्यांचे मत दिसले. त्यांच्या मते, ‘पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया प्रामाणिक आणि कष्टाळू असतात.’

हेही वाचा – माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट

नागपूरमध्ये वास्तव्यास असलेले आणि ग्रामीण भागात पंचवीस एकर कोरडवाहू शेतीची मालकी असणारे भगवंतराव. गेल्या बारा वर्षांपासून कमलाताईंना त्यांनी आपल्या शेतीचा ठेका दिला आहे आणि ते त्याबद्दल निर्धास्त आहेत. ते म्हणतात की, ठेक्याचे पैसे मागे-पुढे का होईना, पण नक्की मिळतात. शिवाय कमलाताई स्वत:हून शेतात पिकवलेले धान्य, भाजीपाला, फुले आवर्जून पाठवतात. ‘स्त्रियांना शेतीतले काय कळते,’ या गैरसमजुतीमुळे त्यापासून दूर राहिलेल्या स्त्रियांना मानसिकता बदलू लागल्याचा परिणाम निश्चित जाणवतोय. ठेक्याच्या शेतीमध्ये अधिक प्रमाणात उतरणे स्त्रियांना शक्य होऊ लागले आहे आणि या शेतीने त्यांना मान मिळवून दिलाय.

उषाताईंना अधूनमधून अपस्माराचे झटके येत. त्यामुळे पतीने त्यांना माहेरी पाठवले. पण माहेरी त्यांना आधार मिळाला नाही. कोणी कामदेखील दिले नाही. मग स्वत:कडे असलेले सोन्याचे कानातले विकून उषाताईंनी ठेक्याने शेती करायला घेतली. ठेका देणाऱ्याला त्याच्या ठेक्याचे पैसे मिळत गेल्यामुळे उषाताईंच्या आजाराचा त्याला अडसर वाटला नाही. पहिली दोन वर्षे उषाताईंना पैसे काही फारसे मिळाले नाहीत, पण भाजीपाला, डाळ वगैरे मिळायला लागले. हळूहळू वैविध्यपूर्ण पिके घेऊन, रात्रंदिवस मेहनत करून उषाताई थोडेफार पैसे मिळवू लागल्या. शेती जरी स्वत:ची नसली, तरी ठेक्याचे पैसे दिल्यावर शेतीचा मालक त्याकडे ढुंकूनही बघत नव्हता. तेव्हा उषाताईच स्वत:ला मालकीण समजत आणि स्वत:च्या निर्णयावर खूश होत! आता त्यांच्या आजाराबद्दल कोणी टोकणारे, नाकारणारे नव्हते. हे त्यांच्यासाठी खूप समाधानाचे होते. आनंदी आणि समाधानी राहात असल्यामुळे, वेळच्या वेळी जेवण-औषधे घेत असल्यामुळे उषाताईंची तब्येतही पहिल्यापेक्षा सुधारली.

अकोल्यातील वेणूताईही एकल आहेत. त्यांना मुले-सुना आहेत, पण त्या स्वतंत्र राहतात. गेली अनेक वर्षे स्वत:ची शेती तर सांभाळतातच, शिवाय ठेक्याची शेतीसुद्धा करतात. त्यांचा धाकटा मुलगा थोडीफार शेतीकामांत मदत करतो. त्यांची स्वत:ची फारच कमी- दीड एकर शेती आहे. त्यामुळे त्या ठेक्यानेही शेती करतात. वेणूताई सांगतात, ‘‘जमिनीवर सीलिंगचा (‘कमाल जमीनधारणा कायदा’) कायदा आहे, पण ठेक्याची शेती केली तर त्यासाठी काही मर्यादा नाही. मग काय हरकत आहे, मी माझ्या शेतीशिवाय इतर दोन शेती कसायला घेतल्या तर?… माझ्यासारख्या एकल स्त्रियांना शेतीशिवाय काय पर्याय आहे? शेती करण्यासाठी मला कोणतीही परीक्षा पास करावी लागत नाही, वशिला लावावा लागत नाही!’’

अर्थात सर्व एकल स्त्रियांना ठेका पद्धतीने शेती करताना सुरुवातीला त्रास झालाच आहे. काही ठिकाणी त्यांना ठेका मिळू नये, यासाठी इतर शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. किंवा काही जणींच्या बाबतीत त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी मुद्दाम या स्त्रियांच्या शेतातील पिकांची नासाडीही केली. स्वत:च्या शेतातील पाणी या स्त्रियांच्या शेतात वळवून तिथे चिखल करून ठेवला… अशा काही प्रसंगांना या स्त्रियांना तोंड द्यावे लागते. पण त्या जिद्दीने आणि चिकाटीने शेती करताहेत.

वर उषाताईंचा अनुभव मांडलाय. त्या असेही सांगतात की, ‘‘शेतमजूर स्त्रियांना मिळेल तिथे मजुरीला जावे लागते. कधी लांब, तर कधी परक्या गावाला. बरं, शेतमालक भला असला तर ठीक! पण मजूर बायांना शिव्या देणारे आणि उपकार केल्यासारखी मजुरी देणारे शेतमालक असतील, तर मजूर स्त्रियांच्या अडचणी अधिकच वाढतात. त्यापेक्षा आमच्यासारख्या ठेक्याने शेती करणाऱ्या स्त्रिया आपल्या ठेक्याच्या शेतापुरत्या तरी ‘मालक’ असतो. आम्हाला मजूर म्हणून कोणी हिणवत नाही.’’

‘मजूर ते मालक’ हा खऱ्याखुऱ्या अनुभवाचा प्रवास कोणतीही बुके न शिकताही स्त्रियांचे आत्मभान कसे जागृत करतो, त्याचे हे बोलके उदाहरण आहे.
रंजनाताईंनाही सुरुवातीच्या दोन वर्षांत घरी खाण्यापुरतेच थोडेफार शेतीतून मिळाले. जी रोख रक्कम मिळाली ती उसनवारी परत करण्यातच खर्च झाली. तिसऱ्या वर्षी मात्र त्यांनी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले आणि स्वत:च बाजारात भाजी विक्री केली. भाजीपाला विकून आठवड्याला हजार रुपयांपर्यंत पैसे त्यांना मिळायचे आणि त्यामुळे घराला हातभार लागायचा.

उषाताईंच्या म्हणण्याला वेणूताईसुद्धा दुजोरा देतात. वेणूताई शेतमालक आहेतच, शिवाय ठेक्यानेही शेती कसतात. त्या सांगतात, ‘‘शेतमाल विकला गेल्यावर एकरकमी हातात येणाऱ्या पैशांकडे आम्ही डोळे लावून बसतो, पण बऱ्याच वेळेला आम्हाला फटकाही बसतो. मग अशा वेळी कर्ज, उसनवार यांचा आधार घ्यावा लागतो.’’ यावर त्यांनी आपले एक गणित बसवले आहे. वेणूताईंची स्वत:ची शेती ओलीत आहे. तिथे त्या भाजीपाला, हरभरा, गहू घेतात आणि ठेक्याच्या कोरडवाहू शेतीमध्ये तूर आणि कापूस घेतात. तूर आणि कापूस यांचे पैसे एकरकमी हातात पडतात. त्यातील खर्च वजा करून पुढील हंगामासाठी त्या राखून ठेवतात. किंवा एखादा मोठा खर्च असेल तर तो त्यातून करतात. यामुळे कमाई जरी खूप नाही झाली, तरी उसनवारी करावी लागत नाही, त्यामुळे व्याजाचेही पैसे वाचतात. याच वेणूताई हसत हसत हेही म्हणतात, की ‘आम्ही शेती कसली, तरच इतर स्त्रियांना चांगली मजुरी मिळेल.’

हेही वाचा – सांदीत सापडलेले.. ! शिक्षण!

एकीकडे शेतमालाला हमीभाव कमी, निसर्गाचे बदलते चक्र, शेतीचा वाढणारा खर्च, या अडचणी कायम आहेतच. मग तरी या एकल स्त्रिया ठेक्याचे पैसे देऊन वर स्वत:चे उत्पन्न कसे काय काढू शकतात?… यावर उषाताई सहजपणे बोलून गेल्या, ‘‘आम्ही छोटे शेतकरी आहोत. त्यामुळे आम्हाला नुकसानाची झळ बसतेच. पण इतर व्यवसायांतसुद्धा धोके असतात, चढउतार असतात ना! ते लोक आपले उद्याोग, व्यवसाय बंद नाही करत, मग आम्ही शेती का सोडावी?’’ नुकसानाची झळ कमी व्हावी, याकरिता काही स्त्रियांनी एकापेक्षा अधिक शेतांचा ठेका घेतला आहे, तर काही जणी शेतीच्या जोडीला इतर व्यवसायसुद्धा करतात.

मनोरमा यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे आणि त्या दीड एकरावर त्यांच्या सासूसह अधिक दोन वारस आहेत. त्यांनी काही वर्षे दुसऱ्याची शेती ठेक्याने केली. मग या कामांतून त्यांची दखल घेतली गेली आणि आज त्या गावात ‘कृषी सखी’ म्हणून काम करत आहेत. ‘कृषी सखी’ हा नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठीचा केंद्र सरकारचा एक उपक्रम असून त्याअंतर्गत शेतीविषयक प्रशिक्षण मिळण्याचे, देण्याचे काम केले जाते.

मनोरमा यांच्यासारखेच उदाहरण सागरबाईंचे आहे. अकोला जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि ठेक्याने शेती करणाऱ्या सागर यांचीही गावाची ‘कृषी सखी’ म्हणून निवड झाली. त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी सरपंचपदासाठी उभे राहावे, असा गावातून आग्रह झाला. सागरबाईंनी निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस केले नाही, पण त्यांनी स्वत:चे एक स्थान गावात निर्माण केले आहे, हे मात्र यात अधोरेखित झाले.

एकल स्त्रियांशी संवाद साधताना त्यांच्याकडून आणि इतर स्त्रियांकडूनही सातत्याने हेच मांडले गेले, की त्यांचे वर्तमान आणि भविष्य शेतीशी जोडलेले आहे. त्यात अडचणी असल्या, तरी शेतीशिवाय शाश्वत आणि मोठ्या संख्येने रोजगार देणारा दुसरा पर्याय नाही.

हेही वाचा – शंभरीतलं शहाणपण!

उषाताई सांगतात, ‘‘मला मिरगीची बिमारी (आकडी वा फिट येणे) आहे. लोक मला वेडी किंवा भूताची बाधा झालेली म्हणायचे. पण जेव्हापासून मी शेती करू लागले, तेव्हापासून असे टोमणे कमी झालेत. माझ्यासारख्या स्त्रीला इतर कुठल्याच रोजगाराने हा सन्मान दिला नसता.’’

स्त्रियांना शेतीबाबत असलेल्या जिव्हाळ्यात त्यांची सुरक्षितता आणि त्यांचा सन्मान दोन्ही समाविष्ट आहे. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. हा केवळ काही स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न नाही. ग्रामीण स्त्रियांबद्दलच्या सामाजिक मानसिकतेत हळूहळू होणारा बदल आणि त्यांना या रोजगारात खंबीरपणे उभे राहण्यासाठी तयार होणारे पोषक वातावरणही महत्त्वाचे आहे. ते व्यापक स्वरूपात तयार व्हायला हवे. तर आणखी शेतमजूर स्त्रिया शेतकरी होण्यासाठी प्रयत्न करतील… यशस्वीपणे शेती कसतील. त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेत स्त्रियांचा वाटा वाढवायचा असेल, तर धोरण व योजना निर्मिती करताना हे लक्षात ठेवायला हवे.

prakritingp1990@gmail.com