स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टीच भारतीय स्त्रीच्या अध:पतनाला कारणीभूत आहेत हे स्वामीजींना जाणवले होते. ज्या देशात मातृत्वाचा गौरव केला जात होता, त्याच देशात स्त्रीत्वाची मात्र उपेक्षा केली जात होती. प्रथम स्त्री सुविद्य झाली पाहिजे. त्यानंतरच तिच्या आत्मप्रकटीकरणाचे युग सुरू होईल, असे स्वामीजींना वाटत होते. स्त्रीविकासाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणाऱ्या विवेकानंदांच्या आजपासून सुरू होणाऱ्या १५०व्या जयंतीनिमित्त खास लेख.
सिस्टर ख्रिस्तीनी यांनी स्वामी विवेकानंदांचे मोठेपण विशद करताना म्हटले आहे- ‘Blessed is the country where he was born, blessed are the people who were present on the earth at the same time and blessed thrice blessed are those few who sat at his feet.’ विवेकानंदांचे सबंध जीवन हा पौरुषाचा, पराक्रमाचा, धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या जयघोषाचा महोत्सव होता. कोलकात्याला महाविद्यालयात शिकत असताना विल्यम वर्ड्सवर्थची ‘एक्सर्कशन’ नावाची कविता समजून घेत असताना देवाच्या अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न विवेकानंदांच्या मनात निर्माण झाले. या जगात देव आहे का? असला तर तो कोणी पाहिला आहे का? पाहिला असला तर तो मला दिसेल का? या प्रश्नांची उत्तरे शोधत विवेकानंद रामकृष्णांच्या दिशेने गेले आणि गुरूंची योग्यता पटल्यानंतर त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. १८८६ साली रामकृष्ण कालवश झाले आणि जाताना आपला समृद्ध आध्यात्मिक वारसा विवेकानंदांना देऊन गेले. त्यानंतर विवेकानंदांनी भारतभ्रमण केले. त्यांची सांगता कन्याकुमारीच्या दर्शनाने झाली. या परिभ्रमणामुळे त्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या, प्रगल्भ झाल्या.
या संपूर्ण प्रवासात त्यांना जे समाजदर्शन घडले ते मन विषण्ण करणारे होते. धर्माला आलेली अवकळा त्यांनी पाहिली. रूढी, परंपरांनी स्त्रियांचे जीवन केवळ झाकोळून टाकलेले नाही, तर त्यांच्या जीवनात दाट काळोख निर्माण केला आहे हे त्यांनी जवळून पाहिले. पंथाभिमान, स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टीच भारतीय स्त्रीच्या अध:पतनाला कारणीभूत आहेत हे स्वामीजींना जाणवले होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव, अशी संस्कृती असणाऱ्या या देशात मातृत्वाचा गौरव केला जात होता, पण स्त्रीत्वाची मात्र उपेक्षा केली जात होती. प्रथम स्त्री सुविद्य झाली पाहिजे. त्यानंतरच तिच्या आत्मप्रकटीकरणाचे युग सुरू होईल, असे स्वामीजींना वाटत होते. संन्यस्त धर्म स्वीकारल्यानंतर विवेकानंद आरंभीच्या काळात तसे परंपरावादी होते. भारतभ्रमण करीत असताना घडलेल्या एका घटनेने त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविले. खेतडी नरेशांनी एका नृत्य जलशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वामीजींना ज्या वेळी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले, त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मी संन्यासी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मी येणार नाही. स्त्रियांचे मुखदर्शनही मी टाळतो.’’ स्वामीजींची ही भूमिका त्या नर्तकीला समजली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. तिने सूरदासाची एक रचना सादर केली. त्या रचनेचा आशय होता, ‘हे प्रभू, तुझ्यापाशी श्रीमंत, गरीब, लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा कसलाही भेद नाही. तू समदर्शी आहेस. लोखंडाच्या एका तुकडय़ापासून कसायाच्या हातची सुरी तयार होते. त्याच लोखंडापासून भगवंताची मूर्तीही तयार होते. कसायाच्या हातची सुरी आणि भगवंताची मूर्ती या दोहोंनाही जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा त्याचे रूपांतर सोन्यातच होते. ही सुरी आणि ही मूर्ती असा भेद परीस करीत नाही. पावसाचा थेंब गंगेच्या पात्रात पडतो आणि त्याला तीर्थाचे रूप प्राप्त होते. त्याच पावसाचा थेंब गटारात पडतो आणि वाहत जाऊन मोठय़ा गटाराला मिळतो. हे दोन्ही प्रवाह जेव्हा समुद्राला जाऊन मिळताच तेव्हा हे गंगेचे पाणी आणि हे गटारातले असा भेद सागर करीत नाही. मग आम्ही माणसेच असा भेद का करतो?’ हे त्या नर्तकीचे विवेचन ऐकल्यानंतर विवेकानंद उठून ज्या तंबूत हा जलसा चालला होता तिथे गेले आणि त्या नर्तकीला म्हणाले, ‘‘सामाजिक अद्वैताचा पाठ आज तुमच्या पायाशी बसून मी घेतो आहे.’’ या घटनेनंतर विवेकानंद बदलून गेले.
अमेरिकेत गेल्यानंतर विवेकानंदांना सनबर्न नावाच्या बाई भेटल्या. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून विवेकानंद सर्वधर्म संमेलनासाठी गेले असले तरी त्यांच्याकडे सहभागासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नव्हते. सनबर्न बाईंनी त्यांची हार्वर्ड विद्यापीठातले ग्रीक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक जे. एच. राईट यांच्याशी भेट घडविली. त्यांनी विवेकानंदांशी चर्चा केल्यानंतर ‘Here is a man who is more learned than all our learned professors put together’ अशा आशयाचे पत्र संयोजन समितीला दिले. त्यामुळे सर्वधर्म संमेलनात आपले विचार व्यक्त करण्याची संधी स्वामीजींना मिळाली. अमेरिकेतल्या वास्तव्यात स्वामीजी सनबर्न बाईंबरोबर तिथले महिलांचे कारागृह पाहण्यासाठी गेले. गुन्हेगार महिलांची तिथे योग्य रीतीने देखभाल केली जात होती. मुख्य म्हणजे त्यांना माणूस म्हणून वागवले जात होते. ते कारागृह पाहून बाहेर आल्यानंतर स्वामीजींचे डोळे पाणावले. सनबर्नबाईंनी त्यांना विचारले तेव्हा स्वामीजी म्हणाले, ‘‘माझ्या देशातल्या स्त्रिया गुणसंपदेच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत, पण धर्मामुळे लादल्या गेलेल्या गुलामगिरीमुळे आणि रूढी- परंपरांच्या प्रभावामुळे त्यांचा विकास होऊ शकलेला नाही. त्यांच्यासाठी मी आजपर्यंत काहीही करू शकलो नाही याची खंत माझ्या मनात आहे.’’
भारतीय स्त्रीने अमेरिका आणि इंग्लंड इथल्या स्त्रियांप्रमाणे स्वावलंबी व्हावे, असे स्वामीजींना वाटत होते. ‘भारतीय नारी’ या पुस्तकात त्यांनी या संदर्भातले आपले विचार मांडले आहेत. भगिनी निवेदितांना स्वामीजी एकदा म्हणाले होते, ‘‘माझ्या देशातील स्त्रियांच्या उद्धारासाठी इथल्या समाजातून एखादी स्त्री पुढे येऊन उभी राहील आणि भारतीय महिलांच्या उत्थापनासाठी ती काम करेल अशी परिस्थिती आणि शक्यता सध्या तरी भारतात दिसत नाही. आरंभीच्या काळात मला पाश्चिमात्य देशातून ‘कार्यकर्ता स्त्रिया’ या कामासाठी आणाव्या लागतील.’’ स्वामीजींच्या या विधानाचा विचार करताना त्या काळाचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. पुढे स्वामीजींच्या विचाराने प्रभावित झालेल्या अनेक पाश्चात्त्य शिष्या आपला देश, धर्म आणि संस्कृती सोडून या देशात आल्या, इथेच रमल्या. त्यांनी कामांचे डोंगर उभे केले आणि आपल्या गुरूचे चिरंतन स्मारक आपल्या कार्यातून उभे केले. या सर्व शिष्या उच्चविद्याविभूषित, उच्चभ्रू आणि सधन वर्गातल्या आणि समाजकार्याची आवड असणाऱ्या होत्या. स्वामीजींचे विचार ऐकल्यानंतर मार्गारेट नोबेल (भगिनी निवेदिता) स्वामीजींना म्हणाल्या होत्या, ‘‘मी भारतात येते. संन्यास घेते. हिंदू धर्माचा स्वीकार करते. मुलींसाठी शाळा काढते. स्त्रियांसाठी वर्ग चालवते.’’ स्वामीजींना असे काही हवे होते, पण केवळ भावनेच्या भरात काही करणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी तिला सांगितले, ‘‘तुला गरीब व्हावे लागेल. गर्दीत, गैरसोयीच्या ठिकाणी राहावे लागेल. अंधश्रद्धा, जातीयता यांनी ग्रासलेल्या खेडवळांना सांभाळून घ्यावे लागेल. तुझ्या आजवरच्या संपन्न आणि सुसंस्कृत जीवनाशी हे सारे विसंगत असेल. चालेल का हे तुला?’’ बाई अनेक दिवस आपल्या अंतर्मनाचा वेध घेत राहिल्या. स्वामींनी आपल्या अनुमतीसाठी त्यांना तसेच तिष्ठत ठेवले. शेवटी कौल मिळाला. स्वामीजी म्हणाले, ‘‘भारतीय भगिनींच्या उत्थानासाठी मला सिंहहृदयाची सुकन्या हवी होती. तू आलीस, भारतीय झालीस तर भारतभूमीचे भाग्य उजळेल.’’ १८९८ मध्ये स्वामीजींनी मार्गारेट नोबेल यांना ब्रह्मचारिणीची दीक्षा दिली आणि ‘निवेदिता’ हे नाव दिले. त्यांच्यापाठोपाठ श्रीमती केट, एमिली जॉन, सिस्टर ख्रिस्तीनी, जोसेफा ईन मॅक्लिऑड, मेरी सी फंकी, मार्था ब्राऊन फिंके, हेल भगिनी, मॅडम एम्मा काल्व्हे, एस.के. ब्लॉजेट, एलिझाबेथ डचर अशा किती तरी भगिनी भारतात आल्या आणि त्यांनी इथल्या स्त्रियांसाठी मोठे काम उभे केले. या देशातला एक संन्यासी आपल्या पाश्चात्त्य स्त्री शिष्यांना घेऊन या देशात येतो आहे, त्यांना इथे काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे, इथल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्याद्वारे प्रयत्न करतो आहे, ही गोष्ट त्या काळातल्या धर्ममार्तण्डांना मानवणारी आणि सहन होणारी नव्हती. त्यांनी टीकेची झोड उठवली, पण त्याला न जुमानता स्वामीजींनी आपले काम सुरू२ ठेवले. हे सारे काळाच्या संदर्भात जेव्हा आपण तपासून पाहू तेव्हा स्वामीजींचे मोठेपण आणि त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येईल. स्त्री शिक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट होती. स्वामीजी म्हणत, ‘Educate your women first and leave them to themselves then they will tell you what reforms are necessary for them’ स्त्रियांना शिक्षण देताना त्यात चार गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे असे त्यांना वाटत होते. ते म्हणत, ‘We want that education by which character is formed, strength of mind is increased intelluct is expanded and one can stand on his own feet.’ स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्यासाठी व्यापक समाजशिक्षणाची आवश्यकताही त्यांनी विशद केली.
स्वामी रामाकृष्णानंद यांना रामकृष्ण मठाच्या आचारसंहितेसंदर्भात एक विस्तृत पत्र स्वामीजींनी लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधीही एकाच पंखाने उडू शकत नाही. रामकृष्ण अवतारात स्त्रियांचा ‘गुरू’ म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणून स्त्रिया या जगन्मातेचे रूप आहेत. म्हणूनच स्त्रियांसाठी मठ स्थापण्याचा माझा सर्वप्रथम प्रयत्न राहील. या मठातून गार्गी, मैत्रेयी आणि त्यांच्याहूनही अधिक श्रेष्ठ स्त्रिया पुढे निर्माण होतील. स्त्रियांच्या उन्नतीमध्ये पुरुषांनी लुडबुड करू नये. त्यांचे प्रश्न त्या सोडवतील एवढे बळ त्यांच्या पंखात निर्माण करण्याची गरज आहे.’
पुरुषांसाठी ज्याप्रमाणे रामकृष्ण आश्रम स्थापन झाला त्याप्रमाणे स्त्रियांसाठी स्वतंत्र शारदा मठ स्थापन व्हावा, अशी स्वामीजींची प्रामाणिक तळमळ होती. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे हे स्वप्न साकार झाले.
विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित होऊन भारतात आलेल्या त्यांच्या पाश्चात्त्य शिष्यांनी इथे मुलींसाठी शाळा काढल्या. प्रौढ महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यासाठी परदेशी दौरे करून देणग्या मिळविल्या. रुग्णालये उभारली. प्लेगच्या साथीत उच्चविद्याविभूषित असणाऱ्या या शिष्यांनी प्रसंगी हातात खराटे घेऊन स्वच्छतेचेही काम केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. साथीचे रोग पसरत असताना मोठे मदतकार्य उभे केले. विधवांच्या प्रश्नांवर काम केले. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कार्यात स्वामीजींनी स्त्रियांना समाविष्ट आणि सहभागी करून घेतले. एक संन्यस्ताने भारतमातेला दैवत मानून, कालिमातेचे स्मरण करून, पाश्चात्त्य स्त्री शिष्यांकरवी इथल्या स्त्रियांच्या उत्थापनासाठी प्रतिकूल काळात जे काम केले, त्याचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या मालिकेत विवेकानंदांचे स्थान खूप वरचे आहे. असे असतानाही त्यांचे स्त्रियांच्या संदर्भातले काम दुर्लक्षिले गेले आहे. त्यांची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी होत असताना ही गोष्ट मान्य करून चूक सुधारण्याचे काम जाणकारांनी करायला हवे.
‘स्त्रीच्या आत्मप्रकटीकरणाचे युग येईलच’
स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टीच भारतीय स्त्रीच्या अध:पतनाला कारणीभूत आहेत हे स्वामीजींना जाणवले होते. ज्या देशात मातृत्वाचा गौरव केला जात होता, त्याच देशात स्त्रीत्वाची मात्र उपेक्षा केली जात होती. प्रथम स्त्री सुविद्य झाली पाहिजे.
आणखी वाचा
First published on: 12-01-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women has to become literate after which she can prove and establish her in the coming years