स्त्रियांच्या साहित्याविषयी जेव्हा ‘स्मरणरंजन’ आणि ‘स्वप्नरंजन’ हे शब्द वापरले जातात, तेव्हा त्यात सूक्ष्म उपहासाचा भाव असतो. आठवणींमध्ये रमणे म्हणजे स्वत:ला कोशात अडकून ठेवणे आणि स्वप्नात रमणे म्हणजेही स्वत:पुरती स्वप्ने विणणे, असा अर्थ त्यात अभिप्रेत असतो. म्हणूनच सरसकट सर्वच स्त्रीसाहित्याबाबत अशा दृष्टिकोनातून पाहाणे योग्य नाही. त्यासाठी ‘स्मरणसंजीवन’ आणि ‘स्वप्नसंजीवन’ हे शब्द रुढ करावेसे वाटतात.

साधारणत: आपल्याकडे रूढ असलेले शब्द आहेत, ते ‘स्मरणरंजन’ आणि ‘स्वप्नरंजन’. मात्र स्त्रीसाहित्याचे बारकाईने वाचन करताना मला दोन शब्द नव्याने रूढ करावेसे वाटतात. एक शब्द आहे- ‘स्मरणसंजीवन’ आणि दुसरा- ‘स्वप्नसंजीवन’, कारण  स्त्रियांच्या साहित्याविषयी हे शब्द जेव्हा वापरले जातात, तेव्हा त्यात सूक्ष्म उपहासाचा भाव असतो. आठवणींमध्ये रमणे म्हणजे स्वत:ला कोशात अडकून ठेवणे आणि स्वप्नात रमणे म्हणजेही स्वत:पुरती स्वप्ने विणणे, असा अर्थ त्यात अभिप्रेत असतो. काही स्त्रीलिखित साहित्याबाबत कदाचित असे म्हणता येईल! पण सरसकट सर्वच स्त्रीसाहित्याबाबत अशा दृष्टिकोनातून पाहाणे योग्य नाही. आपण जेव्हा ‘स्मरणरंजन’ आणि ‘स्वप्नरंजन’ असेच दोन शब्द वापरतो, तेव्हा आपण ‘स्मरण’ आणि ‘स्वप्न’ यांच्याविषयीही फक्त एकांगी पद्धतीने विचार करीत राहतो. दुसरे म्हणजे आपण आपली भाषाही स्मरण आणि स्वप्न यांविषयीच्या वेगळ्या जाणिवा व्यक्त करण्यापासून वंचित ठेवतो हे थांबवायला हवे.
स्त्रीसाहित्यात ‘स्मरणसंजीवन’ही आढळते. त्याची काही उदाहरणे पाहू- रमाबाई रानडे (‘माझ्या आयुष्यातील काही आठवणी’), लक्ष्मीबाई टिळक (‘स्मृतिचित्रे’) या सुरुवातीच्या स्त्रीलिखित महत्त्वाच्या आत्मकथनांमध्ये ‘स्मरण’ हाच अनुभव केंद्रवर्ती आहे. रमाबाई रानडे यांनी आपले पती न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या आठवणी मनात जागवत त्यांच्या मृत्यूनंतर स्वत:चे सामाजिक कार्य चालू ठेवले होते. लक्ष्मीबाई टिळकांच्या बाबतीतही तसेच घडले आहे. त्यांनीही रे. टिळकांचे अपुरे लेखन प्रकल्प (‘ख्रिस्तायन’ काव्य) पूर्ण केले. आठवणी या त्यांच्यासाठी प्रेरक, संजीवक होत्या. आठवणी लिहिताना त्या मनाने दु:खातून बाहेर येत होत्या. कृतिशील होत होत्या. स्त्रीसंवदनेचा हा विशेष आपण नीट समजावून घ्यायला हवा.
आनंदीबाई शिर्के यांनी ‘सांजवात’ या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे, ‘संध्याकाळी देवापुढे सांजवात लावून बसते तेव्हा साहजिकच गतजीवनाचे सिंहावलोकन होते. वाटते सारी उमेदीची वर्षे मी संकटांना सामोरी जाण्यातच घालविली का? जन्मभर संकटांशीच झगडत राहिले का? नाही. हे सर्वस्वी खरे नाही. माझ्या जीवनात हिरवळही पुष्कळ होती. सुखात जसे साथी-सोबती होते, तशी संकटकाळीही मी एकटी-एकाकी नव्हते.’ आनंदीबाईंनी अशा शब्दांत स्मृतींविषयीची कृतज्ञताच एक प्रकारे व्यक्त केली आहे. वार्धक्यावस्थेत एकाकीपणात या स्मृतींनी त्यांना सोबत तर केलीच, शिवाय जगण्याचे बळही दिले.
आयुष्यात असे ‘स्मरणसंजीवन’ अनुभवणारी आणखी एक लेखिका आहे- मंगला केवळे. त्यांचे ‘जगायचंय प्रत्येक सेकंद’  हे आत्मकथन वाचताना याचा प्रत्यय येतो. त्यांचे पती डॉ. यशवंत यांचे तरुण वयात अपघाती निधन झाले. अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देऊन संसारात स्थिरावलेल्या मंगलाताईंवर हा वज्राघात होता. पण, ‘आपल्याला प्रयत्नवादाच्या जोरावर हे क्षणभंगूर जीवन जगायचंय प्रत्येक सेकंद!’ हे पतीचे स्मृतीत चिरंतन राहिलेले शब्द त्यांना बळ पुरवीत गेले.
स्त्रीकाव्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यावरही याचा अनुभव येतो. शांता शळके जेव्हा पुढील ओळी लिहितात-
‘मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकडय़ांनो,
आजीला माझे कुशल सांगा’ (‘गोंदण’)
तेव्हा वस्तूशी निगडित स्मृतींनी भावजीवनाला पुरवलेले अस्तर लक्षात येतेच. त्याचबरोबर हेही लक्षात येते की जगण्यातील एकसंधपण टिकवण्यासाठी स्मृतींना महत्त्वाचे स्थान आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे आपण सोयीसाठी पाडलेले काळाचे कप्पे असतात. वर्तमानकाळ हा इतका चिंचोळा असतो की त्याला भूतकाळामुळे-अर्थातच स्मरणामुळे- सातत्याचा वारसा  मिळत असतो आणि भविष्याविषयीच्या ओढीमुळे- म्हणजेच स्वप्नांमुळे गती मिळत असते. जगण्याचे हे प्रवाहीपण लक्षात घेता ‘स्मरणरंजन’ आणि ‘स्वप्नरंजन’ अशा फक्त एकाच कोनातून पाहणे, म्हणजे जगण्याचे समग्रपण दुर्लक्षित करणे ठरते.
वैयक्तिक जीवनात विविध स्मरणे आठवत राहणे: हा अनुभव निखळ दु:खाचा असेलच असे नाही. इंदिरा संतांच्या कवितांमध्ये पति-निधनानंतर निर्माण झालेली भावनिक पोकळी त्यांना सतत गतजीवनाच्या स्मृतींच्या आवर्तात खेचत राहिलेली दिसते. पण त्यांची कविता सूक्ष्मतेने वाचताना हे जाणवते की त्या स्मरणातून स्वत:तील कलावंत मनाला ऊर्जा मिळवून देत आहेत. वेगळ्या प्रकारे नवजीवन अनुभवीत आहेत. त्या एके  ठिकाणी लिहितात-
‘घुसमटले मी जळले, बुडले
पुन्हा कशी पण तळहातावर
नवजाता मी भ्याले. हसले!’ (‘मेंदी’)
काही वेळा वैयक्तिक जीवनातील स्मृती या व्यक्तीच्या जीवनदृष्टीवरच खोल ठसा उमटवून जातात. प्रज्ञा दया पवार आपल्या एका कवितेत आपल्या आजीच्या जगण्याच्या आठवणी शब्दबद्ध करतात. त्या लिहितात-
‘कुक्कू पुसल्यावर। रांडय़ाभुंडय़ा कपाळांनं ।
उरी फुटून गावगाडय़ाला जुंपून ।
आज्जे तू सरवा वेचल्या। डोंगरमाथ्यावरून मोळ्या वाहिल्या।’
(‘उत्कट जीवघेण्या धगीवर’)
या आठवणींमधील उत्कट जीवघेणी धग त्यांच्या काव्यातील विद्रोही सूर जागा ठेवणारी आहे, हे विसरून चालणार नाही.
जे स्मरणाबाबत तेच स्वप्नाबाबतही खरे आहे. व्यक्तिमनाच्या भावकोशातून उमलणारी स्वप्ने ही प्रत्येकवेळी स्वत:पुरती मिटून जाणारी असतात; असे मुळीच नसते. स्वप्ने व्यक्तींच्या जगण्याचा अवकाश अधिक विस्तृत करणारीही असतात. संजीवनी मराठे आपल्या एका कवितेत म्हणतात,
‘माझ्या स्वप्नांमधला मोहर
कुजबुजतो ताऱ्यांच्या कानी’ (‘चित्रा’)
विश्वाशी असे अमूर्त पातळीवर नाते जोडण्याची स्वप्नांची क्षमता स्त्रीमन जाणून असते. स्त्रीसंवेदनाचा हा एक पैलू आहे.
कविता महाजन एका कवितेत लिहितात :
‘मला आठवताहेत, कोवळ्या वयात आम्ही
दोघींनी मिळून पाहिलेली स्वप्ने:
आम्हाला कधी तरी, घराच्या गच्चीवरून
धगधगतं पिवळं उन्ह रंगवायचं होतं’ (‘तत्पुरुष’)
त्या कवितेत जिच्याबरोबर कवयित्रीने ही स्वप्नं पाहिली होती, तिचा दु:खद अंत वर्णन केला आहे. मात्र कविता महाजन यांची ‘ब्र’, ‘भिन्न’सारखी पुढील काळातील लेखननिर्मिती पाहता स्त्रीत्वाच्या दातांमध्ये जीभ अडकून ज्यांची स्वप्ने फुलण्याआधी कोमेजली, त्यांना समर्थपणे शब्द देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आढळतो. म्हणजे स्वप्ने त्यांच्या मनातच नव्हेत तर शब्दांतही उतरली. काही वेळा व्यक्तिमनाची स्वप्ने समूहाच्या नेणिवेत अबोध पातळीवर घर करून राहतात. अशा वेळी ती स्वप्ने म्हणजे स्वप्नसंजीवन असते, आशावादाचे ते प्रखर रूप असते.
‘मी पाणी होऊन वाहत जाईन
पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत
मी माझ्यातून उसळून पोहोचेन
माझ्यात नांदणाऱ्या साऱ्यांपर्यंत
निनादेल तिथे तिथे
पाण्याची शीळ नि जगण्याची धून
 पाण्यात विरघळलेली स्वप्ने
येतीलच येतील तरारून’ (‘जगण्याच्या कोलाहलात’- नीलिमा गुंडी) असे लिहिताना स्वप्नांचे हेच वर्तमानाला भविष्यवेधी आकार देणारे सर्जनशील रूप अभिप्रेत असते.
एखाद्या कवयित्रीच्या मनातील स्वप्न तिच्या पिढीकडून पुढील पिढीकडे कसे संक्रमित होत जाते, हेही पाहण्याजोगे आहे. कवयित्री पद्मा गोळे यांनी आपल्या ‘आकाशवेडी’ या कवितेत आकाशात उंच झेपावण्याचे आपले स्वप्न सांगितले आहे, ते असे-
 ‘मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी!’
आज शीतल महाजनची पक्ष्याच्या पोशाखात आकाशातून घेतलेल्या उडीची रोमहर्षक बातमी वाचताना वाटते, पद्मा गोळे यांचे स्वप्न जणू साकार झाले आहे! स्वप्ने अशी व्यक्तीलाच नव्हे, तर समाजमनालाही गती देऊ शकत असतात.
शेवटी एक महत्त्वाचा तपशील पुरवावासा वाटतो. तो म्हणजे ‘आमार जीवन’ (१८७६) ही बंगालमधील राससुंदरी देवी यांनी लिहिलेली आत्मकहाणी म्हणजे भारतीय भाषांमधले पहिले स्त्रीलिखित आत्मकथन होय. निरक्षर अशा राससुंदरी देवींना एकदा स्वप्न पडले की त्या चैतन्य भागवताची पोथी वाचत आहेत! त्या स्वप्नामुळे झपाटून जाऊन त्या लिहा-वाचायला शिकल्या. स्त्रीसाहित्यातील स्वप्नसंजीवनाची ही नांदीच म्हणायला हवी. आता तरी आपण स्त्रीसाहित्यात स्मरणसंजीवन आणि स्वप्नसंजीवनही आढळते, याची नोंद घ्यायला पाहिजे.    

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Story img Loader