सा माजिक दृष्टीने मुद्रित माध्यमांची एकंदर भूमिकाच समाजाचे वैचारिक नेतृत्व करणारी असते. वृत्तपत्र वा नियतकालिकाचे ‘संपादकीय’ त्यांची भूमिका विशद करण्यात मोलाची भूमिका बजावते. संपादकीयाला वृत्तपत्र-परिभाषेत ‘अग्रलेख’ म्हणतात. ‘अग्रलेख’ हा मुद्रित माध्यमाला वैचारिक कणा प्राप्त करून देतो. वृत्तपत्रांच्या तुलनेत नियतकालिकांतील संपादकीयाला मर्यादित वाव असला तरी नियतकालिकांतील ‘संपादकीय’सुद्धा समाजाच्या प्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे काम करतात. काळानुरूप, बदलत्या जबाबदारीनुसार संपादकीयाचे स्वरूपही बदलत जाते.
१९३० नंतरच्या काळात स्त्रियांच्या सर्वागीण विकासाला पूरक साथ देणारी भूमिका एकंदर नियतकालिकांनी घेतली. ‘स्त्री’च्या संपादनातून शंवाकिंनी (शंकरराव किलरेस्कर)संपादनाचा नवीन आविष्कार घडवला. त्याच बरोबरीने संपादकीयातून ‘स्त्री मनाशी संवाद’ करण्याची पद्धत विकसित केली. संपादक म्हणून असणारी जबाबदारीची जाणीव, विचारांचा ठामपणा, अभिव्यक्तीतील परखडता, काळाबरोबर विकसित होताना, संपादकीयातून लेखनाच्या होणाऱ्या संवादाला लय सापडली. संपादकीय लेखनाचा नवा आविष्कार झाला. विषयाच्या दृष्टीने व्यापकता आली. प्रत्येक मासिकाचे स्वत:चे स्वरूप, वाचकवर्ग यानुसार ‘संपादकीय’ शैली साहजिकच वेगळी राहिली तरीही स्त्रीजीवन, समाजजीवन जसे पुढे सरकत गेले, त्यानुसार संपादकीयातील संवादात नवे विषय येत गेले. तारा टिळक या ‘संपादकीय स्फुट’ शीर्षकाने ‘गृहलक्ष्मी’चे संपादकीय लिहीत. तेथपासून ‘वनिता विश्व’पर्यंत स्त्रीलिखित संपादकीय ‘अग्रलेखा’च्या दर्जापर्यंत विकसित झाली.
स्त्रीविषयक प्रश्नांपासून साहित्यक्षेत्र, राजकीय घटनांपर्यंत संपादकीय लेखनात येणारी सर्वसमावेशकता स्त्रियांच्या वैचारिक प्रगल्भतेची द्योतक झाली. ‘स्त्री’च्या पहिल्या अंकापासून शंकरराव किलरेस्कर यांनी संपादकीयातून स्त्री मनाशी संवाद सुरू केला. भगिनी समाजाच्या कार्याला ‘स्त्री’ने प्रसिद्धी दिलीच. काही भगिनी समाजाचे कार्य विस्ताराने वाचकांसमोर यावे म्हणून विशेषांकही काढले. नोव्हेंबर १९४४ चा अंक ‘दादर भगिनी समाज’ विशेषांक होता. त्या निमित्ताने भगिनी समाजाच्या कार्याचे महत्त्वच संपादक स्पष्ट करतात. ‘भगिनी समाज महिला मंडळे’ या संस्थांतून स्त्रिया काय काम करतात हे पुढे आलेच पाहिजे असे ते म्हणत. स्त्रियांना मिरवायला पाहिजे म्हणून त्या समाजात जातात, हा गैरसमज आहे. समाजाचे गैरसमज दूर व्हावेत. स्त्रियांच्या संस्थांचे कार्य समजावे हा हेतू विशेषांकातून सविस्तर कार्य देण्यामागे आहे.. स्त्रियांच्या सार्वजनिक संस्था, ही समाजजीवनात नवीन दिसणारी गोष्ट खरे तर तीस-चाळीस वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती. शिक्षण प्रसारातून सुशिक्षित झालेल्या स्त्रीकडून समाजाच्या काही अपेक्षा आहेत. बालसंगोपन, आरोग्यवर्धन, स्त्री वर्ग उन्नती, कुटुंबव्यवस्था इत्यादी प्रश्न स्त्रियांनी व्यक्तिगत प्रयत्न करून सुटणारे नाहीत. संघटित प्रयत्नांतूनच सुटणारे आहेत. एकत्र जमून विचारविनिमय करून कार्यक्रम ठरवून पार पाडणे. यासाठी महिला मंडळ उपयुक्त संघटना ठरते.
लीलावती मुन्शी यांनी स्त्रियांच्या वसतिगृहाची मागणी केली. १९४७ सालच्या दिवाळी अंकाच्या संपादकीयात शंवाकिंनी त्यानिमित्ताने स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. ‘‘वसतिगृहाची सोय करणे आवश्यक आहे. ती टाळण्याकरिता स्त्री-पुरुष समानतेच्या वादाचा कितीही विपर्यास केला तरी ती मागणी नजरेआड होणार नाही असे म्हटले. हिंदुस्थानच्या घटनेत स्त्री-पुरुषांची समानता मान्य करण्यात आली आहे. पण ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम प्रांतिक सरकारचे आहे.. स्वातंत्र्याचा स्त्री समानतेचा तात्त्विक स्वीकार करणाऱ्या देशभक्तांनी नि:पक्षपातीपणे स्त्रियांच्या मागण्यांकडे पाहणे आवश्यक आहे. स्त्रिया मागणी करू लागल्या की त्या पुरुषांशी भांडायला त्यांची बरोबरी करायला उठल्या आहेत. याच चष्म्यातून जर पुढारीही त्यांच्याकडे पाहू लागले तर स्त्रियांना न्याय मिळणे कठीण होईल.’’
स्वातंत्र्यप्राप्ती आणि ‘स्त्री’चा २०० वा अंक हा योग जुळून आला. तेव्हाही संपादकांनी स्त्रियांना एक दिलासा दिला. ‘पण या पुढील काळ अधिक संधीचा आहे. स्त्रियांपुढेसुद्धा विविध क्षेत्रे उघडी होत आहेत. स्त्रियांची कामगिरी अधिक बिकट आहे. आपली कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी स्त्री किती कौशल्याने व चतुराईने पार पाडते. यावरून तिचे इतिहासात स्थान ठरणार आहे. या वेळी भगिनींच्या प्रत्येक कार्यात त्यांना साहाय्य व मार्गदर्शन करण्याचे काम ‘स्त्री’ मासिक खात्रीने करील.’
माई वरेरकर यांनी स्त्रियांच्या प्रश्नांच्या बरोबरीने राजकीय, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रांतील विषयांचाही परखडपणे वेध घेतला. ‘महिलेसाठी महिला’ असे मासिकाचे धोरण जाहीर झाल्यावर ‘कंपोझिटर्स’सुद्धा स्त्रिया असणार का? या शंकेला परखड उत्तर माई वरेरकर देतात.. स्त्रियांच्या लेखांनी सजलेले मासिक. ही जशी क्रांती घडून आली त्याचप्रमाणे काही दिवसांनी स्त्री ‘कंपोझिटर्स’सुद्धा प्रत्येक कारखान्यात आढळतील. राजकारणांत स्त्रिया शिरतील, कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन लाठय़ांचा मार खातील. अशी कोणी पूर्वी कल्पना केली होती का? मात्र लाठी खाण्याचा प्रकार जसा अनपेक्षित होता. तसे स्त्री- कंपोझिटर्सच्या बाबतीत नाही काय? स्त्रियांच्या जीवनात जशा इतर सुधारणा घडून आल्या, त्याप्रमाणे ही सुधारणाही सहज घडून येईल.’’
१९३३ साली ज्येष्ठ नाटककार काकासाहेब खाडिलकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी काहीशी उशिराच निवड झाली. त्यानिमित्त माई वरेरकर लिहितात, ‘‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी एवढय़ा काळात बऱ्याच स्त्रियांची योजना करणे अशक्य नव्हते. काशीबाई कानिटकर, यमुनाबाई हर्लेकर, कमलाबाई किबे, अवंतिकाबाई गोखले, गिरिजाबाई केळकर यांच्यापैकी कोणालाही अध्यक्ष नेमले असते तर साहित्य संमेलनाचा मांडव ओस पडला नसता.. पुरुषांच्या बाबतीत पंक्तिप्रपंच होत आहे, तिथे स्त्रियांना न्याय मिळेल, ही अपेक्षा करणेच चुकीचे.’’
१९३४ मध्ये लीलावती जैन यांनी ‘स्त्रियांना म्युनिसिपालिटी व डिस्ट्रिक बोर्डाच्या निवडणुकांना उभे राहण्यास बंदी आहे ती उठवावी, असा ठराव पंजाब कौन्सिलमध्ये मांडला. ठरावावर खूप चर्चा झाली. भिन्न धर्मीयांच्या समजुती आड येत असल्याने ठराव अमान्य झाला. मुस्लीम स्त्रियांच्या पडदा पद्धती बदल विशेष चर्चा झाली. त्या विषयी संपादक स्पष्टपणे लिहितात, ‘खरे कारण मुसलमानांविषयी जिव्हाळा नसून स्त्रियांची प्रगती नको आहे. मुसलमानी रूढींची शिक्षा मुसलमानेतर समाजाला का? मुसलमानेतर स्त्रिया निवडून येत्या तर मुसलमानी समाज आपोआप जागा झाला असता. पदाचाही बदल त्यांना विचार करणे भाग पडले असते! ’ तसेच सेन्सार बोर्डावर ‘स्त्री’ प्रतिनिधीची नेमणूक व्हावी, अशी सूचना त्यांनी १९३६ मध्ये केली. प्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर (बाळूताई खरे) यांचे प्रारंभीचे लेखन, ‘विभावरी शिरूरकर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होई. टोपणनाव घेतल्याचा निषेध माई वरेरकरांनी स्पष्ट शब्दात केला. ‘कळय़ांचे नि:श्वास’ या पुस्तकाच्या लेखिकेला स्वत:चा धीटपणा नव्हताच काय? इतक्या निर्भयपणे आपले विचार पुढे मांडावयास तयार असलेल्या लेखिकेला टोपणनावाचे संरक्षण देणारे हे कोण शिष्ट? पुरुषी झब्बूशाहीचे यापेक्षा जास्त ठळक उदाहरण कोठे सापडणार नाही.’
काळ बदलत आहे. जुनी मूल्ये जाऊन नवीन मूल्ये येत आहेत तेव्हा जैन स्त्रियांनी केलेली प्रगती याविषयी लिहिताना, ‘अंधानुकरण न करता योग्य गोष्टीची निवड करावी’ अशी प्रगल्भ दृष्टी ठेवून सुमतीबाई शहा लिहितात, ‘भारताच्या भावी काळात स्त्रियांचे भवितव्य उज्ज्वल व्हावयाचे असल्यास सर्व भगिनींनी इतर राष्ट्रातील स्त्रियांचा इतिहास अभ्यासला पाहिजे.. इंग्लंड, अमेरिका, रशिया या राष्ट्रातील स्त्रियांचे स्थान व त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट याचा इतिहास आपणास माहीत होणे आवश्यक आहे. अर्थात आपणांस दुसऱ्यांची हुबेहूब नक्कल करावयाची नाही किंवा हिंदी स्त्री म्हणजे इतर राष्ट्रातील स्त्रीची प्रतिकृती बनवायची नाही. फक्त चांगले तेवढेच आपल्या परंपरेस साजेल असेच आपणांस उचलायचे आहे. पण त्यासाठी अभ्यास हवा!’
संपादकीय लेखनाचा प्रगल्भ आविष्कार डॉ. चंद्रकला हाटे यांच्या संपादकीयात दिसतो. विषयांचे वैविध्य, विषयाचा सर्वागीण वेध घेण्याची साक्षेपी भूमिका, विचारांमधील समतोलत्व, कालसंगत अन्वय लावताना भविष्याचे सूचन करणारी विचारसरणी इत्यादी अनेक वैशिष्टय़े
डॉ. हाटे यांच्या संपादकीयातून व्यक्त होतात. महात्मा गांधीजींचा प्रथम स्मृतिदिन, जयपूर काँग्रेस, इंडोनेशियात डचांनी केलेले आक्रमण, कुटुंब नियोजनावर -धावत्या गाडीला खीळ कुठे घालणार?, हिंदू कोड बिल, स्त्रियांच्या परिषदा इत्यादी अनेक विषयांचा परामर्श डॉ. हाटे यांनी संपादकीयातून सातत्याने घेतला.
संपादकांनी संपादकीयांतून सातत्याने केलेल्या ‘संवादा’मुळे स्त्रियांच्या बौद्धिक व वैचारिक विकासाला निश्चित दिशा व वेग प्राप्त झाला. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करू लागल्या. स्त्रियांच्या विचारांची प्रतिबिंबे त्यांच्या प्रतिक्रियांतून लेखनातून उमटू लागली.
डॉ. स्वाती कर्वे – dr.swatikarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा