विसावे शतक लागले तेच मुळी स्त्रीजगताच्या नवीन संवेदना, जाणिवा घेऊन. स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्रियांनीच पुढे येण्याची गरज आहे, याचे तीव्र भान येऊ लागले होते. धार्मिक व सामाजिक द्वंद्वांचा सामना स्त्रीमन करत असले तरी नव्या-जुन्याच्या संक्रमणाची चाहूल निश्चितपणे लागली होती.
एकोणिसावे शतक संपले, विसावे शतक अनेक नवीन संवेदना, जाणिवा बरोबर घेऊनच आले. सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीने बाहय़ जगतात बदल होऊ लागल्याने स्त्रियांच्या विचारांत, मनोरचनेत, संवेदनशीलतेत बदल होऊ लागले. काळाची गरज ओळखून लेखक- संपादकांची नवीन पिढी पुढे आली.
हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स व अण्णासाहेब कर्वे यांच्या शिक्षणसंस्थांनी अल्पावधीत वेग घेतला. विसावे शतक सुरू झाल्यावर रमाबाई रानडे यांनी प्रथम मुंबईत व नंतर पुण्यात ‘सेवासदन’ संस्थेची स्थापना केली. ‘पुणे सेवासदन’ची पहिली समिती सर्व स्त्रियांची होती. स्त्रियांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. स्त्रियांचे संघ, वनिता समाज स्थापन होऊ लागले. रमाबाई रानडे यांच्या ‘हिंदू लेडिज क्लास’च्या वतीने स्त्रियांच्या कलाकौशल्याची प्रदर्शने भरवली जात.
काळ तर ‘केसरी’ व लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाचा होता. या सगळय़ातून स्त्रियांचे मानस विकसित होण्यास अनेक प्रेरणा मिळाल्या. स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्रियांनीच पुढे येण्याची गरज आहे, याविषयी तीव्र भान आले. १९०४ मध्ये मुंबईला पहिली ‘आद्य महिला परिषद’ भरली. स्त्रियांच्या शैक्षणिक-सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने अनेक स्त्रियांनी विचार मांडले. ‘स्त्रियांनी सामाजिक कार्य करण्यास पुढे यावे’ असे आवाहन अध्यक्षीय भाषणात रमाबाई रानडे यांनी केले.
परिषदेचा समारोप करताना काशीबाई कानिटकर यांनी महत्त्वाची जाणीव व्यक्त केली, ‘‘आपण पूर्वी होतो कोण? आता आहोत कशा? आणि यापुढे काय व्हावयास पाहिजे? या गोष्टींचा विचार स्त्रिया करू लागल्या आहेत. स्त्रियांच्या सभांना नावे ठेवणाऱ्या व्यक्तींनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, आपण सुधारणेच्या ओघाप्रमाणे चालला आहात, तर आपल्या अर्धागिनीला मागे अलीकडच्या तीरी ठेवून आपण पलीकडे जाण्याचा प्रयत्न कराल तर तो यत्न फुकट जाईल.’’
काशीबाईंच्या शब्दांतून व्यक्त होणारी स्त्रियांची मानसिक जागृती स्त्रियांना एकाच वेळी विविध संदर्भात विचार करण्यास प्रवृत्त करीत होती. मासिकांमधील लेखनही काळाबरोबर बदलत चालले होते. का.र. मित्र यांचे ‘मासिक मनोरंजन’ केवळ स्त्रियांसाठी प्रसिद्ध होणारे मासिक नसले तरी स्त्रीविषयक लेखनाला, स्त्रियांच्या लेखनाला प्रसिद्धी देण्याची का.र. मित्र यांची भूमिका होती. ‘स्त्रियांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होणारी नाही’ असे त्यांचे मत होते. ‘मनोरंजनात प्रसिद्धीसाठी पाठवायचे लेख आबालवृद्धांना, विशेषत: स्त्रीवर्गाला रुचतील व हितकारक होतील असे सुबोध व सोप्या भाषेत असावेत’ असे आवाहन ते करीत. ‘बिचारी आनंदीबाई’ ही शांताबाई यांची स्त्रीलिखित पहिली कथा ‘मासिक मनोरंजन’मध्येच प्रसिद्ध झाली. कथा, कविता, लेख, पत्रे, स्फुट लेखन, प्रतिक्रिया व्यक्त करणारे लेख यांसारख्या विविध प्रकारच्या लेखनांतून स्त्रियांच्या लेखनाने वेग घेतला.
‘महाराष्ट्र महिला’ व ‘गृहिणी रत्नमाला’ ही स्त्री संपादित मासिकेसुद्धा या काळात प्रसिद्ध होत होती. का.र. मित्र यांच्या पत्नी मनोरमाबाई मित्र ‘महाराष्ट्र महिला’ संपादित करीत. काळाचा रोख ओळखून स्त्रियांच्या मासिकांच्या अंतरंगात महत्त्वाचे बदल होत होते. माहिती, उद्बोधन यापलीकडे जाऊन चर्चा, मुळाशी जाऊन विचार समजावून घेण्याची ओढ, पारंपरिक कल्पनांना तसेच न स्वीकारता, त्याविषयी चर्चा करण्याची स्त्रीमनाची तयार होणारी धारणा विविध संदर्भात व्यक्त होत होती. स्त्रियांच्या संस्था, संस्थांचे उपक्रम, कार्य, व्याख्याने इत्यादींचे वार्ताकन हा नवीन विषय समाविष्ट झाला. ‘स्त्रियांच्या उन्नतीविषयक चळवळींची हकिकत देण्याचे ठरविले आहे. हकिकत कळवावी,’ असे संपादक आवाहन करीत.
‘मुलीची पाठवणी’, ‘एका बालविवाहित स्त्रीचा विलाप’, ‘वृद्ध सासूचा तरुण सुनेस उपदेश’ अशा स्त्रियांच्या कविता प्रसिद्ध होत. ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’, ‘स्त्रियांची प्रसूती व उपचार’ यांसारखे विषय असले तरी आता ‘आदर्श स्त्री’ सदरामध्ये परदेशातील स्त्रियांचा परिचय संपादक प्रसिद्ध करू लागले. ‘व्हिक्टोरिया राणी’, ‘राणी अलेक्झँड्रा’, ‘डचेस ऑफ यार्क’, ‘अमेरिकेतील स्त्रिया’ यांच्याविषयीचा परिचय प्रसिद्ध झाला होता. ‘काल्पनिक संवाद’ या सदराच्या ऐवजी ‘काल्पनिक पत्रव्यवहार’ हे नवे सदर पुढे आले. स्त्रियांचा स्वतंत्र पत्रव्यवहार प्रसिद्ध होई, परंतु स्त्रिया शिक्षित झाल्याने दोन स्त्रियांमध्ये पत्रव्यवहाराच्या शक्यता निर्माण झाल्या. संपादकांनी समयसूचकतेने सदराचे स्वरूप बदलले. पत्रलेखनातून अनुभवांची, विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. टोपणनावाने किंवा काल्पनिक नावांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर, सामाजिक विषयांवर पत्रव्यवहार सुरू झाला. वैचारिक, उद्बोधनाचाच नवीन कालसंगत आविष्कार होता. ‘महाराष्ट्र महिला’पासून ‘वनिता विश्व’पर्यंत म्हणजे १९०१ ते १९५० पर्यंत साधारणपणे या स्वरूपाचा पत्रव्यवहार आपले अस्तित्व टिकवून होता. काळाबरोबर पत्रांचे विषय बदलले. विषयाकडे बघण्याची दृष्टी बदलली. ‘सासू-सुनेचे नाते’, ‘शिक्षणाचे, लेखनाचे परिणाम’, ‘इंग्रजी शिक्षणाने होणारे परिणाम’, ‘हुंडय़ाचा प्रश्न’, लग्न ठरवण्याच्या रीती’, काळाबरोबर येणारा ‘प्रेमविवाह’, ‘महिला मंडळांचे कार्य’ इत्यादी विषय पत्रव्यवहारात आले. ‘सुलभेचा विवाहविषयक दृष्टीकोन’ या अनुताई व सुलभा यांच्या पत्रव्यवहारात’ मी माझ्या पसंतीचा अनुरूप वर (नवरा) निवडणार आहे, असे सुलभा लिहिते. ‘विवाह यशस्वी होण्यासाठी, गावात एक क्लब असावा. मुलामुलींना महिन्यांतून एकदा एकत्र येण्याची संधी द्यावी. ओळख घेऊन त्यांना जीवनाचा जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. अशा पद्धतीने जमलेले ९९ टक्के विवाह यशस्वी होतील’ असा उपाय ती सुचवते. पुढील काळात वधुवर सूचक मंडळे-मेळावे भरू लागले. त्याचेच पूर्वरूप सुलभेच्या पत्रातून डोकावते. १९४२ साली वधुवर मेळाव्याची कल्पना सुचवली जात होती, हे विशेष.
काळ बदलत होता. तरीसुद्धा विसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘स्त्रियांनी शिक्षण घ्यायचे ते सुमाता, सुगृहिणी, सुपत्नी होण्यासाठीच या विचारांचा प्रभाव कायम होता. नवे समोर येत होते, परंतु जुनेही अद्याप सोडवत नव्हते. वैचारिक दृष्टीने काहीसा संधिकाल होता. स्त्रियांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या लेखनातून व्यक्त होई. प्रसंगी नवीन विचारांची प्रभासुद्धा प्रकट होई. ‘लग्नाची वयोमर्यादा’, ‘सुगृहिणी’, ‘स्त्रियांचे शिक्षण’, ‘स्त्रियांना उच्च प्रतीचे शिक्षण असावे का?’, ‘हुंडय़ाची घातुक चाल’, ‘व्रतवैकल्ये’, ‘गृहशिक्षण’ इत्यादी विषयांवरील स्त्रियांच्या लेखनातून स्त्रियांच्या मनातील नव्या-जुन्या विचारांतील द्वंद्व तसेच स्त्रियांच्या विचारांची बदलणारी दिशाच स्पष्ट होते. ‘आमच्या वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ या परिसंवादात १९१० साली आठ स्त्रियांनी विचार मांडले. ‘बालपणच्या विवाहांत एकमेकांचे स्वभाव एकमेकांस कळणे शक्य नसते. म्हणून प्रौढपणी विवाह व्हावा असे वाटते आणि तोही ज्याची त्याने निवड करून व्हावा. हे बरे. सर्व गोष्टींचा विचार करता, ज्याचा त्याने विचार करून आपणांस बांधून घ्यावे हे चांगले आणि असे घडून येण्यास प्रौढविवाहच झाले पाहिजेत’ असे काळाच्या पुढे जाणारे मतच काशीबाई कानिटकर यांनी व्यक्त केले.
‘मासिक मनोरंजन’मध्ये १९१३ साली ‘सुशीलेचे विचार’ या लेखात ‘सुगृहिणी’ या कल्पनेवर चर्चा होती. स्त्री शिकली तरी मर्यादाशील, नम्र स्त्रीच आदर्श गृहिणी अशी कल्पना करून स्त्रीची कर्तव्ये सांगितली होती. बनुताई सहस्रबुद्धे यांना ‘आयडियल वाइफ’ची ही कल्पना अजिबात पटली नाही. ‘सुगृहिणी’ या शीर्षकाखाली त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. ‘मला वाटते, त्यांना पूर्ण स्वतंत्रतेची कल्पना आली आहे. ज्या पतीशी बरोबरीच्या नात्याने वागतात, ज्या आपल्या पतीला कोणत्याही वाईट विचारांपासून- गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना आपले हक्क किती आहेत याची कल्पना आली आहे, ज्यांना आपल्या मुलांचं संगोपन करावयाचे शास्त्रशुद्ध ज्ञान आहे, अशा स्त्रियांनाच ‘आयडियल वाइफ’ असे म्हणावे.’
इंदूरच्या कमलाबाई तावडे यांनी स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ‘हरितालिका व्रतासंबंधी’ काही शंका उपस्थित केल्या. ‘विवाहापूर्वी प्रत्येक स्त्रीने करावयाचे हे व्रत असताना विवाहित स्त्रिया हे व्रत का करतात? त्यासंबंधी माहिती मिळवून मग ती व्रते करावीत, तर ते फलद्रूप होते. सर्व भगिनींना आधी विचार करा, मग जे करणे आहे ते करीत चला. उगीच देखादेखी कोणतीही गोष्ट करणे इष्ट नाही,’ असे स्त्रियांना आवाहनही केले. ‘गृहिणी रत्नमाला’च्या संपादकांनी सदर टिपण प्रसिद्ध करून वाचकांनी माहिती कळवावी, अशी विनंती केली. ठाण्याच्या कमलाबाई दळवी यांची प्रतिक्रिया स्त्रियांची द्विधा मन:स्थिती व्यक्त करते. एकूणच परंपरेविषयी कमलाबाई लिहितात,
‘भगिनींनो, हरितालिका व्रताची एक गोष्ट सोडून दिली तरी इतर धार्मिक आचरणांबद्दल माझे तुम्हांस इतकेच सांगणे आहे की, पूर्ण विचार केल्याशिवाय आपली पूर्ण परंपरा सोडण्यास तयार होऊ नका, असे सांगण्यात मी तुम्हाला ‘जुने ते सोने’ समजण्यास शिकवते, असे मुळीच नाही. मलाही तुमच्याप्रमाणे नवे ते हवे आहे. परंतु नवे घेताना.. ते जर आपल्या आर्य संस्कृतीच्या आड येत नसेल तर त्याचा स्वीकार करावा.’
धार्मिक बाबतीत मानसिक द्वंद्वात घुटमळणाऱ्या स्त्रिया सामाजिक रूढींच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करून उपायही सुचवीत होत्या. ‘हुंडा’ लग्न जमविण्यातील मोठी अडचण होती. चंपा मोहळकर यांनी जून १९२० मध्ये ‘हुंडय़ाची घातक चाल’ या लेखात हुंडा घेणे या प्रथेला कायदेशीर आधार आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर रखुमाबाई दातार यांनी सुचविले- लोकमान्य टिळकांसारख्यांनी मनावर घेतल्यास एखादी हुंडा प्रतिबंधक संस्था का निघू नये? संस्थेचे सभासद होतील त्यांनी शपथ घेतली पाहिजे, की आम्ही आपल्या मुलांचे अगर आप्तांच्या लग्नात बिलकूल हुंडा मागणार नाही. तसेच रखुमाबाईंनी आपल्या दोन्ही मुलांचा विवाह हुंडा न घेता करण्याचा निर्धार व्यक्त केला.
जुन्याची वीण पूर्णपणे उसळली नसली तरी नव्या-जुन्याच्या संक्रमणाची चाहूल निश्चित लागत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा