औषधे आणण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंत अनंत अडचणी सांगणारी ती पोर किती कुचंबणेतून जात होती! ती म्हणाली, ‘डॉक्टर, लग्नाआधी माहेरचे लोक आमचे इतके लाड करतात, काहीही कमी पडू देत नाहीत आणि वर असं सांगतात की ‘आयुष्यात जी काही मजा करायची ती आत्ता करून घ्या, लग्नानंतर यातलं काहीही मिळणार नाही. ‘लग्नापूर्वी’ व ‘लग्नानंतर’ अशी संपूर्ण आयुष्याची विभागणी जर इतकी विसंगत असेल; तर कुठल्या सुज्ञ मुलीला लग्नाची ओढ वाटेल?
श्वेता ही माझी फार वर्षांपासूनची रुग्ण.
१९-२० वर्षांची, नितळगोरी, नाजूक, भावनाप्रधान, बारावीपर्यंत शिकलेली मारवाडी मुलगी. मूळची मुंबईच्या उपनगरात वाढलेली. गेल्याच वर्षी तिचं जोधपूरमधील एका मोठय़ा कुटुंबातील मुलाशी लग्न झालं, मला निमंत्रण असूनही मी जाऊ शकले नव्हते. परवा लग्नानंतर ती पहिल्यांदा माझ्याकडे आली; तेव्हा मला वाटलं, आनंदात असेल ती, कदाचित काही गोड बातमीची खातरजमा करायलासुद्धा आली असेल. पण छे! तिची कर्मकथा ऐकून मी चाटच पडले.
लग्नानंतर नऊ महिन्यांनी तिला पहिल्यांदाच माहेरी पाठवली होती. ती सांगत होती, ‘मला सारखी सारखी दर १५-२० मिनिटांनी लघवी लागते. जाऊन आले की थोडय़ा वेळात पुन्हा लागते. यामुळे माझी रात्रीची झोप कधीच पूर्ण होत नाही. दुपारी तर आम्ही झोपायचा विचारही करू शकत नाही. सासरचे म्हणतात, आपल्या घरी मोलकरीण ठेवण्याची प्रथा नाही, आम्ही सगळी कामं घरीच करतो. त्यामुळे घरातील बायकांनी पहाटेपासून रात्री शेवटचा माणूस घरी येऊन, जेवून उठेपर्यंत व त्यानंतर आवराआवरीची कामं करून मगच झोपायला जायचं. मी तर नवीन लग्न झालेली सून, त्यामुळे सकाळी उशिरा उठण्याची मुभा नाही. लघवीच्या त्रासाने मी थकून जाते, नीट झोप नाही, मी काय करू?’ असं म्हणून ती रडायलाच लागली. तिच्याशी बोलताना जाणवत होतं, ती अनेक न्यूनगंडांनी ग्रासलेली, भेदरलेली होती. स्वत:ला सारखी त्रासही खूप करून घेत होती.
तिच्या एकंदर बोलण्यातून मला त्या घरातील बऱ्याच गोष्टी कळल्या. घरच्या सुनेने बाहेरच्या बठकीच्या खोलीत यायचं नाही; यावं लागलं तर चेहऱ्यावर घुंगट घेऊनच. बाकी क्लासेस, मत्रिणी, शिक्षण, नातेवाईकांना भेटणे, बाजारहाट, नुसतं जगाचं तोंड जरी पाहावंसं वाटलं; तरी बाहेर जाणं सुनेला निषिद्धच! ती कितीही शिकलेली असली, तरी तिने घरात बसायचं. वर्षांतून ४-५ वेळा नवऱ्याबरोबर बाहेर जायला मिळालं, तर ती पर्वणी समजायची. या कोंडवाडय़ाविरुद्ध तिने ब्र देखील काढायचा नाही; नाहीतर आई-वडिलांचा किंवा पुण्या-मुंबईचा (माहेर कुठलं असेल त्याप्रमाणे)उद्धार ठरलेला! म्हणजे पुण्या-मुंबईची मोकळ्या वातावरणातली बायको मिळाली, ही प्रतिष्ठेची बाब लग्न करताना हवीशी वाटते, पण लग्न करून तिकडे गेल्यावर मात्र घराण्याच्या अचाट, न बदलणाऱ्या रूढी-परंपरांमध्ये तिला बरोब्बर तिची ‘जागा’ दाखवून द्यायची, ही तऱ्हा!
    श्वेताला वारंवार लघवीला जाणे, गेल्यावर थोडी थोडी लघवी होणे, पुन्हा थोडय़ा वेळाने लघवीची कळ येणे या तक्रारी होत्या. ती सतत दडपणाखाली असायची, अखंड विचार तरी करीत बसायची किंवा रडत बसायची. तिच्या दुर्बणिीच्या तपासणीत मला शंका होती तोच interstitial cystitis (लघवीच्या थलीला आलेली विशिष्ट प्रकारची सूज) हा आजार सिद्ध झाला. या आजाराची व्यक्ती विशेषत: कमकुवत मनाची, दबलेली अशी असते, याचं प्रमाणदेखील स्त्रियांमध्ये जास्त असतं. असे रुग्ण मनात काहीतरी भीती बाळगून मानसिकरीत्या अस्वस्थ असतात. सर्व गोष्टी श्वेतामध्ये जशाच्या तशा पुस्तकात दिल्याप्रमाणे मिळत होत्या. मी तिला गोळ्या लिहून दिल्या व त्या सहा महिने न चुकता घे म्हणून सांगितलं. ‘तू नक्की बरी होशील’ असा धीर दिला.
आता एका जिवाला किती चिंता ते पाहा- ‘तुम्ही दिलेल्या गोळ्या मी घरात कशी घेऊ? ते लोक म्हणतील, हिला आजार पहिल्यापासूनच होता. मग ते माझ्या आई-वडिलांना बोल लावतील. या माझ्या त्रासाने आमचे संबंध नीट होत नाहीत. माझ्या नवऱ्यालाही माझ्याप्रमाणेच लघवीसाठी सारखं उठावं लागतं. मग माझाच आजार शरीरसंबंधामुळे त्यांना झाला का? हा त्रास मी घरात कोणाला सांगू शकत नाही. लग्नानंतर नऊ महिने उलटून गेले तरी बाळाची चाहूल नाही; म्हणून घरातले लोक मलाच टोकतात. तुम्ही सांगितलेला सहा महिन्यांचा औषधांचा कोर्स संपल्यावर मी तुम्हाला दाखवायला कशी येऊ? आम्हाला तर माहेरी वर्षांतून एकदाच पाठवतात. या संपल्यावर मी पुढच्या गोळ्या तिथे उघड उघड कशी आणू? मला घरातल्या बायका- काकडी, टोमॅटो खाल्ला; तर तुला अजून लवकर लवकर लघवीला जावं लागेल, असं सांगून मला ते खाऊ देत नाहीत, पण मला राजस्थानच्या उष्म्यात काकडी खूप खावीशी वाटते. पण मी जीव मारते. मी हे पदार्थ खाल्ल्याने खरंच माझा आजार वाढेल का डॉक्टर?’ ती एकेक गाऱ्हाणी मांडत होती. तिच्या नवऱ्याला हाच त्रास आहे, तर मग त्याला का नाही डॉक्टरकडे जायला सांगत? असं मी विचारल्यावर ती लगेच म्हणाली, ‘छे! तो कसा जाईल? तो तर म्हणतो, तुझ्यामुळेच मला असं झालं.’ तिच्या एकेक शंका म्हणजे अज्ञान व आलेल्या अनुभवातून घेतलेली भीतीच होती. ‘ना हा आजार एकामुळे दुसऱ्याला शरीरसंबंधातून होतो, ना हा संसर्गजन्य आजार आहे, तुझ्या नवऱ्याला जो त्रास आहे तो तुझ्यापेक्षा वेगळ्या आजाराचा आहे’ हे मी तिला सांगितल्यावर ती जरा मोकळी झाली.
औषधे आणण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंत अनंत अडचणी सांगणारी ती पोर किती कुचंबणेतून जात होती! नंतर ती म्हणाली, ‘डॉक्टर, लग्नाआधी माहेरचे लोक आमचे इतके लाड करतात, काहीही कमी पडू देत नाहीत आणि वर असं सांगतात की ‘आयुष्यात जी काही मजा करायची ती आत्ता करून घ्या, लग्नानंतर यातलं काहीही मिळणार नाही. ‘लग्नापूर्वी’ व ‘लग्नानंतर’ अशी संपूर्ण आयुष्याची विभागणी जर इतकी विसंगत असेल; तर कुठल्या सुज्ञ मुलीला लग्नाची ओढ वाटेल? जर पुरुषांच्या आयुष्यात ‘लग्नापूर्वी’ आणि ‘लग्नानंतर’ असे फारसे दृश्य स्वरूपात बदल होत नाहीत; तर स्त्रियांच्याच बाबतीत इतका विरोधाभास का व्हावा? तो राजरोसपणे मान्य का केला जावा? आनंद, दु:ख, राग, लोभ व्यक्त करायला ‘स्त्री’त्व आड का यावं? स्त्री गर्भाने या जगात येऊन पहिला श्वास घ्यायचा की नाही, हे समाजाने ठरवायचं; आणि स्त्रीने जन्माला आल्यावर तिला मोकळेपणाने श्वास घेत जगू द्यायचं की नाही, हे पण तिच्या घरच्यांनी ठरवायचं? मग हाच का आपला ‘सुधारलेला समाज’ आणि यालाच का तिने म्हणायचं ‘आपलं घर’?
 मला हे ऐकताना २५ वर्षांपूर्वीची माझ्या मेडिकल कॉलेजमधील एका एम.डी. अ‍ॅनेस्थेशियाचं शिक्षण घेतलेल्या मुलीची आठवण झाली. प्रेमविवाह करून गावी नेलेल्या तिच्या हार्टसर्जन नवऱ्यानेदेखील तिला तब्बल आठ वष्रे प्रॅक्टिससाठी घराबाहेर पडू दिलं नव्हतं. या बुरसटलेल्या घरच्या विचारसरणीला शिक्षित मुलगेही विरोध करू शकत नाहीत? ही विशिष्ट समाजपद्धतीची बळी ठरलेली माझी रुग्ण मी प्रत्यक्षात पाहत होते.
तिथेही सकारात्मक बदल सावकाश गतीने जरी घडत असतील तरी त्यांचं स्वागत आहे, पण त्या दिवशी श्वेताला तिच्या आजारासाठी निराशाशामक औषधांचं प्रिस्क्रिप्शन देताना माझी स्थिती फारच निराशाजनक झाली होती; हे मात्र खरंच! प्रश्न पडला, कधी बदलणार हे सारे ?

Story img Loader