रिकामटेकडं बसणं हा विचारसुद्धा अनेकींना नकोसा वाटतो. मोकळा, निवांत, फावला वेळ म्हणजे अगदी शांत, काहीही न करता नुसता तो क्षण अनुभवणं. पण म्हणजे काय, हे कित्येकींना माहीतच नसतं. स्वत:साठी वेळ काढणं, स्वत:साठी जगणं हे त्यांच्यासाठी कर्तव्याच्या उतरंडीवर अगदी शेवटी असतं. कारण काहीही न करण्याच्या रिकामटेकडेपणाला आळशीपणाचा आणि ‘सेल्फ गिल्ट’चा गंध चिकटला आहे.
ऑफिसमधून घरी आलेय… हिवाळ्यातला गारवा वातावरणात छान मुरला आहे… तिन्हीसांजेच्या मंद प्रकाशात खिडकीतून आकाशातला लालिमा अनुभवत निवांतपणे चहा पीत बसलेय… अगदी काहीही न करता. किती तरी वेळ… एक संध्याकाळ अशी वाट्याला आली असतानाच, घरकामासाठी मदतीला येणाऱ्या सविता काकू आल्या. रोज त्या रात्री येतात, आज जरा लवकरच आल्या म्हणून त्यांच्यासाठीही चहा टाकला. मग त्याही बसल्या जरा निवांत… गेल्या दोन वर्षांत मी पहिल्यांदा त्यांना असं शांत बसलेलं पाहात होते. समोरचं आकाश अगदी गुलाबी दिसत होतं. काकूंना म्हटलं, ‘‘आभाळ केवढं भारी वाटतंय ना आज?’’ त्या म्हणाल्या, ‘‘ खरंच असं आकाश कधी पाहाताच आलं नव्हतं. आयुष्यात इतकं रिकामटेकडं एकदा तरी व्हायलाच हवं, लेका.’’ चहाचा पेला उचलत काही क्षण थांबल्या नि कामाची आठवण येऊन लगेच आत गेल्या. पण त्यांनी उच्चारलेला ‘रिकामटेकडा’ हा शब्द डोक्यात घुमायला लागला. निवांतपणा, मोकळा वेळ याची गरज प्रत्येकाला असतेच, पण मिळतो का तो? आणि मिळाला तरी त्या वेळेचं काय करायचं याचं उत्तर मिळालंय का? विशेषत: बाईला!
हेही वाचा – नव्या वर्षाचं स्वागत करताना…
एलिझाबेथ गिल्बर्टचं ‘Eat Pray Love’ हे पुस्तक आणि त्याच नावाचा ज्युलिया रॉबर्ट्स अभिनित चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. यामध्ये ती आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आहे, जिथे समाजाच्या मुख्य प्रवाहातल्या ज्या मान्यता आहेत, त्या जगताना ती अपयशी ठरली आहे, नात्यांमध्ये आणि करियरमध्येही. आता तिला जाणीव होते की, ती स्वत:साठी जगलेलीच नाहीये, म्हणजे ज्या गोष्टी आनंद देतात, त्याचा ‘उपभोग’ घेण्यासाठी ती आत्तापर्यंत कचरलेली आहे. मग मात्र ती स्वत:च आयुष्याचं ‘पॉझ’ बटण दाबते. आणि प्रवासाला निघते. ती इटलीला जाते. जिथे जाऊन ती खास तिथले पदार्थ मनसोक्त खाते. तिथल्या काही स्थानिकांशी तिची मैत्री होती. बोलता बोलता विषय निघतो तो जगण्याचा. ते तिला सांगतात, ‘‘तुम्हा अमेरिकी लोकांना जगण्याचा खरा अर्थ सापडलेला नाहीये. कारण तुम्हाला सतत काहीतरी सिद्ध करायचं असतं. पण आम्ही एक शब्द मनापासून जगतो. तो म्हणजे ‘डोल्से फार नियांते’ (dolce far niente) (आनंद देणारा आळशीपणा, काहीच न करता जगण्याची कला… असं काहीसं)’’ ती खरोखरच भानावर येते. ज्या गोष्टींसाठी तिने स्वत:ला रोखून ठेवलेलं असतं, त्यातूनही ती मुक्त होते…
मी जो रिकामटेकडेपणा म्हणतेय तो या संकल्पनेशी मिळताजुळता आहे. त्यातूनच ‘women leisure time’ या संकल्पनेशी परिचय झाला, याचा अर्थ असा की, काही काळ कुठलंच काम न करता, स्वत:च्या लयीत जगणाऱ्या स्त्रिया. मी अनेकींना त्याविषयी विचारायचा सपाटाच लावला. ‘तुमचा असा खास वेळ असतो का? काढता का? अगदी शांत, काहीही न करता निवांत बसून राहाता का? केलंय का कधी?’ सुरुवातीला तर कित्येकींना त्याचा अर्थच कळला नाही. काहीच न करता बसायचं? कोणतेही छंद नाहीत, घर आवरणं नाही, मुलांच्या मागे नाचणं नाही, पाहुण्यांची उस्तवारी नाही? गोंधळच दिसला अनेकींच्या चेहऱ्यावर!
खरं तर या रिकामटेकडेपणाची गरज असतेच, शरीर-मनाला! पण स्त्रिया ते सहज स्वीकारत नाहीत, याचं कारण ते दडपण, तुम्ही आयुष्यात कुचकामी आहात याची टोचणी देत राहातं. स्वत:ला सतत कामात गुंतवून ठेवल्याने माणूस दीर्घायुषी होतो, हा विचार आपल्याकडे फारच गंभीरपणे घेतला जातो. आम्ही ‘वर्कोहोलिक’ आहोत हे बिरुद लोकांना जास्त प्रिय आहे. त्यातही ‘अल्कोहोलिक’ मधला टॉक्सिक शब्द त्याला जोडला आहे. याच निमित्ताने स्त्रियांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक आरोग्याविषयी मी काही सर्व्हेक्षणे अभ्यासत होते. त्यात असं आढळून आलं की, जागतिक स्तरावर मानसिक आजारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा (९.३ टक्के) स्त्रियांमध्ये (११.९ टक्के) जास्त आहे. साहजिकच प्रश्न पडतो की ‘मोकळा वेळ’ वा ‘विमेन लेजर’ याचा याच्याशी काही संबंध असावा का? हाच धागा पकडून मी, काही मैत्रिणींशी बोलले. वय, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक, सामाजिक, कौटुंबिक स्तर वेगवेगळे असणाऱ्या या सगळ्याजणी होत्या.
या अनेकजणींच्या आयुष्यामध्ये ‘फावला वेळ’ आणि ‘रिकामटेकडेपणा’ या शब्दांची ‘उत्क्रांती’च अजून झालेली नाहीये. त्यात स्त्रिया-मुलींसाठी मोकळा वेळ म्हणजे शॉपिंग करणं, पार्टी करणं, उरलेली कामं पूर्ण करणं, ‘छंद’ या गोड नावाखाली, सतत काहीतरी करत राहणं, त्यातून चार पैसे कमावणं यातच ही संकल्पना आखुडलेली आहे. याचं कारण रिकामटेकडेपणाला आळशीपणाचा आणि ‘सेल्फ गिल्ट’चा गंध चिकटला आहे.
अनेकींना ‘फावल्या वेळेत काय करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर बऱ्याच जणींनी ‘आम्ही अमुक अमुक करतो’, हेच सांगितलं. आमच्या शेजारी राहाणाऱ्या आजींनी तर, काहीच न करता नुसतं बसणं हे मुलीच्या जातीसाठी भयंकरच आहे, असं सांगून टाकलं. त्यांच्या भाषेत काही न करणं म्हणजे ‘गजाल्या गात, उकिरडा हुंगत वेळ वाया घालवणं.’ त्यांचं वय ७८ आहे. नुकतंच आजींचं ऑपरेशन झालंय. ‘घरी एखादी मदतनीस असावी, जेणेकरून मदत होईल असा सल्ला दिला तर त्यावर ‘घरच्या बाईने आराम करू नये. लक्ष्मी निघून जाते’ हे उत्तर मिळालं. स्वत:ला त्रास झाला तरी चालेल, पण त्यागाची मूर्ती हाच स्त्रियांचा खरा दागिना, हे मानणारी पिढी अजूनही आहेच आपल्याकडे!
पणकाही जणींना याचा अर्थ थोडा थोडा का होईना कळू लागलेला आहे, असं जाणवलं. ५७ वर्षांच्या वर्षा चाळके म्हणाल्या, ‘‘मी वरिष्ठ लेखापाल आहे. गेली बरीच वर्षं नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत सुरू होती. अजूनही आहे म्हणा, कधी चहाचा एक घोट निवांतपणे घेण्याची फुरसत मिळत नव्हती. त्यात स्वत:साठी वेळ काढणं खूप कठीण. रोजचा अर्धा अधिक वेळ रेल्वेच्या आणि इतर प्रवासातच जातो. माझ्या पिढीतल्या शहरी स्त्रिया, ज्या नोकरी-व्यवसाय करतात त्यांचं आयुष्य असंच धावपळीचं आहे. या धावपळीत जो दम लागतो, तो अनेक वर्षांचा आहे. आता मुलं मोठी झाल्याने वेळ काढता येतोय, पण इतकी वर्षं जी सतत मेहनत करायची सवय झाली आहे, ती मोडायला वेळ लागणारच.’’
महाबळेश्वर येथील तापोळा गावाच्या मध्यमवर्गीय सकपाळ या कुटुंबातील जान्हवी (वय १६), तिची आई गौरी (४२) आणि आजी (८०) चंद्रभागा या तीन पिढ्यांना बोलतं केलं असता, आजी म्हणाल्या, ‘‘माझं लग्न अगदी १२व्या वर्षी झालं. आम्ही सात भावंडं, मी कधीच शाळेत गेले नाही. बालपणी घरातली कामं आणि फावला वेळ गुरांच्या मागे धावत घालवणं एवढंच मला माहीत! आता घरी नातवंडं आहेत, ती कॉलेजला गेली की, घरी टीव्ही बघणं हाच माझा छंद. तोच माझा मोकळा वेळ.’’ त्यांची सून गौरी सांगते, ‘‘मी बारावी केलं. मला पोलिसांत भरती व्हायचं होतं, पण काही कारणामुळे मला नोकरी करण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही. आता फावला वेळ मिळाला आहे, कारण मुलं मोठी झाली. मी स्वत:साठी कपडे शिवते. वेळेचा सदुपयोग करून चार पैसे कमवायला हवेत, असं वाटत राहातं म्हणून छोटंसं पाळणाघर सुरू करायचा विचार आहे.’’ जान्हवी सांगते, ‘‘मी माझा वेळ रिल्स किंवा युट्यूबवर गेमिंगचे स्ट्रिम, व्लोग बघणं तसंच संध्याकाळ झाली की, मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळणं, यात घालवते.’’
या संवादात आवर्जून ज्या गोष्टी समोर आल्या त्या म्हणजे, सकपाळ आजींनाही ‘फावला वेळ म्हणजे काही ना काही करत राहाणं’ हेच माहीत आहेत. तर त्यांच्या सुनेसाठी, मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग कुटुंबाला हातभार लागेल अशी कामं करत घालवणं आहे, तर त्यांची नात, तिला हवं तसं जगण्याचा विचार म्हणजे फावला वेळ घालवणं स्वत:मध्ये रुजवत आहे. त्यांच्याशी बोलताना एक विचार मनात आला की, हे ‘प्लेजर लेजर’ फक्त सुखवस्तू लोकांसाठी आहे का?
एका सामाजिक संस्थेच्या कार्यकारी संचालक शिवानी मेहता यांनी सांगितलं, ‘‘मी वयाच्या २२व्या वर्षापासून काम करतेय. माझ्या माहेर आणि सासरचं वातावरण माझ्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला अगदी पूरक! माझा नवरा मला गमतीने म्हणायचा, तुझा स्वभाव म्हणजे तुला आयुष्यात सगळंच हवं आहे आणि तेही लगेच. त्यामुळे सतत काहीना काही करत राहणं हा माझा स्वभावगुण. पण माझ्या आयुष्यात दोन घटना घडल्या. एक म्हणजे माझे पती अकाली गेले आणि माझ्या जवळची मैत्रीण अचानक वारली. या घटनांमुळे ‘मृत्यू कधीही तुमच्या दारात येऊ शकतो’चा अलार्म मनात वाजत राहातो. आता कटाक्षाने मी स्वत:च्या आनंदासाठी ब्रेक घेते. मोकळा श्वास हा मला आताच्या घडीला महत्त्वाचा वाटतो. अनेक ठिकाणी मी एकटी फिरायला जाते. काहीही काम करत नाही. कधी समुद्रावर फिरते, कधी जंगल अनुभवते, गाणी ऐकते.’’
हा मोकळा श्वास घेण्यासाठी तुम्ही श्रीमंत असायला हवेत,असं नाही. याची प्रचीती एका सामाजिक संस्थेत संचालकपदी असणाऱ्या अलका उमापे यांच्याशी बोलताना आली. त्यांचं आताचं वय ५९ वर्षे. त्यांचं वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्यापेक्षा २२वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत लग्न लावून दिलं गेलं. आता त्या स्वत: कमवतात आणि २० हजार रुपयांत घर चालवतात. त्या म्हणतात, ‘‘मला माझं आयुष्य आता चटक म्हणजे खूप मजेत जगायचं आहे. आता रडणं संपवलंय. वेळ काढून माझ्या मुलींकडे जाते. नाती भेटतात. त्यांच्या बरोबर माझं बालपण पुन्हा एकदा अनुभवते. त्यांच्यासोबत आईस्क्रीम, चिंचा, बोरं खाते. आणि वर्षातून एकदा स्वत:ला गिफ्ट म्हणून कुठेतरी जाऊन येते. यावर्षी मी ऋषिकेशला जाऊन आले. माझा मोकळा वेळ माझी गरज आहे, हे मला उशिरा कळलं, पण कळलं.’’
मी स्वत: माझी ‘प्रायोरिटी’ आहे, हे बऱ्याचदा कळायला उशीर होतो. पण एकदा कळलं की, तसं जगता येतं. साधना पवार (वय ३६) सांगते, ‘‘मी एचआर म्हणून काम करते. अविवाहित आहे. आई आणि वहिनींसोबत (लहान भाऊ नुकताच वारला) राहते. माझे बाबा लहानपणीच वारले. मोठी म्हणून घरची सगळी जबाबदारी माझ्या अंगावर आली. आपल्यालाच हे का करावं लागतंय, असा विचार मन दुखवायचा. तो राग बोलण्या-वागण्यातही येत असणार. स्वत:साठी पैसा खर्च करणं हा मला नेहमीच गुन्हा वाटत आला. पण गेल्या दोन वर्षांपासून ‘मी स्वार्थी होईन’ असा विचार केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. माझ्या घरातलं वातावरणही त्यामुळे मोकळं, छान झालं आहे. आईही मनसोक्त जगते. फावल्या वेळात आम्ही सगळे माझ्या भाचीसोबत ‘आठ चल्लस’ हा सागरगोट्यांचा बैठा खेळ हमखास खेळतो. आणि हो, आता मी आवर्जून ब्यूटीपार्लरमध्ये जाते. आपण सुंदर दिसावं याचा अट्टहास नाही, पण तिथे फेशियल, मसाज करवून घेताना तेवढा वेळ ‘मी कुणीच नसते.’ फक्त अनुभव घेते. वर्तमानात जगते. रिलॅक्स होते. ’’
हेही वाचा – विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
मी ज्या सामाजिक संस्थेत काम करते तिथे ‘महिला नेतृत्व विकास’ कार्यक्रमाअंतर्गत आम्ही काही कार्यशाळा घेतो. त्यासाठी अतिशय दुर्गम भागातून स्त्रिया येतात. जेव्हा या कार्यशाळेचं पहिलं प्रशिक्षण होतं, तेव्हा आम्ही त्यांना त्यांचा अनुभव विचारला, त्यावर कित्येक स्त्रिया म्हणाल्या, ‘‘बालपणानंतर पहिल्यांदा आम्हाला कोणी तरी असं ताट वाढून हातात दिलं. नाही तर इतकी वर्षं शेतात जाऊन आल्यावर, आम्हीच आमचं जेवण करून जेवत आलोय. कोणीतरी आपल्याला असं आयतं खाऊ घालतं आहे ही भावना सुखावणारी आहे. आयतं ताट हातात घेऊन खाणारी बाई समाजाला मान्य नाही. घरात सगळ्यांचं जेवण झालं की तिने जेवावं हेच आम्ही जगलोय. त्यामुळे मोकळं, छान वाटतंय. काहीच काम नाहीए. रिकामटेकडं वाटतंय.’’
याच विचाराची दुसरी बाजू सांगताना सुखदा आयरे (वय ३८) म्हणाली, ‘‘माझं बहुतांश काम हे एकाच जागेवर बसून तासन् तास नाटक, मालिका लिखाणाचं. त्यामुळे मला जेव्हा कधी फावला वेळ मिळतो, त्यावेळी मी स्वत:साठी काहीतरी खमंग बनवून खाते. ‘वुमन लेजर’ ही संकल्पना माझ्या आयुष्यात जगते. माझ्या आईला मी निवांत पाहिलं आहे. काहीच काम न करता, कुठल्याही प्रकारचा अपराधी भाव मनात न ठेवता तिला तिच्या पद्धतीनं जगताना पाहिलं आहे. मला एक जाणवतं, आपल्याकडे मुलींवर सतत दडपणं घातली गेली आहेत, त्यांना सांगितलं जातं की, तुमचं घर कसं आहे यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे कळतं. त्यामुळे बऱ्याचदा मुली- स्त्रिया स्वत:चा वेळ घर लावण्यात घालवतात. टापटिपीकडे लक्ष देतात. त्यातही स्त्रियांसाठी प्रत्येक काळात समाजानं काही गृहीतकं कायम केली आहेत. ही गृहीतकं अनेक मुली- स्त्रिया खरी मानून आपल्या जगण्याला- अस्तित्वाला खूप गांभीर्याने घेत लढत राहातात. त्यात त्यांना नेमकं काय हवं हेच लक्षात येत नाही. ते लक्षात येण्यासाठी, काय शोधायचं हेही कळायला हवं. आणि त्यासाठी मनावरचं मळभ दूर करायला हवं तरच मला आणि सविता काकूंना हवंहवंसं आभाळ त्यांनाही दिसू शकेल. ते मळभ दूर करण्यासाठी लागणारा मदतीचा हात, तो विश्वास हा मोकळा वेळ देत असतो. ही जाणीव जिवंत ठेवण्यासाठी काही जागा खऱ्या अर्थाने राखीव ठेवायला हव्यात. आमच्या संस्थेत आम्ही अशी एक जागा आवर्जून बनवली आहे, जिथे कोणत्याही स्त्रीला येऊन बोलावंसं, किंवा नुसतं येऊन आराम करावा वाटलं तर ती तिथे येऊन आराम करू शकते. कुठलीही दमछाक करून न घेता, अलगदपणे जगायचं. कधी अगदी लहान व्हायचं, तर कधी सगळे मुखवटे उतरवून नुसतं माणूस व्हायचं.
‘इट प्रे लव ’ चित्रपटात एक माणूस देवाकडे सतत विनवण्या करत असतो की, ‘प्लीज प्लीज देवा, मला लॉटरी लागू दे.’ तेव्हा देव त्याला सांगतो, ‘प्लीज प्लीज तू तिकीट खरेदी तर कर.’ तसं प्रत्येकीनं मला स्वत:साठी निवांत जगायचं आहे, काही काळ का होईना रिकामटेकडी व्हायचं आहे, याचा फक्त विचार न करता, ते आचारणातच कसं येईल याचं तिकीट स्वत:साठी घ्यायला हवं!
(लेखिका ‘कोरो’ या सामाजिक संस्थेत कम्युनिकेशन मॅनेजर आणि फिल्म एज्युकेटर आहेत.)
poonam.bisht@coroindia.org