‘बाईपणा’च्या कल्पना आता पुरे झाल्या. कारण आजवर त्यांनी तिचं काहीच भलं केलं नाही. म्हणूनच आíथक स्वावलंबनाच्या, निर्णयस्वातंत्र्याच्या, उत्कर्षांच्या समान संधींसाठी ‘बाई’ म्हणून झालेले सगळे संस्कार बाजूला ठेवून तिनं आता ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याच्या लढय़ात उतरलं पाहिजे, असं स्त्रीवाद सांगतो.
स्त्रीवादी विचारधारा ही स्त्रीच्या सक्षमीकरणाला दिशा देणारी एक भक्कम विचारधारा आहे हे खरं, पण मुख्य मुद्दा असा आहे की, स्त्रीवादी विचारधारेचे अभ्यासक वगळता पुरुषप्रधान व्यवस्थेत आजवर भरडल्या गेलेल्या, दुय्यम स्थानावर जगण्याची सवय लागलेल्या ज्या स्त्रीवर्गाच्या कल्याणाची दिशा ही विचारधारा निश्चित करते त्या स्त्रीवर्गाला ‘स्त्रीवाद’ काय सांगतो हे ठाऊक असणं अधिक गरजेचं आहे.
‘स्त्रीवाद’ हा शब्द कदाचित सर्वसामान्य संसारी स्त्रियांना दूरचा वाटेलही, पण त्याचा अर्थ इतकाच आहे की, पुरुषाला जसं ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळतं तसंच ते स्त्रीलाही मिळायला हवं. केवळ जन्मानं ती स्त्री आहे म्हणून तिच्या निर्णयस्वातंत्र्यावर पुरुषाचा अथवा घरातल्या इतर कुणाचा अंकुश असता कामा नये. पण ‘स्त्रीस्वातंत्र्य’ म्हणजे नेमकं काय, याचं आकलन करून न घेता पुरुषासारखं वागायला मिळणं म्हणजे ‘स्त्री-पुरुष समता’, असं बऱ्याच स्त्रिया मानतात आणि त्यामुळेच मनाचा गोंधळ करणाऱ्या अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं.
‘स्त्रीवाद’ स्त्रीला ‘व्यक्ती’ म्हणून जगायला शिकवतो. पुरुषांच्या मालकीच्या या जगात स्त्रीला ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याचा अधिकार नाही. पुरुषाची पत्नी, आई, मुलगी, बहीण अशा विविध नात्यांतच तिला जगावं लागतं. स्त्रीच्या पुरुषावरच्या या अवलंबित्वाला आणि त्यातून येणाऱ्या मालकीहक्काला स्त्रीवाद विरोध करतो. प्रेमाचा अधिकार आणि मालकीहक्क यात फरक आहे. आपण मुलगी म्हणून जन्माला आलो आहोत म्हणून कायम वडिलांच्या आणि नंतर नवऱ्याच्या उपकारातच जगलं पाहिजे, प्रसंगी स्वत:च्या इच्छा मारल्या पाहिजेत, पण त्यांना दु:ख होईल असं काही करता कामा नये, या विचारांचा दाट पगडा आजही कित्येक मुलींच्या मनावर आहे. संस्कृतीरक्षकाची जी भूमिका तिच्यावर लादली गेली आहे त्यातून बाहेर येऊन तिनं ‘बाई’ म्हणून स्वत:वर होणाऱ्या सर्व अन्यायांच्या विरोधात उभं राहण्याची तयारी दाखवली तरच तिला ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल.
पण आपल्याकडे अजूनही ज्या वातावरणात मुली मोठय़ा होतात त्या वातावरणानं दिलेला नाती जपण्याचा, मोठय़ांचा आदर करण्याचा संस्कार मुलींना स्वतंत्र निर्णय घेण्यामध्ये, ‘व्यक्ती’ म्हणून जगण्यामध्ये अडथळा बनून राहतो. मग आपल्या व्यक्तिमत्त्वाची कुचंबणा करणारे असे संस्कार स्त्रीनं फेकून द्यावेत का? तर तसं अजिबातच नाही. ‘माणूस’ म्हणून जगण्याच्या हक्कात सन्मूल्यांचा आदर करण्याला, त्यांच्या संवर्धनाला मोठं स्थान आहे. प्रत्येक सुसंस्कृत माणूस आपल्या जीवनात मूल्य मानतो. पण ही सुसंस्कृतता जर स्त्रीच्या व्यक्तित्त्वाचा बळी मागत असेल तर ‘असं का?’ हा प्रश्न समाजाला करण्याचा तिचा हक्क स्त्रीवाद मान्य करतो.
घर आणि बाहेरचं क्षेत्र या दोन्ही पातळ्यांवर सुखी व्हायचा हक्क स्त्रीला नाही का, हा प्रश्नही या निमित्तानं पुढे येतो. बाहेरच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या बुद्धिवादी स्त्रीला घरासाठी जास्त वेळ देता येत नाही. अशा वेळी मुलांचा अभ्यास, त्यांचं भविष्य, घरातलं काम यांच्या होणाऱ्या हेळसांडीला स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं. ‘तिनं खुशाल आपल्या उत्कर्षांच्या संधी घ्याव्यात पण घरादाराला सांभाळून.’ अशी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. आणि ही अपेक्षा केवळ पुरुषच करतात असं नाही तर तिच्या घरातल्या, आजूबाजूच्या बायकाही तिच्याकडून अशीच अपेक्षा करतात. त्यांच्या या धारणेतून त्या जोपर्यंत बाहेर येत नाहीत, तोपर्यंत स्त्रीवादी लढय़ाचं फलित काय, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच राहणार. ‘व्यक्ती’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळवली, मानाचं स्थान मिळवलं, पण ‘बाई’ म्हणून घराच्या प्रश्नांच्या संदर्भात जर तिचं मन खंतावलेलंच राहणार असेल तर तिचा लढा अपुराच राहील.
खरं तर तिच्या प्रश्नांच्या संदर्भात हा जो तिढा निर्माण होतो तो तिचा तिलाच सोडवता येणार आहे. नाहीतरी मुलांना तीच घडवते. त्या सांभाळ करण्यातून तिची मनानं सुटका नाहीच. मग तिनंच आपल्या मुलांना जाणीवपूर्वक का घडवू नये? ‘जन्मानं तू मुलगा आहेस किंवा मुलगी आहेस म्हणून अमुक एका पद्धतीनं जगलं पाहिजेस.’ ही चुकीची, पुढे स्त्रीलाच जाचक ठरणारी रीत घरातल्या मुलांना म्हणजेच भावी स्त्री-पुरुषांना शिकवण्याऐवजी ‘तुम्ही तुमच्या व्यक्तिगत उत्कर्षांकडे लक्ष द्या. व्यक्तिगत उत्कर्ष हा िलगाधारित असता नये.’ हे तिनं शिकवलं पाहिजे. स्त्रीला ‘व्यक्ती’ म्हणून जगण्यासाठी केवळ स्त्रीच या मार्गानं बळ देऊ शकते.
अपवादात्मक स्त्रियांची उदाहरणं सोडता पुरुष जसं मोकळं आयुष्य जगू शकतो, उत्कर्षांच्या संधी मिळताच घरदार सोडून (कारण घर सांभाळायला बायको असतेच.) त्या संधीसोबत वाटचाल सुरू करतो, स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो तसं सगळं बाई करू शकते का? तिला ही निवडीची संधी समाजव्यवस्थेनंच नाकारलेली आहे. लग्न झालेली स्त्री लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांत अडकते. तर लग्न न करणाऱ्या स्त्रीवर वेगळी दडपणं असतात. तिचं एकटं राहणं, तिचं घटस्फोटित असणं किंवा आवडत्या पुरुषाबरोबर लग्न न करता राहणं.. तिच्या प्रत्येक कृतीवर समाजाचं बारीक लक्ष असतं. बाईची सारी प्रतिष्ठा तिच्या वैवाहिक स्थितीशी निगडित असते. पुरुष मात्र अशा चौकटीत कधीच बंदिस्त नव्हता आणि आजही नाही.
स्त्रीवाद हा िलगाधारित भेद संपवण्याची मागणी करतो. सिगरेट ओढणं हे स्त्रीसाठी अपायकारक असेल तर ते पुरुषासाठीही तितकंच अपायकारक असायला हवं. पण ‘स्त्रीनं सिगरेट ओढणं बरं दिसत नाही. हेच तिचे संस्कार का?’ अशा प्रकारचा विरोध चुकीच्याच पायावर उभा आहे. लग्नबाह्य संबंध ठेवणं हे जर अनीतीचं कृत्य असेल तर स्त्रीला जसा यासंदर्भात जाब विचारला जातो तसाच तो पुरुषालाही विचारला जायला हवा. नतिकतेच्या चौकटी दोघांनाही सारख्याच हव्यात. पुरुषासारखीच स्त्री ही ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणून गणली जायला हवी, त्याला मिळणारी जगण्यातली मोकळीक स्त्रीलाही मिळायला हवी, हा स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या लढय़ातला मुख्य मुद्दा आहे. अर्थात जगण्यातली मोकळीक म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वैराचाराला मुभा असताच नये आणि अशी मुभा जर िलगाधारित असेल तर ते त्याहूनही वाईट!
‘स्त्री’ म्हणून जन्म घेणं हा काही अपराध नव्हे. पण भ्रूणहत्यांचं मोठं प्रमाण आजही तेच सिद्ध करतं आहे. तिनं जन्म घेण्याआधीपासूनच जर तिच्या जगण्या-मरण्याचा अधिकार समाज असा आपल्या हातात ठेवणार असेल तर आता प्रत्येक आईनं कणखर बनायला हवं. प्रेम, त्याग, सेवा हे सारं चांगलंच आहे. पण ते जर जगण्याच्या हक्काआड येत असेल तर तिनं गंभीर होऊन या प्रश्नाकडे बघायला हवं. ‘बाईपणा’ च्या कल्पना आता पुरे झाल्या. कारण आजवर त्यांनी तिचं काहीच भलं केलं नाही. म्हणूनच आíथक स्वावलंबनाच्या, निर्णयस्वातंत्र्याच्या, उत्कर्षांच्या समान संधींसाठी ‘बाई’ म्हणून झालेले सगळे संस्कार बाजूला ठेवून तिनं आता ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याचा लढय़ात उतरलं पाहिजे असं स्त्रीवाद सांगतो.
‘स्त्री इतकी स्वतंत्र झाली आता तिला आणखी किती स्वातंत्र्य हवं आहे?’ असा प्रश्न बरेचदा केला जातो. स्वातंत्र्यात ‘इतकं आणि तितकं’ असं काही नसतं. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य! आणि ‘स्वातंत्र्य’ या शब्दात तिला प्रामुख्यानं अपेक्षित आहे तो व्यक्तिमत्त्व विकासाचा अधिकार. पण ‘स्त्रीची संस्कृती’ या अधिकाराची गळचेपी करणार असेल तर मात्र तिनं हा दुबळेपणा झिडकारून टाकलाच पाहिजे. हे धर्य जोपर्यंत ती दाखवत नाही तोपर्यंत स्त्रीवादाच्या नुसत्या तात्त्विक आकलनाचा काहीही उपयोग नाही.
एकीकडे भावनिक पातळीवर स्त्रीनं स्वत:ला असं बरंच कणखर बनवण्याची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे एकटं-दुकटं वावरण्याची वेळ येते तेव्हा स्वत:ची काळजी कशी घ्यावी याचं शिक्षणही तिला लहान वयापासूनच दिलं गेलं पाहिजे. स्वसंरक्षणासाठी हत्यार वापरण्याची परवानगी नको, पण कराटेसारखं शिक्षण प्रत्येकीला सक्तीचं केलं गेलं पाहिजे. मन आणि शरीर दोन्ही बाबतीत ती कणखर झाली पाहिजे. स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा किती काळ करायची याचा विचार आता तिनंही केला पाहिजे. ‘बलात्काऱ्याला िलगविच्छेदाची शिक्षा हवी.’ असा लेख जेव्हा मी लिहिला तेव्हा त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. स्त्रीवर बलात्कार झाल्याची घटना कानी आली नाही असा एक दिवस जात नाही. रोजची वर्तमानपत्रं याला साक्ष आहेत. स्त्री बलात्काराचं भक्ष्य ठरते, तिच्यावर अमानुष, पाशवी बलात्कार होतो त्यावर कधी कुणाला झडझडून लिहावं असं वाटलं नाही, स्त्रीवरचे हे अत्याचार थांबवण्यासाठी काहीतरी करायलाच हवं या विचारानं कुणाची तडफड झाली नाही. पण िलगविच्छेदच्या शिक्षेचा उच्चार करताच ‘अशी अमानुष शिक्षा नको’ अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. मलाही मान्य आहे की, िलगविच्छेदाच्या शिक्षेनं बलात्कार थांबतीलच असं नाही, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाच्या कानापाशी असेच ढोल वाजवावे लागतात. त्यातूनच अत्याचाराचा प्रतिकार करायलाच हवा या विचाराला निदान सुरुवात तरी होते.
या पूर्णत: विस्कटून गेलेल्या समाजचित्रात व्यवस्थेला छेद देऊ पाहणाऱ्या काही बंडखोर स्त्रिया जशा दिसतात तसंच स्त्रियांच्या दु:खस्थितीला समाजव्यवस्थेचा भाग म्हणून आपणही जबाबदार आहोत हे मान्य करून समाजपरिवर्तन व्हायलाच हवं. िलगभेद हा सामाजिक स्थानाचा, प्रतिष्ठेचा निकष असता नये असं म्हणणारे काही पुरुषही दिसतात. स्त्रीची कुचंबणा संपायला हवी, तिला व्यक्ती म्हणून अभिमानानं उभं राहता येईल अशी समाजव्यवस्थेची पुनर्रचना व्हायला हवी असं त्यांना वाटतं. पुरुषांचं जगही अपराधीपणाच्या भावनेनं ढवळून निघतं आहे, हे स्त्रीवादी लढय़ाला पुढं नेणारं चित्र आहे आणि ही मोठी जमेची गोष्ट आहे.
(समाप्त)
र. धों.च्या निमित्ताने.. आता लढा व्यक्ती म्हणून..
‘बाईपणा’च्या कल्पना आता पुरे झाल्या. कारण आजवर त्यांनी तिचं काहीच भलं केलं नाही. म्हणूनच आíथक स्वावलंबनाच्या, निर्णयस्वातंत्र्याच्या, उत्कर्षांच्या समान संधींसाठी ‘बाई’ म्हणून झालेले सगळे संस्कार बाजूला ठेवून तिनं आता ‘व्यक्ती’ म्हणून जगण्याच्या लढय़ात उतरलं पाहिजे, असं स्त्रीवाद सांगतो.
First published on: 22-12-2012 at 05:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women rights movement