अंजली चिपलकट्टी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अति-प्राचीन काळात पुरुष शिकार करायचा आणि स्त्री सर्व कुटुंबांची काळजी घ्यायची, हे गृहीतक अगदी आजही घट्ट आहे, पण त्याला सुरुंग लागलाय तो ९००० वर्षांपूर्वीची काही दफनं मिळाल्यावर केल्या गेलेल्या संशोधनानंतर. एकूणच स्त्रीविषयक गृहीतकांचा बांध त्यानंतर ढासळत गेला आहे. स्त्री केवळ छोटय़ा नाही, तर ‘बिग गेम हंटिंग’मध्ये आपल्या कुशल दगडी हत्यारांसह कशी सामील होत होती, शिकारीसाठी व्यूहरचना कशी पुरुषांपेक्षा वेगळी करत होती याचे पुरावेच सापडत गेले.. मग आतापर्यंत पुरुषांनी केलेल्या संशोधनाचे अर्थ एकतर्फी का लावले गेले? स्त्री शिकाऱ्यांवरचा स्त्री संशोधकांचा अभ्यास स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह दूर करायला मदत करील का? याचा हा आलेख..
नोव्हेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानं जगातल्या बऱ्याच जणांचं लक्ष वेधून घेतलं. रँडी हास या मानववंश वैज्ञानिकाला पेरू देशातल्या अँडीज पर्वतरांगांमध्ये ९००० वर्षांपूर्वीची काही दफनं सापडली. यात सापडलेल्या ६ सांगाडय़ांबरोबर हत्यारं नीट पुरलेली होती, जी सर्व शिकार करण्यासाठीची आवश्यक अशी दगडी हत्यारं होती. त्यापैकी एका सांगाडय़ाबरोबरच्या हत्यारांमध्ये खूप विविधता होती, शिवाय त्यांचा दर्जाही खास होता. यावरून उत्खनन करणारे अनुभवी तज्ज्ञ म्हणत होते, की हा मोठा तरबेज शिकारी असणार, तो बहुधा टोळीला ‘लीड’ करत असावा. पण काही कवटीची हाडं आणि दात यांच्या परीक्षणातून असं सिद्ध झालं, की तो सांगाडा पुरुषाचा नसून १७ ते १९ वर्ष वयाच्या स्त्रीचा आहे! अनेक संशोधकांनी आग्रह करून पुन्हा तपासणी केली, तरी ती स्त्रीच होती याला पुष्टी मिळाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. काहीतरी गडबड आहे.. असं शक्य नाही, असं त्यांना वाटत होतं. असं त्यांना का वाटत होतं?
अति-प्राचीन, शेतीपूर्व काळात जेव्हा आपण भटकं जीवन जगत होतो, तेव्हा आपला उदरनिर्वाह शिकार आणि अन्न गोळा करण्यातून (बिया, कंदमुळं, फळं) होत असे. या कामाची विभागणी स्त्री-पुरुषांमध्ये कशी होत असेल?.. तर, पुरुष शिकार करत असणार आणि स्त्रिया अन्न गोळा करत असणार, फार तर फार बारीकसारीक प्राणी मारत असणार, असा सरसकट कयास रूढ झालेला होता, किंबहुना अजूनही आहे. या समजाला वरच्या पुराव्यामुळे तडा गेला. केवळ एका पुराव्यामुळे आधीचं सगळं संशोधन असं कसं मोडीत निघेल? पण या पुराव्याच्या निमित्तानं आधीच्या संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांतल्या गफलती उघडय़ा पडल्या.
हा स्त्री-शिकारी सांगाडा म्हणजे एखादं अपवादात्मक उदाहरण आहे, की सार्वत्रिक, याचा शोध घेण्यासाठी रँडी हास आणि त्यांच्या टीमनं आणखी पुरावे मिळतात का, याचा अभ्यास करायचं ठरवलं. मग त्यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत त्याआधी झालेल्या उत्खननाची माहिती मिळवली. १०७ उत्खननं केलेल्या जागांमध्ये सापडलेल्या ४२९ मानवी सांगाडय़ांचा डेटा मिळवला. त्यात २७ माणसं ‘बिग गेम हंटिंग’शी संबंधित होती. ‘बिग गेम हंटिंग’ म्हणजे मोठय़ा जंगली प्राण्यांची शिकार; बारीक-सारीक नव्हे. २७ पैकी १५ ठिकाणी पुरुष, तर ११ ठिकाणी स्त्रियांचे सांगाडे होते. यावरून ‘प्रोबॅबिलिटी’चं (संभाव्यता) गणित केल्यावर हास यांच्या टीमच्या लक्षात आलं, की मोठय़ा प्राण्यांची शिकार करण्यात स्त्रियांचा सहभाग ३० ते ५० टक्के इतका, म्हणजे जवळजवळ पुरुषांइतकाच असावा. मग हे आधीच्या अभ्यासकांनी का नाही कधी मांडलं?
जी हत्यारं पुरुष सांगाडय़ांबरोबर सापडली, साधारण तशीच हत्यारं या ११ स्त्री सांगाडय़ांभोवती सापडली होती. पण पुरुष असतील, तर ते ‘बिग गेम हंटिंग’मध्ये सामील होते आणि स्त्रिया असतील, तर मात्र हत्यारांचा उपयोग त्या कंदमुळं खणून काढण्यासाठी, सशासारख्या छोटय़ा प्राण्यांच्या शिकारीसाठी करत असाव्यात, असे दुजाभाव करणारे निष्कर्ष आधीच्या संशोधकांनी काढले होते. याला दोन कारणं असावीत- १. संशोधन करणारे बहुसंख्य पुरुष होते. पुरुषसत्ताक समाजातल्या सांस्कृतिक समजेनुसार लिंग-आधारित श्रम विभागणीत स्त्रियांनी घरगुती काम करावं आणि पुरुषांनी बाहेर मुलुखगिरी करावी, असे ‘स्टिरीओटाईप’ रूढ झालेले होते. त्या पूर्वग्रहाला मिळतेजुळते निष्कर्ष काढले गेले.
२. जगभरात आजही ज्या आदिवासी जमाती अन्न-वेचे-शिकारी (Hunter- gatherer) असं जगणं जगतात, त्यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी भरपूर माहिती जमा केली आहे. त्यातल्या काही जमाती आजूबाजूच्या इतर संस्कृतींच्या प्रभावात आल्यावर त्यांच्यात काही बदल झाले. तर काही जमाती अजूनही इतरांच्या संपर्काविना स्वायत्तपणे जगतात, त्यामुळे त्यांच्यात फार बदल झालेले नाहीत. निष्कर्ष काढताना यांपैकी कोणत्या जमातींची माहिती वापरली गेली, त्यानुसार निष्कर्ष बदलणार. आपल्याला ‘अनुकूल’ इतकीच माहिती/ विदा (डेटा) वापरून अर्थ काढणं याला ‘चेरी पिकिंग’ म्हणतात. अशीही संशोधकांची गफलत झाली असावी.
सिअॅटल पॅसिफिक विद्यापीठातल्या कॅरा
वॉल-शेफ्लर या मानववंश आणि उत्क्रांती संशोधिकेनं आपल्या टीमसह स्त्रियांचा शिकारीमध्ये, विशेषत: ‘बिग-गेम हंटिंग’मध्ये सहभाग कसा होता, हे अभ्यासण्यासाठी उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही सागरी प्रदेश, अशा जगभरातल्या जमातींचं जे डॉक्युमेंटेशन झालं होतं (D- Place) त्याचा नव्यानं अभ्यास करायचं ठरवलं. ३९१ भटक्या जमातींपैकी ६३ शिकार करणाऱ्या जमाती निवडल्या. कॅरा यांच्या टीमला असं आढळलं, की सर्व जमातींत स्त्रिया शिकारीत सहभागी तर होत्याच, पण मोठय़ा प्राण्यांच्या शिकारीतही त्यांचा सहभाग ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ४१ जमाती, ज्यांचा उदरनिर्वाह शिकारीवर जास्त होतो, त्या सर्व जमातींत स्त्रिया जाणीवपूर्वक, सक्रियपणे शिकार करत होत्या आणि ‘बिग गेम हंटिंग’मध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. या स्त्रिया जी हत्यारं वापरत, त्यात पुरुषांच्या तुलनेत बरीच विविधता होती (उदा. फिलिपिन्स- आग्टा जमात). भाले, अॅटलाटल,
धनुष्य-बाण, विविध धारदार दगडी चाकू, अशी हत्यारं वापरण्यात स्त्रिया तरबेज होत्या. अशा वस्तू स्वीडनमध्ये, रशियात सिदीयन स्त्री-योद्धयांच्या दफनात सापडल्या. जमा केलेल्या डेटावरून असं लक्षात आलं, की शिकार करण्यासाठी स्त्रिया वेगवेगळे व्यूह रचतात. विविध प्रकारे छोटा समूह रचून, एक-दोन साथीदार- इतर स्त्रिया, मुलं, कुत्रे, पुरुष-जोडीदार वगैरेंना बरोबर घेऊन त्या शिकार मिळवत होत्या. सावजाला ‘कॉर्नर’ करणं, पाठलाग करणं, हल्ला करणं या सर्वात त्या-त्या जमातीच्या पद्धतीनुसार स्त्रिया सामील होत्या. जाळी लावून शिकार करण्याच्या प्रकारात तर पुरुषांपेक्षा स्त्रिया तरबेज असतात असं दिसलं. या संशोधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. गर्भधारणा आणि मुलांचं संगोपन यात स्त्रिया अडकतात, त्यामुळे शिकारीसाठी वेळ कसा मिळत असेल? सावजामागे पळणं त्यांना कसं शक्य झालं असेल? लहानग्यांना कुणाच्या भरवशावर सोडलं असावं? अशा प्रश्नांना रँडी हास आणि कॅरा वॉल-शेफ्लर यांनी नीट उत्तरं दिली आहेत. त्यासाठी त्यांना इतर अनेक मानववंश वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग झाला.
१. या टोळय़ा भटक्या असल्यानं सततच प्रवासात असायच्या. त्यामुळे शिकार करण्यासाठी स्त्रियांना लांबवर पळत जाण्याची गरज चपळ, हलत्या टोळीमुळे सहजपणे भागली असावी. उलट शिकारीतल्या सहभागामुळे अधिक पौष्टिक मांस मिळण्याची गरज भागल्यानं प्रजननासाठी त्याचा फायदाच झाला असावा.
२. काँगोतल्या आका जमाती आणि ब्राझीलमधल्या आवा जमातीत स्त्रिया छोटय़ा बाळांना पाठीशी बांधून शिकार करतात. शिवाय भटक्या जमातींमध्ये मुलांचा सांभाळ समुदायातल्या लोकांनी मिळून करण्याची पद्धत आहे. त्याला अॅलो-पॅरेंटिंग असं म्हणतात. त्यामुळे स्त्रियांना शिकार करण्यासाठी आवश्यक ती मोकळीक मिळते. हाजदा, आका जमातीत तर ३ वर्ष वयाच्या पुढची मुलं शिकारीत सहभागी होतात!
३. पाठीवर बाळाला वाहून नेणाऱ्या अनेक स्त्रियांच्या अभ्यासातून कॅरा वॉल-शेफ्लर यांनी असं दाखवून दिलं, की जंगलातून पळताना लागणारी ऊर्जा आणि वेग यांचं स्त्रियांचं गणित पुरुषांइतकंच यशस्वी ठरतं!
रॉबर्ट सपॉल्स्की हा प्रायमेटॉलॉजिस्ट (प्रागतिक सस्तन प्राण्यांचा अभ्यास करणारा) म्हणतो, की भटक्या टोळय़ांमध्ये सदस्यांच्या, मुलाबाळांच्या सकस अन्नाची/ उष्मांकाची गरज टोळीतल्या पुरुषांनी केलेल्या शिकारीतून भागते, असा गैरसमज अनेक वर्ष होता. मात्र हे खरं नाही. शेतीशिवाय आणि स्वायत्तपणे अजूनही पूर्णत: भटकं जीवन जगणाऱ्या अनेक जमातींच्या अभ्यासातून असं लक्षात येतं, की प्राचीन काळापासून टोळीतल्या मुलांना सकस अन्नाचा पुरवठा करण्यात जास्त वाटा मुलांच्या आया आणि आज्या (आईची आई) उचलत असत. पुरुष लोक प्रत्यक्ष शिकारीपेक्षा शिकारीबाबत गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवत असत. मागच्या शिकारीत आपण किती शौर्य गाजवलं आणि पुढच्या शिकारीत अजून कशी मजा येणार आहे, अशा गप्पा रंगवण्यात त्यांना जास्त आनंद मिळत असे! (हे सपॉल्स्की म्हणतायत बरं का!) आजही जगभरात ‘एलिट’- श्रीमंत नसलेल्या कुटुंबांचा ‘उदर’निर्वाह करण्यात स्त्रियांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे.
या स्त्री-शिकाऱ्यांबाबतच्या संशोधनानंतर कॅरा वॉल-शेफ्लरनं संशोधन प्रक्रियेबाबत भाष्य केलं आहे, ते अधिक महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात, ‘मिळालेल्या माहिती/ डेटामधून काय निष्कर्ष निघणार, हे संशोधकाच्या पूर्वग्रहांनुसार ठरतं! संशोधक ज्या संस्कृती- परंपरेत वाढतात, त्या वर्तमानातल्या परंपरा ते भूतकाळातल्या समूहांवर लादतात आणि त्यानुसार निरीक्षणांचा अर्थ लावतात. बराच काळ उत्खनन, मानववंश विज्ञान या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांनी काढलेले निष्कर्ष पाश्चात्त्य पुरुषी मानसिकतेला अनुकूल होते. त्यामुळे ते चुकीचे असू शकतात, अशी शंका आली नाही. मात्र स्त्री-संशोधक फिल्डवर काम करू लागल्यानंतर आधीच्या संशोधनाला आव्हान मिळालं, पुराव्यांचे वेगळे अर्थ निघू लागले. अर्थात हे काम हास, सपॉल्स्कीसारख्या पूर्वग्रह नसलेल्या पुरुषांमुळेही घडत आहेच.’
तर, आता मुख्य मुद्दय़ाकडे येऊ- स्त्रियांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेबाबत कायमच त्या पुरुषांपेक्षा कमी असतात, त्यांच्या कामाचा दर्जा कमी असतो, असं आरोपण केलं जातं. स्त्रियांचा मेंदू छोटा असतो, त्या हळव्या असल्यानं त्यांना तार्किक, गणिती विचार करता येत नाही, असा सरसकट समज सर्वदूर असतो. संधी मिळूनही सर्व क्षेत्रात स्त्रिया कशा पिछाडीवर आहेत, त्यांचा ज्ञान-निर्मितीतला वाटा किती नगण्य आहे, याचे दाखले तोंडभरून सांगितले जातात. तसं का आहे, याचं संशोधन करताना सुरुवातीला टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनमुळे मुलग्यांच्या गणिती मेंदूला चालना मिळते, वगैरे अंदाज वर्तवले गेले. ‘म्हणजे खरंच जैविक फरकांमुळेच मुलगे सरस असतात की काय?’ असं वाटत होतं. मात्र ‘सायन्स’मध्ये २००८ मध्ये प्रसिद्ध झालेला एक अभ्यास याबाबत वेगळा निष्कर्ष काढतो. यात ४० देशांमध्ये मुली आणि मुलगे यांच्या वाचन क्षमता आणि गणिती बुद्धिमत्तेचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. गणिती बुद्धिमत्ता मोजण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली. ती ‘संस्कृती निरपेक्ष’ असेल याची काळजी घेण्यात आली. परीक्षेचे ‘स्कोअर’ हाती आल्यावर मग प्रत्येक देशातली लिंग-विषमता (आर्थिक- शैक्षणिक- राजकीय) आणि गणिताच्या परीक्षेतला मुली आणि मुलगे यांचा तुलनात्मक स्कोअर असा आलेख काढण्यात आला. शेजारील आलेखात दिसतंय त्याप्रमाणे लिंग विषमता आणि गणिताच्या स्कोअरचा थेट संबंध दिसून आला! मेक्सिको, ब्राझील, टर्की, या देशांत सर्वात जास्त विषमता आहे, तिथे मुलींचा स्कोअर सर्वात कमी आहे. (याची आकृती पाहिली, तर त्यात मेक्सिको, ब्राझील- जे टर्कीच्या डाव्या बाजूला आहेत, पण आलेखात दिसत नाहीत. मूळ आलेख ४० देशांचा आहे, त्यातला आवश्यक तेवढा भाग दिला आहे.) त्यामुळे मुली-मुलगे तफावत मोठी आहे, जी ऋण बाजूस दिसते. मध्यावर अमेरिका दिसते. गंमत म्हणजे, सगळय़ात उजवीकडे स्कॅन्डिनेव्हियन देश- जिथे लिंग समानता आहे, तिथे मुलींचा तुलनात्मक स्कोअर मुलग्यांपेक्षा जास्त आहे! मुलींचा वाचन क्षमतेचा स्कोअर सर्व देशांमध्ये मुलग्यांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ सरळ आहे, गणिती बुद्धिमत्तेतला फरक जैविक नसून संस्कृतीतून आला आहे.
दुसऱ्या एका प्रयोगात मुलींच्या दोन गटांना संशोधकांनी वेगवेगळय़ा प्रकारे ‘प्राईम’ केलं- म्हणजे एका गटाला सांगितलं, की ‘मुलींना गणित चांगलं जमतं’ आणि दुसऱ्या गटाला त्याउलट- म्हणजे ‘मुली गणितात कच्च्या असतात’. मग त्यांची गणिताची परीक्षा घेतल्यावर जे निकाल लागले त्यात दुसरा गट खूप पिछाडीवर होता असं दिसलं. मुलांच्या मानानं सतत दुय्यम वागणूक मिळणं आणि पारंपरिक दबलेपणा यामुळे मुलींच्या मेंदूच्या विकासावर ताण येतो. वरील आलेखात भारताचा उल्लेख नसला तरी भारतात लिंग-जातीभेद किती तीव्र आहे हे कुणी सांगायला नको. याबाबतचा अजून एक किस्सा ‘भारी’ आहे. अनेक वर्ष पक्ष्यांबाबत असा समज होता, की नर पक्षी बहुगामी असतात, तर मादी पक्षी एकगामी असतात. माणसांनी आदर्श घ्यावा असंच नै! मात्र स्त्री अभ्यासक ‘फील्ड’वर काम करू लागल्यावर वेगळी निरीक्षणं समोर आली. सारा हार्डी या अभ्यासकानं त्यांच्या फील्डवरच्या पक्ष्यांच्या अभ्यासातून मादी पक्ष्यांच्या लैंगिक बहुगामित्वाविषयी मोलाचं संशोधन केलं. मानवी समाजांकडे आणि स्त्रियांच्या लैंगिकतेकडे डोळसपणे बघण्यासाठी स्त्री-संशोधकांचं हे मोठं योगदान आहे.
ज्ञान-निर्मिती आणि अन्वेषणाच्या क्षेत्रात पुरुषांप्रमाणे स्त्रिया सहभागी होऊ लागल्यावर एकांगी विचार बाजूला पडून ज्ञानाला वेगळी दृष्टी मिळते, हे जेन गुडाल, रोझालिंड फ्रँकलिन, सारा हार्डी, बार्बरा मॅकिलटॉश, मिशेल फिशर, ब्रिजेट स्टचबरी, सिमॉन-द-बोव्हार अशा अनेक स्त्रियांमुळे सिद्ध झालंय. यांना सांस्कृतिक दुय्यमत्वावर मात करून काम करता आलं, त्यामुळे ज्ञानालाच ‘चार चाँद’ लागले आहेत. स्त्रिया इतक्या कमी संख्येनं असूनही त्यांची विज्ञानातली पावलं ठसठशीतपणे उमटली आहेत, ते त्यांच्या भरीव कामगिरीमुळे. तरी आजही स्त्रीच्या क्षमतेविषयीचे पूर्वग्रह पुरेसे कमी झालेले नाहीत आणि संशोधन क्षेत्राप्रमाणे इतर अनेक क्षेत्रांत त्यांना खूप भेदाभेद सहन करावे लागतात. आता हे स्त्रियांपुरतंच मर्यादित न ठेवता समाजातल्या सर्व स्तरातल्या दुय्यमपणे जगणाऱ्या माणसांना लागू केलं तर? भारतात सांस्कृतिक लिंग-जातिभेदांमुळे कितीतरी मुलांसाठी ज्ञानाची कवाडं उघडतंच नाहीत, त्यांनी ज्ञान-निर्मितीत सहभाग कसा द्यावा? पुरुषसत्ताक उतरंडीच्या, आज्ञापालन-अधिकारशाहीच्या वातावरणात मुलींच्या, खालच्या स्तरातल्या तरुणांच्या बुद्धीचे धुमारे विझून जातात. संशोधनात्मक काम करणाऱ्यांच्या चमूत विविधता असेल, तर संशोधन अधिक सकस होतं असं अनेक पाश्चात्य विद्यापीठांत, कंपन्यांमध्ये दिसून आलंय, कारण विचार एकांगी न होता विविध दृष्टीकोनांमुळे त्याला अनेक आयाम मिळतात. आपला देश ज्ञान-निर्मितीच्या बाबतीत इतका मागे का, याची काही उत्तरं इथे मिळू शकतात. सामाजिक विषमता ही चहुबाजूंनी चाल करून येत असते. जमलं तर एक ‘युटोपियन’ का असेना, कल्पना करून पहा- भारतातले सर्व समूह भेदांच्या, दुय्यमत्वाच्या मर्यादा उल्लंघून मोकळा श्वास घेताहेत, आपली विद्यापीठं सर्व स्तरातल्या तरुणांनी फुलून गेली आहेत आणि इथल्या नवीन शोधांबद्दल जाणून घ्यायला जगभरातले संशोधक उत्सुक आहेत!.. काहीही!