‘स्त्रीविश्व’ या सदरात जगभरातील स्त्रीवादी विचारविश्वाचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लेख वाचून वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना यामुळे लेखनात सातत्य ठेवायला स्फूर्ती मिळाली. समाजमाध्यमांवरचे ‘ट्रेंड्स’ काय आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला. वर्षभर स्त्रीजगताचा समृद्ध करणारा अनुभव देणाऱ्या सदराचा हा शेवटचा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज या सदराचा हा शेवटचा लेख लिहिताना अनेक गोष्टी मनात येत आहेत. अनेकानेक विचार गर्दी करत आहेत. गेलं वर्षभर जगभरातल्या ‘स्त्रीविश्वा’चा आढावा घेणं हा माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता. दर पंधरा दिवसांनी नवे विषय शोधणं, नव्या ‘ट्रेंड्स’ना विचारात घेणं, त्यासाठी निरनिराळे संदर्भ तपासणं, त्याचा दस्तावेज ठेवणं, शक्य झाल्यास त्याबाबत तज्ज्ञांशी बोलणं, लिहिलेला मजकूर पुन्हा पुन्हा तपासून पाहत बदल करणं, जमलेल्या माहितीच्या आधारे सुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या प्रक्रियेत संपूर्ण वर्षं कसं निघून गेलं, हे कळलंच नाही. खरं तर प्रत्येक वर्षीच ‘हे वर्ष कसं भुर्रकन उडून गेलं’ असं आपण म्हणत असतो. परंतु माझ्यासाठी मात्र हे वाक्य या वर्षी शब्दश: खरं ठरलं. त्यामुळे आज शेवटच्या लेखाच्या निमित्ताने अनेकांप्रति कृतज्ञ व्हावंसं वाटत आहे. त्यात अर्थात संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानावेच लागतील. त्यांनी मला दिलेली ही संधी बहुमोल आहे. पण त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत, ते वाचकांचे आणि त्यातही सातत्याने लेख वाचून प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांचे!

हेही वाचा – एक होतं गृहिणी विधेयक!

तुम्हा सर्वांचे अभिप्राय आणि सूचना यांच्यामुळे मला लेखनात सातत्य ठेवायला स्फूर्ती मिळाली. अनेकांच्या पत्रांमुळे मी विचारप्रवृत्त झाले, आनंदित झाले आणि भावुकसुद्धा! या सगळ्यासाठी नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करणं इतकंच माझ्या हाती आहे. या सदरातील सुरुवातीचे लेख लिहिताना मी बरीच चाचपडले. ‘लोकल ते ग्लोबल’, असा स्त्रीविश्वाचा मोठा पट कसा मांडायचा यावर बराच विचारविनिमय होत असे. देशांची किंवा स्त्री चळवळींची विशिष्ट उदाहरणं घेऊन लिहिलं, तर ते सगळ्यांनाच रुचेल, आवडेल किंवा आपलं वाटेल असं नाही. कदाचित दूरदेशी घडणाऱ्या काही घटनांशी आमचा काय संबंध, असं वाचकांना वाटण्याची शक्यता होती. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या जगाशी मिळतंजुळतं तरीही जगभरात आढळणारे असे मुद्दे आणि घटना यांचं निरीक्षण मी सुरू केलं. त्यातून काही तरी गवसत गेलं. ते नेमकं काय हे नक्की सांगता येणार नाही. पण त्यानंतर लेखांसाठी विषयांची कमतरता कधी भासली नाही. अर्थात बरेच विषय घेता नाही आले, किंवा बऱ्याच मुद्द्यांवर अधिक दीर्घ मांडणी करता आली असती, ती जमली नाही. पण आत्ता या क्षणी राहून गेलेल्या गोष्टींपेक्षा लिहून झालेल्या लेखांबाबत जास्त समाधान आहे. भविष्यात या अनुभवाच्या आधारे आणखी काम करता येईल, असा विश्वास वाटतो आहे.

मला इथं एक गंमत आठवते. आमच्या महाविद्यालयातील एका प्रश्नपत्रिकेत मी स्त्रीवादावर प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर लिहिताना एका विद्यार्थ्याने ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रिया-स्त्रियांमध्ये होणारे वाद’ अशी व्याख्या लिहिली होती! हे वाचून माझी करमणूक झाली, पण ही ‘व्याख्या’ माझ्या मनात गेली अनेक वर्षं एखाद्या काट्यासारखी रुतून बसलेली आहे. मला असं वाटतं की, माझ्या आजूबाजूच्या अनेकांना स्त्रीवादाविषयी असंच काहीसं वाटतं. त्या विद्यार्थ्यासारखी हास्यास्पद व्याख्या ते थेट करत नसले, तरीही स्त्रीवादाबद्दल एक प्रकारचा आकस किंवा गैरसमज दिसून येतात. जणू काही पुरुषांना संपवण्यासाठी, त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी अशा चळवळी चालवल्या जातात, असं काहीसं चित्र उभं केलं जातं. त्याला साजेशी अशी उदाहरणं सोयीनं दिली जातात. स्त्रीवादी चळवळींमधल्या ‘जहाल’ गटांचे दाखले देत संपूर्ण विचारविश्वाची वासलात लावली जाते. हे करताना स्त्रियांनी गेली अनेक शतकं आत्यंतिक मेहनतीनं केलेल्या प्रवासाला सहजपणे किरकोळीत काढलं जातं. पुरुषसत्तेला सातत्यानं आव्हान देत, शासनाला स्त्रियांप्रति संवेदनशील असे कायदे आणि धोरणं घडवायला भाग पडणाऱ्या समस्त स्त्रीवादी स्त्री-पुरुषांचे खरं तर आपण ऋणी असायला हवं. पण ते तसं सहज होत नसतं आणि होणारही नाही. म्हणूनच या लेखमालेत केवळ चळवळींवर भाष्य न करता, स्त्रीवादी विचारविश्वाचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर कसे येतील, ते मांडण्याचा प्रयत्न केला. रोज आपल्या सामाजिक आणि राजकीय परिघात घडणाऱ्या घटनांवर स्त्रियांच्या नजरेतून किंवा स्त्रीवादी दृष्टिकोनातून कसा प्रकाश टाकता येईल, यावरही आपसूक विचार होत होता. तो लेखांमध्ये उतरला असेल अशी आशा.

वर्षभरात अनेक घटना घडल्या. त्याचे माझ्या मनावर, एकूण बुद्धीवर आणि समजेवर परिणाम होत राहिले. त्याचे पडसाद कळत-नकळत या लेखमालेत उमटत राहिले. उदाहरणार्थ, या वर्षभरात अफगाणिस्तान- मधल्या स्त्रियांवर असलेले निर्बंध आणखी कडक झाले. माझ्या अगदी सुरुवातीच्या एका लेखात मी अफगाणी स्त्री कार्यकर्त्यांवर भाष्य केलं होतं. तिथल्या काही स्त्रिया तालिबानला कसं धैर्याने तोंड देत आहेत, याची कैफियत मांडली. त्यानिमित्ताने मी माझ्या एका अफगाणी विद्यार्थ्याशी बोलले. आपण केवळ काही शब्दांत जे वास्तव मांडतोय ते तिथले लोक प्रत्यक्ष जगत आहेत, हे जाणवल्यावर थरकाप उडाला. असाच थरकाप उडाला तो कोलकाताची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येची घटना घडल्यानंतर. त्या घटनेनंतर मनात दाटून आलेल्या संतापाला वाचा कशी फोडावी, हे समजत नव्हतं. परंतु मग ‘रिक्लेम द नाईट’ चळवळ उभी राहिली, आणि त्यावर लेखन करून आपणही त्याचा अप्रत्यक्षरीत्या एक भाग झाल्याचं समाधान मला मिळालं. बॉक्सर इमाने खलिफवर ऑलिम्पिकदरम्यान कशा प्रकारचे आरोप केले गेले, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्रातल्या स्त्रियांना कशा प्रकारे हतबल केलं जाऊ शकतं, याविषयी संशोधनाला सुरुवात केली. माहितीचा एक मोठा खजिनाच यानिमित्ताने माझ्यासमोर उलगडला. त्यातून मला आकळेल ते मांडायचा मी प्रयत्न केला. त्यानंतर एका लेखात स्त्रियांच्या क्रिकेटविश्वाचाही आढावा घेतला. खरं तर क्रीडा क्षेत्र हा माझा अभ्यासाचा विषय नाही, पण या लेखमालेच्या निमित्ताने मला अशा विषयांतही रस वाटला, आणि आता मी त्याकडे बारकाईनं पाहायचा प्रयत्न करेन.

काही घटना बाहेरच्या देशांमध्ये घडत असल्या, तरीही त्याचा आपल्याशी फार जवळचा संबंध आहे याची जाणीव झाली. त्यातून समाजमाध्यमांवरचे ‘ट्रेंड्स’ काय आहेत, हे समजून घेऊन त्याविषयीही थोडंफार वाचन झालं आणि लेख लिहिले गेले. उदाहरणार्थ, ‘ट्रॅड वाइफ’ किंवा ‘फॅट फोबिया’ या पाश्चात्त्य जगातल्या लाटा असल्या, तरीही आपल्याकडेही त्याचा परिणाम दिसून येतो. समाजमाध्यमांचे मुलांवर होणारे दुष्परिणाम आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या आई, याविषयीचा लेख पाश्चात्त्य देशांच्या संदर्भातून होता. परंतु आपल्याकडेही त्याची सुरुवात झाली असल्याची जाणीव झाली. त्यानिमित्ताने वाचकांचे येणारे प्रतिसादही साधारण हेच सांगत होते. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला दूरस्थ भासतात त्या प्रत्यक्षात आपल्या किती जवळ येऊन ठेपल्या आहेत, हे उमगलं.

काही लेख स्त्री वाचकांना जवळचे, वैयक्तिक वाटले, असा माझा कयास आहे. जसं की, मातृत्वाचे कंगोरे, पाळीची आणि मातृत्व रजा, सौंदर्याचं वस्तूकरण, ‘पिंक टॅक्स’ किंवा गेल्या पंधरवड्यात लिहिलेला ‘४ बी’ चळवळीवरचा लेख. काहींनी त्यांच्या अभिप्रायांमध्ये त्यांचे वैयक्तिक अनुभव कथन केले. ते अर्थात इथं सांगण्याचं प्रयोजन नाही. पण मला त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कळलं की स्त्रीच्या मनावर आणि शरीरावर ताबा मिळवण्यासाठी कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था कंबर कसून तयारच असतात. त्यातून जर काही जणींनी तरी सुटका करून घ्यायची म्हटली, तरी त्याची कुठल्या ना कुठल्या प्रकारे किंमत मोजावी लागते, आणि ती स्त्रियांना काकणभर जास्तच मोजावी लागते. चौकटी मोडण्याचं स्वातंत्र्य अजूनही सहजासहजी मिळत नाही.

आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, वैयक्तिक अनुभव महत्त्वाचे तर असतात, पण त्यामुळे संपूर्ण समाजाचं चित्र उभं राहू शकत नाही. वेगवेगळ्या जात- धर्म- वर्गात मोडणाऱ्या स्त्रियांची अनुभवविश्वेही निरनिराळी असतात. अनेकदा त्यांच्यात अंतर्गत मतभेद, विरोधाभास आणि कलह असतात. त्यामुळे फक्त ‘स्त्री’ ही अस्मिता सुटेपणानं बघता येत नाही. ती कुठल्या परिघातून येते आहे, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच लिंगभावविषयक प्रश्नांचा अभ्यास जटिल आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या वरवरच्या वाचनातून समजणार नाहीत. त्यासाठी दृष्टीचा आणि संवादांचा परीघ विस्तारावा लागेल आणि ती एक निरंतर प्रक्रिया आहे.

या लेखमालेत आपण मुख्यत: ‘ती’चं विश्व काय आहे हे समजून घेत होतो. पण ‘तो’ किंवा ‘ते’ हे तिच्या विश्वात आहेतच, हे विसरून चालणार नाही. पुरुषांच्या ‘हाऊस हसबंड’ असण्यावर जो लेख लिहिला, त्यावर अनेक हाऊस हसबंड्सनी दिलेल्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या. तसंही हे स्त्रीविश्व स्त्रियांपुरतं मर्यादित राहिलंच नाही. सगळ्या लेखांवर अनेक पुरुषांनी मला आवर्जून अभिप्राय दिले, सूचना केल्या. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत.

कौटुंबिक समस्येच्या कारणास्तव अतुल सुभाष यांनी केलेल्या आत्महत्येमुळे हा लेख लिहीत असताना आजूबाजूला ‘कायदे जेंडर न्यूट्रल (लिंगभावदृष्ट्या तटस्थ) असायला हवेत, पुरुषांसाठीही चळवळ उभी करायला हवी, ‘मी टू’सारखे ‘मेन टू’ असं काही तरी चालवायला हवं’ अशासदृश चर्चा घडत होती. त्यातले मुद्दे ठीकच होते, परंतु हे सगळं म्हणत असताना स्त्रीवादी चळवळींविषयीचा जो आकस प्रकट होत होता, तो मला व्यथित करून गेला. तो ऐकताना मनात विचार आला, की पुष्कळ प्रवासानंतरही स्त्रियांना आणि स्त्रीवादी चळवळींना अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. स्त्रीवादी चळवळींनी पुरुषांना आणि इतर लिंगभाव ओळखींना सामावून घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. तो अजून जोरकसपणे करायला हवा. समानतेकडे पावलं टाकताना, सगळ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला हवी. त्यामुळे अधिकाधिक समन्वयवादी आणि समंजस विचार होणं गरजेचं आहे. या लेखमालेच्या निमित्ताने माझ्याकडून तरी ही सुरुवात झालेली आहे, असं वाटतं.

हेही वाचा – अधिक मुलांचा पर्याय खरंच आहे का?

पुनश्च भेटीच्या आशेसहित, कमला भसीन यांच्या ‘नारीवाद का बहुवचन’मधल्या ओळींनी या सदराचा शेवट करते.

‘चूंकी पितृसत्ता ग्लोबल भी है लोकल भी

मेरे नारीवाद भी लोकल भी है ग्लोबल भी

मेरे लिए नारीवाद सफर भी है मंजिल भी

यह आसान भी है मुश्कील भी।’

gayatrilele0501 @gmail.com