क्रिकेट हा खेळ आजही काही प्रमाणात पुरुषांचा मानला जात असला तरी आता देशोदेशी स्त्रियांचे क्रिकेट संघ तयार झाले आहेत. भारतात तर आता त्यांच्या वेतन वाढीचे नवीन करारही झाले आहेत. मुख्य म्हणजे पुरुषप्रधान शब्द टाळून लिंगभाव समावेशक शब्द उदा. ‘बॅट्समन’ला (फलंदाज) ‘बॅटर’ म्हणून संबोधलं जाणं यावर विचार सुरू आहे. पुरुषांसारखी आक्रमकता स्त्री क्रिकेटमध्ये नसते त्यामुळे स्पर्धा बघणे आव्हानात्मक नसते, हा काही क्रिकेटप्रेमींचा आक्षेप मोडून काढत स्त्रियांच्या क्रिकेट स्पर्धाही लोकप्रिय होत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘महिला आशिया क्रिकेट चषक’सामन्यांच्या निमित्ताने…

क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय, पुरुषांची मक्तेदारी असलेला खेळ. आज देशोदेशी स्त्रियांचे क्रिकेट संघ तयार झालेले असले, तरीही क्रिकेट म्हणजे पुरुष खेळाडू हे समीकरण सहजासहजी पुसलं जात नाही. परंतु त्याला छेद देणाऱ्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. नुकतेच झालेले महिला आशिया चषक स्पर्धेतील सामने हे त्याचंच एक द्याोतक आहे.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

लोकांच्या मनात आणि माध्यमांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटला जेवढा सन्मान व अवकाश मिळतो, तेवढा अजूनही स्त्रियांच्या क्रिकेटला मिळताना दिसत नाही. तरीही गेल्या काही वर्षांमध्ये चित्र बदललेलं दिसतं. नुकत्याच झालेल्या या सामन्यांच्या निमित्ताने स्त्रियांच्या क्रिकेट विश्वाचा आढावा घ्यायचा हा प्रयत्न.

क्रिकेट हा जरी मुख्यत्वेकरून पुरुषांचा खेळ मानला जात असला, तरीही यात स्त्रियांचा सहभाग फार पूर्वीपासून राहिलेला आहे. असं म्हटलं जातं की, स्त्रियांचा पहिला क्रिकेट सामना दक्षिण इंग्लंडमध्ये १७७५ मध्ये झाला होता. हा सामना ब्रॅमली आणि हॅम्बल्डन या दोन गावांमधल्या प्रत्येकी अकरा तरुणींच्या संघांमध्ये रंगला. हे दोन संघ वेगळे आहेत, हे दर्शवायला या मुलींनी वेगवेगळ्या रंगाच्या रिबिनी बांधल्या होत्या. त्यानंतर गावागावांमध्ये स्त्री क्रिकेट संघ तयार झाले आणि त्यांच्यात सामने होत असत. १८९० ते १९१८च्या दरम्यान इंग्लंडमध्ये स्त्रियांचे जवळपास १४० ‘क्रिकेट क्लब’ तयार झाले होते. तरीही या गटांचे स्वरूप अनौपचारिकच होते आणि जिंकणाऱ्या संघांना लहानमोठी बक्षिसं दिली जात असत. आता वाचताना गंमत वाटते की, अशाच एका स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून चक्क ‘प्लम केक’ देण्यात आला होता!

हेही वाचा – ‘आईची जात, ती मुलांची का नाही?’

एखाद वेळेस सामने रद्दही होत असत, कारण काही टारगट पुरुष मंडळी धावपट्टीवर येऊन धुडगूस घालत. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्त्रिया लांब स्कर्ट, लांब हाताचे ब्लाउज आणि बॉनेट (हनुवटीखाली बांधायची टोपी) घालून सामने खेळायच्या. नंतर या पेहरावात हळूहळू बदल घडत गेले.

एकूणच स्त्रियांच्या अनौपचारिक क्रिकेटचं चित्र बदललं ते १९२६ पासून, जेव्हा ‘विमेन क्रिकेट असोसिएशन’ने अतिशय गंभीरपणे आणि औपचारिक पद्धतीने सामने भरवण्यास सुरुवात केली. यात मुख्यत: अशा स्त्रियांना स्थान देण्यात आलं, ज्यांचा शाळा संपल्यानंतर क्रिकेटशी फारसा संबंध उरला नव्हता. त्यांना प्रोत्साहन देणं, हे या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. पुढच्या काही वर्षांतच शंभरच्यावर स्त्री खेळाडू या क्लबमध्ये दाखल झाल्या. हळूहळू वेगवेगळ्या गावांमध्ये आणि ‘कौंटी’मध्ये क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार झाला आणि स्त्रियांचे बरेच संघ उभे राहिले. हे लक्षात घ्यायला हवं की, यामध्ये बहुतेककरून श्वेतवर्णीय आणि उच्चभ्रू स्त्रियांचा समावेश होता. अर्थात स्त्रिया क्रिकेट खेळायला शिकल्या जरी असल्या, तरीही प्रत्यक्षात मैदानात जाऊन सतत क्रिकेट खेळणंही फार भूषणावह मानलं जायचं नाही. असं म्हणतात की, पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा पुरुष लढायला जात असत, तेव्हा स्त्रियांचे संघ घरच्या मैदानात जोमाने क्रिकेट खेळत असत. सततची असुरक्षितता आणि भीती यांवर मात करण्यासाठी स्त्रियांना क्रिकेटची मदत झाली. या काळात थोड्या-फार प्रमाणात कामगार वर्गातल्या स्त्रियासुद्धा क्रिकेटचा छंद जोपासू लागल्या असं दिसून येतं.

यथावकाश जगातल्या इतर देशांमधील स्त्रियांनादेखील क्रिकेट खुणावू लागलं. १९३४-३५पर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही स्त्रियांचे क्रिकेट संघ तयार झाले. त्यामुळे अर्थातच आता आंतरराष्ट्रीय सामने रंगणार होते. याच काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना झाला. या सामन्याचे थोडेफार चित्रण आज इंटरनेटवर पाहायला मिळतं. त्यात असं दिसतं की, स्त्रियांनी गुडघ्यापर्यंत येणारे स्कर्ट आणि टी शर्ट्स घातले आहेत तसेच बॉनेटऐवजी टोप्या परिधान केल्या आहेत. हा सामना बघण्यासाठी बऱ्यापैकी प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. १९५८ मध्ये ‘इंटरनॅशनल विमेन क्रिकेट काऊन्सिल’ची स्थापना झाली. यामध्ये सुरुवातीला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि हॉलंड या पाच देशांच्या सदस्यांचा समावेश होता. १९७० ते १९९०पर्यंत यात वेस्ट इंडिज, आयर्लंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका वगैरे देशही सहभागी झाले. भारतात १९७३ मध्ये ‘विमेन काऊन्सिल’ची स्थापना करण्यात आली.

तरीही स्त्रियांच्या क्रिकेटचा एकूण प्रवास हा चढ-उतारांचाच राहिलेला आहे. स्त्रियांच्या क्रिकेट खेळण्याला केवळ एक छंद म्हणून पाहणं आणि फारसं गांभीर्यानं न घेतलं जाणं ही तक्रार कायम आहे. ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील लॉर्डस् मैदानावरही १९७६पर्यंत स्त्रियांना खेळण्यासाठी मुभा नव्हती. पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळणं, त्यांच्याइतकी प्रसिद्धी आणि मानसन्मान वाट्यास न येणं, मूलभूत सेवासुविधा व प्रशिक्षणाचा अभाव असणं, स्त्रियांच्या क्रिकेटला पुरेसं आर्थिक पाठबळ न मिळणं, या समस्या सार्वत्रिक आहेत. मग तो देश विकसित असो वा विकसनशील.

हेही वाचा – कर्करोग प्रतिबंधात्मक उपचार हाच उपाय

९०च्या दशकात मात्र या परिस्थितीत थोडीफार सुधारणा घडून आली. १९९२ मध्ये न्यूझीलंडने आपल्या स्त्री आणि पुरुष कसोटी सामन्यांच्या खेळाडूंना समान वेतन देण्यास सुरुवात केली. इंग्लंडनेही १९९८ मध्ये याचा कित्ता गिरवला. २००५ मध्ये ‘इंटरनॅशनल विमेन क्रिकेट काऊन्सिल’ने निर्णय घेतला की, स्त्रियांच्या क्रिकेटचा कारभारही ‘इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल’ म्हणजेच ‘आयसीसी’च्या हाती द्यावा. त्यामुळे तेव्हापासून पुरुष आणि स्त्रियांच्या क्रिकेटच्या नियमनासाठी ‘आयसीसी’ही एकच संस्था काम पाहते. भारतातही ‘बीसीसीआय’ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था क्रिकेट नियमनाचं काम पाहते. त्यांनी २०२२ पर्यंत स्त्री आणि पुरुष खेळाडूंसाठी वेगवेगळ्या वेतन श्रेणी लागू केलेल्या होत्या. स्त्री खेळाडूंचा समावेश केंद्रीय करारात करण्यात आल्यामुळे त्याही आता आर्थिकदृष्ट्या सबळ झाल्या आहेत. अर्थात इथे हे लक्षात घ्यायला हवं की, इथवर येण्यासाठी स्त्रियांना बरीच प्रतीक्षा करावी लागली आणि झगडावं लागलं. तेव्हा कुठे आज स्त्रियांच्या क्रिकेटला पूर्वीच्या तुलनेत चांगले दिवस आले आहेत, असं म्हणता येतं.

तरीही हे ‘चांगले दिवस’ टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत स्त्री खेळाडूंना अधिक मेहनत घ्यायला लागते, हे नाकारता येत नाही. स्त्रियांना चांगले वेतन जरी मिळू लागले असले, तरी पुरुष खेळाडूंना माध्यमांमध्ये जितके ‘ग्लॅमर’आहे किंवा पैसे मिळवण्याचे जे इतर मार्ग उपलब्ध आहेत तेवढे स्त्रियांसाठी नाहीत शिवाय स्त्री खेळाडूंची तुलना सातत्याने पुरुषांशी केली जाते. त्यामुळे ‘स्त्रियांचे क्रिकेट’ हे पुरुषांच्या सावलीतून पूर्णत: बाहेर आलेलं नाही, असं म्हटलं जातं. परंतु याबाबतीतली काही निरीक्षणं रोचक आहेत. जसं की, ‘आयसीसी’चे काही वर्तनविषयक दंडक आहेत आणि त्यांचं उल्लंघन केल्यास खेळाडूंना दंड भरावा लागतो किंवा शिक्षा भोगावी लागते. यामध्ये इतर संघातल्या खेळाडूंशी गैरवर्तन करणं, अपशब्द वापरणं किंवा कुठल्याही प्रकारची अफरातफरी करणं यांचा समावेश होतो. सामान्यत: असं दिसून येतं की, फारच कमी स्त्री खेळाडू अशा प्रकारच्या वर्तनासाठी शिक्षा भोगतात, पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या संघांमध्ये अधिक सौहार्द असल्याचं दिसून येतं. क्वचित अयोग्य वागण्याच्या कारणावरून स्त्री खेळाडूंनाही शिक्षा झालेली आहे.

बहुतेकदा असं दिसतं की, स्त्री खेळाडूंची भाषा ही पुरुषांहून निराळी असते. त्या केवळ स्वत:बद्दल आणि खेळाबद्दलच नाही, तर एकूणच कुटुंब व्यवस्थांवर, सामाजिक धारणांवरदेखील भाष्य करताना दिसतात. मुलींना या क्षेत्रात अधिकाधिक संख्येनं कसं आणता येईल याबाबत विचार मांडतात आणि त्यादृष्टीने सक्रियही असतात. भारतातल्याच शुभांगी कुलकर्णी किंवा झुलन गोस्वामीसारख्या क्रिकेटर्सचं इथे उदाहरण घेता येईल. त्यांची कारकीर्द खेळाडू म्हणून मर्यादित नाही, तर त्यापलीकडेही त्याचं काम आहे.

स्त्री क्रिकेटपटूचं तुलनेनं सौम्य, शांत असणं बऱ्याचदा स्वीकारलं जात नाही. सर्वसामान्य जनतेचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरुषी असतो. त्यामुळे आक्रमक असणं, प्रतिस्पर्ध्यांशी अटीतटीची स्पर्धा करणं आणि प्रसंगी या आक्रमकतेचं प्रदर्शन करणं हे प्रेक्षकांना आकर्षित करतं. त्यामुळे स्त्रियांचं क्रिकेट हे ‘निष्प्रभ’ आणि ‘कंटाळवाणं’ असतं अशीही दूषणं दिली जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र याच्या अगदी वेगळं चित्र पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी हे लिहिलं गेलंय की, स्त्रियांचं क्रिकेट हे पुरुषांपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक सरस असतं. आणि ते तेवढंच स्पर्धात्मक, आक्रमकदेखील असतं. परंतु हे गुण पारंपरिक पुरुषी साच्यानुसार प्रदर्शित केले जात नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना हे सामने पाहण्यात फारसा रस राहत नाही. पण तरीही, हळूहळू घडणाऱ्या बदलांची नोंद घेणंही आवश्यक आहे. या स्पर्धाही लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.

हल्ली क्रिकेटमध्ये लिंगभाव समावेशक शब्द कसे वापरले जाऊ शकतात, याचा विचार होतो आहे. त्यानुसार, ‘बॅट्समन’ला (फलंदाज) ‘बॅटर’ म्हणून संबोधलं जातं. जेणेकरून फक्त ‘मॅन’ म्हणजेच पुरुषांसाठी हा खेळ आहे असं संबोधलं जाणार नाही.

आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांना माध्यमांनी बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली. भविष्यात अधिकाधिक मुली क्रिकेटची करियर म्हणून निवड करतील, अशी आशा आहे. १९६३ मध्ये इंग्लंडचा कर्णधार लेन हटन म्हणाला होता की, स्त्रियांनी क्रिकेट खेळणं हे पुरुषांनी विणकाम कारण्याएवढंच विचित्र आहे! आज ६० वर्षांनीही आपल्या मनात अशाच प्रकारच्या धारणा आहेत का, हे तपासून पाहायला हवं.

थोडक्यात, स्त्री खेळाडूंना फक्त समान वेतन मिळणं पुरेसं नसून, एकूणच समाजाचा या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि स्त्रियांना त्यात किती अवकाश मिळतो, याचा विचार होणंही अत्यंत आवश्यक आहे.

gayatrilele0501@gmail.com