– ज्योति म्हापसेकर

समानता, जागतिक शांतता आणि विषमता निर्मूलन हे स्त्री चळवळीसमोरील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खाचखळग्याचा आहे, पण हमरस्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

१९७५ साल उजाडले तेव्हा मी नोकरी करत होते. मनासारखा जोडीदार मिळाला होता आणि मुलगीही झाली होती. माझे वडील आणि सासरे दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. आईही स्वातंत्र्य चळवळीत काम करणारी होती. माहेरच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक ‘लाल निशाण’ पक्षात आणि बहुधा असंघटितांना संघटित करण्याचे काम करीत होते. मी एकुलती एक असल्याने आई-वडिलांनी कायमच समानतेची वागणूकही दिली होती. माझी आई स्त्रीवादी होती. पण ते मला कळायच्या आतच १९७५ मध्ये फेब्रुवारीतच तिचा अपघाती मृत्यू झाला आणि माझ्या छोट्याशा विश्वात उलथापालथ झाली.

१९७५ ऑक्टोबरमध्ये पुण्यातील स्त्रियांच्या परिषदेत आईने लिहिलेली गाणी म्हणण्याच्या निमित्ताने एका समविचारी मैत्रिणींच्या समूहात मी सामील झाले, ज्या समूहाचे नंतर ‘स्त्रीमुक्ती संघटने’त रूपांतर झाले. याच वेळी स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात अनेक लेख लिहून येत होते. त्यामुळे स्त्री-पुरुष असमानतेचे अनेक संदर्भ नव्याने कळू लागले. स्त्रियांचे प्रश्न हे निसर्गाने नाही, तर मानवाने निर्माण केले आहेत. त्याला पुरुषप्रधान समाजरचना कारणीभूत आहे हेही समजू लागले. भारतीय घटनेने स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष केला होता, पण व्यवहारात त्याचे प्रतिबिंब दिसत नव्हते. उलट स्त्रीमुक्ती शब्दाची तर टिंगलच होत होती. कुणापासून मुक्ती, नवऱ्यापासून, संसारापासून की मुलांपासून? असे प्रश्न आम्हाला सतत विचारले जात असत. कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे नसून त्याला सामाजिक संदर्भ आहेत. त्याचबरोबर स्त्री मुक्तीचा लढा हा केवळ सामाजिक पातळीवरच नव्हे, तर वैयक्तिकरीत्याही लढावा लागणार आहे हे लक्षात आल्यावर आम्ही सर्वप्रथम स्त्री प्रश्नांचा अभ्यास सुरू केला. पाश्चात्त्य स्त्रीवादी विचार आम्ही वाचलेच, पण आपण नक्की कोणाच्या खांद्यावर उभे आहोत याचाही आम्ही अभ्यास करत होतो. यात १९व्या शतकातील सुधारणा, स्त्री शिक्षणाची सुरुवात, स्त्रियांचा राजकीय चळवळीतील सहभाग त्याचबरोबर कामगार स्त्रियांच्या प्रश्नांचाही अभ्यास करीत होतो. या अभ्यासातूनच ‘स्त्री मुक्ती संघटने’चा जाहीरनामा बनला. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रांत स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. या दुय्यम स्थानापासून मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती अशी सोपी व्याख्या आम्ही बनविली.

संपूर्ण समाजाच्या मुक्तीच्या क्रमातच स्त्रीमुक्ती साकार होणार आहे, असा आम्हाला विश्वास होता. स्त्रियांच्या प्रश्नांचा सैद्धांतिक अभ्यास, त्यांना स्वत:च्या हक्काबद्दल जागृत करणे व संघटित करणे ही संघटनेपुढची महत्त्वाची कामे आहेत, असेही आम्ही मांडले.

१९७८ ते १९८३ या काळात ‘हुंडा’ आणि ‘बलात्कार’ या संदर्भातील ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याच्या निदर्शनात, लेख लिहिण्यात आम्ही होतोच. आम्हाला ज्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते त्यांना आमच्या बैठकांना यायला वेळही नाही आणि सवयही नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पोस्टर्स, कलापथक आणि भाषणे असा त्रिसूत्री कार्यक्रम आम्ही ठरविला. काव्य, नाट्य, चित्रकला, संगीत याचे कोणतेही औपचारिक व तांत्रिक शिक्षण घेतले नसताना आम्ही गीतांच्या माध्यमाचा वापर करण्याचे ठरवले. आपल्याला जे व्यक्त करायचे तेच लोकांना समजले पाहिजे हा सर्वात मुख्य निकष आम्ही आमच्या गाण्यांना लावला. अनुभवाच्या या पुंजीवरच ‘मुलगी झाली हो’ पथनाट्याची आधी गाणी आणि मग त्यांना जोडणारे संवाद अशा पद्धतीने निर्मिती झाली. आम्ही कार्यकर्त्यांनीच त्यात काम करायला सुरुवात केली. आम्ही बहुतेक जणी स्वत:च्या पायावर उभ्या असल्याने संघटनेवर आमची आर्थिक जबाबदारी नव्हतीच. त्यामुळे नाटक करण्याचा भार संघटनेवर पडला नाही. तरीही महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींसाठी, न्यायासाठी लढणाऱ्या सर्व लोकांनी आम्हाला पाठबळ दिले.

‘मुलगी झाली हो’, ‘हुंडा नको ग बाई’, ‘बाप रे बाप’, ‘पंडिता रमाबाई – समतेकडे वाटचाल’ ही संघटनेची नाटके आणि कलापथक घेऊन आम्ही स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करत महाराष्ट्रात अनेक छोटे दौरे आणि यात्रा केल्या. त्यातून शेकडो कार्यकर्ते संघटनेला मिळाले. हे दौरे किंवा यात्रा म्हणजे केवळ नाटकांचे प्रयोग नव्हते, तर सकाळी त्या त्या गावातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद, दिवसभर स्त्री प्रश्नांवरचे पुस्तक, पोस्टर प्रदर्शन, संध्याकाळी सर्व गावांसाठी कलापथकाचा कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम होता. हजारोंनी लोक येत होते, चर्चा करीत होते.

पहिल्या यात्रेनंतरची आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग संघटनेकडे येऊ लागला. त्यांना संघटनेबरोबर काम करायचे होते. प्रश्न समजून घ्यायचे होते, समानतेचे आणि समतेचे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचा होता. स्त्रीमुक्ती संघटनेत पुरुष कार्यकर्ते काम करू लागले. स्त्रिया आणि तरुणींना नाटकांव्यतिरिक्त इतरही काम करायचे होते.

नाटकाचा परिणाम असा की नाटक संपल्या संपल्या किंवा नंतरही अनेक स्त्रिया संघटनेकडे वैयक्तिक हिंसाचाराचे प्रश्न घेऊन येऊ लागल्या. यातूनच संघटनेने प्रथम समुपदेशन केंद्रे, नंतर पाळणाघरे, कुमारवयीन मुला-मुलींसाठी जिज्ञासा आणि कचरा वेचक स्त्रियांसाठी बचत गट, मुलांचे शिक्षण आणि उपजीविकेसाठी प्रशिक्षण तसेच आरोग्यासाठी शिबिरे असे विविध उपक्रम सुरू केले. त्याचबरोबर स्त्री प्रश्नांवर पुस्तक प्रकाशन आणि गेली जवळजवळ ३९ वर्षे अखंड प्रकाशित होणारे ‘प्रेरक ललकारी’ हे मासिक हेही संघटनेचे महत्त्वाचे उपक्रम आहेत. ‘मुलगी झाली हो’चे हिंदीत भाषांतर झाल्यानंतर भारतातल्या इतर राज्यांत जाण्याची संधीही आम्हाला मिळाली.

‘स्त्री मुक्ती संघटना’ म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा ध्यास घेऊन गेल्या ५० वर्षांत एका छोट्या गटापासून महाराष्ट्रात पसरलेल्या, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेल्या, सातत्याने, तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच आहे. या संचाने स्त्रियांसाठी विविध उपक्रम हातात घेतांना स्त्री प्रश्नांचा अभ्यास आणि चळवळीचा धागा आजतागायत सोडला नाही. तेही कुठल्याही प्रकारे पैसा व प्रसिद्धी यांच्या मागे न लागता.

या ५० वर्षांत एकीकडे काही प्रश्न हळूहळू सुटत आहेत, तर काही गुंतागुंतीचे होत आहेत. जात आणि धर्म यांच्या वाढत्या अस्मितेमुळे स्त्रियांचे जीवन आणखी असुरक्षित होत आहे. कारण जातीय, धार्मिक आणि वांशिक दंगली आणि युद्धे याची सगळ्यात जास्त झळ स्त्रियांना आणि लहान मुलांनाच जास्त पोहोचते. स्त्रिया आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. केवळ स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन किंवा त्यांना घरात डांबून ठेवून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी पुरुषाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

स्त्रियांचा श्रमशक्तीमधील सहभाग वाढण्यासाठी शहरात आणि ग्रामीण भागात शौचालये, पाणी, रस्त्यांवर दिवे, मुलांना सांभाळण्याची सोय, वसतिगृहे इत्यादी पायाभूत सुविधा तयार व्हायला हव्यात. जंगल, जमीन आणि पाणी यांचे संरक्षण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट हाही स्त्रियांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या या गंभीर टप्प्यावर स्त्रियांचे योगदान फार महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवून विशेषत: गरीब वर्गातील स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखायला हव्यात. ‘हरित निधी’सारख्या अनेक योजना कागदावर किंवा धोरणाच्या कागदपत्रात किंवा नियमावलीतही दिसतात, पण अंमलबजावणीच्या पातळीवर स्त्रियांच्या हाताला काहीच लागत नाही. ६० टक्के संपत्तीची निर्मिती स्त्रिया करीत असल्या तरी १० टक्के संपत्तीही त्यांच्या नावावर नसते असे आकडेवारी सांगते.

स्त्री-पुरुष समानतेचे आम्ही पाहिलेले स्वप्न अजून प्रत्यक्षात यायला बराच अवधी लागणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’ची घोषणा आहे, ‘सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण’, पण तरुण मुलींना शिक्षणाची आणि नोकरीची समान संधी, संपत्तीत समान वाटा, जात आणि धर्म याचे बंधन न ठेवता जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित जीवन मिळण्याची संधी मिळाली तरच ही घोषणा साकार होणार आहे.

‘स्त्री मुक्ती चळवळी’चा आजवरचा प्रवास हा लोकशाही आणि अहिंसक मार्गानेच झाला आहे. समानता, जागतिक शांतता आणि विषमता निर्मूलन हे स्त्री चळवळीसमोरील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग खाचखळग्याचा आहे, पण हमरस्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, कारण एकीकडे समृद्धी वाढते आहे. त्याचबरोबर व्यक्तिवादी संस्कृतीही उदयाला आली आहे. ‘स्त्री मुक्ती चळवळ’ ही एका अर्थी व्यक्तिस्वातंत्र्याची चळवळ आहे, पण ती व्यक्तिवादी संस्कृती मानत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याला सामूहिक समृद्धीची सुदृढ चौकट हवी तरच ते उपभोगता येईल हे नव्या पिढीने लक्षात ठेवायलाच हवे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच म्हणजे स्त्रियांना, पारलिंगींना तसेच पुरुषांनाही बरोबर घेऊन त्यांच्या साथीनेच आपल्याला नव्या जगाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आमचा व्यापक दृष्टिकोन खालील ओळीतून स्पष्ट होईल.

समानता हे ध्येय आमुचे
केवळ तितुके नाही
भूक, गरिबी, जातिभेद अन्
हिंसेशी ही लढाई
निसर्ग मानव संतुलनाची
आसही आमच्या हृदयी
विकास समता विश्वशांती
हे ध्येय आमुच्या पुढे
या शतकाच्या पाठीवर
लिहून समानतेचे धडे
खांद्यावर पेलुनी आकाश अर्धे
चला जाऊया पुढे

smsmum@gmail.com

Story img Loader