शब्द हे केवळ संवादाचं माध्यम नाही, तर त्यातून ऊर्जा प्रवाहित होत असते. आपल्याकडून बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला विशिष्ट स्पंदनं असतात. ज्यामुळे आपल्या ऊर्जेत आणि आयुष्यात येणाऱ्या नवनव्या संधी-शक्यतांमध्ये वाढ किंवा घट होत असते. दैनंदिन संवादात आणि विचार करताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये वास्तवाला आकार देण्याचं सामर्थ्य असतं. सजगतेनं जगण्याच्या या प्रवासात शब्दांचं महत्त्व केवळ सकारात्मक राहून नकारात्मकतेला दूर ठेवणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये, तर आपली मानसिकता, वृत्ती, कृती आणि त्यांचे परिणाम या सर्वांवर भाषेचा नकळत प्रभाव पडत असतो.
आपण बोलतानाची भाषा असो किंवा विचार करण्याची भाषा, आपल्या भाषेचा आपण जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर, परस्पर संवादावर आणि आपल्या जीवनानुभवावरसुद्धा खोलवर परिणाम होतो. ‘मी तणावग्रस्त आहे.’ आणि ‘मी आव्हानात्मक परिस्थितीतून जातोय.’ या दोन वाक्यांमधला फरक लक्षात घ्या. पहिल्या वाक्यातला तणाव हा जणूकाही कायमस्वरूपी राहणार आहे असा अर्थ त्यातून ध्वनित होतोय, तर दुसऱ्या वाक्यातली आव्हानात्मक परिस्थिती ही तात्पुरती आहे. हा अर्थ ध्वनित होतोय. शिवाय त्यातून प्रगतीची आणि बदलाची शक्यताही अधोरेखित होतेय. दोन्ही वाक्यांतला फरक किरकोळ वाटला, तरी आपल्या आव्हानांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर खोलवर परिणाम करतो.
अमित आणि राजीव या दोघा मित्रांच्या गोष्टीतून शब्दांची ‘ताकद’ आणि ‘प्रभाव’ कसा पडतो हे लक्षात येईल. या दोघांची भाषेचा वापर करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा फारच वेगळी आहे. शब्द केवळ भावनांनाच आकार देतात असं नव्हे, तर आयुष्यात आपण ज्या मार्गावर चालतो, जी मानसिकता अंगीकारतो आणि जे यश मिळवतो त्या सर्व गोष्टींना मूर्त रूप देण्याचं कामही शब्दच करतात. अमित आणि राजीव यांचा जीवनानुभवही हेच अधोरेखित करतो.
हेही वाचा…इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
अमित आणि राजीव एकमेकांचे चांगले मित्र. दोघांचेही भारतातल्या वेगवेगळ्या शहरांत स्वतंत्र व्यवसाय आहेत. दोघेही तितकेच हुशार आणि महत्त्वाकांक्षी, पण दोघांचीही बोलण्याची, शब्दांचा वापर करण्याची पद्धत वेगळी आणि यामुळेच दोघांचे मार्गही वेगवेगळे.
अमितच्या तोंडी बऱ्याचदा ‘मला या मीटिंगला जावंच लागेल.’ किंवा ‘मला माझा व्यवसाय वाढवायला हवा, पण त्याबरोबर मला जादाचा ताण नकोय,’ अशी वाक्यं असतात. त्याच्या मीटिंग्जमधल्या बोलण्यात, ‘व्यवसायासाठी एवढा खर्च मला नाही परवडणार.’ आणि ‘या प्लॅनमधली त्रुटी म्हणजे…’ अशा वाक्यांचा खच पडलेला असतो. याशिवाय ‘कधी एकदा हा आठवडा संपतोय असं झालंय.’ हे वाक्यही त्याच्या तोंडी कायम असतं. ‘कधी तरी भविष्यात चांगले दिवस येतील याच आशेवर सगळं अवलंबून आहे.’ ही त्याची सगळी वाक्यं वर वर पाहता आपल्याला अगदी सामान्य वाटतात, पण त्यांचा अमितच्या मानसिकतेवर फार खोलवर परिणाम झाला आहे.
त्याच्या प्रत्येक वाक्यातून स्वत:च्याच आयुष्यात तो परावलंबी असल्यासारखा आणि सक्तीच्या गोष्टींनी व ताणतणावांनी जखडल्यासारखा वाटतो. जेव्हा तो ‘मला हे करावं लागेल,’ असं म्हणतो तेव्हा त्याच्यावर असलेला ताण जाणवतो, जणूकाही तो स्वत:च्या नव्हे तर इतरांच्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झगडतोय. ‘मला हे परवडत नाही’, हे वाक्य त्याला अभावावरच लक्ष केंद्रित करायला भाग पाडतंय, तर ‘यातली त्रुटी म्हणजे…’ हे बोलून तो उपायापेक्षा समस्येकडेच अधिक लक्ष देतोय.
जर तुम्ही या सगळ्या वाक्यांचा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की, आपण सर्वच जण अशी काही वाक्यं आणि शब्द उच्चारतच असतो. फक्त परिस्थिती वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, अमितची ‘आज मला माझ्या मुलाला शाळेतून आणावं लागेल.’ किंवा ‘मी रोज पहाटे पाच वाजता उठायला हवं.’ ही वाक्यं जरा स्वत:शी म्हणून पाहा आणि तुम्हाला काय जाणवतं ते पाहा.
अमितची भाषा ही अभाव आणि दडपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसाची भाषा वाटते. त्याला असलेल्या मर्यादांशी त्याचं ‘मन’ आणि ‘जाणिवा’ जोडल्या जातात. त्यातून तो जे निर्णय घेतो. त्यामुळे या अभावाच्या आणि दडपणाच्या मानसिकतेलाच खतपाणी घातलं जातं.
अमितच्या बोलण्याच्या पद्धतीचा त्याच्या व्यवसायावर थेट परिणाम होतो. त्याच्या संभाव्य ग्राहकांना आणि नवीन प्रोजेक्ट्सना तो सावधगिरीचं धोरण ठेवून सामोरा जातो. अशा वेळी त्याचं लक्ष त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या संधींपेक्षा त्यात असलेल्या धोक्यांकडेच जातं. नवं तंत्रज्ञान आणि त्याला अनुरूप सेवा पुरवण्यासाठी गुंतवणूक करण्याची त्याची तयारी नसते. त्यात काही नुकसान झालं तर? अशी त्याला भीती वाटते. जेव्हा काही आव्हानात्मक प्रसंग येतो, तेव्हा त्यात असलेल्या अडथळ्यांकडे त्याचं सर्वप्रथम लक्ष जातं, त्यामुळे चटकन योग्य निर्णय घेता येत नाही आणि त्या क्षणी निर्माण झालेल्या संकटातल्या संधीकडे मात्र दुर्लक्ष होतं.
हेही वाचा…बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
व्यवसायाच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्यापेक्षा खर्चात कपात कशी करायची याचीच अमित सतत चिंता करत असतो, त्यामुळे त्याच्या व्यवसायवाढीत साहजिकच अडथळा निर्माण होतो. अमितच्या सावधगिरीच्या मानसिकतेचा त्याच्या सहकाऱ्यांवरही परिणाम होतो. त्याच्या बोलण्यात नेहमी येणाऱ्या ‘आपल्याला हे करावं लागेल.’ या शब्दांमुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्ये सक्तीची भावना निर्माण होते. ध्येयाने प्रेरित होऊन काम करण्यापेक्षा तणावाखाली काम करण्याचं वातावरण निर्माण होतं. परिणामत: अमितची प्रगती ही अतिशय संथ गतीने होतेय. त्याच्या ग्राहकांना तो योग्य पद्धतीने सांभाळत असला तरी व्यवसायाच्या नव्या संधी मिळवण्यासाठी मात्र त्याला झगडावं लागतं. त्याचा सगळा वेळ हा रोजच्या आव्हानांना तोंड देण्यातच खर्ची पडतो, त्यामुळे त्याला व्यवसायवाढीच्या दृष्टीने काही नवीन योजनांचा विचार करण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्याने कितीही कठोर मेहनत घेतली तरी त्याचे शब्द मात्र मर्यादांभोवतीच घुटमळत राहतात. अखेरीस हेच शब्द एखाद्या भविष्यवाणीसारखे सत्य होतात आणि त्याच्या व्यवसायाची प्रगती खुंटते.
राजीवची भाषा मात्र अमितच्या अगदी उलट आहे. तो म्हणतो, ‘मला या मीटिंगला उपस्थित राहायचं आहे.’ हेच शब्द सक्तीचं रूपांतर संधीत करतात. जेव्हा त्याला काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा ‘आपल्याला हे केलंच पाहिजे.’ असं म्हणण्याऐवजी तो स्वत:ला विचारतो, ‘मला खरंच हे करायचं आहे का? माझ्याकडे इतर कोणते पर्याय आहेत?’ तसंच ‘मला हे परवडत नाही.’ असं म्हणण्यापेक्षा ‘आत्ता या गोष्टीला प्राधान्य देण्याची गरज नाहीये.’ असं तो म्हणतो. यामुळे अभावाच्या किंवा उणिवेच्या भावनेपेक्षा त्या क्षणी काय महत्त्वाचं आहे यावर त्याचं लक्ष केंद्रित राहतं.
राजीवची भाषा त्याला कायम सक्षम मानसिकतेत ठेवते. काही योजना किंवा भविष्यातल्या काही आव्हानांबद्दल चर्चा करताना त्यात काय त्रुटी आहेत यापेक्षा तो नेहमी ‘मी अमुक गोष्टीला प्राधान्य देईन.’ असे शब्द वापरतो. कितीही जोखमीची गोष्ट असली तरी ‘या ग्राहकाला भेटायला मी उत्सुक आहे.’ असं तो म्हणतो. यातून त्याचा उत्साह दिसून येतो.
शब्दांचा जाणीवपूर्वक व योग्य वापर केल्यामुळे राजीवच्या विचारांची जडणघडण योग्य पद्धतीने होते आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी मजबूत होतो. त्याच्या कामांकडे तो त्याने निवडलेला पर्याय म्हणून बघतो, सक्ती म्हणून नाही. यामुळेच कृतज्ञतेची आणि उत्साहाची भावना वाढीस लागते. परिणामत: तो धोक्यांना भीतीने नाही तर उत्सुकतेने सामोरा जातो. नव्या ग्राहकांसोबत नव्या प्रकल्पांवर काम करायला मिळणार यासाठी तो उत्सुक असतो. त्याच्या या मानसिकतेमुळे त्याला नवनवीन संकल्पनांवर काम करायला वाव मिळतो आणि यातूनच त्याच्या व्यवसायाची वेगाने प्रगती होते.
राजीवच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहतं. त्याच्या सहकाऱ्यांनाही सकारात्मकता जाणवते आणि यातून त्यांना सर्जनशील आणि सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा मिळते. कामाचा ताण येण्याऐवजी त्यांना आपल्याला आणि आपल्या कामाला किंमत आहे हे जाणवतं, आणि ते अधिक उत्साहानं काम करतात. राजीवला त्याच्या ध्येयाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यात रस आहे, यामुळे त्याला त्याच्या व्यवसायाचा स्तर उंचावता येईल आणि नव्या संधीही मिळतील.
अमित आणि राजीवच्या भाषेचा वापर करण्याच्या पद्धती आणि त्यातील फरकावरून आपल्याला दोन वेगळ्या प्रकारच्या वास्तवांचं दर्शन घडतं. अमितची भाषा सक्ती, तणाव, अभाव याभोवती केंद्रित आहे, तर राजीवची भाषा निवड, प्राधान्य आणि विपुलता याभोवती केंद्रित आहे. अमितची भाषा ही त्याला नेहमी संकुचित अवस्थेत ठेवते, ज्यामुळे त्याला नेहमी परिस्थितीने बांधून ठेवल्याची भावना येते. आव्हानाकडे तो अवजड ओझं म्हणून बघतो. त्याने घेतलेले निर्णयसुद्धा प्रगतीची संधी शोधण्यापेक्षा अस्थिरतेची, अस्वस्थतेची परिस्थिती टाळण्याच्या भावनेतून घेतलेले असतात. राजीव मात्र नेहमी विस्ताराच्या भूमिकेतून विचार करतो. स्वत:च्या आयुष्यातले निर्णय तो स्वत:च घेतो आणि त्यामुळे तो शांत राहून प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सक्रिय राहू शकतो, हे त्याच्या भाषेवरून लक्षात येतं. दोघांमधले हे फरक वरकरणी सामान्य वाटले, तरी त्यांच्या कृती, वृत्ती आणि परिणामांवर मात्र या फरकांचा फार खोलवर परिणाम झालेला आहे.
हेही वाचा…… मोहे शाम रंग दई दे
शब्द हे अंत:करणाच्या भूमीवर रुजवलेलं बीज आहे. त्यातून विचार, वृत्ती आणि कृती निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या वास्तवाला आकार प्राप्त होतो. ‘केलंच पाहिजे.’ किंवा ‘करणं भाग आहे.’ यातून ध्वनित होणारी ऊर्जा ही ‘मी हे निवडतोय.’, ‘मला हे करायचंय.’ यातून ध्वनित होणाऱ्या ऊर्जेपेक्षा मुळातच वेगळी आहे. शब्दांचा आपल्या जीवनावर किती मूलगामी परिणाम होतो हे अमित आणि राजीवच्या अनुभवातून प्रकर्षाने लक्षात येतं. जरी दोघांच्या समोरची आव्हानं एकसारखी होती तरी त्यांच्या शब्दांमुळे मात्र दोघांच्या बाबतीत संपूर्णपणे वेगळे परिणाम दिसून आले.
आपल्या भाषेच्या वापराच्या शैलीत केलेल्या बदलांमुळे आपल्या आयुष्यात काही एका रात्रीत बदल घडणार नाही. पण ही एक सुरुवात असू शकते, आपल्या मानसिकतेतल्या बदलाची आणि कालांतराने आपल्या कृती आणि त्यांचे परिणाम यातही घडणाऱ्या बदलांची. आताच्या जगात असंख्य गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण शब्दांचा यथायोग्य वापर करणं मात्र आपल्या हाती आहे. तेव्हा अधिक जागरूकतेने आणि शहाणपणाने त्यांचा वापर करू या, फायदा आपलाच आहे! sanket@sanketpai.com