डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com
करोनापेक्षाही सध्या अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे हैराण झालेत. घरातून काम करताना तांत्रिक अडचणी तर आहेतच, पण त्याहीपेक्षा मोठी अडचण म्हणजे वाढलेला कामाचा भार! घरातूनच काम चाललं आहे म्हटल्यावर कोणत्याही वेळी होणाऱ्या ‘ऑनलाइन मीटिंग्ज’, ‘बॉस’ लोकांकडून बारीकसारीक गोष्टींचा पाडला जाणारा कीस, लहान मुलंही सध्या पूर्णवेळ घरातच असल्यामुळे आई-बाबांनी आपल्याशी खेळावं म्हणून त्यांच्याकडून धरला जाणारा हट्ट आणि आई-बाबांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्यामुळेपुढे होणारी रडारड हे सगळं तर आहेच, पण या ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये सर्वात जास्त भरडल्या जाताहेत त्या स्त्रिया! लॉकडाऊनमुळे घरकाम करायला कुणी मदतनीस नाही. मग जेवणखाणापासून घरची कामंही तिनेकरावीत अशी धरली जाणारी अपेक्षा आणि त्यातच ऑफिसच्या ‘टार्गेट्स’ची चिंता..
‘‘गेले आठ-दहा दिवस करोनामुळे मी ‘वर्क फ्रॉम होम’ करतोय. हे इतक्या अचानक झालं, की त्याची तयारी करायलाही अवधी मिळाला नाही. खरं सांगायचं तर करोनापेक्षाही ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मी हैराण झालोय. एकतर घरामध्ये मिळणारा इंटरनेटचा कमी वेग, लॅपटॉपच्या सुविधांमधला अभाव, पुरेशा ‘बँडविथ’ची कमतरता, या तांत्रिक अडचणी आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त अडचण म्हणजे कामाचा वाढलेला अतिरिक्त भार! पूर्वी निदान नोकरीच्या ठरावीक वेळात काम असायचं. आता तर काळ-वेळ उरलेलाच नाही. घरीच आहे म्हटल्यावर बॉसचा कधीही मेसेज येतो की ‘ऑनलाइन’ मीटिंगसाठी तयार राहा. मग कामाचा कीस पाडला जातो, सूचना केल्या जातात. नवीन ‘असाइन्मेंट्स’ दिल्या जातात. पूर्वी बॉसना बारीकसारीक गोष्टीत लक्ष द्यायला फुरसत नसायची. आता मात्र प्रत्येक किरकोळ तपशीलावर ते नजर ठेवतात. कार्यालयात एक किंवा दोन आठवडय़ांतून एकदा कामाचा आढावा घेतला जायचा. आता रोजच घेतला जातोय. करोनामुळे सगळे बॉस ‘मायक्रो मॅनेजर’ झाले आहेत. त्यांनाही व्यवस्थापकांना दाखवून द्यायचं असतं ना, की आम्ही ऑफिसला प्रत्यक्ष येत नसलो तरी आमचं काम कसं सुरळीत चालू आहे ते! ..’’ फायनान्स फर्ममध्ये नोकरी करणारा सौरभ ‘वर्क फ्रॉम होम’ला असा कंटाळून गेलाय.
सल्लागार कंपनीत नोकरी करणाऱ्या रोहिताची व्यथा वेगळीच आहे. ती म्हणते, ‘‘करोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करताना सर्वात जास्त भरडल्या जातात त्या स्त्रिया! एकतर लॉकडाऊनमुळे घरकाम करायला कुणी मदतनीस नाही. त्यामुळे घरचा भारही ओढायचा आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करायचं. नवरा आणि मुलं थोडीफार मदत करतात. पण जेवणखाणापासूनची वेळखाऊ कामं शेवटी माझ्यावरच पडतात. भाजीला फोडणी देत देत कामाचे फोन घ्यावे, करावे लागतात. म्हणजे घरकामही करा आणि ऑफिसची दिवसभरातली ‘टारगेट्स’ पूर्ण करा. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरातल्यांशी संवाद जास्त होतो, असं म्हणतात. पण मला मात्र या दुहेरी वर्कलोडमुळे कुणाशीच संवादाचं त्राण राहत नाही. माझा संवाद चिडचिड आणि वैतागातच संपून जातो.’’
विराजच्या आजी-आजोबांना ‘वर्क फ्रॉम होम’ नाही, पण त्यांचाही याबाबत तक्रारीचाच सूर दिसतो. ते म्हणतात, ‘‘ विराजचे आई-बाबा म्हणजे आमचे मुलगा-सून दोघंही सॉफ्टवेअर कंपन्यांत नोकरी करतात. आता दोघंही ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. दोघंही दिवसभर कानाला हेडफोन लावून लॅपटॉपसमोर बसलेले असतात. आमचं घर लहान आहे. त्यांची कामं चालू असली की टीव्ही लावायचा नाही, मोठय़ानं बोलायचं नाही. एक ना दोन, अनेक बंधनं! बरं, लॉकडाऊनमुळे बाहेर जायची सोय नाही. आमचा खूपच इतका कोंडमारा होतोय. आई-बाबा घरी आहेत याचा आनंद बिचाऱ्या विराजलाही धड घेता येत नाही. त्याला त्यांच्याशी खेळायचं असतं आणि ते काम करताना व्यत्यय आणू नकोस म्हणून त्याच्यावर ओरडत असतात.’’
आज करोनामुळे लॉकडाऊन होऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या अनेकांची ही प्रातिनिधिक व्यथा आहे. एकतर दिवसेंदिवस वाढत जाणारा करोनाचा विळखा आपल्याभोवतीही पडेल का, किंवा तसं झालं तर काय ही चिंता आहेच. त्यात लॉकडाऊन किती दिवस चालेल याचीही अनिश्चितता जोडीला आहे. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ कदाचित प्रदीर्घ काळ चालेल या चिंतेची टांगती तलवार डोक्यावर आहे. एकतर घरून काम करायचं आणि जेव्हा ऑफिसेस उघडतील तेव्हा एवढे दिवस सुट्टी झाली म्हणून दिवस भरून काढायला नेहमीच्या सुट्टय़ांवरही गदा येईल, अशी चिंता काहींना आहे, तर अर्थव्यवस्थेवर झालेल्या गंभीर परिणामांमुळे आपली नोकरी टिकेल की नाही किंवा टिकली तरी तिचं स्वरूप काय असेल याचीही चिंता काहींना आहे. थोडक्यात, करोनामुळे मिळालेला ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय अनेकांना सुखावह वाटण्यापेक्षा चिंतेत व ताणात भर घालणारा आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यप्रणाली पाश्चात्त्य देशांत बरीच प्रचलित आहे. काम कशा प्रकारे करावं हे स्वातंत्र्य ही पद्धत देत असली तरी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे कमी काम नव्हे. जर कमी काम असा त्याचा अर्थ लावला तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर भ्रमाचा भोपळा फुटू शकतो. काम कमी नव्हे, तर ते सुखावह करणं हे या कार्यप्रणालीचं उद्दिष्ट असतं. म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे लोक उशिरा उठत, घरातल्या कपडय़ांत अगदी नाइटसूटमध्येही लोळत, टीव्ही बघत, संगीत ऐकत, पुस्तकं वाचत, मजेत काम करताना दिसतात. परंतु याचा अर्थ ते काम कमी करत नसतात, तर कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा जास्तच काम करत असतात. जेव्हा एखाद्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला जातो, तेव्हा तो टप्प्याटप्प्याने अमलात आणला जातो. त्यामुळे घरून काम करण्यासाठी मानसिकता हळूहळू अनुकूल केली जाते. करोनाच्या महासंकटानं पाहता पाहता इतकं अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं, की आपल्याकडे ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय तडकाफडकी अमलात आणला गेला. त्यामुळे मानसिक अनुकूलतेस अवकाशच मिळाला नाही. परंतु सद्य परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम ’ हा पर्याय राहिला नसून ती अनिवार्यता झाली आहे. तिला कमीतकमी अस्वस्थ होऊन तोंड देणं हा एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे. त्यासाठी अनुकूल मानसिकता निर्माण करणं महत्त्वाचं आहे. सौरभ, रोहिता आणि विराजच्या कुटुंबीयांनी हे लक्षात घेतलं, तर त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकते. त्यासाठी ते पुढील मार्गाचा अवलंब करू शकतात.
मानसिक लवचीकता जोपासणं- सौरभ, रोहिता व विराजचे कुटुंबीय अवस्थ झाले आहेत, कारण त्यांची सुरळीत चाललेली घडी अचानक मोडली आहे. आपला सगळ्यांचा एक विशिष्ट दिनक्रम ठरलेला असतो. त्यात विघ्न आलं, की आपल्याला ताण जाणवतो. या सगळ्यांना प्रत्यक्ष कामापेक्षा विस्कटलेल्या घडीमुळे ताण आला आहे. तो सहन करण्यासाठी त्यांनी मानसिक लवचीकता ठेवली पाहिजे. मानसिक लवचीकता म्हणजे आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी न घडण्याची व त्यात बदल घडण्याची मानसिक तयारी. बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. जर या सतत होणाऱ्या बदलाचा आपण स्वीकार केला नाही, तर घडी विस्कटल्यामुळे समोर येणाऱ्या नकारात्मक बाजूंवरच आपलं लक्ष केंद्रित होईल. या सगळ्यांनी लवचीकता ठेवली तर त्यांना असं दिसेल, की घरून काम करण्यात काही अडचणी असल्या तरी त्याचे काही फायदेही आहेत. उदाहरणार्थ, रोजच्या प्रवासाचे तास वाचतात, दगदग वाचते, नेहमीपेक्षा जास्त वेळ कुटुंबासमवेत व्यतीत करता येतो, कपडय़ांचं ड्रायक्लीनिंग, बाहेरच्या जेवणाचा खर्च यात बचत होते, आपण स्वावलंबी होतो, असे अनेक फायदे त्यांच्या लक्षात येतील व परिस्थिती फार भीषण वाटणार नाही.
संदिग्धतेचा सहनबिंदू (अँबिग्युइटी टॉलरन्स) वाढवणं- सध्याची परिस्थिती इतकी संदिग्ध आहे, की पुढं नक्की काय होणार याचं अचूक भाकीत कुणीच करू शकत नाही. संग्दिग्धतेचा सहनबिंदू वाढवणं म्हणजे परिस्थिती सुस्पष्ट, ठोस नसली तरी स्वत:ला अस्वस्थ न करणं. सौरभ, रोहिता आणि विराजच्या कुटुंबीयांनी संदिग्धतेचा सहनबिंदू वाढवला तर त्यांना कळेल, की संदिग्ध परिस्थिती आपल्याला वर्तमानकाळात राहायला शिकवते. सध्या परिस्थिती संदिग्ध असली तरी ती सदासर्वकाळ तशी राहणार माही. आता अव्यवस्था दिसत असली तरी अव्यवस्थेचीही घडी बसू शकते. त्याला ‘न्यू नॉर्मल’ असं म्हणतात. याचा अर्थ काही काळानं आपल्याला संदिग्धतेचीही सवय होते. जेवढं अधिक आपण संदिग्धतेला तोंड देऊ तेवढं अधिक कठीण प्रसंगांशी मुकाबला करण्याची क्षमता वाढवू. त्यामुळे पुढील आयुष्यात अवघड प्रसंग आले तरी आपण खचून जाणार नाही, कारण असे प्रसंग कसे हाताळायचे याचा अनुभव आपण आज घेत आहोत. जेवढी जास्त संदिग्धता तेवढी सर्जनशीलता अधिक बहरून येते, असं संशोधन सांगतं. सद्य परिस्थितीत अनेक जण लिहीत असलेल्या कविता, मनोगतं, निबंध, चुटकुले याची साक्ष देतात. सौरभ व रोहिताही चिडचिडीत व वैतागण्यात खर्च होणारी स्वत:ची ऊर्जा सर्जनशीलतेच्या नवीन संधी शोधण्यात कारणी लावू शकतात.
बहुविध कामांची (मल्टिटास्किंग) क्षमता वाढवणं- ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपल्याला सौरभ व रोहिताप्रमाणे अनेक कामं एकाच वेळी करावी लागतात. बहुविध कामं करणं म्हणजे अनेक कामं एकाच वेळी करणं असा नव्हे, तर एका कामातून दुसऱ्या कामात जाण्याचा कालावधी कमी करणं. सौरभ व रोहिताने जर स्वत:ची अस्वस्थता कमी केली तर हा कालावधी ते कमी करू शकतील व ही क्षमता जोपासण्यासाठी प्रयत्न करू शकतील. तसं झालं, तर आता त्यांना येत असणारा तणाव कमी होईल.
विचलनशीलता कमी करणं- ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपल्याला विचलित करणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. ऑफिससारखं शांत व अनुकूल वातावरण मिळत नाही. व्यक्तिगत अवकाशही मिळत नाही. याचा जाणीवपूर्वक स्वीकार केला तर नियोजन करून ठरलेल्या वेळात नक्की काय करायचं आहे हे लक्ष्य निश्चित करता येतं व स्वत:ची विचलनशीलता कमी करता येते. ती केली तर व्यावसायिक कामांसाठी स्वत:चं व्यक्तिगत जग तयार करणं कठीण नाही. ते करणं बा जगातील घटनांवर अवलंबून नाही. विराजच्या आई-वडिलांनी स्वत:ची विचलनशीलता कमी केली तर बा जगात अनेक गोष्टी घडत असूनही ते स्वत:चं वैयक्तिक जग निर्माण करू शकतील व कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्यामुळे घरातल्या लोकांवर बंधनं घालण्याची गरज त्यांना राहणार नाही.
सौरभ, रोहिता आणि विराजच्या कुटुंबीयांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ‘वर्क फ्रॉम होम’ ही केवळ कामाची पद्धत नाही तर घरामध्ये कार्यसंस्कृती निर्माण करण्याचं ते एक आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी स्वत:ची मानसिकता त्यासाठी अनुकूल करणं गरजेचं आहे. ती केली तर ‘वर्क फ्रॉम होम’चा संबंध तणावाशी न जोडता त्याचे स्वागत करायला ते सज्ज होतील.