सुकेशा सातवळेकर
तंदुरुस्ती, वाढ आणि विकासासाठी आवश्यक प्रमाणात ऊर्जा आणि इतर अन्नघटक पुरवणं, कायम सुयोग्य वजन सांभाळणं; ही मधुमेही आहाराची प्रमुख तत्त्वं आहेत. वेळीच निदान झालं तर औषधांशिवाय फक्त आहारोपचाराने हा मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. कसा ते सांगणारा हा लेख १४ नोव्हेंबर या ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त..
परवा साठे दाम्पत्य आले होते. साठे यांना मधुमेह असल्याचं नुकतंच कळलं होतं. वयाची चाळिशी नुकतीच पार केलेलं हे जोडपं, जरा भांबावूनच गेलं होतं. झालं! आता खाण्यापिण्यावर खूप बंधनं आली, आवडते गोड पदार्थ खाता येणार नाहीत म्हणून साठे नाराज, तर साठेबाईंना दडपण आलं होतं, रोज दोन वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करावा लागणार याचं. पथ्य पाळायचं आणि कुपथ्य टाळायचं म्हटलं, की सगळ्यांनाच दडपण येतं.
हल्लीच्या गतिमान आयुष्यात आहारविहारात, खाण्यापिण्यात बदल करणं अवघड वाटतं. खरं तर मधुमेहींसाठी, रोजच्या स्वयंपाकापेक्षा खास वेगळे पदार्थ तयार करण्याची गरज नसते. फक्त आहाराविषयी पूर्ण माहिती समजून घेणं महत्त्वाचं असतं. पथ्याची अनाठायी भीती न बाळगता, योग्य आहारपद्धतीशी दोस्ती करण्यासाठी आहारतज्ज्ञ मधुमेहींना मदत करतात.
‘जीवन करि जीवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’
खरंच, मधुमेह टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ आहे आणि ‘अन्नग्रहण हे यज्ञकर्म’ आहे.
आहारोपचार हा साखर नियंत्रणाचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक मधुमेहीने वैयक्तिक आहार मार्गदर्शन घेऊन ते पाळण्याचा प्रयत्न करावा. जागतिक पातळीवरील संशोधनानंतर असं सिद्ध झालंय की, वैद्यकीय आहारोपचारामुळे मधुमेह नियंत्रणासाठी खूप चांगला फायदा मिळतो. प्रशिक्षित आणि अनुभवी आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार नियंत्रणात ठेवला, तर मधुमेहातील गुंतागुंत २५ टक्क्य़ांनी कमी होते.
हल्ली मध्यमवयीन लोकांबरोबरच, लहान मुलांमध्येही ‘टाइप २’ मधुमेह दिसून येतो. यामध्ये इन्शुलिनची काही प्रमाणात कमतरता दिसते आणि जे इन्शुलिन उपलब्ध असतं ते अकार्यक्षम असतं. वेळीच निदान झालं तर औषधांशिवाय फक्त आहारोपचाराने मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. १४ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त मधुमेहाविरुद्धच्या जागतिक स्तरावरील लढय़ाला बळ मिळतं. ‘मधुमेहमुक्त विश्व’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, ज्या सूत्रांचा अवलंब होतो त्यात ‘वैद्यकीय आहारोपचार’ हे प्रमुख सूत्र आहे.
तंदुरुस्ती, वाढ आणि विकासासाठी आवश्यक प्रमाणात ऊर्जा आणि इतर अन्नघटक पुरवणं, कायम सुयोग्य वजन सांभाळणं, ही मधुमेही आहाराची प्रमुख तत्त्वं आहेत. आवश्यक सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात पुरवणारा संतुलित आहार, रक्तशर्करा नियंत्रण आणि गुंतागुंत टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खाण्यापिण्याचं प्रमाण आणि वेळा यांमध्ये नियमितता असावी. आहार ५-६ वेळा विभागून घ्यावा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण सगळे घेतात; पण सकाळच्या नाश्त्यानंतर २ तासांनी आणि रात्रीच्या जेवणाआधी २ तास थोडंसं काही तरी खाणं महत्त्वाचं असतं. त्या वेळी एखादं फळ/ चणे-फुटाणे/ सोया नट्स/ थोडा सुका मेवा घेऊ शकता. फक्त २ वेळा जेवण घेतलं तर रक्तशर्करा नियमित राहू शकत नाही. भरपेट जेवणानंतर साखरेची पातळी वाढते. त्यानंतर बराच काळ काही खाल्लं गेलं नाही तर रक्त शर्करा एकदम खाली येऊन हायपोग्लायसिमिया होऊ शकतो; पण जर ठरावीक अंतराने ५-६ वेळा थोडं-थोडं खाल्लं तर रक्तशर्करा नियंत्रित आणि नियमित राहते.
रोजच्या आहाराचं नियोजन करून, मधुमेहाचं स्वनियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक खाणं ठरवताना काही पदार्थ आवर्जून वाढवायला हवेत, तर काहींचं प्रमाण कमी ठेवायला हवं. पालेभाज्या, शेंगांच्या, शिरांच्या भाज्या, सॅलडच्या भाज्या, काही फळं, अख्खी सालासकट धान्यं, कमी स्निग्धांश असलेलं दूध आणि दुधाचे पदार्थ, पोषक प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ यावर भर द्यायला हवा. साखरेचा वापर कमीत कमी करावा. मीठ कमी वापरावं. मदा वापरू नये. अल्कोहोल टाळावं. खाण्यापिण्यात नियमितता ठेवली तरी काही वेळा वैविध्य हवं असतं. म्हणजे जेवताना कधी फुलक्याऐवजी भाकरी, पराठा किंवा पुलाव खायचा असेल तर तो किती खायचा ते माहिती हवं. म्हणूनच ठरावीक उष्मांक, प्रथिनं देणारे पर्यायी पदार्थ, बहुपर्यायी तक्त्यात दिलेले असतात. मधुमेहींनी त्याचा जरूर वापर करावा.
‘मधुमेहींनी फळं खायची का? आणि किती?’ असं नेहमी विचारलं जातं. फळांमध्ये फ्रुक्टोज शुगर असते. तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे फळं खाल्ल्यावर रक्तशर्करा एकदम वाढत नाही. फळांमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं (मिनरल्स) आणि अँटिऑक्सिडंटस असतात. हापूस आंबा, रामफळ, सीताफळ, केळं यांमध्ये काही आहारतत्त्वं असतात, पण उष्मांकही जास्त असतात. म्हणून ही फळं सोडून बाकी सर्व मोसमी फळं, दोन जेवणांच्या मध्ये, रोज एक खायला हरकत नाही.
कबरेदकांचा रक्तशर्करेच्या पातळीवर सर्वात जास्त परिणाम होतो. धान्य, भाज्या, सॅलडच्या भाज्या यांमधून ‘कॉम्प्लेक्स काब्र्ज’ मिळतात. यांतील धान्य प्रकार पचल्यावर त्यांचे ७०-७५ टक्के ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. जेवणात धान्य प्रकार जास्त घेतले तर रक्तशर्करा वाढते. म्हणून आहारतज्ज्ञाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच पोळी, भाकरी, भात किंवा पोहे, उपमा, ओट्स खावेत. साखर, ग्लुकोज, मध, गूळ, मदा यांमधून ‘सिम्पल काब्र्ज’ मिळतात, ज्यांच्या पचनानंतर जास्त प्रमाणात साखर तयार होते आणि लवकर रक्तात शोषली जाते. म्हणून हे पदार्थ शक्यतो टाळावेत.
आवश्यक प्रमाणात प्रथिने मिळवण्यासाठी कमी स्निग्धांश असलेलं दूध आणि दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्य, सोयाबीन, तेलबिया, काही प्रमाणात सुका मेवा यांचा समावेश रोजच्या आहारात हवा. मांसाहार करणाऱ्यांनी अंडय़ाचा पांढरा भाग, मासे आणि चरबीशिवाय चिकन वापरावं. शेंगदाणा/ राइसब्रान/ मोहरी/ ऑलिव्ह तेल वापरावं. थोडय़ा प्रमाणात सूर्यफूल/ सोयाबीन/ करडी आदी तेल वापरावं. एकूण ३-४ चमचे तेल आणि लोणी किंवा साजूक तूप एक चमचा दिवसभरात वापरावं. डालडा, मार्गारीन पूर्णपणे वर्ज्य करावं.
मधुमेही आहारात तंतुमय पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. तंतुमय पदार्थामुळे, ग्लायसिमिक इंडेक्स कमी होतो, ग्लुकोजचं शोषण कमी होतं. त्यामुळे रक्तशर्करा
नियंत्रित राहायला मदत होते. स्निग्ध पदार्थाचं शोषण कमी होतं, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होतं. हृदयविकार आणि कोलोन कर्करोगाचा धोका कमी होतो. म्हणूनच २५-३० ग्रॅम तंतुमय पदार्थ रोज आहारातून मिळावेत. त्यासाठी पालेभाज्या, शेंगांच्या, शिरांच्या, सॅलडच्या भाज्या, फळं, शक्यतो सालं आणि बियांसकट घ्यावीत. अख्खी, सालासकट धान्यं आणि मोडाची कडधान्यं, बार्ली, ओट्स आहारात हवेत.
मधुमेहाबरोबर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रिपडाचे आजार यांचीही शक्यता वाढते. हे विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी मिठाचा वापर प्रमाणात हवा. एक चमचा मीठ दिवसभरात वापरावं. प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, बेकरीतले पदार्थ, सॉस, खारवलेले पदार्थ, लोणची, पापड हे टाळावं. शास्त्रीय संशोधनानंतर काही विशिष्ट पदार्थामधील औषधी गुणधर्मामुळे मधुमेहींना विशेष फायदा होतो, असं सिद्ध झालंय. मधुमेही आहारात या पदार्थाना खूप महत्त्व आहे. रक्तशर्करा नियंत्रणाबरोबरच गुंतागुंतीचे विकार आटोक्यात ठेवायला मदत होते.
मेथी दाणे – रोज किमान २ चमचे मोडाची मेथी खाल्ली तर रक्तशर्करा आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहायला मदत होते.
ओट्स – ओट्समध्ये बीटा ग्लुकान्स नावाचे फायबर असते ज्यामुळे ग्लुकोजचं शोषण कमी होतं.
दालचिनी – दालचिनीमध्ये सिनॅमन अल्डीहाईड असतं. ज्यामुळे ग्लुकोज रक्तामधून स्नायूंपर्यंत पोहोचवायला मदत होते.
लसूण – लसणामध्ये अॅलीसीन नावाचा घटक असतो, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतं.
जवस – जवसामध्ये ओमेगा ३ फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी असतात.
अल्कोहोलमुळे मधुमेहाच्या औषधांची परिणामकारकता बदलते. त्यामुळे रक्तशर्करा खूप वाढू किंवा कमी होऊ शकते. यकृत, हृदय, मेंदू यांच्या कार्यावर अल्कोहोलचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे अल्कोहोल शक्यतो नकोच. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असलेली पेयं पूर्णपणे टाळावी. एक खूप मोठा गैरसमज आहे, की रोज एखादा पेग घेणं हृदयासाठी चांगलं असतं; पण नवीन शास्त्रीय संशोधनानं असं सिद्ध झालंय, की अल्कोहोलमुळे एचडीएल-२ हा संरक्षक घटक वाढत नाही, तर एचडीएल-३ वाढतो ज्याचा हृदयाच्या आरोग्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अल्कोहोल वर्ज्यच करावं.
मधुमेहींना काही वेळा हायपोग्लायसिमिया म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी होण्याचा अनुभव येतो. हायपोग्लायसिमिया झाला तर ताबडतोब ३-४ चमचे साखर खावी किंवा साखर घालून फळांचा रस/ सरबत घ्यावं. १५ मिनिटांनी रक्तशर्करा तपासावी, कमी दिसली तर परत साखर खावी. व्यक्ती बेशुद्ध असेल तर पाणी पाजू नये. जिभेखाली किंवा गालाच्या आत पिठीसाखर/ ग्लुकोज पावडर ठेवावी.
मधुमेही आजारी पडले तर त्यांना काय आणि किती प्रमाणात खायला द्यायचं याबाबतीत घरच्यांचा गोंधळ उडतो. नेहमीचं जेवण जात नसेल तर दर एक ते दीड तासांनी पचायला हलके पदार्थ, भाताची पेज, पातळसर आंबील, मऊ भात, पातळसर खिचडी, भाज्यांची सूप्स, फळांचा रस थोडय़ा प्रमाणात द्यावेत. पाणी आणि पातळ पदार्थाचं प्रमाण वाढवावं. हायपोग्लायसिमिया टाळण्यासाठी साखरेचा थोडय़ा प्रमाणात वापर करायला हरकत नाही. नेहमीची मधुमेहाची औषधं चालू ठेवावी. वरचेवर रक्तशर्करा तपासून डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावेत.
मधुमेह नियंत्रणासाठी आहार नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी आहारतज्ज्ञाचं मार्गदर्शन ठरावीक कालावधीने घ्यावं आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आहारात बदल करावेत. मधुमेहाविषयीच्या गैरसमजांना तसंच अशास्त्रीय भूलथापांना बळी पडू नये. त्यातून शरीरावर घातक आणि दुरुस्त करता येणार नाहीत असे परिणाम होऊ शकतात, हे लक्षात ठेवावं. शास्त्रीय संशोधन आणि शास्त्रीय ठोस पुराव्यांनी सिद्ध झालेल्या गोष्टीच पाळाव्यात. जागरूक राहून आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या स्वत:च्या हातातच ठेवावं. ते मधुमेहाकडे देऊ नये.
dietitian1sukesha@yahoo.co.in
chaturang@expressindia.com