अनेक स्त्रियांनी संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरतील अशा डिशवॉशर,स्टोव्हचा सेफ्टी बर्नर, व्हाइटनर, कॅनिंग, डायपर्स, कांगारू बॅग, कंगवे आदी गोष्टींचा शोध लावणाऱ्या संशोधक स्त्रियांविषयी
१० नोव्हेंबरच्या जागतिक विज्ञान दिनानिमित्ताने ..
विज्ञान आणि संशोधन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने पुरुष शास्त्रज्ञांचं चित्र उभं राहतं. मादाम क्युरी हे नाव सोडलं तर सर्वसामान्यांना संशोधक स्त्रियांची फारशी माहिती नसतेच. विज्ञानाच्या, मानवाच्या प्रगतीत स्त्रियांचे योगदान फक्त नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या स्त्रीसंशोधकांपुरते मर्यादित नाही. अगदी एकोणिसाव्या शतकापासून स्त्रियांनी काही उल्लेखनीय व महत्त्वाचे शोध लावले आहेत आणि जे रोजच्या जगण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.
१९३८ साली जन्मलेल्या मार्गारेट नाईटला ‘वुमन एडिसन’ म्हणून संबोधले जाते. मानवाला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील असे शंभर शोध तिने लावले आहेत. वीसच्यावर शोधांचे पेटंट तिच्या नावावर जमा आहेत. मार्गारेटचे वडील तिच्या लहानपणीच वारले. आई ज्या सूतगिरणीत काम करत असे तिथे मार्गारेट कधीतरी जात असे. वयाच्या बाराव्या वर्षी तिने एक अपघात पाहिला. तो होता एका सूतगिरणीत अडकून पडलेल्या कामगाराचा. सूतगिरणीच्या यंत्रात काही अडकले तरी यंत्र थांबत नसे. अडकलेली वस्तू, व्यक्ती यांचा त्या यंत्रात पार चेंदामेंदा होऊन जाई. मार्गारेटने हा अपघात पाहिल्यानंतर काही वर्षांनी असे उपकरण शोधून काढले जे यंत्रात काही अडकले असता यंत्र आपोआप बंद करत असे. सूतगिरणीत काम करणाऱ्या लाखो कामगारांना या उपकरणामुळे सुरक्षितता लाभली.
आज पॅकिंगसाठी ज्या पसरट तळाच्या कागदी पिशव्या वापरल्या जातात त्या तयार करण्याचे यंत्र मार्गारेटने तयार केले. त्याआधी तशा कागदी पिशव्या बनवल्या जात नव्हत्या. मार्गारेटच्या यंत्रामुळे पसरट तळाच्या पिशव्या मोठय़ा संख्येने बनवल्या जाऊ शकत होत्या. जगभर तिचा हा शोध वापरला गेला. आजही आपण ज्या पिशव्या वापरतो त्या मार्गारेटच्याच. मार्गारेटने सूतगिरणीसाठी जे उपकरण तयार केले होते ते उपकरण चार्ल्स नावाच्या माणसाने चोरले, ती कल्पना आपलीच असल्याचे सांगून त्याने आपल्या नावे पेटंट घेतले. पण मार्गारेटने या चोरीबद्दल त्याला न्यायालयात खेचले. न्यायालयात चार्ल्सच्या वकिलाने ‘एक स्त्री यंत्र तयार करूच शकत नाही. स्त्रीमध्ये यंत्र तयार करण्यासाठी बुद्धिमत्ता नसते,’ असा युक्तिवाद केला. मार्गारेटने वकिलाच्या मदतीशिवाय आपणच हे उपकरण तयार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. न्यायालयानेही तिच्यावर विश्वास दाखवत तिच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. मार्गारेटला तिचे पेटंट परत मिळाले.
मार्गारेटने १८७१ साली आपल्या हक्काची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर इतर अनेक शोध लावले. खिडकीची चौकट, नंबरिंग मशीन, बॉक्स तयार करायचे यंत्र अशी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उपकरणे, यंत्रे बनवली.
त्यानंतर १८७३ साली अमांडा जोन्स हिने कॅनिंग, अन्नपदार्थ हवाबंद डब्यात साठवण्याची प्रक्रिया शोधून काढली. अन्नपदार्थ हवा काढून टाकलेल्या डब्यात साठवता येतात आणि त्यामुळे अन्नपदार्थाचे आयुष्य वाढते आणि पोषणमूल्येही सुरक्षित राहातात, असे निरीक्षण तिने मांडले. आजही आपण जी कॅिनगची पद्धती वापरतो ती जोन्सचीच आहे. तिला ‘जोन्सची प्रक्रिया’ असेच संबोधले जाते. आपल्याला काही ‘आत्मे’ येऊन संशोधनाची कल्पना देतात, असे ती सांगत असे. १८८० साली जोन्सने स्टोव्हचा सेफ्टी बर्नर तयार केला. तिच्या या शोधामुळे लाखो गृहिणींचा स्वयंपाकाचा वेळ वाचला. अमांडा जोन्सने हे बर्नर तयार करण्याचा कारखाना सुरू केला. पुढे कारखान्यातील पुरुषांनी एकत्र येऊन अमांडाची तिच्याच कारखान्यातून हकालपट्टी केली व कारखाना ताब्यात घेतला.
१८९२ साली सारा बुनी या अफ्रिकी-अमेरिकी महिलेने इस्त्री करायला लागणारे टेबल तयार केले. उभे, लांबट व पुढे त्रिकोणी आकाराच्या या टेबलामुळे कपडय़ांना इस्त्री करणे सोपे झाले. आज ही घरोघरी जी इस्त्रीची खास टेबलं वापरतात त्याचे डिझाईन साराचेच आहे.
असाच एक महत्त्वाचा शोध डिश वॉशरचा. १८८९ साली जोसेफाइन कोहरेन हिने हा अॅटोमॅटिक डिश वॉशर तयार केला. जोसेफाइनच्या घरी सतत मेजवान्या होत असत. भांडय़ांचे, बशांचे ढिगच्या ढिग तिला घासायला लागत. त्यातून तिला डिश वॉशरची कल्पना सुचली. तिने तारांचे कपटे बनवले. ज्यात डिश मावतील अशा या कप्प्याखाली एक चाक बसवले. चाक फिरवण्यासाठी तांब्याची बॉयलर मोटर बसवली. बॉयलरमधून साबणाचे गरम पाणी डिशवर पडून गोल फिरणाऱ्या डिश धुतल्या जाऊ लागल्या. ‘कोहरेनचा डिश वॉशर’ या नावाने हा डिश वॉशर पुढे बाजारात आणला. सुरुवातीला हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये डिश वॉशर बसवले गेले. नंतर घरोघरी हा डिश वॉशर वापरला जाऊ लागला. जोसेफाइनने स्वयंपाकघरातील इतरही उपकरणे तयार करण्याचा कारखाना सुरू केला. आज असंख्य स्त्रिया नकळत का होईना पण तिला यामुळे धन्यवाद देत असतील.
या महत्त्वाच्या शोधाबरोबर रोज उपयोगी पडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा महत्त्वाच्या शोधांची जननी म्हणून ओळखले जाते ते मेरियनला. तिचे वडील आणि काकांनी लेथ मशीनचा शोध लावला होता. तिलाही लहानपणापासूनच यंत्रांची आवड होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मेरियनने एक खूप महत्त्वाची गोष्ट तयार केली. त्या वेळेपर्यंत बाळांना कापडाचे डायपर वापरले जात. जे वारंवार बदलावे लागत. ओले राहिल्यामुळे बाळांच्या अंगावर पुरळ उठत, खाज सुटे. मेरियनने घरच्या मशीनवर कापूस, कापड आणि प्लॅस्टिकचा कागद वापरून डायपर शिवले. या डायपरमुळे लाखो आयांना फायदा झाला. रात्रभर जागरणे कमी झाली. सुरुवातीला या डायपर्सना ‘बोटर’ म्हटले जायचे. मेरियनने डायपर्सचे उत्पादन सुरू केले. ज्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला. मेरियनने फेशियल टिश्यू, टॉवेल डिसपेन्सर, पाकीट व लिहिण्याच्या कागदाचे मिश्रण असलेले पत्र (ज्याला आपण आंतर्देशीय पत्र म्हणतो), दंतवैद्यकांना उपयोगी पडतील अशी उपकरणे तयार केली आणि गरज शोधांची जननी आहे हे दाखवून दिले.
१९५६ साली बेटी या शॉर्टहँड टायपिंग करणाऱ्या मुलीने ‘व्हाइटनर’चा शोध लावला. त्यामागची गोष्टही गमतीशीर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ती टायपिस्टची नोकरी करू लागली. टायपिंगमध्ये काही चुका झाल्यास तिला बॉसची बोलणी खावी लागत असत. चित्रकार आपली एखादी चूक झाल्यास त्यावर पांढरा रंग लावतात हे तिने पाहिले होते. त्याच धर्तीवर तिने पांढरा रंग आणि काही रसायने वापरून एक मिश्रण तयार केले. आपल्या चुकांवर ते मिश्रण लावून ती बिनचूक कागदपत्रे तयार करू लागली. हे गुपित तिने आपल्या इतर टायपिस्ट मैत्रिणींना सांगितले. त्याही बेटीकडून हे मिश्रण घेऊन वापरू लागल्या. घरीच, स्वयंपाकघरात, घरगुती मिक्सरवर बेटी हे मिश्रण तयार करीत असे. परंतु मागणी वाढल्यामुळे तिला वेळ मिळेनासा झाला. तिच्या बॉसने तिला कामावरून काढून टाकले. बेटीकडे आता भरपूर वेळ होता. तिने स्वत:ची कंपनी सुरू केली. ‘मिस्टेक आऊट’ या गमतीशीर नावाने तिने हे उत्पादन सुरू केले. अल्पावधीतच जगभर बेटीचे उत्पादन लोकप्रिय झाले आणि ती श्रीमंतही झाली.
स्त्रियांसाठी विशेषत: आईसाठी महत्त्वाचा शोध म्हणजे बेबी कॅरियरचा. आफ्रिकेत टांगो येथे शांती सैन्यात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या अॅन मूरने आफ्रिकेतील महिलांना पाठीवर मूल घेऊन काम करताना पाहिले. शेतात, मळ्यात काम करत असताना या मजूर महिला कापडाच्या झोळीत बाळाला ठेवत. ते पाहून अॅनला ‘बेबी कॅरियर’ तयार करण्याची कल्पना सुचली. आपल्या आईच्या मदतीने तिने मूल पोटाशी घेऊन काम करता येईल अशी ‘कांगारू बॅग’ बनवली, आज आपण अॅनचीच बेबी कॅरियर वापरतो आहोत.
आणखी एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावला लिंडाने. लिंडा न्यूमनने केसाचा कंगवा तयार केला. त्यापूर्वी प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेले कंगवे वापरत असत. लिंडाने कृत्रिम धाग्यांपासून कंगवे बनवले.
सारा गुडी हिने घडी घालता येईल असा बेड बनवला, डेस्क बनवले. थोडय़ा जागेत अधिक सामान ठेवता येण्याजोगे फर्निचर तिने तयार केले. गुलाम असणाऱ्या साराने पुढे अशा फर्निचरचे दुकान सुरू केले. फ्रान्सिस गेब हिने स्वयंचलित सफाई यंत्र तयार केले. असे अनेक शोध स्त्रियांनी लावले. यातील बहुतेकांनी केवळ कल्पनेच्या जोरावर हे शोध लावले. शास्त्रशाखेचे कोणतेही आधुनिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. आधुनिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनीदेखील काही महत्त्वाचे शोध लावले.
१९५३ साली भूलतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्हर्जिनिया अॅपगार हिने नवजात शिशूचे आरोग्य तपासणाऱ्या ‘अॅपगार स्कोअर’चा शोध लावला. बाळाच्या त्वचेचा रंग, श्वसन, हृदयाचे ठोके, रिफ्लेक्स पाहून त्याची स्थिती कशी आहे याचा निष्कर्ष काढला जातो. बाळ जन्मल्यावर पहिल्या मिनिटाला, पाचव्या आणि दहाव्या मिनिटाला अॅपगार स्कोअर मोजला जातो. आजही प्रत्येक नवजात शिशूचा अॅपगार स्कोअर घेतला जातो. अॅपगारने अशा तऱ्हेने आपले नाव अजरामर करून ठेवले आहे.
बार्बरा ही नासामध्ये काम करणारी रसायनशास्त्रज्ञ होती. अंतराळात घेतलेले फोटो सांभाळण्याचे काम ती करत असे. तिने रेडिओअॅक्टिव्ह पदार्थाच्या साहाय्याने या महत्त्वाच्या फोटोच्या निगेटिव्हजचे आयुष्य वाढवले. जुने फोटो, क्ष-किरण फोटो यांचे आयुष्य वाढवण्यासाठी बार्बरा हिने विविध रसायनांचा उपयोग केला आणि लोकांचे आयुष्य वाढवण्यास मदत केली.
हेडी लॅमर ही ऑस्ट्रियन अभिनेत्री तिच्या आरस्पानी सौंदर्याबद्दल प्रसिद्ध होती. तिने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जॉर्ज अॅन्थीयल याच्या मदतीने अमेरिकेत वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावला. नाझींच्या गुप्तचरांना चकवू शकतील अशी संदेश यंत्रणा हेडीने विकसित केली. अनियमित काळाने रेडिओ लहरी पाठवून संदेश पाठवण्याची प्रक्रिया विकसित करून तिने दोस्त राष्ट्रांना मोलाची मदत केली. हा संदेश नाझींना फोडता आले नाहीत. १९४१ साली ‘स्प्रेड स्पेक्ट्रम तंत्र’ या शोधाचे पेटंट तिला मिळाले. आजच्या अत्याधुनिक डिजिटल संदेश वहन पद्धतीचे मूल हेडीच्या ‘स्प्रेड स्पेक्ट्रम’ (spread spectrum) तंत्रात आहे. अभिनेत्री आणि संशोधक असे दुहेरी व्यक्तिमत्त्व हेडीला लाभले होते.
अशा अनेक स्त्रियांनी संशोधनाच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. शिक्षण, विशेषत: विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या जागतिक स्तरावर बरीच मोठी झाली आहे. संशोधनाच्या संधी सहजतेने उपलब्ध झाल्या आहेत. जेव्हा वाट अत्यंत खडतर होती तेव्हा आपली बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर ज्या स्त्रियांनी संशोधन केले, नव्या कल्पनांना जन्म दिला, जीवनशैलीत बदल घडवून आणले त्या सर्वजणींप्रती आज कृतज्ञ राहायला हवे.
गरज शोधांची जननी
अनेक स्त्रियांनी संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरतील अशा डिशवॉशर,स्टोव्हचा सेफ्टी बर्नर, व्हाइटनर, कॅनिंग, डायपर्स, कांगारू बॅग, कंगवे आदी गोष्टींचा शोध लावणाऱ्या संशोधक स्त्रियांविषयी १० नोव्हेंबरच्या जागतिक विज्ञान दिनानिमित्ताने ..
आणखी वाचा
First published on: 05-11-2012 at 10:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World science day women in research