‘‘आमच्या आयुष्यातले साधे-साधे निर्णयसुद्धा आम्ही घेऊ शकत नाही. आमच्या मनाची घुसमट कुणी समजून घेत नाही. कुणाकडं बोलावं तर आपलं बोलणं समजून घेण्याऐवजी उपदेशाचे डोसच पाजले जातात. कधी कधी त्या बोलण्याची आपल्यामागं टिंगल झाल्याचंही कानावर येतं. प्रश्न तर खूप असतात, पण उत्तरं कधी मिळतात, कधी मिळत नाहीत. मिळाली तर ती अवघड असतात. दरवर्षी आठ मार्चला आम्ही सण, उत्सवासारखा महिला दिन साजरा करतो, पण वर्षभर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच गत असते. काय करावं आम्ही़?’’ आजही असे असंख्य प्रश्न मनात, डोळ्यात घेऊन आपल्या असंख्य मैत्रिणी उभ्या आहेत. गावातच नव्हे, तर शहरातही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या मनाचा हा मागोवा.
का ही दिवसांपूर्वी सोलापूरला एका महिला मेळाव्याला प्रमुख वक्ता म्हणून जायचा योग आला. त्यावेळी नुसत्या भाषणाऐवजी मी त्या स्त्रियांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही प्रश्नोत्तरं, काही विचारांची देवाणघेवाण झाली.
‘इथं जमलेल्यांपकी किती जणींना फक्त मुली आहेत?’
काही जणींनी हात वर केले.
‘आपल्याला फक्त मुलीच आहेत आणि मुलगा नाही याचं किती जणींना दुख होतं किंवा मुलगा असायलाच हवा असं किती जणींना वाटतं?’
‘एकही उत्तर नाही, पण नजरा खाली झुकलेल्या.’
‘तुमच्यापकी कितीजणी घरी स्वतंत्रपणे निर्णय घेतात?’
दोन हात वर आले.
‘मी बाई आहे, याचा मला अभिमान आहे, असं तुमच्यापकी किती जणींना वाटतं?’
आधी ३-४ हात वर आले. नंतर हळूहळू ही संख्या वाढत साधारणपणे ७० टक्क्यांपर्यंत गेली, पण बळजबरी केल्यासारखी. एकीनं हात वर केला म्हणून दुसरीनं केला अशा रीतीनं.
कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजणींनी माझ्याभोवती कोंडाळं केलं. म्हणाल्या, ‘आमची दुखंच तुम्ही तुमच्या बोलण्यातनं सांगितलीत. आम्हाला नीट बोलता येत नाही, पण तुम्ही बोलत होता ते पटत होतं. आमच्या आयुष्यातले साधे-साधे निर्णयसुद्धा आम्ही घेऊ शकत नाही. आमच्या मनाची घुसमट कुणी समजून घेत नाही. कुणाकडं बोलावं तर समजून घेण्याऐवजी उपदेशाचे डोसच पाजले जातात. कधी कधी आपल्यामागं त्याची टिंगल झाल्याचंही कानावर येतं. प्रश्न तर खूप असतात, पण उत्तरं कधी मिळतात, कधी मिळत नाहीत. मिळाली तर ती अवघड असतात.’
यानंतर काही क्षण तिथं शांतता होती. पण अजून काहीतरी बोलण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तेवढय़ात त्यातली एकजण म्हणाली, ‘आतापर्यंत आम्ही जेवढी भाषणं ऐकली त्यापेक्षा तुम्ही खूप वेगळं बोललात. नुसते उपदेश नाही केले तर ‘आमच्याशी’ बोललात. आमची सुख-दुखं जाणून घ्यायचा प्रयत्न केलात. आम्हाला खूप बरं वाटलं.’
‘हो ना..!’ दुसरी म्हणाली, ‘अनेकजण बोलताना आम्हाला नेहमी मोठमोठय़ा स्त्रियांची उदाहरणं देतात. त्यातली कित्येक आम्हाला पाठ झालीयत् आता. स्त्रिया मोठय़ा होऊ शकतात हे आम्हालाही कळतं, पण प्रत्येकजणच एवढी मोठी कशी होऊ शकेल? आम्ही सामान्य स्त्रिया. आम्हाला मिळालेलं वातावरण साधं, आम्ही ज्या परिस्थितीत वाढलो ती परिस्थिती साधी-बेताची.’
‘मग काय तर?’ तिसरी तिची ‘री’ ओढत म्हणाली, ‘आम्हालाही मनातनं वाटतच असतं काहीतरी करावं असं, पण रोजच्या रामरगाडय़ातनं ते कसं शक्य होणार? संसाराचा गाडा ओढता ओढता दिवस कधी उगवतो न् रात्र कधी होते तेही कळत नाही. मग या वेगळ्या गोष्टींना वेळ कधी न् कसा काढणार?’
‘तुम्ही मुलींचा मुद्दा काढलात, मुलगा नसला तर काय होईल, असा मुद्दा काढलात. पण इथं आम्हाला विचारतोय कोण? ‘मुलगा पाहिजे’ असा घरच्यांचा अट्टहास आम्हाला सुखानं जगू देत नाही. ‘मुलगा नाही’ या दोषाचं खापर सतत आमच्या माथ्यावर फोडलं जातं. त्यानं जिवाचा कोंडमारा होतो नुसता. शिवाय मुलगी तरी समाजात कुठं सुरक्षित आहे? ती बाहेर गेली न् वेळेवर घरी परतली नाही तर जीव टांगणीला लागतो नुसता.’ मुलींच्या आयांचं प्रतिनिधित्व करीत एकजण बोलली.
‘दरवर्षी आठ मार्चला आम्ही सण, उत्सवासारखा महिला दिन साजरा करतो, पण वर्षभर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच गत असते आमची.’
त्या सगळ्या जणी जे बोलत होत्या त्यात तथ्यही होतं न् त्यांच्या बाजूनं त्या खऱ्याही होत्या. उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी पार पाडता पाडता त्याचं आयुष्य त्यांच्याही नकळत भराभरा सरून जात होतं. इतर गोष्टींचा विचार करायला त्यांना उसंत मिळत नव्हती. पण आपल्या विचारांची, आपल्या सुखदुखांची, अडचणींची कुणीतरी दखल घेतंय्, ही गोष्टही त्यांना मोलाची वाटली होती.
८ मार्च या दिवशी महिलांचा सहभाग असणारे अनेक कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले जातात. त्यातून महिलांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात. काही ठिकाणी काही ठोस कार्यक्रम हाती घेतले जातात. पार पाडले जातात. त्यातून चांगल्या जाणकार कार्यकर्त्यां निर्माण होतात. ५० टक्के आरक्षणाचा फायदा होऊन अनेक जणी पुढे येत आहेत. वेगवेगळी पदं भूषवीत आहेत. तरीही ‘आमची मनस्थिती, आमच्या सभोवतीची क्लेशकारक परिस्थिती समजून घेतली जात नाही’ ही स्त्रियांच्या मनातली खंत शिल्लक आहेच.
काही कर्तबगार स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत अनेक क्षेत्रात स्वकर्तृत्वाचे झेंडे रोवले. त्यामध्ये जगाला अनभिज्ञ असणाऱ्या गृहिणींपासून इरावती कर्वे, मेधा पाटकर, कल्पना चावला, मार्टनिा नवरातिलोव्हा आणि आज अमेरिकेतील फेडरल रिझर्व बोर्डाची पहिली महिला अध्यक्ष जेनेट लुईज येलिनपर्यंत. यातल्या कुणालाही कोणतीही गोष्ट सोपी होती असं नव्हे, पण त्यांनी ते करून दाखवलं.
असं असूनही आज जगात अनेक महिला अशा आहेत, ज्यांना स्वतबद्दल आत्मविश्वास नाही. ज्यांच्या मनाचं, विचारांचं, भावनांचं खच्चीकरण झालेलं आहे, मानसिक त्रासातून जावं लागणं हेच ज्याचं रूटीन आहे, ‘तुझी अक्कल चुलीपुरतीच राहू दे’ अशी मुक्ताफळं ज्यांना आजही ऐकावी लागत आहेत, घराबद्दलचे, मुलांबद्दलचे इतकंच नव्हे, तर स्वतबद्दलचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य ज्यांना नाही, त्यांची संख्या बरीच मोठी आहे.
लहान मुलींपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत अनेकींना समाजात वावरणं दुरापास्त झालं आहे. कोणत्याही वयाची स्त्री, पुरुषांच्या लंगिक वासनांची बळी ठरते आहे. तिचं मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं जात आहे. ‘लोकसत्ता’च्या १५ फेब्रुवारीच्या एकाच पानावर ‘रेल्वेत महिलांशी होणाऱ्या गरवर्तनाच्या प्रमाणात वाढ’, ‘बलात्काराला विरोध करणाऱ्या महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न’, ‘विवाहाला नकार देणाऱ्या मुलीचे नाक छाटले’, ‘बिरभूम सामूहिक बलात्कार प्रकरणात अधिक परिणामकारक कारवाई गरजेची-सर्वोच्च न्यायालय.’ अशा स्त्रियांच्या बाबतीतल्या विदारक वास्तव सांगणाऱ्या बातम्या आहेत.
असं सगळं असताना सर्वसामान्य स्त्रियांची मानसिकता सकारात्मक कशी राहील? त्यातूनही आता काही स्त्रिया पुढं येऊन बोलू लागल्या आहेत. स्वतच्या अडचणी मांडायचा प्रयत्न करीत आहेत. पण अजूनही अशा स्त्रियांचं प्रमाण खूप मोठं आहे की ज्यांना घराबाहेर येऊनच काय, घरातही बोलायला वाव नाही, ज्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत, ज्यांच्या आयुष्यावर त्यांच्या स्वतचा नव्हे, तर इतरांचा ताबा आहे. त्यांना ‘आपण खंबीर झालं पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे’ असं मनातून कितीही वाटलं तरी ते शक्य होत नाहीय्.
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या महागाईला तोंड देता देता, स्त्री-पुरुष, दोघांचाही जीव मेटाकुटीला येतोय. कित्येक घरांमधून मुलांची त्यांच्या वडलांशी दिवस न् दिवस (कधी-कधी आठवडेही) भेट होत नाही. अशा वेळी स्त्रीची जबाबदारी आणखीनच वाढतेय. त्यामुळे स्वतचं मानसिक संतुलन ढळू न देता घर-संसार-मुलं, नोकरी करणाऱ्या असतील तर ती तारेवरची कसरत हे सगळं सांभाळणं स्त्रियांना सोपं जात नाहीय. टी.व्ही., इंटरनेट, मोबाईल, इतर प्रसारमाध्यमांचा पगडा एवढा जबरदस्त आहे की मुलं नको त्या वयात ‘मोठी’ होतायत, त्यांच्यावर अंकुश ठेवून संस्कार करणं याचा भयंकर मोठा ताण स्त्रियांवर येतोय. मुलं बिघडली की त्याचं खापर येतं पुन्हा स्त्रीवरच!
या सगळ्या गोष्टींचं ओझं मनावर घेऊन जगणाऱ्या स्त्रीकडून अपेक्षा मात्र तिनं शांत राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशा! पण त्याचा परिणाम उलट असा होतोय की, तिची चिडचिड वाढतेय. तिची सहनशक्ती संपुष्टात येतेय. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान लोप पावतंय. तिला सतत आशा-निराशेच्या िहदोळ्यावर झुलावं लागतंय. त्यामुळे तिच्या मनातील नराश्याचं प्रमाण वाढतंय. अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं मानसिक आरोग्य ढासळतंय..!
हे सगळं तिला नको आहे. तिलाही आनंदानं जगायचंय, स्वतची कर्तबगारी दाखवायचीय, भयमुक्त वातावरणात मोकळा श्वास घ्यायचाय. स्वत घडायचंय, मुलांना घडवायचंय. मानसिक त्रासाच्या साखळदंडातून तिला सुटका हवीय नि जगण्यातलं खरंखुरं समाधान हवंय. पण कसं हाच अनेकदा तिच्यासमोर पेच म्हणून उभा आहे. ही आता जबाबदारी समाजाची आहे. समाजातल्याच स्त्रियांनी पुढे यायला हवंय, कारण हे घडू शकतं, असं समाधान मिळवता येऊ शकतं. त्यासाठी तसं प्रशिक्षण घेता येऊ शकतं. जीवनकौशल्यं शिकता येऊ शकतात. आपण कुठे चुकतो आणि नेमकं काय केलं पाहिजे याची जाणीव होते. पण त्यासाठी स्त्रीनं स्वतपासून सुरुवात केली पाहिजे. वेगळ्या दिशेने विचार केला पाहिजे. ही प्रथमत तिची स्वतची जबाबदारी आहे. इच्छा तिथे मार्ग आहे, फक्त तयारी हवी. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने ही जाणीव जरी या स्त्रियांच्या मनात निर्माण झाली तरी त्या दिनाचा हेतू सफल होईल. कारण त्यातूनच एक वेगळंच नि सुंदर जग आकाराला येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा