डॉ. नंदू मुलमुले

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळील ‘ब्लॅकवेल’ बेटावर असलेले एक मनोरुग्णालय, त्यात डांबण्यात येणाऱ्या स्त्रियांची दैन्यावस्था प्रसिद्ध वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’चे संपादक जोसेफ पुलित्झर यांच्या कानी पोचली. या स्त्रियांची करुण कहाणी जगापुढे कोण आणेल? या प्रश्नाच्या उत्तरात एका स्त्री पत्रकाराचे नाव त्यांच्या समोर आले. डोके पूर्ण ठिकाणावर असलेल्या या तरुण पत्रकाराने मनोरुग्ण असल्याचे सोंग आणत तिथे प्रवेश मिळवला, तब्बल दहा दिवस तिथल्या वास्तव्याचा भयंकर अनुभव घेतला आणि त्याचं शब्दांकन करीत या मनोरुग्णालयाची अमानवी वस्तुस्थिती जगापुढे आणली. ६ जानेवारीला महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘पत्रकार दिना’- निमित्ताने नेल्लीच्या शोधपत्रकारितेविषयी.

accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune senior citizen latest news
पुणे: मोफत धान्य देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक
baba amte loksatta news
वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी…
Couple commit suicide by jumping under running train
विक्रोळी रेल्वे स्थानकात युगुलाची मेल एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू

ही अद्भुत कहाणी आहे नेल्ली ब्लाय ( Nellie Bly) या एका स्त्री-पत्रकाराने केलेल्या जगातल्या कदाचित पहिल्या शोधपत्रकारितेची. त्यात नेल्लीची जिद्द, साहसी शोधवृत्ती, समाजातल्या दुर्लक्षित घटकांविषयीचा कळवळा या गोष्टी चकित करून सोडतात. १८६४ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया राज्यातल्या एका लहानशा प्रांतात जन्मलेल्या नेल्लीचे मूळ नाव एलिझाबेथ कोचरन. वडील तिच्या लहानपणीच वारले, आईने उपजीविकेसाठी पिट्सबर्ग शहरी स्थलांतर केले. शिक्षण अर्धवट मात्र या परिस्थितीत एलिझाबेथची उपजत स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती फुलून आली. ‘पिट्सबर्ग डिसपॅच’ या स्थानिक वृत्तपत्रात ‘मुली कसल्या कामाच्या?’ अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभ लिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. स्टीफन फॉस्टर या गायकाचे एक गाणे त्या काळी गाजत होते, त्यात ‘नेल्ली ब्लाय’ या आफ्रिकी-अमेरिकी कष्टकरी स्त्रीची कहाणी आहे. तिने हेच नाव टोपणनाव म्हणून घेतले.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले…!: समारोप

गरीब, कष्टकरी स्त्रिया हा नेल्लीचा जिव्हाळ्याचा विषय आणि वृत्ती शोधपत्रकाराची, तिने लगेच आपला मोर्चा कारखान्यात काम करणाऱ्या कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वळवला. त्यांच्या वाट्याला आलेली कारखानामालकांची अरेरावी, निकृष्ट व्यवस्था, आरोग्याला धोकादायक असे वातावरण, सारी व्यथा प्रभावी शब्दांत लिहिली. कारखानामालकांनी संपादकांकडे तक्रार केली. अखेर दबावाखाली संपादकाने तिची बदली खास स्त्रियांसाठी असलेल्या विभागात करून टाकली. विषय? घर टापटीप कसे ठेवावे, पार्टीला जाताना कोणते पोशाख निवडावे, घरातली फुलबाग, मुलांचे संगोपन वगैरे… ते काम नेल्लीला कंटाळवाणे वाटू लागले. १८८७ मध्ये तिने न्यूयॉर्कचा रस्ता धरला. मार्ग खडतर होता हे तिच्या लक्षात आले. एका वीस-बावीस वर्षाच्या तरुणीला वार्ताहराचे काम कुणी देईना. प्रसिद्ध ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’चे संपादक होते जोसेफ पुलित्झर, त्यांना तिच्यात साहसी शोधवृत्तीला लागणारी धमक, निधडेपणा आणि उत्तम शब्दांकनाची हातोटी दिसली. त्यांनी तिला काम दिले, गुप्त वार्तांकन! न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या ‘ब्लॅकवेल’ बेटावरील ‘कुख्यात’ अशी वदंता पसरलेल्या स्त्रियांच्या मनोरुग्णालयात दहा दिवस राहणे, तेथील परिस्थितीचा ‘आंखो देखा हाल’ वृत्तांत लिहिणे. त्या काळचे एका स्त्रीने केलेले हे बहुधा पहिलेच स्टिंग ऑपरेशन असावे.

नेल्लीने ते आव्हान लगेचच स्वीकारले. तेथे पोचलेली व्यक्ती परत येणे कठीण असेच समजले जाई. त्यामुळे नेल्ली तेथे पोचल्याच्या बरोबर दहाव्या दिवशी ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ने तिची हमी घेऊन सुटका करायची हे ठरले.

मनोरुग्णाचं सोंग घेतलेल्या अवस्थेत ती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी तिला बेलेव्यू हॉस्पिटलला पाठवून दिले. आता परीक्षा डॉक्टरांसमोर, तेही मनोविकारतज्ज्ञांसमोर. नेल्लीने आपला एक धोशा सुरू ठेवला, मी कोण आहे मला आठवत नाही, कुठे राहत होते आठवत नाही, माझं नाव तेवढं आठवतं, नेल्ली ब्राऊन. डॉक्टर गोंधळात पडले. मग असेच काही शेंडाबुडखा नसलेले प्रश्न विचारून त्यांनी ती डिमेंटिक म्हणजे मेंदू-क्षयग्रस्त असल्याचे जाहीर केले आणि तिची रवानगी ‘ब्लॅकवेल’ बेटांवरील मनोरुग्णालयात करून टाकली!

लांबच लांब दगडी इमारती. डाव्या हाताला भयंकर सडका वास मारणारे स्वयंपाकघर, राहायला दोघींसाठी एक अशा पंचवीस जुनाट खोल्या. खोलीच्या खिडक्या निखळलेल्या, त्यातून हाडांना चिरत जाणारे, सतत आत घुसणारे बर्फाळ हवेचे सुरीसारखे धारदार पाते. अंगावर पांघरायला भोकं पडलेले जुनाट ब्लॅन्केट. नर्सेस अत्यंत संवेदनाशून्य, दुष्ट स्वभावाच्या. प्रसंगी मारीत. डॉक्टर काल्डवेल हे तेथील प्रमुख अधीक्षक, मात्र रात्री ते किंवा इतर कुणीच ड्युटीवर नसत. मग असे रुग्ण नर्सेसच्या हवाली. त्यांचा आवडता उपचार? रुग्णाचा गळा दाबायचा, म्हणजे श्वास घेण्याच्या धडपडीत त्याचे ओरडणे, बडबडणे बंद पडायचे. तेथील रुग्णांना देण्यात येणारे जेवण कायम निकृष्ट. सगळी ताजी फळे, मऊ ताजा ब्रेड नर्सेसच्या खोलीत जायचा.

आणखी वाचा-मनातलं कागदावर: बहुपर्यायाचा प्रश्न

नेल्लीने त्या वास्तव्यातील काही करुण कहाण्या टिपल्या. मनोरुग्ण नसतानाही अनेक जणी तिथे डांबल्या गेल्या होत्या. एक वयस्क जर्मन स्त्री अमेरिकेत फिरायला आलेली, एके दिवशी तिला ताप चढला. तिच्या सोबतिणीने तिला दवाखान्यात भरती केले, तिथे फणफणत असताना ती बरळू लागली. मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले गेले, त्यांनी तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे जाहीर केले आणि थेट मनोरुग्णालयात तिची रवानगी झाली. सारा नावाच्या स्त्रीने सांगितले की ती मूळची इस्राईलची असून तोडकेमोडके इंग्रजी बोलते. तिच्या अमेरिकी नवऱ्याला तिचा प्रियकर असल्याचा संशय आला, भांडणे झाली आणि त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी तिला डॉक्टरांपुढे उभे केले आणि तिला येथे आणून डांबले गेले. अर्थात खऱ्याखुऱ्या मनोरुग्ण स्त्रियाही तेथे होत्याच. नेल्लीला सारी रात्र एका खोलीत अशा पाच स्त्रियांसोबत काढावी लागे. रात्रभर त्यांच्या बडबडीने नेल्लीची झोप होत नसे. अशा वातावरणात ठिकाणावर डोके असलेला वेडा होऊन जायचा. एकदा तिथल्या दगडी इमारतीत डांबलेल्या प्रक्षुब्ध रुग्णांचे ओझरते दर्शन नेल्लीला घडले आणि ती हादरून गेली. दहा जणींचा एक गट, प्रत्येक गटातल्या स्त्रियांना पोटाभोवती एका साखळदंडांने एकत्र बांधले होते. त्यातल्या काही हसत होत्या, ओरडत होत्या, काहींना कशाचेच भान नव्हते. त्यातल्या ज्या भानावर असतील, चांगल्या असतील त्यांचे काय होत असेल?

नेल्लीने प्रामाणिकपणे हे सारे अनुभव लिहिले, सगळ्या नर्सेस वाईट नव्हत्या. मिस बर्न्स अतिशय कनवाळू होती. तिची सहसा रात्रपाळी असे. ती हळुवार आवाजात आपुलकीने साऱ्यांची चौकशी करे. जमतील तसे कमी फाटके पांघरूण घाली. अनेक स्त्रियांना आपल्या घराची आठवण येई. कुणीतरी आपल्याला सोडवेल अशी त्यांना आशा वाटे. अशा वेळी नेल्ली त्या मनोरुग्णांची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करी. त्या काळात मानसिक आजारांवर ठोस असा कुठलाच औषधोपचार नव्हता. त्यांना सांभाळणे (पक्षी डांबून ठेवणे) आणि कधीतरी त्या आपोआप बऱ्या होतील याची वाट पाहाणे हाच उपाय. मात्र त्यासाठी पोषक वातावरण, समजून घेणारे लोक भोवताली असणं गरजेचं, त्याचा पूर्ण अभाव होता.

ठरल्याप्रमाणे दहा दिवसांनी ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’चे संपादक जोसेफ यांनी एका वकिलाला रवाना केले. त्याने अधीक्षकांना भेटून नेल्लीची सुटका केली. नेल्लीने लिहिले, ‘निघताना आनंद होता, त्यापेक्षा अधिक वाईट वाटत होते. त्या सगळ्या परिस्थितीने गांजलेल्या असाहाय्य जीवांना त्या नरकात सोडून मी आपले सुरक्षित, उबदार घर जवळ करीत होती, मात्र माझ्या रिपोर्ताजने काही बदल होण्याची आशाही मी मागे ठेवून जात होती.’

नेल्लीने सुटका झाल्याबरोबर आपला सविस्तर वृत्तांत ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’मध्ये लिहून प्रसिद्ध केला. तिच्या रिपोर्ताजने अमेरिकन समाजात एकच खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाची झाडाझडती घेण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने ‘ब्लॅकवेल’च्या मनोरुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी दहा लाख डॉलर्सची घसघशीत मदत जाहीर केली.

आणखी वाचा-जिंकावे नि जागावेही : सजग जीवनाचं बीजारोपण

या शोधपत्रकारितेने नेल्लीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली, मात्र ऑफिसात बसून लेखमालिका लिहिण्यात तिला स्वारस्य नव्हते. साहसी मोहिमेचे अपार आकर्षण तिला स्वस्थ बसू देईना. तिने जगप्रदक्षिणा घालण्याचा प्रकल्प संपादकांच्या कानी घातला. साहसाचे अपार आकर्षण असलेल्या नेल्लीने १८८९ मध्ये ४० हजार कि.मी.च्या प्रवासाला प्रारंभ केला. इंग्लंड, फ्रान्स, सिंगापूर, सिलोन इत्यादी पार करीत ती तब्बल ७२ दिवसांनी अमेरिकेत परतली. दरम्यान, पहिले महायुद्ध सुरू झाले. तेथेही नेल्ली पोचली. ऑस्ट्रिया-सर्बिया युद्धाचे वार्तांकन करणारी ती पहिली स्त्री-पत्रकार ठरली. पोस्टाने तिच्यावर तिकीट काढले, तसेच ‘द एडव्हेन्चर्स ऑफ नेल्ली ब्लाय’ हा चित्रपटही अतिशय गाजला.

शोध-पत्रकारितेतील अनेक जोखीमभरल्या मोहिमा तिने त्यानंतरही अनुभवल्या, मात्र नेल्ली ब्लाय कायम लक्षात राहील ती तिच्या पहिल्या मोहिमेसाठी, ‘ब्लॅकवेल’ बेटावरील दुर्दैवी मनोरुग्ण स्त्रियांसोबत घालवलेल्या त्या दहा दिवसांसाठी. तिच्या या कृतीने वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या रुग्णांची सुटका झालीच, मात्र मनोरुग्णांना आपुलकीची आश्वासक वागणूक, प्रेम दिले तर ते सावरू शकतात हे समाजाच्या नजरेत आणून दिले.

१९२२ मध्ये, वयाच्या ८९व्या वर्षी न्युमोनियाने ती आजारी पडली, आणि त्यातच तिने अखेरचा श्वास घेतला. शोधपत्रकारितेचा एक प्रशस्त मार्ग तयार करून नेल्ली ब्लाय नावाचे वादळ शमले.

nmmulmule@gmail.com

Story img Loader