‘‘माझ्यासाठी पर्यटनाची सुरुवात लहानपणीच झाली होती, मात्र त्याचा पहिला खराखुरा आनंद ऐन तारुण्यात घेतला. देशा-परदेशांतली नवी ठिकाणं, माणसं यांनी नेहमी मनाला साद घातली. त्यातूनच पुढे माझं लिखाणही फुलत गेलं. कधी नितांतसुंदर अनुभव आले, तर कधी मनात भीती रुतवणारे.. ‘‘माझी गोष्ट सांग ना!’’ असं मला म्हणत ते सर्व मनात भिरभिरत राहिले.’’ सांगताहेत लेखिका नीलिमा बोरवणकर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खजुराहो मंदिरासमोर आईच्या शेजारी उभी असलेली मी, जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूत किल्ला करतानाची मी, आगगाडीच्या शेजारी फलाटावर आई आणि काकाच्या मधोमध उभी असलेली मी, विस्तीर्ण तलावाच्या काठावर बाबांच्या कडेवरची मी.. असे माझे कित्येक काळेपांढरे फोटो बघत मोठी होताना पर्यटन हा माझ्या आयुष्याचा भाग कधी होऊन गेला कळलंही नाही.

कुटुंबातल्या थोरल्या भावाच्या जबाबदाऱ्या निभावणाऱ्या आईबाबांची मी लेक. लहानपणी कुठलीही चैन, हॉटेलचं खाणं, आमच्या घरी कधीच नव्हतं. पर्यटन मात्र सदैव! एस.टी. बसनं, आगगाडीच्या तृतीय वर्गानं, घरी बनवलेले टिकाऊ खाद्यपदार्थ बरोबर घेऊन आम्ही खूप प्रवास केले. अगदी आत्याच्या दिवाळसणाला ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळा’च्या एका स्वयंपाकघर असलेल्या सदनिकेत आम्ही १०-१२ कुटुंबीय गेलो होतो. बरोबर फराळाचे पदार्थ. तिथे आई, काकूंनी मिळून स्टोव्हवर केलेला स्वयंपाक, रात्री उडवलेले फटाके, याही आठवणी आहेत.

हेही वाचा >>> मोडला नाही कणा..

लग्नानंतर आम्हा नवरा-बायकोंत असलेली कदाचित एकमेव सामायिक आवड म्हणजे पर्यटन. लग्नानंतर अवघ्या सहा वर्षांत, स्वत:चं घर, गाडी नसताना आणि सर्व मित्रांनी आधी घर घ्या, असा सल्ला दिलेला असताना, होती नव्हती ती सगळी बचत मोडून, किंचित उधार घेऊन आम्ही केली ती २५ दिवसांची युरोप सहल! इतरांसाठी तो तद्दन वेडेपणा असला आणि पुढे सर्व बचत संपल्यामुळे स्वत:चं घर घेण्यासाठी बरेच कष्ट झाले असले, तरी आजही आम्हा दोघांना आमची ती युरोप सहल संस्मरणीय वाटते.

ते वर्ष होतं १९८८. राजीव गांधींच्या सरकारनं तिशीच्या आतल्या तरुण पर्यटकांसाठी काही योजना आखल्या होत्या. पैकी एक होती किमान तीन तरुणांच्या गटाला युरोपात फिरण्यासाठीचा २१ दिवसांचा ‘युरेल’चा पास अतिशय कमी किमतीत. नक्की आठवत नाही, पण बहुतेक हा पास तीन हजार रुपये प्रत्येकी असा होता. युरोपीय समुदाय अजून एकत्र व्हायचा होता, बर्लिनची भिंत पूर्व-पश्चिम अशी विभागणी करत अद्याप उभी होती. प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळं असण्याचा आणि फक्त ५०० डॉलर सोबत नेता येऊ शकण्याचा तो काळ. इंटरनेट अर्थातच नव्हतं. फक्त रेल्वेचा पास हातात आणि पहिला परदेशप्रवास!

‘ट्रॅव्हल युरोप इन टेन डॉलर्स अ डे’ हे पुस्तक आमचं मार्गदर्शक. युरोपातली पर्यटनस्थळं, प्रेक्षणीय स्थळं, तिथे जाण्याचे स्वस्त पर्याय, राहण्यासाठी युथ हॉस्टेल, निवास-न्याहारी देणारी घरं, काय खावं, कुठे खावं, सुपरमार्केट्समध्ये कशी खरेदी करावी (तेव्हा भारतात सुपरमार्केट्स नव्हती. ‘एकावर एक फ्री’ किंवा वस्तूंचे मोठे पॅकस् कसे स्वस्त पडतात, वगैरे इथे माहितीही नव्हती.) दिवसभर फिरण्यासाठी बस-मेट्रोची तिकिटं कशी घ्यावी वगैरे सगळं शहाणपण आम्हाला त्या पुस्तकानं दिलं. मुक्कामाचा खर्च वाचवण्यासाठी रात्री प्रवास, उतरल्यावर क्लॉक रूममध्ये सामान टाकायचं, तिथल्याच वॉश रूममध्ये तयार व्हायचं, चलन बदलून घ्यायचं, दिवसभर पायाला भिंगरी लावून फिरायचं आणि परत रात्री प्रवासात ट्रेनमध्ये झोप काढायची. ज्या देशात मुक्कामाची गरज, तिथे फक्त बेड-ब्रेकफास्टवाली स्वस्त सोय बघायची. सुपरमार्केटमधून ब्रेड, फक्त गरम करून खाण्याजोगे सूप, सॉसेजसारखे पदार्थ यांचं जेवण. खूप ऐश म्हणजे इटलीत खाल्लेला पिझ्झा, पास्ता, फ्रान्समधले सुफले! आणि प्रत्येक देशात तिथलं स्थानिक खाणं.

हेही वाचा >>> ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’

हा प्रवास खूप दमवणारा होता, पण प्रचंड नवे अनुभव देणारा. लुव्र म्युझियम, व्हिएन्नामधला ऑपेरा, बर्लिनची भिंत.. आयुष्यभर ही पुंजी सोबत राहील. पुढे लेक जर्मनीत असल्यानं तीन-चार वेळा युरोपातल्या वेगवेगळय़ा देशांत मनसोक्त फिरणं झालं. कुकेनहॉफची टय़ूलिप गार्डन, ऑस्ट्रियात स्कीइंगसाठी प्रसिद्ध डोंगरउतारांची गावं, पोलंडमधल्या मिठाच्या खाणी, विस्तीर्ण पसरलेला हॅलस्टॅट जलाशय, ब्लॅक फॉरेस्ट, बर्फाच्छादित शिखरं, धबधबे ते मानवनिर्मित अम्यूजमेंट पार्क.. नजरेला सुखावणारं पुष्कळ बघितलं. देशात, परदेशात, पण ऐन तारुण्यात, पै पै वाचवत, भिरभिरत्या, उत्सुक नजरेनं बघितलेलं निसर्ग आणि मानवनिर्मित सौंदर्य बघण्यात जी गंमत होती, त्याची सर पुढच्या सराईत प्रवासात नव्हती हे नक्की!

त्या वेळी भेटलेले लोक, अनोळखी लोकांनी केलेला पाहुणचार, हेही अजून स्मरतं. अ‍ॅमस्टरडॅमला एका कुटुंबात मुक्कामी असताना मी माझ्या ३ वर्षांच्या लेकीचा फोटो दाखवून त्या मालक बाईला विचारलं होतं, ‘‘इथे बाहुल्या कुठे स्वस्त मिळतील?’’ तिनं पटकन तिच्या घरातली बाहुली मला देऊन टाकली! ‘‘तुझ्या देशात माझी आठवण काढ,’’ असं सांगत. हे सगळं मनात इतकं ठाण मांडून बसलंय, की लिहीत असताना कधी कधी अचानक या व्यक्ती माझ्या पुढय़ातच येऊन ठाकतात.

वयाच्या चाळिशीत मी लिहू लागले. पहिली कथा मी लिहिली ती १२ वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये भेटलेल्या- खरंतर न भेटलेल्या एका मुलीची. एका फ्रेंच जोडप्यानं दोन भारतीय मुलांना दत्तक घेतलं होतं. त्या मुलांना भेटायला त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. आम्ही गेलो. सुरुवात झाली वाइननं; आम्हाला अर्थातच सवय नव्हती. पण आलेल्या पाहुण्याला सरबत द्यावं, तसं होतं ते त्यांच्यासाठी. अनेक ‘कोर्स’ असलेलं फ्रेंच कुझिन आमच्या असं सामोरं आलं. शेवट परत वाइननं, एका चिमुकल्या ग्लासात. ही वाइन म्हणे अमुकतमुक वर्ष मुरलेली. ती फक्त जिभेच्या टोकावर घ्यायची आणि त्याचा आनंद घेत तोंडात घोळवायची. बरोबर ताजं घरी बनवलेलं चीज. ते टेबलवर येताच त्याचा उग्र दर्प नाकात शिरलेला..  

हेही वाचा >>> ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’

सगळं संभाषण तोडक्यामोडक्या इंग्रजीत. थोडे हातवारे, खाणाखुणा आणि थोडे ओळखीचे शब्द. संवादाला भाषेची गरज नसते याची लख्ख जाणीव तेव्हा पहिल्यांदा झाली. त्यांनी भारतातून दत्तक घेतानाच्या अनुभवांची माहिती दिली, मुलाला बोलावलं. दक्षिण भारतातल्या एका अनाथाश्रमातून घेतलेली ती जुळी मुलं. एक मुलगा, एक मुलगी. मुलं होती १२-१४ वर्षांच्या अडनिडय़ा वयात.  त्या काळय़ासावळय़ा मुलाला ते दोघं प्रेमानं जवळ घेत होते, त्याच्या हुशारीविषयी, खेळण्याविषयी बोलत होते. मुलाला इंग्रजी येत नव्हतं, तरीही त्यांना आम्हाला त्या मुलांना भेटवायचं होतं, ते केवळ आम्ही त्याच्या मायदेशातून आलो होतो म्हणून. मुलगा भेटला, पण मुलगी समोर आली नाही. कारण कळलं, ते धक्कादायक होतं. ज्या देशातले लोक आपल्या मुलांना टाकून देतात, त्या देशातल्या लोकांना कशाला भेटायचं, असं तिचं म्हणणं! कदाचित आम्ही तिचा गैरसमज दूर करू शकू, म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं म्हणे. पण ती नाहीच भेटली. विलक्षण अनुभव होता तो. परतीच्या वाटेवर आम्ही अक्षरश: नि:शब्द होऊन गेलो होतो. अख्खं तप हा अनुभव मनाच्या तळाशी कुठेतरी जमून बसला होता. जेव्हा मी लिहू लागले तेव्हा तो आपोआप वर आला आणि त्या मुलीच्या नजरेतून मी कथा लिहिली.

असंच एकदा मालवणच्या समुद्रकिनारी मच्छीमार बोटी बघत असताना त्यांचं जगणं समजून घ्यावं असं तीव्रतेनं वाटलं. मग नंतर मुद्दाम एकटी गेले, राहिले, फिरले. त्यांच्या वस्तीतल्या घरांमध्ये गेले, मासळीबाजारात चकरा मारल्या आणि माझी ‘गाज’ ही कादंबरी लिहिली गेली.

माझी लेक कॉलेजात असताना अन्नमलईच्या डोंगरात पक्ष्यांवरच्या एका प्रोजेक्टसाठी दोन महिने गेली होती. मी फक्त दोन दिवस तिला सोडण्यापुरती गेले होते. पुढे मला काही दुखण्यामुळे तीन महिने घरी बसावं लागलं. सुरुवातीचं नैराश्य प्रयत्नपूर्वक झटकलं आणि लिहायचं ठरवलं. समोर आलं अन्नमलई, तिथल्या डोंगररांगा, लेकीच्या तोंडून ऐकलेली वर्णनं.. ‘निजखूण’ कादंबरी लिहिली आणि ‘दीपावली’ अंकाला पाठवून दिली. गंमत म्हणजे संपादक अशोक कोठावळेंनी  कुणाकुणाकडे माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी केली. जंगलाचे, पक्षीप्राण्यांचे तपशील इतके तंतोतंत बघून त्यांना शंका आली, की घरचं कुणी फॉरेस्ट डिपार्टमेंटला वगैरे आहेत का?

हेही वाचा >>> मला घडवणारा शिक्षक : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे गर्गे सर

माझ्यासाठी पर्यटन हा जणू माझा हुंकार असतो. तेव्हा बघितलेलं, अनुभवलेलं अकस्मात उसळी मारून वर येऊन सांगतं, ‘‘माझी गोष्ट सांग ना!’’ आसाम, अरुणाचल, मेघालयला जाऊन आल्यावर ‘तीन ध्रुव’ कथा लिहिली गेली. एक मात्र आहे, मला अजून तरी प्रवासवर्णन लिहायची इच्छा झालेली नाही. कदाचित मी अभ्यासू नजरेनं न बघता फक्त भावनात्मक पातळीवर त्या त्या जागा बघत असेन म्हणूनही असेल. पण पर्यटनाला जाण्याचा विचार सुरू झाला की पहिलं प्राधान्य समुद्रकिनाऱ्याला! समुद्र सर्वात प्रिय, जणू जिवाचा सखा. कोकण, गोवा, कोलकाता, जगन्नाथपुरी, कोणार्क, सुरत, चेन्नई, पुद्दुचेरी, केरळ, कन्याकुमारी, मालदीव्ह, पटाया, दुबई, लक्षद्वीप.. किती देशातले समुद्रकिनारे फिरलो. प्रत्येक किनाऱ्याची रेती वेगळी, पाण्याचा रंग वेगळा, भरती-ओहोटीचा खेळ वेगळा. किनाऱ्यावर सापडणाऱ्या शंख-िशपल्यांचे आकार वेगळे. समुद्राकडे बघताना भान हरपण्याचा अनुभव मात्र एकसारखा! तासनतास समुद्राला न्याहाळत, दिवसाच्या प्रत्येक प्रहरी तो तितकाच कसा देखणा असू शकतो याचं नवल करत वेळ कसा सरतो कळतच नाही.

असंच कधी तरी बोटीतून प्रवास करत असताना मनात आलं.. किती शांत, निर्मळ, नितळ वाटतंय या सागरात! पोटात सगळी रत्नं दडवणारा रत्नाकर हेच नाव याला खरं शोभून दिसणारं. आपली अखेरही अशीच इथे व्हावी, रत्न होऊन जावं! या प्रिय सागराच्या बाबतीतच खूप वर्षांनी माझी एक इच्छा पुरी व्हायचा क्षण आयुष्यात आला, पण वाटलं होतं तसा तो सुंदर न वाटता प्रचंड हादरवून टाकणारा ठरला!

हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : देशाटनातून जडले मैत्र जीवांचे! 

७-८ वर्षांपूर्वी आम्ही दोघं, दोन्ही मुली, जावई आणि दोन वर्षांची नात देवबागच्या समुद्रात बोटीनं डॉल्फिन मासे बघायला चाललो होतो. अगदी समोरच्या पहिल्या बाकावर जावई आणि छोटी. फक्त आमचं कुटुंब त्या बोटीत. ऐन दिवाळीचा दिवस असल्यानं इतरत्र कुठेच बोटी दिसत नव्हत्या. आम्ही मजेत जात असताना एकदम एक मोठी लाट आली, बोट उलटली आणि आम्ही सगळे समुद्रात फेकले गेलो. बाकीचे दूर आणि माझ्या डोक्यावर ती उलटलेली बोट. समुद्राला उधाण आलेलं.. वरची बोट हेलकावे खातेय. त्या क्षणी मनात आलं.. ‘संपलं सगळं. माझे आईबाबा वयाची ऐंशी उलटलेले. मी एकुलती एक आणि माझं अख्खं कुटुंब इथे. केवढं भीषण दु:ख मी देतेय त्यांना!..’ अर्थात तसं झालं असतं तर मी हे लिहूच शकले नसते. माझ्या नवऱ्यानं मला बोटीखालून ओढून बाहेर काढलं, लेक नातीला उंच धरून पाय मारत राहिली. आम्ही सगळे नाकातोंडात पाणी जाऊनसुद्धा भरती असल्यानं आत ओढलो गेलो नाही. १५-२० मिनिटं हा खेळ चालू असावा. अचानक लाइफ जॅकेट घेऊन एक बोट आली, शिडी सोडली गेली आणि आम्हाला वर काढलं गेलं. आम्ही सगळे परमेश्वर कृपेनं वाचलो. लाइफ जॅकेट न घालता आम्ही बोटीत बसलोच कसे, हा प्रश्न आम्हाला तेव्हा पडला नाही हे खरं. बोटीत ती सोय नव्हतीच. सगळय़ांचे सगळे पैसे, मोबाइल समुद्रार्पण करून पण सुखरूपपणे आम्ही बाहेर आलो.. विलक्षण हादरवून टाकणारा हा अनुभव होता. बरेच महिने रात्री झोपेतून मी दचकून जागी व्हायचे. इतके वर्ष ज्या भरतीच्या लाटांमध्ये आम्ही डुंबायचो, ती महाकाय लाट स्वप्नात यायची. आमच्यापैकी एखाद्यालाही काही झालं असतं तर.. ही कल्पना उरात धडकी भरवायची.

हेही वाचा >>> सूर संवाद : पार्श्वगायनाशी ओळख!

  ज्या समुद्रात अंतिम क्षण यावा असं स्वप्न मी बघायचे, त्या समुद्राची भीती बसली. पुढे बँकॉकला गेलो असताना तिथल्या बेटांवर बोटीतून जावं लागलं तेव्हा रुमालात तोंड झाकून रडले होते मी. मालदीव्हला समुद्रातले कुठलेही खेळ खेळायची हिम्मत केली नाही. ज्या समुद्रावर इतका जीव होता, त्याची भीती बसावी ही कल्पना मात्र मला सहन होईना. भलतं धाडस करू नका, जिवाची काळजी घ्या, कुठल्याही प्रसंगी घाबरून जाऊ नका, एकमेकांसोबत राहा, कुठल्या तरी रूपात कुणी तरी तुमच्या मदतीला येतो यावर विश्वास ठेवा.. अशी शिकवण या समुद्ररूपी गुरूनं दिली. ज्यातून आपलं अख्खं कुटुंब सहीसलामत बाहेर आलं त्याला घाबरायचं की त्याच्याप्रति कृतज्ञ राहायचं? मनात हा विचार आला आणि मी शांत झाले. आता कुठल्या किनाऱ्यावर गेले की आधी त्याला मनोमन नमस्कार करते आणि स्वत:ला जपत पाण्यात उतरते.

माझ्या लेकीची अ‍ॅनेट ही जर्मन मैत्रीण एकदा म्हणाली होती, ‘‘भारतात आलं की आपल्या कान, नाक, जीभ, डोळे आणि स्पर्श या सर्व संवेदना एकदम जागृत होतात!’’ पर्यटन माझ्यासाठी असंच सर्व संवेदना जागृत करणारं असतं. आयुष्याची श्रीमंती वाढवत नेणारं!

borwankar.neelima@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer neelima borwankar article about her foreign tour zws
Show comments