‘‘एक अगदी निराळा, कादंबरी अभिवाचनाचा श्रोत्यांसमोर एखादा ख्यालासारखा रंगत जाणारा सुंदर अनुभव मी उणीपुरी चाळीस र्वष घेते आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘जैत रे जैत’ ‘मृण्मयी’, ‘हे तो श्रींची इच्छा’.. अप्पांच्या, गो. नी. दांडेकरांच्या या वेगवेगळ्या बाजाच्या कादंबऱ्या. त्यांच्या अभिवाचनामध्ये साहित्य, कथाकथन, नाटक तिन्हींचा संगम आहे. त्या अनुभवामुळे मला माझी ‘निजखूण’ सापडली.’’ सांगताहेत, , लेखन, प्राध्यापकी, वाङ्मयीन मुलाखती, व्याख्यानं आणि रुबाया-कवितांचं अभिवाचन , असं साहित्याच्या जगात सर्वथैव रमणाऱ्या प्रा. डॉ. वीणा देव.
माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, ते ‘आशक मस्त फकीर.’ त्यापूर्वी काही फारसं लिहून झालं नव्हतं हातून. ‘गो. नी. दांडेकरांची मुलगी तू, लेखन करत नाहीस?’ असा प्रश्नही अनेकांनी विचारला होता. लिहिलं नसलं, तरी माझे साहित्यविषयक उपक्रम मात्र सातत्यानं चालू होते. महाविद्यालयात मराठी शिकवत होतेच; शिवाय वाङ्मयीन मुलाखती, वृत्तपत्रांतून पुस्तक परीक्षण, व्याख्यानं असं सतत काहीतरी चालू असे. सृजनशील लेखन फारसं झालं नव्हतं हे खरं! साहित्यक्षेत्रात वावरत असल्यानं हे मीच लिहिलं पाहिजे असं जेव्हा वाटेल, तेव्हाच आपण लिहायचं, असं मनोमन ठरवलं होतं. आप्पा पन्नास वर्षांचे झाले, तेव्हा आचार्य अत्र्यांच्या सांगण्यावरून मी ‘आप्पा- एक धुक्यानं वेढलेला डोंगर’- असा लेख लिहिला होता. तेव्हा मी कॉलेजात दुसऱ्या वर्षांला असेन. ‘नवयुग’च्या अंकात तो आला होता. नंतर आप्पांच्या साठीच्या निमित्तानं, ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हाही लिहिणं झालं होतं. त्यानंतर एकदा मारुती चित्तमपल्ली मला म्हणाले, ‘‘वीणा, तू आप्पांवर लिहिलेले लेख मी वाचले आहेत. मला आवडले ते. पण खरं तर तू आता आप्पांवर दीर्घ लेखन करायला हवं.’’ त्यांचं हे बोलणं मनापर्यंत पोहोचलं आणि लिहायचा निश्चय केला.
एक बहुपेडी व्यक्तित्व म्हणून मला आप्पांविषयी खूप कुतूहल होतं. त्यांच्या स्वभावातल्या काही गोष्टी मला कोडय़ात टाकत. काही सुखावत तर काही अस्वस्थही करत. एकुलती एक मुलगी म्हणून अनुभव माझ्या गाठीशी होतेच; पण केवळ आठवणींच्या आधारावर मला त्यांचं व्यक्तित्व उलगडायचं नव्हतं. वडील, लेखक, एक छांदिष्ट माणूस, दुर्गप्रेमी, गिरिभ्रामक, छायाचित्रकार अशा त्यांच्या विविध पैलूंचा माझ्या परीने वेध घ्यायचा होता.
‘आशक मस्त फकीर’च्या निमित्ताने मी तो घेतला. किती सुखाचा काळ होता तो लेखनाचा! माझ्या अगदी जवळच्या, माझ्यावर अत्यंत प्रेम असलेल्या माझ्या वडिलांचा शोध. झपाटल्यासारखं लेखन झालं ते. कच्चा खर्डा पूर्ण झाल्यावर मी त्यांना तो वाचायला दिला. पक्षाघातामुळे त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या होत्या. हातही लिहिता राहिला नव्हता. त्यामुळे मला ते अभिप्राय कसा देतील, याविषयी कुतूहल होतं. एक ताणही होता मनावर. माझ्या लेखनात त्यांच्या वागण्यातल्या मला खटकणाऱ्या काही गोष्टीही मी लिहिल्या होत्या. अर्थात मर्यादेनं. पण त्यांना आवडलं नसतं तर? खरं तर त्यांच्या- माझ्यातलं नातं अगदी खुलं होतं. मित्रच ते माझे. पण ते एरवीच्या जीवनात. लेखनात जाहीरपणे ते नोंदवलेले त्यांच्या मनास येई का? अशी धाकधूक मनात होती. झालं असं की, बसवत नसतानाही त्यांनी माझं सगळं लेखन सलग वाचून काढलं. अनावर कुतूहलानं. शेवटच्या ओळी वाचल्या अन् टाळ्या वाजवल्या. त्या वेळी त्यांना भावना प्रकटीकरणाचा मुख्यत: तोच मार्ग उरला होता. मग जवळ पाटी घेतली अन् मोठय़ा प्रयासानं त्यावर लिहिलं, ‘‘फार छान झाले आहे. माझ्यापेक्षा तुझे लेखन वेगळे आहे. इतके खरे कोणी लिहीत नसते.’’
माझे डोळे भरले होते अन् मनही. जिव्हाळ्यानं, तटस्थतेनं, मनापासून आणि विचारपूर्वक मी जे लिहिलं होतं, ते त्यांना आवडलं. पुस्तक प्रसिद्ध झालं. अनेक मान्यवरांनी माझी पाठ थोपटली. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कारही मिळाला. अन् मी लिहीत राहायला हवं, असं माझ्या मनानं घेतलं. सुरुवात आप्पांच्या ललित व्यक्तिचित्रापासून झाली आणि माझ्या पुढल्या ललित लेखनाचंही सूत्र राहिलं, माणसाच्या अंतरंगाचा शोध.
साहित्यक्षेत्रातल्या अनेक ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखती घ्यायची संधी मला मिळाली. पुण्याच्या मॅजेस्टिक गप्पा, आकाशवाणी, दूरदर्शन, नियतकालिक अशा वेगवेगळ्या माध्यमांसाठी. त्या निमित्ताने पुन्हा त्यांच्या साहित्याचा अभ्यास. मोठा आनंद मिळे त्यातून. माझं काम म्हणजे त्यांच्यातला कलावंत आणि माणूस रसिकांसमोर ठेवायचा. नक्षत्रांच्या भेटी मनात जी स्मरणं ठेवून गेल्या, त्यासंबंधी, जेव्हा तीव्रतेनं लिहावंसं वाटलं, तेव्हाच लिहिलं. त्या संग्रहाचं नाव ‘परतोनि पाहे’. ‘स्त्रीरंग’मध्ये स्त्रीमनाचे पैलू उलगडत गेले. कितीजणी कित्येक वर्ष मनात पिंगा घालत असलेल्या. लहान, थोर. त्यांच्या वागण्याचे मला लागलेले अर्थ टिपले. स्वानुभवाशी एकरूप होत त्यातला आशय टिपायला मला आवडतं. त्यामधला आनंद, वेदना, ताणतणाव, अवघडलेपण, बोच सारं काही शब्दबद्ध करावंसं वाटतं. ‘विभ्रम’मध्ये संग्रहित झालेल्या ललित लेखांनी मला ते समाधान मिळालं. ललितगद्य हे माझ्या सृजनशील लेखनाचं माध्यम आहे. त्या आनंदाची प्रतही वेगळी होती.
साहित्यानं मला आणखीही खूप दिलं आहे आणि ते साहित्याच्या रंगमंचावरील सादरीकरणामुळे आहे. एकदा सुधीर मोघे यांनी प्रस्ताव ठेवला, की रॉय किणीकरांच्या रुबायांवर ‘उत्तररात्र’ हा कार्यक्रम आपण काही जण मिळून रंगमंचावर सादर करायचा. मी तो प्रस्ताव लगेच स्वीकारला. किणीकरांची कविता अनवट उत्कट पण अभिव्यक्तीच्या आगळ्या रीतीमुळे काही वेळ कोडय़ात पाडणारी. एकेका शब्दाचं दळ उमलत चारच ओळींची रुबाई परिणामकारक सादर कशी करायची, ते सुधीरमुळे उमगत गेलं. खानोलकर, बोरकर, माडगूळकर, इंदिरा संत, संजीवनी अशा अनेक भिन्न प्रकृतीच्या अनेक कवींच्या कविता अरुणा ढेरे यांच्याबरोबर विविध ठिकाणी सादर करता आल्या. उच्चारित शब्दानं कवितेतलं ‘शब्दांच्या पलीकडलं’ व्यक्त करायचा मार्ग सापडत गेला. त्यावेळची एक विसरता येणार नाही अशी आठवण आहे. एकदा आमचा कविता वाचनाचा कार्यक्रम सुनीताबाई देशपांडय़ांच्या घरी होता. त्यांचं कवितांचं भावोत्कट सादरीकरण मला फार आवडे. त्यांच्या मी ऐकलेल्या कवितांपैकी ‘चाफ्याच्या झाडा’ ही पद्मा गोळ्यांची कविता तर अगदी मनात रुतून बसलेली. योग असा की त्या दिवशी त्या कार्यक्रमात ती कविता मला वाचायला होती. अर्थात माझ्या पद्धतीनंच मी ती वाचते, त्यामुळे आत्मविश्वास होता, पण किंचित दडपणही होतं. श्रोत्यांमध्ये त्यांची ती कविता ऐकलेले बरेच चोखंदळ रसिक होते. कविता सुरू करताना नेहमीपेक्षा क्षणभर विश्राम अधिक घेतला मी, त्या क्षणात त्यांच्याकडे पाहिलं अन् वाचायला लागले. संपूर्ण कविता होईपर्यंत मी एका वेगळ्याच तंद्रीत होते. ते माझं वाचणं, ‘त्यांना’ आवडायला हवं, असं आतून वाटत होतं. पण वाचताना मी तेही विसरले होते. कविता संपली, मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं. समाधानानं त्या थेट माझ्या डोळ्यांत पाहात होत्या. तो आनंद मला विसरता नाही यायचा. त्या क्षणी तो माझ्यापुरता होता, तरीही.
पण त्याच्याही आधीपासून एक अगदी निराळा, कादंबरी अभिवाचनाचा श्रोत्यांसमोर एखादा ख्यालासारखा रंगत जाणारा सुंदर अनुभव मी उणीपुरी चाळीस र्वष घेते आहे. त्यामध्ये साहित्य, कथाकथन, नाटक तिन्हींचा संगम आहे. त्या अनुभवामुळे मला माझी ‘निजखूण’ सापडली. तो योग अवचित आला..
१९७५ मधली गोष्ट. एक दिवस आप्पांचा फोन आला, ‘‘राजी, ‘मोगरा फुलला’ला वाचकांचा उदंड प्रतिसाद आहे. पण यादवकालीन भाषेशी साधम्र्य दाखवणारी ती भाषा आजच्या वाचकांना थोडी जड जात असावी. डॉ. व. दि. कुलकर्णी म्हणताहेत, ब्रिटिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्स आपल्या कादंबऱ्यांचं जाहीर वाचन करत असे. त्या धर्तीवर तुम्ही ‘मोगरा’ करा. वीणा, विजय आणि तुम्ही. म्हणजे ‘मोगरा’च्या भाषेचा एक वेगळा समर्थ प्रत्यय येईल.’’
आप्पांनी संहिता तयार केली. कादंबरीतले महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांची सांधेजोड करण्यासाठी स्वतंत्र निवेदन. कादंबरीतल्या स्त्री व्यक्तिरेखा मी वाचायच्या आणि पुरुष व्यक्तिरेखा विजयनी. तालमी सुरू झाल्या. लक्षात आलं की, हा भाषेचा ढंग अगदी निराळा आहे. त्यातले अनेक शब्द आज वापरले न जाणारे. त्या भाषेची लय निराळी. ती नीट वाचली तर श्रोत्यांना उमगेल. हे सर्व आप्पांनी आमच्याकडून करून घेतलं. ते पुन:पुन्हा वाचून घेत. मला एक वाक्य होतं, ‘‘माय मज बोलली, की बये, इंद्रायणीवरून दोन खेपा घेऊन ये. येऱ्हवी अस्तावल्यावर मग पाणी आणणे व्हायचे नाही. दारवंटा वलांडीत बाहेर पडल्ये.’’ हे जुनं वळण जिभेवर रुळायला वेळ लागला. आप्पा कठोर शिक्षक होते. ते स्वत: उत्तम वाचायचे. प्रख्यात अभिनेते डॉ. लागूंनी ‘दांडेकरांचं वाचन एकपात्री प्रयोगासारखं असे. ऐकताना त्यांची पात्र आमच्या मनात जिवंत होत.’ असं म्हटलं आहे. (लमाण पृ. ३७). अशा कलावंतांकडून आम्हाला संथा मिळाली. कादंबरी वाचताना निवेदनासाठी आवाजाचा पोत कसा वापरायचा, संवाद भाषा कशी पेलायची, विविध व्यक्तिरेखांसाठी आवाजाचं वैविध्य कसं योजायचं, याचे धडे त्यांनी दिले. ‘मोगरा’ वाचताना आम्ही कथावस्तूशी अगदी एकरूप होऊ लागलो. अखेरचा ज्ञानेश्वरांच्या समाधीचा प्रसंग, म्हणजे शांत रसाचा आविष्कार, तो स्तब्ध झालेलेल्या श्रोत्यांच्या साक्षीनं घेतलेला आध्यात्मिक अनुभवच!
पण आप्पांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सत्तरेक प्रयोगानंतर आम्ही थांबलो. मराठीतल्या एका मान्यवर लेखकाच्या साक्षीनं, साथीनं कार्यक्रम करण्यात फार मोठं सौख्य होतं आणि तो माणूस आमचा होता. काही काळानंतर आप्पांच्या चाहत्यांच्या आग्रहामुळे अभिवाचनाचे प्रयोग करू लागलो. बरोबर आली आमची धाकटी लेक मधुरा आणि जावई रुचिर कुलकर्णी. अलीकडे तर नातू विराजसही आमच्या चमूत सामील झाला आहे. आम्ही तीनही पिढय़ा अभिवाचनाचा मनमुराद आनंद घेत असतो.
आप्पांच्या बरोबर अभिवाचनाचा प्रवास असा सुरू झाला. पण काळाच्या ओघात त्यांचं बोट सुटलं आणि अभिवाचनाच्या क्षेत्रात मी निरनिराळे प्रयोग करत राहिले, आजतागायत. वाचनासाठी कोणती कादंबरी वाचायची, सादरीकरणासाठी त्यात कोणते विशेष हवेत याचा विचार करावा लागला. तिचा गाभा, सत्त्व कायम ठेवून दीड-पावणेदोन तासांत वाचण्याजोगं तिचं संक्षिप्त रूप करणं खरंच अवघड. तिचं निवेदनप्रधान रूप कायम राहायला हवं. कथानकातल्या घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा निवडणं- खरं तर बरंच काही वगळणं, माझी कसोटी पाहणारं. अभिवाचनाच्या संहितेत एकसंधता हवी. प्रत्येक वाक्य, शब्द त्या दृष्टीने निवडायचा. आज आम्ही वाचत असलेल्या नऊही कलाकृतींसाठी खूप विचार करावा लागला. खूप कष्टही घ्यावे लागले. आम्हाला मदत फक्त वाचिक अभिनयाची. केवळ शब्दांमधूनच अनुभव उभा राहायला हवा हा माझा आग्रह. अनुभव असा की तो राहतोच. ऐकत असताना श्रोता आपल्या कल्पकतेच्या बळावर मनाच्या पडद्यावर सगळं स्पष्ट पाहू शकतो. त्याच्या मदतीला असते लेखकाच्या भाषेतली चित्रमयता आणि उच्चारित शब्दाचा ध्वनी.
आम्हाला ‘पवनाकाठचा धोंडी’साठी मावळातली मराठी बोली, ‘पडघवली’ आणि ‘शितू’साठी दक्षिण रत्नागिरीकडली बोली नेमकेपणानं शिकावी लागली. ‘जैत रे जैत’ मधला ठाकरी बोलीचा बाज उचलावा लागला. ‘मृण्मयी’ वऱ्हाडात आणि कोकणात घडते त्यासाठी वऱ्हाडी बोली, ‘हे तो श्रींची इच्छा’मध्ये तर अनेक बोलीभाषा! पण ते सगळं शिकलो.
आम्ही खूप निष्ठापूर्वक आजवरचे साडेपाचशे प्रयोग केले आहेत. जणू ते आमचं व्रत आहे. श्रोत्यांसाठी हा श्रवणानुभव उत्तम दर्जाचा असायला हवा याकडे माझं बारीक लक्ष असतं. त्यामुळेच एक जिवंत अनुभव घेतल्याचं सौख्य वाचकांना मिळतं, अशी माझी कलाकार आणि दिग्दर्शक म्हणूनही भावना आहे.
कादंबरीवाचनातले काही अनुभव चिरस्मरणीय आहेत. एक श्रीमंत अनुभव रायगडावर ‘हे तो श्रींची इच्छा’ वाचण्याचा. शिवराज्याभिषेक हा तिचा विषय. तोच दिवस वाचनासाठी निवडलेला. स्थळ राजसभा. प्रत्यक्ष राज्याभिषेकाची जागा. राज्याभिषेकाचा प्रसंग एकेका वाक्यानं आकार घेत होता. आम्हाला आणि समोर बसलेल्या सर्व वयाच्या श्रोत्यांना आनंदानं स्फुरण चढत होतं. कादंबरीतला शेवटचा प्रसंग असा आहे, राज्याभिषेकानंतर जिजाबाईसाहेबांना भेटायला छत्रपती वाडय़ात आले आहेत. पण जिजाबाईच राजांना मुजरा करत आहेत. म्हणताहेत, ‘‘राजे आपण आता सिऊबा राहिला नाहीत. छत्रपती झाला आहात. शेष सर्व आपली प्रजा. तेव्हा प्रजेने जे करायास हवे, ते आम्हास करू द्या.’’
मी जिजाबाई वाचत होते. त्या क्षणी त्या परिसरात ते शब्द पूर्णाशानं मी अनुभवीत होते. एक आभाळाएवढी उंच आई, जणू मीच होते. वाचन संपलं. पण भानावर यायला मला खूप वेळ लागला..
एक कलावंत म्हणून ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’च्या वाचनानं मला आव्हान दिलं. ती संक्षिप्त करतानाही मला खूप विचार करावा लागला. त्या कादंबरीत आप्पांनी स्वत:चा अनुभव ‘कुणा एकाचा’ म्हणून मांडला. त्यामुळे ‘कुणी एक’ हाच महत्त्वाचा. बाकी दोन ठळक व्यक्तिरेखा सोडल्या तर अन्य अगदी मोजक्या वाक्यांमधून आकार घेणाऱ्या. मी कादंबरी संक्षिप्त केली. व्यक्तिरेखांची विभागणी केली. वाटपही केलं. तालमी सुरू झाल्या. पण आम्ही नेहमीचेच कलावंत असूनही अनुभव वाचनातून जिवंत होईना. प्रयोग काही दिवसांवर आलेला. मी गोंधळले. खरं तर सगळेच. शेवटी मृणालला (थोरली लेक मृणाल कुलकर्णी) बोलावलं. तिच्या कामाच्या व्यग्रतेमुळे तिला अभिवाचनात अगदी क्वचित सहभागी होता आलं होतं. पण तिचं लक्ष असे. तिनं आमची तालीम ऐकली आणि निश्चयपूर्वक म्हणाली, ‘‘आई ही कादंबरी तू एकटीनंच वाचायचीस.’’ मी गंभीर झाले. कादंबरी माझी फार आवडती. पण तिचा नायक आप्पा स्वत:. तेराव्या वर्षी स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेने भारावलेल्या, त्यासाठी घरातून पळालेल्या युवकाची ती कथा. वादळात सापडलेल्या पानासारखं हेलपाटलेलं ते जगणं. त्याला अकल्पनीय भोगावं लागलेलं. मी ती कादंबरी पहिल्यांदा वाचली, तेव्हापासून माझ्या मनावरही त्यांच्या सोसण्याचे व्रण उमटलेले. आता लेकपण विसरून कलावंताच्या तटस्थपणानं तो अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान माझ्यापुढे होतं. त्यातलं प्रखर वास्तव, मानवी नात्यांमधली गुंतागुंत, भावभावनांचे अनेक पदर हे सगळं मला पोहोचवायचं होतं. भिन्नरंगी अनेक व्यक्तिरेखा साकारायच्या होत्या आणि ऐन तारुण्यात एक विरागिनी आणि ‘कुणी एक’ नर्मदेचा परिक्रमावासी यांच्या मनात निर्माण झालेला कोमल भावकोषही माझ्या स्वरातून उलगडायचा होता. प्रत्येक प्रसंगाची भावनात्मक लय पकडायची होती. सगळं जमेल? एकसुरी न होता? असं अभिवाचनाचा एवढा दीर्घ अनुभव असूनही वाटत होतं.
पहिला प्रयोग.. माझं ‘कुणा एका’च्या अनुभवाबरोबर श्रोत्यांना नेणं, कथानकाची नर्मदेच्या प्रवाहासारखी लय सांभाळणं, डोळ्यातलं पाणी निग्रहानं मागं सारत, स्वरावर पूर्ण ताबा ठेवत एकेक उत्कट प्रसंग सादर करणं सुरू झालं. अखेरीस त्या दोघांचा अपरिहार्यपणे झालेला वियोग. व्याकूळ आणि अंतर्मुख करणारा. बहुधा मी हे सगळं उभं करू शकले होते. कारण शेवटचं वाक्य वाचून मी पुस्तक मिटलं अन् श्रोत्यांची एकाग्रता मला जाणवली. तन्मयताही. काही क्षण सगळे स्तब्ध. मग पसंतीच्या कडकडून टाळ्या. त्या मूक क्षणांची अनुभूती आगळीच..
लेखन आणि साहित्याचं अभिवाचन दोन्ही कलांनी मला जे दिलं आणि मीही रसिकांना जे देऊ शकले, ते असं विविधरंगी आहे. वाचनसंस्कृतीच्या वाटेवर चार दशकांत मी टाकलेली ही चार पावलं, समाधान देणारी अन् पुढची वाट सुचवणारीही आहे. चालते आहेच!
‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी (६ एप्रिल) प्रसिद्ध अभिनेत्री दीपा लागू
निजखूण
‘‘एक अगदी निराळा, कादंबरी अभिवाचनाचा श्रोत्यांसमोर एखादा ख्यालासारखा रंगत जाणारा सुंदर अनुभव मी उणीपुरी चाळीस र्वष घेते आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘जैत रे जैत’ ‘मृण्मयी’, ‘हे तो श्रींची इच्छा’.. अप्पांच्या, गो. नी. दांडेकरांच्या या वेगवेगळ्या बाजाच्या कादंबऱ्या.
आणखी वाचा
First published on: 30-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer veena deo