– डॉ. सुनीलकुमार लवटे
सत्संग असो की अनेक ठिकाणी भरणाऱ्या यात्राजत्रा. यामध्ये हजारो, लाखोंच्या संख्येने माणसे सहभागी होतात. माणसाची आस्तिक, नास्तिक, जडवादी, बुद्धिप्रामाण्यवादी घडण ही वयानुसार वाचन, चिंतन, अनुभवातून किंवा त्याच्या अभावातून होत असते. अनेकदा वर्तमान विपरीतच असते. अस्थीर, अशाश्वतच असते. मात्र स्थैर्य मिळवण्याच्या आकांक्षेतून अनेकदा विवेकाला मूठमाती दिली जाते. आपल्याच संतांनी सांगितलेलं, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असो द्यावे समाधान।’ आपल्याला कळूनही वळत नाही आणि मग हजारो, लाखोंच्या संख्येने मेळे भरवलेच जातात. या समूहमनाविषयी…
हाथरस (उत्तर प्रदेश) येथील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू सूरजपाल ऊर्फ नारायण साकार हरी ऊर्फ भोलाबाबा आयोजित सत्संग समाप्तीनंतर बाबांच्या पायाखालील अथवा पदस्पर्शाने पवित्र माती मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. ही भारतातील काही पहिली घटना नाही. अगदी या शतकातल्या, गेल्या अवघ्या दोन दशकांत अशा धर्म सत्संग, दर्शन, कुंभमेळा, यात्रा इत्यादींत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे दीड हजाराच्या घरात आहे. वारंवार घडणाऱ्या समान प्रकारच्या घटनांमधून आपण काहीच बोध घेत नाही, शिकत नाही, आपल्या व्यक्ती वा समूह व्यवहारात बदल करत नाही. हे विवेकी समाजाचे लक्षण आहे का? काय आहे नेमके यामागचे समूहमन?
हेही वाचा – प्रगतीसाठी लिंगाधारित समानता!
अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्त्रिया आणि मुला-मुलींची संख्या अधिक असते. असा धर्मावलंबी समाज-समूह गांजलेला, जगणं मुश्कील झालेला नि म्हणून धर्माधारे जीवन सुसह्य करू पाहणारा स्वप्नाळू समाज असतो. धर्माधारित समाजाचा विचार करू लागलो, की लक्षात येते की, जगातील सर्व देशांतील मानवी समाज हा कोणत्या ना कोणत्या धर्माशी जोडलेला असतो. धर्मावलंबी समाज नाही असा जगात एकही देश नाही. यावरून धर्माची सार्वत्रिकता लक्षात येते. या विश्वव्यापक व्यवस्थेचा शाश्वत विचार करायचा तर तो रूढ मार्गाने अशक्य आहे. भाकरी परतणे हाच त्यावरचा रामबाण उपाय होय.
सत्संग, मेळावे, यात्रा, उत्सव इत्यादी धर्म, ईश्वरकेंद्री उपक्रमांत आपण हजारो, लाखोंचा जनसमुदाय लोटलेला पाहतो. त्यात अशिक्षित, अल्पशिक्षित, उच्चविद्याविभूषित सर्व प्रकारचे धर्मानुयायी असतात. माणसाची आस्तिक, नास्तिक, जडवादी, अनीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, शब्दप्रामाण्यवादी अशी जी घडण असते, ती जन्मजात असते किंवा वाचन, चिंतन, अनुभवातून ती हळूहळू होतेही. माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासात आनुवंशिकता आणि परिस्थिती हे दोन घटक कार्य करतात असे मानसशास्त्र सांगते. जी माणसं धार्मिक असतात, सश्रद्ध असतात, त्यात त्यांच्या मानसिक घडणीचा, भावनिक वृत्तीचा मोठा वाटा असतो. अधिकांश माणसांचा जीवनव्यवहार हा भावनाधारित होत असतो. जी माणसं सत्संगसदृश उपक्रमांमध्ये सहभागी होतात, ती मानसिक अपेक्षांची पूर्तता भौतिक जगात भौतिक साधनांनी होत नाही म्हणून आधिभौतिक वा आध्यात्मिक (मेटाफिजिकल ऑर स्पिरिच्युअल) मार्गांनी ती करण्याचा प्रयत्न करतात. यामागे अनेकदा हताशा, निराशा असते तशी आकांक्षांच्या पूर्ततेची ओढ, तीव्रताही असते. सत्संग, आशीर्वाद, तीर्थ, प्रसाद, अनुग्रह, अनुष्ठान, जप, नवस, गाऱ्हाणं, तीर्थयात्रा करणारे असतातच पण, त्याच्याही पलीकडे जाऊन बळी, भानामती, करणी, अंगात येणे, घुमणे, समर्पण, मंत्रतंत्र, जादूटोणा, इत्यादी अनिष्ट, अघोरी, अमानुष उपाय जिवावर उदार होऊन करायला तयार माणसं विवेक, बुद्धी, विचारमुक्त असतात. त्यांच्यावर ईप्सित साध्यतेचं संमोहन, गारूड कार्य करत असतं. त्याच्या/तिच्या सर्व व्यवहारांवर अपेक्षापूर्तीचं नियंत्रण असतं. येणकेणप्रकारेन इच्छिताची पूर्ती हेच त्यांचं वेड असतं नि ते चरमसीमेचं नि एका अर्थाने ‘स्व’, ‘आत्म’समर्पण, विसर्जनाचं असतं. भक्त अंधच असतो. भक्ती सजग नसते. मात्र सारासार विवेक, बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर निरंतर सतर्क असतो नि तो तर्क, बुद्धी, कार्यकारणभाव कसोट्यांच्या आधारे जीवनातील गोष्टींचा स्वीकार करतो. तो अनाठायी आकांक्षा बाळगत नाही. तो वास्तववादी असतो, स्थितप्रज्ञ असतो.
सर्वसामान्य माणसास आपलं कुटुंब सुखी व्हावं वाटतं, यात गैर काहीच नाही. पण अंथरूण नि पांघरुणाचा मेळ न बसणारी माणसं बाबा-बुवा-बहनजींच्या सत्संगाचे अनुयायी बनतात. अल्पशिक्षितांची स्थिती अर्धवट घडणीची असते. कळतं पण वळत नाही, अशी त्यांची स्थिती असते. मध्यमवर्गीय माणसांचं जीवन निरंतर ‘धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं’ अशा कात्रीत, द्वंद्वात नेहमी हिंदोळे घेत राहतं. श्रीमंत, उच्चपदस्थ, लोकप्रतिनिधी, राजकारणी माणसंही मोठ्या प्रमाणात बुवाबाजीच्या आहारी गेलेली आढळतात. अशा साऱ्या मंडळींचं जीवन अनेक अंगांनी अस्थिर असतं. अशी सश्रद्ध माणसं सतत भयभीत असतात. अस्थिरता, अशाश्वतता, जे कमावलं ते टिकेल कसं याचा घोर लागलेली ही माणसं मग गंडे-दोरे,अनुग्रह, भक्ती, आश्रय इत्यादी मार्गे स्थैर्य, सातत्य, सत्ता, संपत्तीचा ओघ अखंड राहावा म्हणून संत-महंतांच्या, गुरू अनुग्रहाच्या मागे लागतात.
सामान्य-असामान्य कोणीही असो, त्यांना अशा सर्व धर्म, श्रद्धाकेंद्री उपक्रमांतून मानसिक, भावनिक असं तात्कालिक समाधान, आश्वासन मिळतं. अशी माणसं निरंतर ताणतणावात जगत असल्याने सत्संग, गुरू, ईश्वरी भक्ती इत्यादी मार्ग त्यांना दिलासा देतात, दुर्बलतेची तीव्रता कमी करतात. तो दिलासा भावनिक, भ्रामक असतो हे त्यांना कधीच कळत नाही.
प्रत्येक वर्तमान हा विपरीतच असतो. मग अशा काळात माणसानं जगावं कसं? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्याला आपल्या संतांनीच अनेक जीवनोपाय सांगून ठेवले आहेत. ते समजून घेऊन स्थिरचित्त जगणं हीपण जिवंत साधनाच (समाधी!) असते. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असो द्यावे समाधान।’ असं जगावं म्हणजे अस्थिरतेचं भय, अशाश्वततेची भावना मनास सतावत नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ यावर विश्वास ठेवून वैध मार्गाने, कष्टाने कमवावं नि जे हाती येईल त्यात समाधानाने जगावं. ‘अपना हाथ जगन्नाथ’, ‘सो हं’, असं म्हणत जगणारी माणसं खरी धार्मिक, निर्मिक, सदाचारी होत.
माणसाच्या आयुष्यात ही अनिश्चितता केव्हापासून सुरू झाली हा इतिहास सर्वश्रुत आहे. तो आदीम आहे. निसर्ग आणि माणसामधील अतूट आणि अभिन्न नाते तेव्हापासूनचे आहे. माणूस टोळ्यांत राहायच्या काळात तर निसर्गाविषयीचे गूढ त्याच्या लेखी अनाकलनीय ठरत होते. त्याचे जगणे निसर्गनियंत्रित होते. त्या काळात स्वत:च्या अज्ञानामुळे माणूस निसर्गसृष्टीत निर्माण होणाऱ्या पूर, भूकंप, वीज, ढग, पाऊस इत्यादींच्या प्रकोपांनी भयभीत व्हायचा. तरी मनुष्यात जगण्याची अनिवार ओढ असायचीच. त्या ओढीतून तो मग संकट निर्माण करणाऱ्या सृष्टीतील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभुतांची पूजा करू लागला. टोळ्यांतून जंगलात राहणारा माणूस गुहेत राहू लागला तसं त्याला स्थिर जीवन लाभलं. स्थिरतेतून वस्ती, जनपद, नगरं निर्माण झाली. संस्कृती उदयाला येऊ लागली. तो शेती, शिकार करत उद्याोगी झाला. जगण्याची साधनं विकसित झाली. सण, उत्सव, सत्संगांना उधाण येऊ लागलं. जगण्याचे नीतिनियम ठरू लागले. त्यातून देव, दैव, नशीब, ज्योतिष, स्थिर होत गेलं. त्याचं एक सामूहिक रूप धर्मरूपात अवतरलं. पाप-पुण्य, प्रायश्चित्त, शुद्ध-अशुद्ध, स्पृश्य-अस्पृश्य कल्पनांचा उदय साधन नि सत्ता यांच्या स्वामित्वातून आला. आत्मा-परमात्मा संबंध आणि अंतरातून अलौकिक स्वर्ग-नरक कल्पना उदयाला आल्या. त्या अज्ञात सृष्टीच्या ओढीला मोक्ष-लक्ष्य प्राप्त झाले. मोक्षप्राप्ती, इष्ट आकांक्षापूर्तीसाठी उपवास, व्रतवैकल्ये, जपजाप, नवस, तीर्थाटन, आदी कर्मकांड विकसित झाले. त्यासाठी पुजारी, पुरोहित इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. व्यवस्था सत्ता जन्माला घालते. धर्मसत्ता निरंकुश झाली तशी शह देणारी राजसत्ता उदयाला आली. राजसत्तेचं लोकानुनयी बनणं हे सत्ता निरंतरतेसाठी अनिवार्य बनलं.
या इतिहासातून युरोपमध्ये मध्ययुगात प्रबोधन घडून आले. आपल्याकडे संतांनी धर्माचरणाचे खरे रूप विशद केले. आधुनिक काळात झालेल्या शिक्षणप्रसार, विज्ञान-विचार, विविध ज्ञान-विस्तार यांतून धर्मसुधारणा, समाजसुधारणा करणारा मनुष्यकल्याणी विचारवर्ग पुढे आला. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाजाचे विचार एका अर्थाने कर्मकांडकेंद्री धर्माचरणातून मानवमुक्तीचाच विचार होता. या विचारांमागे अज्ञानाधारित शोषण व्यवस्थेतून बहुजन समाजाच्या मुक्तीचाच तो व्यापक प्रयत्न होता. त्यासाठी शिक्षण हा उपाय मानला गेला. पण गेल्या दीडशे-दोनशे वर्षांच्या इतिहासात शिक्षणप्रसार होऊनही मानवी समाज धर्म-कर्मकांड मुक्त झाला नाही. धर्माचरण केवळ अशिक्षितांत नसते तर ते उच्चविद्याविभूषित वर्गातही असते, हे वास्तव समोर आल्यामुळे धर्म संकल्पनेच्या पुनर्घटनेचा, परिवर्तन-विकासाचा प्रश्न ऐरणीवर आल्याची सध्याची स्थिती आहे.
या संदर्भात मला कार्ल मार्क्सची दोन विधाने आठवतात – धर्म ही अफूची गोळी आहे. आणि सर्व समीक्षेचा प्रारंभ धर्म समीक्षेपासून होतो. पहिले विधान धर्माचे वास्तविक रूप लक्षात आणून देते तर दुसरे विधान त्यावरचा उपाय सुचवते. धर्म अफूची गोळी केव्हा बनते? मनुष्य जेव्हा धर्माची
(पान १ वरून) मूल सदाचारस्वरूपी आचारपद्धती विसरून अपेक्षापूर्तीचा उपाय म्हणून बाह्योपचाराच्या आहारी जातो, तेव्हा त्यावरचा उपाय धर्माचे खरे स्वरूप समजावून देऊन वर्तमान धर्माचरणात बदल घडवून आणणे हाच होय. गेल्या शतकात डॉ. पां. वा. काणे, डॉ. के. ल. दप्तरी, स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विपुल लेखन करून धर्मपरिवर्तनाचे समर्थन केले आहे. तर्कतीर्थांचे विपुल लेखन तर धर्म परिवर्तनालाच समर्पित आहे. एकेकाळचा हा वेदान्तपारंगत स्वत:मध्ये जडवाद, अनीश्वरवाद, आनंदमीमांसा, रॉयवाद इत्यादी अभ्यासाने देवघरातील सारे देव कृष्णार्पण करून स्वत:स कर्मकांडमुक्त करतो. त्यांचे हे उदाहरण म्हणजे ‘अशक्य ते शक्य करिता सायास’ची प्रचीतीच होय. प्रा. नरहर कुरुंदकरांनी साप्ताहिक ‘साधना’च्या ‘मी विचाराचा ठोकळेबाजपणा मानत नाही’ (१९७८) या शीर्षक मुलाखतीत स्पष्ट कबुलीच दिली आहे की, तर्कतीर्थ यांच्या ‘जडवाद’ पुस्तकामुळे मी जडवादी झालो आणि नंतर नास्तिक झालो. स्नान शिल्लक राहिले, संध्या संपली.
डॉ. यशवंत मनोहर यांनी तर्कतीर्थांचं ‘हिंदुधर्माची समीक्षा’ हे पुस्तक वाचून समीक्षा करत लिहिलं आहे, ‘माझ्या जन्माच्या तीन वर्षे आधीच हे पुस्तक प्रकाशित झाले होते, पण पुढे जन्मभर ते माझ्या विचारविश्वाची सोबत करीत आहे… शास्त्रीजींच्या या पुस्तकात वादाच्या अशा जागा नाहीतच असे नाही. पण तरी ऐहिक सामाजिक मूल्यांची बाजू घेणारा भौतिकवाद आणि बुद्धिवादावर आधारलेली ध्येये आणि मूल्येच यापुढे पाहिजेत, हे त्यांचे म्हणणे सर्वांनी खुल्या व पूर्वग्रहरहित मनाने लक्षात घेण्याची गरज आहे.’
धर्मस्वरूप परिवर्तनाचा विचार अगोदर व्यक्ती स्तरावर ग्राह्य होतो आणि समविचारी मनुष्य समाज तयार झाला की मग त्याचे प्रत्यंतर समाजमानसात दिसू लागते. युरोपातील प्रबोधन पर्व (रेनीसान्स पीरियड) हे त्याचे उदाहरण होय. ‘देवाचे देवाला आणि राजाचे राजाला’ देण्याच्या फारकतीतून पोपची धर्मसत्ता संपुष्टात येऊन सीझरची राजसत्ता उदयाला आली. तिच्यात प्रबोधन पर्वाने सुधारणा घडवून आणून स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्याधारित लोकशाही राजसत्ता निर्माण केली. भारतातील विद्यामान संसदीय लोकशाही तिचेच विकसित रूप असून भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या पंचशीलावर उभे असून ते एकात्म भारताची ग्वाही देते. त्यात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना स्वातंत्र्य जसे आहे तसेच दर्जा व संधी यांच्या समानतेचे आश्वासनही आहे.
भारत हा प्रारंभीपासून बहुसांस्कृतिक देश म्हणून विकसित होत आला आहे. इथे अनेक जात, धर्म, वंश, भाषा, संस्कृती आहेत. इथे सर्वधर्मसमभाव आहे आणि धर्मसहिष्णुताही. तिचा मूळ उद्देश मानवकल्याणी आहे. त्यासाठी बदलत्या काळात पूर्वमूल्यांमध्ये विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन, बुद्धिप्रामाण्यता, विवेकवाद यांची भर घालून समाजघडण त्याआधारे करण्याची गरज आहे. ही गरज समाजास केवळ आवश्यक मानून चालणार नाही तर आता तिची अनिवार्यता अधोरेखित होऊन भारतीय समाज विकासाचा नवा कृतिकार्यक्रम अमलात आणायला हवा.
गेली तीस-पस्तीस वर्षे राज्यामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली जी पुरोगामी व विज्ञानाधारित समाजनिर्मितीची चळवळ सक्रिय आहे, त्यातून महाराष्ट्रीय समाज विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा या मूल्यांवर विकसित झाला त्याचे फलित म्हणजे ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम- २०१३’ होय. अलीकडेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं समग्र वाङ्मय हिंदीत भाषांतरित करून प्रकाशित केलं आहेच. आज भारताप्रमाणेच जगही उजव्या बाजूस झुकत आहे. एखाद्या विचाराच्या विरोधाचा काळ त्या विचार प्रसाराचा योग्य काळ असतो, हे जगाने प्रबोधन काळात अनुभवले आहे. जगात रेने देकार्त, बारुथ स्पिनोझा, गॉटफ्रीड लाइब्नित्स, जॉर्ज बर्कले, डेव्हिड ह्यूम, जॉन लॉक, इमॅन्युएल कांट, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल प्रभृती विचारक आणि भारतात अब्राहम कोवूर, रामस्वामी पेरियार, हमीद दलवाई, अशा अनेकांनी विवेकवादाचे समर्थन करत नवमानवतावाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा आधार विवेकवाद होता. विवेकबुद्धी आपणांस चांगलं नि वाईट, सत्य आणि असत्य, नैतिक आणि अनैतिक, न्याय आणि अन्याय यांतील फरक समजावत जीवन सकारात्मक व विधायक बनवते.
हेही वाचा – विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?
सत्संगसदृश धार्मिक उपक्रम वा व्यवहार झुंडीच्या मानसशास्त्रावर कार्य करतो. व्यक्ती स्वतंत्र असते, तेव्हा बहुतांश वेळा तिचा सारासारविवेक जागृत असतो. ती जेव्हा समूह, संप्रदाय, गर्दीचा भाग वा अंग बनते तेव्हा सामूहिक विचार, व्यवहाराच्या प्रभावाने ती व्यक्तिगत अस्तित्व गमावून बसते. गर्दीवर गारुड्याचंच गारूड चालतं. विवेक पुरता गारद! झुंडी उन्मादी होतात ते समूहशक्तीच्या जाणिवेने. राग, संताप, द्वेष, समर्पण, भक्ती सर्व एकाच तराजूत तोलले जाते. म्हणून गर्दी तिथे दर्दी शासन लागते. जिथे कायदा कुचकामी ठरतो तिथे अनर्थ अटळ असतो. हे सर्व लक्षात घेऊन जे शासन कल्याणकारी कार्य करणे आपले प्रथम कर्तव्य मानत कार्यरत असते, तिथे शासनाची भूमिका प्रतिबंधात्मक सतर्कतेची (प्रोअॅक्टिव्ह) असायला हवी. ज्या धर्मस्थळांवरील मनुष्यहानीच्या घटना घडल्या, तिथे गर्दीपेक्षा कायदाव्यवस्था कमजोर होती असे दिसून आले आहे. अशा आपदा येऊ द्यायच्या नसतील तर मनुष्य घडणीकडे लक्ष हा भविष्यलक्ष्यी कृतिकार्यक्रम हवा. शिक्षण व संस्कार यांना भारतीय समाज मानव घडणीचे साधन मानतो. तर ती साधने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, जातिभेदमुक्त समाज या मूल्य आणि विचारांवर उभी असली पाहिजे. तरच विवेकी मानव समाज घडणार.
धर्म अफूची गोळी नसून विवेकी समाज सदाचारी करण्याचं साधन आहे, हे लक्षात घेऊन भारतातील धर्म व्यक्तिगत मर्यादेत फुलत राहिला पाहिजे. धर्म ही मुळातच आध्यात्म साधना आहे. आत्मा एकान्त असतो, सामूहिक नाही. समर्थ रामदास स्वामींनी म्हणून ठेवले आहे, ‘येकांतीं विवेक करावा। आत्मराम वोळखावा।।’
(लेखक साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
drsklawate@gmail.com