भारतीय कायद्याने स्वातंत्र्यसैनिक कोणाला म्हणावे हे ठरविले आहे. त्यानुसार, ज्यांना स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली होती ते स्वातंत्र्यसैनिक. जे भारत संरक्षण कायद्याखाली डांबून ठेवले गेले होते अशा अनेकांना असे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत घातले गेले नव्हते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षांत अनेक तरुणांना सक्तमजुरी, काळे पाणी अशा शिक्षा झाल्या. त्यांच्या बायकांना तुरुंगवास म्हणजे काहीच नाही असे म्हणावे इतका शारीरिक, मानसिक, सामाजिक व राजकीय त्रास भोगावा लागला. त्यांची व्यथा कोणी जाणली?
महाराष्ट्रापुरताच विचार करायचा तर वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, चाफेकर बंधूंच्या पत्नी – दुर्गाबाई दामोदर, यमुनाबाई बाळकृष्ण व सीताबाई वासुदेव अशा ज्ञात व अज्ञात अशा अनेक स्त्रिया आहेत. त्यांना सासरच्या माणसांनी घराबाहेर काढले, माहेरच्यांनी ‘आम्हाला तू मेलीस’ म्हणून घराचे दरवाजे बंद केले. शिक्षण नव्हतेच. जवळ जवळ ९८ टक्के बायका निरक्षर. धुणी-भांडी, स्वयंपाक पाणी अशी कामेही कोणी देत नव्हते. कारण सरकारविरोधी कृत्ये करणाऱ्या पुरुषांच्या बायकांना आधार देणे म्हणजे जळता निखारा पदरात बांधून घेण्यासारखे होते. सरकारची वक्रदृष्टी घरावर पडून घरावरून नांगर फिरवून कोण घेणार? अशाही परिस्थितीत धैर्याने तोंड देऊन क्रांतिकारकांच्या स्त्रियांना नेतृत्व देणारी एक तेजस्वी शलाका म्हणजे सरस्वतीबाई ऊर्फ येसूवहिनी सावरकर.
येसूवहिनी याच नावाने प्रसिद्ध असलेल्या या स्त्रीचा जन्म १८८५ च्या सुमारास त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील फडके कुटुंबात झाला. १८९६ मध्ये तिचे लग्न भगूर गावच्या वतनदार कुटुंबातील बाबाराव ऊर्फ गणेश दामोदर सावरकर या मुलाशी झाले. निरक्षर येसूला या घरात आवर्जून लिहिणे-वाचणे- शिकवले गेले. कुटुंब समृद्ध व समाधानी. बाबाराव शिक्षणासाठी नाशिकला राहात होते. योगाभ्यास करता करता त्यांचे मन संन्यासधर्माकडे वळू लागले. संन्यास घेण्याचा त्यांचा विचार पक्का होत होता. इतक्यात १८९८मध्ये नाशिक जिल्ह्य़ाला प्लेगचा मोठा विळखा पडला. त्यात येसूवहिनींचे सासरे, चुलत सासरे बळी पडले. धाकटे दीर नारायणराव यांना या आजारातून बाबाराव व वहिनी यांनी ओढून बाहेर काढले. सासऱ्यांच्या मृत्यूमुळे वतनदारी संकटात आली. गाव सोडावे लागले. धाकटय़ा दोन दिरांचे शिक्षण नाशिकला राहून करायचे ठरले. वतनदारीची समृद्धी गेली. गरिबीने मैत्री केली. त्यावेळच्या ‘अभिनव भारत’ नावाच्या क्रांतिकारकांच्या संघटनेचा एक भाग म्हणून सन १९०० मध्ये ‘मित्रमेळा’ हे लघुरूप आकारात येत होते. १९०६ ते १९०९ या काळात येसू वहिनींचे पती बाबाराव यांनी ९ पुस्तिका प्रकाशित केल्या. या प्रकाशनासाठी व घर चालविण्यासाठी येसूवहिनीने आपला एकेक दागिना विकला. ‘अभिनव भारत’ नावाच्या क्रांतिकारी गुप्त संघटनेशी विलायतेला शिकायला गेलेल्या तात्याराव सावरकर यांचा संबंध होता. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये सन १९०० साली ‘मित्रमेळा’ नावाची संस्था स्थापन झाली होती. त्याचे कौशल्यपूर्ण संघटन बाबारावांनी केले. १९०६ ते १९०९ या काळात या संस्थेमार्फत बाबासाहेबांनी ९ पुस्तिका प्रकाशित केल्या. त्यात पुढे ‘स्वातंत्र्यकवी’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या कवी गोविंद यांचा कविता संग्रह होता. हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल बाबारावांना ‘राजद्रोही’ म्हणून १९४९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊन अंदमानला कारावासात ठेवले. या प्रसंगाने येसूवहिनींच्या आयुष्यात वणवा पेटला व तो तिला भस्म करूनच विझला.
सुख या शब्दाशी येसूवहिनींची ओळख अखेपर्यंत झालीच नाही. त्यांच्या दोन्ही मुली अल्पायुषी झाल्या. नवऱ्याच्या चळवळीमुळे घरदारही गेले, जप्त्या तर किती तरी वेळा झाल्या. घरातील कर्ती स्त्री म्हणून या जप्त्याला तोंड द्यावे लागले. शेवटची जप्ती आली तेव्हा येसूवहिनी बावीस-तेवीस वर्षांच्या होत्या. पती व दिराच्या कामाची त्यांना उत्तम जाणीव आली होती.
१९०५ साली स्वदेशीच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वदेशीचे व्रत घेऊन ते आजन्म पाळले. काचेची बांगडी हे महाराष्ट्रात सौभाग्यचिन्ह मानतात. पण बांगडीची काच परदेशी असे म्हणून त्यांनी काचेची बांगडी घालणे सोडले. त्यांच्या अखेरच्या दुखण्यात हात सुजले होते. हातातल्या बांगडय़ा कापून काढाव्या लागल्या. दोन्ही हातात काळ्या मण्यांची मनगटे बांधली होती. कारण सवाष्णीचा हात रिकामा ठेवणे हे अशुभ होते. याच सुमारास येसूवहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ या नावाने एक महिला मंडळ सुरू केले. मित्रमेळ्याचे सदस्य एक एक करून राजद्रोहाखाली तुरुंगात गेले. त्यांच्या बायकांना कोणीही वाली नव्हता. त्यांचे नातेवाईक त्यांना दारातही उभे करत नव्हते. येसूवहिनीही त्याला अपवाद नव्हत्या. घरावरच्या जप्तीनंतर मामाकडे आश्रय मागणाऱ्या येसूवहिनींना आजोळचे दार कायमचे बंद झाले. त्यांच्यासारखाच प्रसंग ओढविलेल्या स्त्रियांना आपल्या संघातर्फे त्यांनी धीर दिला. या संघाने स्वदेशीचे व्रत घेतले. काचेची बांगडी व साखर वज्र्य केली. दर शुक्रवारी संघाची सभा भरे. वर्तमानपत्रातील निवडक बातम्या व लेख वाचून दाखवून त्यावर चर्चा होई. त्यामुळे नाशिकमध्ये बहिष्कार, स्वदेशी चळवळी चुलीपर्यंत पोहोचल्या. या संघाचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे कवी गोविंदांच्या कवितांचे जतन व रक्षण. बाबारावांनी या कवितांच्या पाच पुस्तिका छापल्या होत्या. त्या जप्त झाल्या. पण येसूवहिनींना या कविता मुखोद्गत होत्या. त्यांनी संघातील बायकांना शिकविल्या. येसूवहिनींचा आवाज गोड होता. त्यांच्यामुळे या कविता नष्ट झाल्या नाहीत, ही येसूवहिनी व त्यांच्या संघाची फारच मोठी देणगी स्वतंत्रता देवतेला आहे.
बाबारावांनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणरावही पकडले गेले. मोठय़ा प्रयासाने जमविलेले सर्व संसार साहित्य जप्त झाले. याच प्रसंगावर वीर सावरकरांनी त्यांचे सांत्वन करण्यासाठी लिहिलेली ‘सांत्वन’ ही अप्रतिम कविता आहे. त्या कवितेतील ‘तू धैर्याची असशी मूर्ति। माझे वहिनी माझे स्फूर्ती।।’ या दोन ओळी येसूवहिनीबद्दल खूप काही सांगून जातात. आपल्या पती व दिराच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी राष्ट्रसेवेचे लोहकंकण हातात घातले. त्यांच्यावरच्या प्रसंगात बाबारावांचे वर्गबंधू रामभाऊ दातार व कवी गोविंद यांनी मात्र परिणामांची तमा न करता होईल ती मदत येसूवहिनींना केली. अभिनव भारत संस्थेच्या मादाम कामा त्यांना दरमहा ३० रुपये पाठवीत. त्यातच येसूवहिनींची गुजराण होई. नारायणराव सहा महिन्यांनी सुटून आल्यावर त्यांना कलकत्त्याला आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा करायला लागणारे पैसेही यातूनच त्या खर्च करीत.
येसूवहिनींना काळ्या पाण्यावरच्या कैद्याची बायको म्हणून बायकाच नव्हे, तर पुरुषही हिणवीत असत. मंगलकार्यात तर बोलावत नसतच, पण सवाष्ण म्हणूनही जेवायला बोलवत नसत. त्यांच्याच सारखे भोग इतरही स्वातंत्र्यसैनिकांच्या बायकांच्या नशिबी होते. येसूवहिनी अशा बायकांना धीर देत असत. त्या अत्यंत समयसूचक होत्या. मुंबईत बाबारावांना अटक झाल्याचा निरोप आला, तेव्हा रात्रीच्या रात्री त्यांनी सर्व संशयित वस्तू हलविल्या. पहाटे पाचला धाड पडली, पण थोडेसे कपडे व भांडी पोलिसांच्या हाती आली. त्यांनी ती पुस्तके, टिपणे व इतर साहित्य हलवले नसते तर सावरकर कुटुंबाची खैर नव्हती. सावरकर कुटुंबाचा एक विशेष म्हणजे व अनुकरणीय गुण म्हणजे ते आपल्या घरातील बायकांपासून काही लपवीत नसत. त्यामुळे प्रसंग पडल्यावर कसे वागावे हे त्यांच्या झटकन लक्षात येई. त्याचमुळे येसूवहिनी हातबॉम्ब घेऊन जाणाऱ्या श्री. बर्वे यांना वाचवू शकल्या.
नारायणराव बाबारावांना भेटण्यासाठी पोलीस कोठडीत गेले होते. ही संधी साधून सावरकरांच्या घरावर पोलिसांनी धाड घातली. त्यांच्या हाती घबाड आले. सर्व कार्यकर्त्यांची नावे व पत्ते आले. कितीतरी तरुण पकडले गेले व त्यांची बायकामुले अक्षरश: रस्त्यावर आली. त्यांना धीर व मदत देण्याचे काम येसूवहिनींनी केले. त्यामुळे मित्र मंडळात जो मान व महत्त्व बाबारावांना होते तेच त्यांच्या पश्चात येसूवहिनींना मिळाले. त्या वेळी येसूवहिनी ऐन पंचविशीत होत्या. अनवाणी पायांनी त्या सर्वत्र फिरत. ‘आपण सर्व एक आहोत व पारतंत्र्याची नदी पार करू,’ असा विश्वास येसूवहिनींनी या पीडित बायकांत निर्माण केला.
नारायणराव डॉक्टर झाल्यावर सावरकर कुटुंब मुंबईला राहायला गेले. युद्ध समाप्तीनंतर येसूवहिनींनी बाबारावांची भेट मागितली, पण ती मिळाली नाही. व्रतं वैकल्ये व उपवास करीत राहिल्यामुळे प्रकृती खंगली. जवळजवळ १ वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या, त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीला भेटण्याचा परवाना आला. तोपर्यंत त्या अनंतात विलीन झाल्या होत्या. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वप्रेरणेने त्यांनी क्रांतिकारकांच्या परिवारांचे संघटन व मदत केली. स्वदेशी व्रत, आत्मनिष्ठ युवती संघ स्थापना, घरावर वारंवार पडणाऱ्या धाडींना धैर्याने तोंड देणे, समविचारी, समवयस्क मैत्रिणींना नैतिक पाठिंबा देऊन मदत करणे यात त्यांनी झोकून दिले होते. भारत सरकारच्या स्वातंत्र्यसैनिकासंबंधीच्या व्याख्येत त्या बसत नसल्या तरी त्यांनी जे सोसले ते कोणत्याही क्रांतिकारकाने सोसले त्यापेक्षा कणभर कमी नाही. खरं म्हणजे त्यांना स्वातंत्र्यसैनिका न म्हणणे म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या स्त्रियांनी हे जे मूक बलिदान केले त्याचा घोर अपमान करणे आहे. येसूवहिनी यांच्या आत्मनिष्ठ युवती संघाचे व त्यांच्या संघटना कौशल्यावर अधिक संशोधन करणं, हीच त्यांना श्रद्धांजली.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. तत्पूर्वी इंग्रजांनी हिंदुस्थानातील एकापाठोपाठ एक राज्ये जिंकली किंवा निरनिराळ्या कारणांनी ती खालसा केली. लवकरच त्यांचे साम्राज्य उभे राहिले. या काळात इंग्रजांविरुद्ध खालसा झाल्यामुळे पेटून उठलेले पुरुष राज्यकर्ते होते तशाच स्त्री राज्यकर्त्यांही होत्या. आपले स्वातंत्र्य गेले याची त्यांना तीव्र जाणीव झाली व त्यातूनच १८५७ चे बंड झाले. या घटनेपासून आपण सर्व हिंदवासी एक आहोत व इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं ही भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. या बंडाच्या काळापासून घडत गेलेली एक गोष्ट स्त्रीअभ्यासकांच्या लक्षात आली ती म्हणजे बंडाच्या काळात व या काळानंतरही पुढे जे आणखी उठाव स्वातंत्र्यासाठी झाले त्यातल्या राजघराण्यातील स्त्रियांच्या सहभागाचा थोडा तरी उल्लेख मिळतो, पण याही काळापासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न या देशात झाले, त्यात सामान्य स्त्रीचेही योगदान आहे, हे दुर्लक्षित झाले आहे. हाच धागा पकडून १८५७ ते १९४७ सालापर्यंत आणि त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम व गोवा मुक्तिसंग्राम यात ज्यांनी अभूतपूर्व काम केले अशा सामान्य स्त्रियांचे योगदान समाजापुढे आलेच नाही. ते आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, हे लक्षात आले.
लोकसत्तेच्या २६ जानेवारी २०१३ च्या चतुरंग पुरवणीत ‘ते झेंडावंदन..येरवडा जेलमधलं’ हा लेख प्रसिद्ध झाला व त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या लेखात शाळकरी व महाविद्यालयीन तरुणी असलेल्या राजकीय स्त्री कैद्यांनी येरवडा जेलवर २६ जानेवारी १९४३ ला तिरंगा फडकवल्याची कथा आहे. यानिमित्ताने अशा अनेक मुली-स्त्रिया त्या काळात होऊन गेल्या, त्यांची ओळख व त्यांचे कार्य आजच्या पिढीसमोर आणणे जरुरीचे आहे, याची जाणीव झाली. स्वातंत्र्यपूर्वकालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन आज पार बदलून गेले आहे. त्यांचे संदर्भही बदलले आहेत. आज स्त्रीला मिळणारे व्यक्तिस्वातंत्र्य अत्यंत मर्यादित व दिखाऊ स्वरूपाचे आहे. आजही स्त्री स्वतचे आरोग्य, शिक्षण, लैंगिकता, सामाजिक-आर्थिक व राजकीय प्रश्न यांबाबत निर्णय घेऊ शकत नाही. काही अपवाद आहेत, हे मान्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा एकच ध्यास होता. बाकी सर्व प्रश्न स्वातंत्र्यानंतर आपोआप सुटतील असा समज होता. लोकमान्य त्याबाबतीत म्हणत की झाडाच्या बुंध्यावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतील. पण आज आपल्याला ते घडलेले दिसत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण महिलांच्या बाबतील एक नागरिक म्हणून तिला स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. हे स्वातंत्र्य कायद्याने मान्य केलेलं असले तरीसुद्धा !
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सामान्य स्त्रीला खऱ्या अर्थाने खेचून आणण्याचे कार्य महात्मा गांधींचे आहे, हे निर्विवाद आहे. गांधीप्रणीत चळवळीत शेतकरी, कामकरी, मध्यमवर्ग ते ऐश्वर्यसंपन्न वर्गातील स्त्रिया यांच्यापर्यंत अनेकांनी या संग्रामात उडी घेतली. घरसंसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रियांनी आपलाही या संग्रामातला खारीचा वाटा उचलला. या स्त्रियांचे कार्य वाचले-ऐकले की सामान्यांमध्येही असामान्य कसे असते, याची प्रचीती येते. मान वर करून कुणाला प्रतिकार करण्याचे, विरोध करण्याचे तर सोडाच पण उंबरठय़ाबाहेर सणासुदीच्या अगर लग्नाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या या काळातील स्त्रियांनी सर्व बंधने सोडून स्वातंत्र्याच्या लढय़ात भाग घेतला. हे एक जागतिक आश्चर्यच होय. काहींनी घरातच राहून भूमिगतांना मदत करणे, दारुगोळा व इतर सामुग्री सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवणे अशी अत्यंत जोखमीची कामे केली. ही कामे करताना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काही मिळेल असा स्वार्थ नव्हता. फक्त स्वातंत्र्य मिळवण्याचा उद्देश होता. त्या सर्वजणी स्वातंत्र्याचे स्वागत करून परत आपल्या संसाराला लागल्या.
१८५७ च्या बंडाचे नेते नानासाहेब पेशवे यांची कन्या मैनावतीने आपल्या वडिलांचा ठावठिकाणा सांगावा म्हणून तिला इंग्रजांनी जिवंत जाळले. काशीबाई हणबरने आपल्या पतीचा ठावठिकाणा सांगावा म्हणून पोलिसांनी तिच्या गुप्तांगात तिखट भरले. नागनाथ नायकवडींच्या आईला याच कारणासाठी इतके बेदम चोपले की तिचे मानसिक असंतुलन झाले. ते तिच्या मृत्यूपर्यंत कायम होते. सातारचे पत्रीसरकार मराठवाडा मुक्तसंग्राम गोवा मुक्तिसंग्राम या व अशाच तऱ्हेच्या लढय़ामध्ये शिक्षा झालेल्या व न झालेल्या स्त्रियांचे योगदान हे गुलदस्त्यातच राहिले. चाफेकर बंधूंच्या पत्नी व येसूवहिनी सावरकर यांच्या योगदानाबद्दलची माहिती आज कुणालाही नाही. मागास समजल्या जाणाऱ्या मुस्लीम स्त्रियांचे योगदानही पुढे आलेले नाही. काहींनी तर पाकिस्तानात जायचेच नाकारले. खान अब्दुल गफारखान यांची चुलत सून सोफिया खान ही त्यापैकीच एक. तिची मुल, नवरा सगळे पाकिस्तानात गेले. तिच्यावरही पाकिस्तानात जाण्याची जबरदस्ती झाली. मात्र, पाकिस्तानात गेल्यावर आजारी पडल्यामुळे मला माझ्या मातृभूमीतच मरायचे, असा हट्ट धरून तिने मुंबईत येऊन देह ठेवला. पारसी व ख्रिस्ती महिलांचेही स्वातंत्र्यलढय़ात असेच पडद्यामागचे पण अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. या सर्व स्त्रियांनी की ज्यांच्याबद्दल आपण आता या सदरातून नियमितपणे वाचणार आहोत, त्यांनी आपल्याला जमेल त्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. त्यांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याकरिता मागच्या पिढीतील स्त्रियांचे हे अप्रकाशित योगदान पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, म्हणून हे नवीन सदर त्यांच्या योगदानाची माहिती देणारं दर पंधरवडय़ाने.